Home LATEST NEWS ताजी बातमी हरदीप सिंग निज्जर हत्या प्रकरणी कॅनडात अटक झालेल्या 3 भारतीय तरुणांच्या कुटुंबीयांचं...

हरदीप सिंग निज्जर हत्या प्रकरणी कॅनडात अटक झालेल्या 3 भारतीय तरुणांच्या कुटुंबीयांचं काय म्हणणं आहे?

2
0

Source :- BBC INDIA NEWS

डावीकडून उजवीकडे- करणप्रीत, करण ब्रार आणि कमलप्रीत

फोटो स्रोत, RCMP HANDOUT

फुटीरतावादी शीख नेते हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येच्या प्रकरणात कॅनडातील पोलिसांनी शुक्रवारी तीन भारतीय तरुणांना अटक केली.

एका गुरुद्वाऱ्याच्या पार्किंगमध्ये 18 जून 2023 ला हरदीप सिंग निज्जर यांच्यावर हल्लेखोरांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. निज्जर कॅनडातील व्हॅंक्युवर मधील गुरुनानक शीख गुरुद्वाराचे अध्यक्ष देखील होते.

कॅनडाच्या इंटीग्रेटेड होमिसाईड इन्व्हेस्टिगेशन टीमने 3 मे रोजी 3 आरोपींना ताब्यात घेतलं.

अटक झालेले तिघे भारतीय तरुण असून त्यांची नावं करण बराड, करणप्रीत सिंह आणि कमलप्रीत सिंह अशी आहेत.

बीबीसीने या तिघा आरोपींची कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

पंजाबमधील रहिवासी असणारे तीन तरुण

करण बराड हा 22 वर्षीय तरुण पंजाबमधील फरीदकोटचा रहिवासी आहे. तर करणप्रीत गुरदासपूरचा रहिवासी असून तिसरा आरोपी कमलप्रीत जालंधर जिल्ह्यातील रहिवासी आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी निज्जर यांच्या हत्येत भारत सरकारच्या एजंटांचा सहभाग असल्याचे आरोप केले होते.

ट्रुडो यांनी हे आरोप सप्टेंबर 2023 मध्ये कॅनडाच्या संसदेत केले होते. मात्र भारत सरकारनं या आरोपांना ‘बिनबुडाचे’ ठरवलं होतं.

करण बराड हा स्टडी व्हिसावर कॅनडात गेला होता. पंजाब पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करण बराड हा फरीदकोट जिल्ह्यातील कोटकपुरा शहरातील रहिवासी आहे. तो मूळचा या परिसरातील कोट सुखिया गावचा आहे.

निज्जरच्या हत्येप्रकरणी तीन तरुणांना कॅनडामध्ये अटक करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, RCMP

पंजाब पोलिसांच्या सूत्रांनी सांगितलं की, “करण बराड याने कोटकपुरामध्ये शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर 2020 मध्ये तो स्टडी व्हिसावर कॅनडात गेला होता.”

पोलिसांचं म्हणणं आहे की, करण बराड एक जमीनदार कुटुंबातील आहे. शेजाऱ्यांकडून आणि आसपासच्या लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, करणचे आजोबा बलबीर सिंह बराड स्थानिक व्यावसायिक आहे.

करण आपल्या आई-वडिलांचं एकमेव अपत्य आहे. त्याच्या परिचितांनी सांगितलं की, करण बराडची आई रमण बराडचं कामानिमित्त सिंगापूरमध्ये वास्तव्य होतं. करण बराडचे वडील मंदीप बराड यांचं मागील महिन्यात 18 एप्रिलला निधन झालं होतं. त्यामुळे करणची आई भारतात परतली होती.

करण बराडला कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही

फरीदकोटचे एसपी जसमीत सिंह यांनी सांगितलं की करण बराडला कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही.

मात्र करणच्या वडिलांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. बीबीसीला हाती आलेल्या एफआयआर नुसार करणचे वडील मंदीप सिंह बराड फरीदकोट जिल्ह्यातील कथित फसवणुकीच्या आरोपांना तोंड देत होते.

त्यांच्या विरोधात कोटपुरा पोलिस स्टेशनमध्ये एक एप्रिल 2024 ला भारतीय दंड विधानाचं कलम 420 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.

शनिवारी जेव्हा बीबीसीची टीम करण बराडच्या घरी पोचली तेव्हा त्याच्या घराला कुलुप होतं.

फोटो स्रोत, bbc

रविंदरपाल सिंह यांच्या तक्रारीनंतर फरीदकोट जिल्ह्यातील कोटकपुरा पोलिस स्टेशनमध्ये मंदिप सिंह यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आली होती.

या एफआयआरमध्ये रविंदरपाल सिंह यांनी तक्रार केली होती. 2018 मध्ये कॅनडाचा व्हिसा मिळवण्यासाठी त्यांनी मंदीप सिंह यांना अडीच लाख रुपये दिले होते. मात्र त्यांना व्हिसा तर मिळालाच नाही आणि पैसेदेखील परत करण्यात आले नाहीत.

गुरदासपूरच्या करणप्रीत बद्दल काय माहिती आहे?

गुरदासपूरचे बीबीसी प्रतिनिधी गुरप्रीत सिंह चावला यांनी दिलेल्या माहितीनुसार करणप्रीत सिंह गुरदासपूर जिल्ह्यातील सुंदल गावचा रहिवासी आहे.

करणप्रीत एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहे. त्याचे वडील दुबईत ट्रक ड्रायव्हर आहेत. सुंदल गावच्या सरपंचाचे सुपुत्र आणि करणप्रीत सिंहचे काका रणजीत सिंह राणा यांचं म्हणणं आहे की, करणप्रीतचा जन्म आणि पालनपोषण एका सर्वसामान्य कुटुंबात झालं आहे.

त्यांनी सांगितलं की प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर 2016 मध्ये करणप्रीत दुबईत गेला. तिथे त्याने आपल्या वडिलांबरोबर जवळपास चार वर्षे ट्रक ड्रायव्हरची नोकरी केली.

करणप्रीतच्या कॅनडात जाण्याबद्दल रणजीत सिंह यांनी सांगितलं की, करणप्रीत वर्क परमिटवर कॅनडात गेला होता. ते पुढे म्हणाले की, करणप्रीत मागील तीन वर्षांपासून कॅनडात होता. तिथे तो ट्रक ड्रायव्हर होता.

त्यांनी हे देखील सांगितलं की, “करणप्रीतची भारतात कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. उलट त्याचा स्वभाव सर्वांमध्ये मिसळण्याचा आहे. त्यामुळेच त्याच्या अटकेचं सर्व गावकऱ्यांना आश्चर्य वाटतं आहे.”

करणप्रीतचे नातेवाईक

फोटो स्रोत, bbc

ते म्हणाले, “करणप्रीतने त्याचं शालेय शिक्षण त्याच्या गावाजवळील एका शाळेतून पूर्ण केलं. पंजाबात राहत असताना कोणत्याही गुन्हेगारी कृत्यात त्याचा सहभाग असण्याची त्यांना कोणतीही माहिती नाही.”

करणप्रीतच्या कुटुंबानं सांगितलं की ,अशा प्रकारच्या गुन्ह्यात त्यांच्या मुलाचा सहभाग असू शकतो या गोष्टीवर त्यांचा विश्वास बसत नाही.

करणप्रीतला दोन बहिणी आहेत आणि त्या दोघींचं लग्न झालेलं आहे. गावकऱ्यांनी सांगितलं की, करणप्रीत सिंहचं जवळ दोन दिवसांपूर्वीच आपल्या कुटुंबाशी बोलणं झालं होतं. हा संवाद नेहमीच्या संवादा प्रमाणे झाला होता.

त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं की, कर्जाची परतफेड करण्यासाठी करणप्रीतच्या कुटुंबियांनी त्याला कॅनडात पाठवण्याची व्यवस्था केली होती.

करणप्रीतच्या कुटुंबीयांनी त्याच्याबद्दल आणखी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला.

स्टडी व्हिसावर कॅनडात गेला होता कमलप्रीत सिंह

पंजाब पोलिसांनी माहिती दिली की, संशयितांपैकी एक असलेला कमलप्रीत सिंह जालंधर जिल्ह्यातील नकोदर उपविभागातील ‘चक कला’ या गावचा रहिवासी आहे.

कमलप्रीत सिंहने नकोदरमधील एका खासगी शाळेत शिक्षण घेतलं होतं. 2019 मध्ये त्यानं बारावी पूर्ण केली. त्यानंतर तो स्टडी व्हिसावर कॅनडात गेला होता.

कमलप्रीतच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती भक्कम आहे. कारण त्याचे वडील सतनाम सिंह नोकरी करतात आणि त्यांची गावात चांगली शेतजमीनदेखील आहे.

पंजाब पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, कमलप्रीतची बहिण कॅनडात वास्तव्यास आहे. 2022 मध्ये त्याची आई देखील त्यांना भेटण्यासाठी कॅनडात गेली होती.

करणप्रीतच्या गावाचा फोटो

फोटो स्रोत, bbc

जालंधर ग्रामीण पोलिसांचे वरिष्ठ पोलिस अधिकारी अंकुर गुप्ता यांनी बीबीसीला फोनवर सांगितलं की, “आमच्या तपासानुसार कमलप्रीत सिंहचं जालंधर जिल्ह्यात कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही.”

कमलप्रीतचे वडील सतनाम सिंह यांनी बीबीसीला सांगितलं की, “आमच्या मुलाच्या अटकेबद्दल आम्हाला बातम्यांमधूनच कळालं आहे. ही आमच्यासाठी दुःखद बाब आहे. कमलप्रीत 2019 मध्ये स्टडी व्हिसावर कॅनडात गेला होता. मागील दोन वर्षांपासून तो गुरदासपूरच्या करणप्रीतसोबत रहात होता. करण बराड बद्दल आम्ही कधीही ऐकलं नव्हतं.”

भारत सरकारची प्रतिक्रिया

रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले की, कॅनडाच्या पोलिसांनी अटक केलेल्या तीन भारतीय नागरिकांबद्दल माहिती मिळण्याची भारत वाट पाहिल.

ते म्हणाले, “कॅनडात या लोकांचा एखादी गुन्हेगारी टोळी सक्रिय होती का, कॅनडाच्या पोलिसांनी आम्हाला याबद्दल माहिती देण्याची आम्ही वाट पाहू. ही आमची चिंता आहे. आम्ही त्यांना सांगत आहोत की त्यांनी भारतातून कॅनडात, खासकरून पंजाबमधून संघटित गुन्हेगारीला परवानगी दिली आहे.”

कॅनडातील भारतीय उच्चायुक्त, संजय वर्मा म्हणाले की या तीन भारतीयांबद्दल कॅनडाच्या अधिकाऱ्यांकडून नियमितपणे माहिती मिळेल अशी आम्हाला आशा आहे.

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर

फोटो स्रोत, ANI

ते म्हणाले, “मला ठाऊक आहे की ही अटक म्हणजे कॅनडातील तपासाची परिणती आहे. हा कॅनडाचा अंतर्गत प्रश्न आहे आणि त्यामुळेच आम्हाला या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही.”

पंजाबातील रहिवासी होते हरदीप सिंग निज्जर?

हरदीप सिंग निज्जर जालंधर जिल्ह्यातील भार सिंह पुरा या गावचे रहिवासी होते. भारत सरकारच्या माहितीनुसार, निज्जर खलिस्तान टायगर फोर्सचे प्रमुख होते. खलिस्तान टायगर फोर्सच्या सदस्यांचं व्यवस्थापन, नेटवर्किंग, त्यांना प्रशिक्षण आणि आर्थिक मदत देण्यामध्ये निज्जर यांचा सक्रिय सहभाग होता.

पंजाब सरकारनुसार, निज्जर यांचे जालंधर जिल्ह्यातील मूळ गाव असलेल्या भार सिंह पुरामधील त्यांची एक एकर जमीन राष्ट्रीय तपास एजेन्सी (NIA)ने जप्त केली आहे.

वेगळ्या खलिस्तान राष्ट्रासाठी ‘सिख रेफरेंडम 2020’ हे ऑनलाईन अभियान चालवण्यासंदर्भातील एका प्रकरणात 2020 मध्ये निज्जर यांची पंजाबातील मालमत्ता जप्त करण्यात आली होती.

एजेन्सीनुसार, भारतात बंदी असलेल्या सिख फॉर जस्टिस या संघटनेशी देखील निज्जर यांचा संबंध होता. ऑस्ट्रेलियात खलिस्तान जनमत चाचणीसाठी घेतलेल्या मतदानाच्या काळात निज्जर दिसले होते.

हरदीप सिंह निज्जर खलिस्तान टायगर फोर्सचे प्रमुख होते

फोटो स्रोत, X/VIRSA SINGH VALTOHA

सप्टेंबर 2023 मध्ये जी-20 शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो भारतात आले होते. इथून परतल्यानंतर लगेचच त्यांनी 18 सप्टेंबरला कॅनडाच्या संसदेत वक्तव्य केलं होतं की निज्जर यांच्या हत्येमागे असणाऱ्या ‘भारत सरकारच्या संभाव्य सहभागाच्या आरोपां’चा तपास केला जातो आहे.

मात्र मोदी सरकारने कॅनडा आणि अमेरिकेत बेकायदेशीरपणे करण्यात येत असलेल्या हत्यांशी संबंध असल्याचा आरोपांचं खंडन केलं आहे.

ऑक्टोबर 2023 मध्ये भारताने कॅनडाच्या 40 राजनयिकांचे राजनयिक अधिकार रद्द केले होते. त्याचा परिणाम म्हणून कॅनडाच्या भारतातील दूतावासातील जवळपास दोन-तृतीयांश कर्मचाऱ्यांना भारतातून मायदेशी परतावं लागलं होतं.

भारतानं म्हटलं होतं की, शिख विभाजनवाद्यांना कॅनडा जी सूट देतो आहे, ती फक्त भारतासाठीच नाही तर कॅनडासाठीदेखील योग्य नाही.

मे 2024 च्या पहिल्या आठवड्यात कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पुन्हा एकदा निज्जर यांची हत्या आणि त्यातील भारताच्या सहभागाचा उल्लेख केला होता. भारताने यावर आक्षेप घेतला होता.

SOURCE : BBC