Home LATEST NEWS ताजी बातमी जगभरात चर्चेचा विषय ठरलेली सुनीता विल्यम्स यांची नवी अंतराळ मोहीम कशी आहे?

जगभरात चर्चेचा विषय ठरलेली सुनीता विल्यम्स यांची नवी अंतराळ मोहीम कशी आहे?

2
0

Source :- BBC INDIA NEWS

बोईंग स्टारलायनर

फोटो स्रोत, Getty Images

सुनीता विल्यम्स हे नाव तुम्ही नक्की ऐकलं असेल. भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स या नासाच्या अंतराळवीर आहेत आणि त्या आता पुन्हा एकदा – तिसऱ्यांदा अंतराळात जातायत. त्यांची ही तिसरी मोहीम ‘बोईंग स्टारलायनर’ नेमकी काय आहे? आणि ती नेहमीपेक्षा वेगळी का आहे?

गेल्या काही काळात अनेक महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमा पार पडल्या आहेत. भारताचं चंद्रयान, जपानचं स्लिम, चंद्रावर जाणारं खासगी यान ओडिसियस.

आता नासाचे दोन अंतराळवीर एका नवीन प्रकारच्या, खासगी कंपनीने बनवलेल्या यानात बसून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला म्हणजे ISS ला जातील. ISS हे अंतराळात असलेलं पृथ्वीला घिरट्या घालणारं एक तरंगतं अंतराळ केंद्र आहे. इथे राहून वेगवेगळ्या देशांचे अंतराळवीर वेगवेगळे प्रयोग आणि निरीक्षणं करतात.

या यानाचं नाव आहे बोईंग स्टारलायनर, जे अमेरिकेतल्या फ्लोरिडामध्ये असणाऱ्या केप कॅनाव्हरालमधून लाँच केलं जाईल. पहिल्यांदाच यातून दोन जणांचा क्रू प्रवास करेल.

बोईंग स्टारलायनर काय आहे?

इलॉन मस्क यांची ‘स्पेस एक्स’ कंपनी ही इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला अंतराळात माणूस पाठवणारी पहिली खासगी कंपनी ठरली होती. आताची मोहीम यशस्वी ठरली तर ‘बोईंग’ ही असं करणारी दुसरी कंपनी ठरेल.

अंतराळवीरांना घेऊन जाणारी यानं तयार करून ती ऑपरेट करण्यापेक्षा आता या सेवा कमर्शियल कंपन्यांकडून घेण्याला नासाचं प्राधान्य असणार आहे.

या बोईंग स्टारलायनरचा लाँच यशस्वी झाला तरी बोईंग कंपनीच्या अडचणी मात्र कमी होणार नाहीत. एकामागोमाग एक झालेल्या अपघातांमुळे बोईंगच्या विमान उद्योगावर टीका होतेय. शिवाय या स्टारलायनरचा विकास करताना बोईंगला लागलेला वेळ आणि टेस्ट फ्लाईटमध्ये आलेल्या अडचणींमुळेही बोईंगच्या अंतराळ शाखेवरही टीका होतेय.

स्टारलायनरची पहिली ‘Uncrewed’ म्हणजे मानवरहित चाचणी ही 2015 मध्ये होणार होती. पण त्याला उशीर होता होता 2019 उजाडलं. चाचणीसाठीचं हे उड्डाण झालं त्यावेळी सॉफ्टवेअरमध्ये अडचण आली आणि त्यामुळे आतलं घड्याळ योग्य चाललं नाही. परिणामी थर्टर्स्टनी जास्त इंधन वापरलं आणि ही कॅप्सूल स्पेस स्टेशनपर्यंत पोहोचू शकली नाही.

त्यानंतर ऑगस्ट 2021मध्ये पुन्हा चाचणी करण्याचं ठरवण्यात आलं, पण ही देखील मे 2022 पर्यंत पुढे ढकलली गेली.

स्टारलायनरने पृथ्वीवरून उड्डाण करून मिशन पूर्ण केलं खरं पण तरीही या यानाच्या तांत्रिक परफॉर्मन्सबद्दल काही शंका नंतर उपस्थित करण्यात आल्या.

याच अडचणी आणि इतर काही सुरक्षेशी निगडीत गोष्टी निस्तराव्या लागल्याने या यानाची मानवी क्रू सह चाचणी पुढे ढकलली गेली. जी आता 7 मे रोजी होतेय.

बोईंग स्टारलायनर

फोटो स्रोत, Getty Images

सगळ्या अडचणी सोडवल्या गेल्या शिवाय नासा आणि बोईंगने अंतराळवीरांना या मिशनवर जाण्यास परवानगी दिली नसणार. शिवाय स्पेसक्राफ्टमध्ये काही प्रॉब्लेम आहे अशी लक्षणं दिसल्यास हे उड्डाण थांबवण्यात येईल.

या यानाच्या चाचण्यांमध्ये इतक्या अडचणी आल्या, त्यामुळे तुमचं हे उड्डाण तुमचे कुटुंबीय आणि जिवलगांसाठी काळजीचं नाही का, असा प्रश्न पत्रकार परिषदेदरम्यान अंतराळवीरांना विचारण्यात आला.

त्यावर उत्तर देताना बॅरी ‘बुच’ विल्मोर यांनी सांगितलं, “तांत्रिक अडचणींना – सेटबॅक म्हणणं योग्य ठरणार नाही. त्यांना आम्ही एक पाऊल पुढे मानतो. आम्ही चूक शोधून ती सोडवली. आणि हे आम्ही आमच्या कुटुंबीयांनाही समजावून सांगितलं आहे.

या स्पेसक्राफ्टच्या पायलट सुनीता विल्यम्स म्हणाल्या, “आम्ही सगळे इथे आहोत कारण आम्ही सगळे सज्ज आहोत. आमचे कुटुंबीय आणि जिवलगांना याबद्दल माहिती आहे आणि आम्ही याबद्दल बोललो आहोत. आम्ही या सगळ्या गोष्टींवर मात करत या प्रक्रियेचा भाग असल्याचा त्यांना आनंद आणि अभिमान आहे.”

स्पेस एक्स आणि बोईंग

अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्याचं काम आता जुन्या अंतराळयानांच्या ऐवजी स्पेस एक्स आणि बोईंग या कंपन्या करतील असं जाहीर करत नासाने या दोन्ही कंपन्यांसोबत समान काँट्रक्ट केले होते. यानुसार या कंपन्यांच्या कॅप्सूल्स वापरण्यात येतील आणि सहा मिशन्ससाठीचा हा करार आहे.

स्पेस एक्स (Space X) सोबतचा करार 2.6 अब्ज डॉलर्सचा होता तर बोईंगसोबतच 4.2 अब्ज डॉलर्सचा. स्पेस एक्स कंपनीने मानवी क्रू सह 2020 मध्ये चाचणी केली. याचा अर्थ बोईंग 4 वर्षं मागे आहे. कंपनीने गोष्टी सुधारण्यासाठी खूप पैसा खर्च केला आहे.

बोईंग स्टारलायनर

फोटो स्रोत, Getty Images

स्पेस एक्स आणि इतर स्टार्टअप्सनी तंत्रज्ञान विकसित करण्याचा एक नवीन दृष्टीकोन ठेवल्याचं ओपन युनिव्हर्सिटीचे स्पेस सायंटिस्ट डॉ. सिमॉन बार्बर सांगतात.

बीबीसी न्यूजशी बोलताना त्यांनी सांगितलं, “एक जुनी स्पेस कंपनी आहे (बोईंग) जी दीर्घकाळापासून कार्यरत आहे आणि एका ठराविक पद्धतीने गोष्टी करते. आणि अशा काही नवीन स्पेस कंपन्या आहेत ज्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतात. म्हणजे संरचना, चाचण्या, त्या अपयशी ठरतात आणि त्यातून शिकून पुन्हा नव्याने उभारणी करतात. त्यामुळे तंत्रज्ञान विकसित करण्याचा त्यांचा वेग अधिक आहे.”

पण टेस्ट फ्लाईटदरम्यान अडचणी येणं हा नवीन अंतराळयान विकसित करण्याच्या प्रक्रियेचा भाग असल्याचं बोईंगच्या कमर्शियल क्रू प्रोग्रामचे मॅनेजर मार्क नापी यांचं म्हणणं आहे.

ते म्हणतात, “आरेखन आणि विकसन या टप्प्यांमध्ये सतत अडचणी येत असतात पण यातूनच सुधारणा होत असते.आणि त्यातूनच आम्ही इथवर आलो आहोत.”

बोईंगचं यान सेवेत आल्याने स्पेस एक्सला स्पर्धा मिळेल आणि परिणामी या प्रक्रियेसाठीचा खर्च कमी होईलं असं युकेच्या अंतराळ संस्थेच्या प्रमुख लिबी जॅक्सन यांना वाटतं.

“हे फक्त नासाच नाही तर युकेसह इतरही अंतराळ संस्थांसाठी महत्त्वाचं आहे. कारण अंतराळवीरांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला नेण्या-आणण्यासाठी करदातयांचा पैसा वापरला जातो आणि तो योग्यरीतीने वापरला जाणं गरजेचं आहे,” त्या सांगतात.

स्टारलायनर कसं आहे?

मागच्या बाजूला सर्व्हिस मॉड्यूल लावल्यानंतर स्टारलायनर अंतराळयान 5 मीटर उंच आणि 4.6 मीटर रुंद (16.5*15 फूट) आहे. अपोलो मोहीमांसाठी वापरण्यात आलेल्या कॅप्सूल्सपेक्षा स्टारलायनर रुंद आहे. यामध्ये 7 अंतराळवीरांना बसता येईल इतकी जागा आहे, पण नियमितपणे साधारण 4 अंतराळवीर यातून झेपावतील. 10 वेळा या कॅप्सूलचा वापर केला जाऊ शकतो.

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या दिशेने प्रवास करताना क्रू या यानामधील आसनव्यवस्था, यानातली इतर जीवनावश्यक प्रणाली आणि नेव्हिगेशन – मार्गदर्शक यंत्रणा, ISS मध्ये सामान नेणारी यंत्रणा यांची पाहणी करेल.

शिवाय हे अंतराळवीर नवीन स्पेससूट वापरून त्यांचीही चाचणी घेतील. बॅरी विल्मोर आणि सुनीता विल्यम्स हे बोईंगचे नवीन निळ्या रंगाचे स्पेससूट घालतील. अमेरिकेच्या याधीच्या अंतराळवीरांनी वापरलेल्या स्पेससूट्सपेक्षा नवीन स्पेससूट्सचं वजन 40% कमी आहे आणि ते अधिक फ्लेक्झिबल – ताणता येण्याजोगे आहेत. या सूटचे ग्लोव्हज टचस्क्रीन वापरण्यासाठी योग्य आहेत. त्यामुळे अंतराळयानातील टॅब्लेट्स अंतराळवीरांना वापरता येतील.

स्टारलायनर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला 10 दिवस Docked म्हणजे जोडलेलं असेल आणि त्यानंतर ते पृथ्वीवर परतेल. अमेरिकेची यापूर्वीची अंतराळवीरांना परत घेऊन येणारी कॅप्सूल्स समुद्रात कोसळत होती. पण स्टारलायनर मात्र नैऋत्य अमेरिकेत कुठेतरी जमिनीवर लँडिंग करेल.

या यानाला असलेलं Heatshield – उष्णता कवच आणि पॅराशूट त्याचा जमिनीकडे झेपावण्याचा वेग कमी करतील आणि जमिनीवर यानाची कॅप्सूल आदळू नये म्हणून एअरबॅग्सही उघडतील.

बोईंग स्टारलायनर

फोटो स्रोत, Getty Images

सर्वकाही व्यवस्थित झाल्यास स्टारलायनर यानाला नियमितपणे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला अंतराळवीर घेऊन जाण्याचं काम करण्याचं प्रमाणपत्रं मिळेल. याचा पुढचा लाँच 2025च्या सुरुवातीला नियोजित असून या फेरीद्वारे 4 अंतराळवीर, यंत्र आणि सामान ISS ला नेण्यात येईल.

1998मध्ये हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन बांधायला सुरुवात करण्यात आली तेव्हापासून आजवर शंभराहून अधिक मानवी मोहिमा इथे आलेल्या आहेत. पण असं असलं तर स्टारलायनरने अंतराळवीरांना घेऊन झेपावणं हा महत्त्वाचा टप्पा असल्याचं क्वालिटी या अमेरिका स्थित स्पेस कन्सलटन्सी फर्मचे कॅलेब हेन्री सांगतात.

बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं, “आपण आता मानवाद्वारे करण्यात येत असलेल्या संशोधनाच्या एका नवीन पर्वात प्रवेश करत आहोत. खासगी क्षेत्राची वाढती भूमिका उत्साहवर्धक आहे. यामुळे अंतराळप्रवास वाढेल, ज्यामुळे नवीन संधी तयार होतील.”

सुनीता विल्यम्स कोण आहेत?

बोईंग स्टारलायनरमधूनचा सुनीता विल्यम्स अंतराळात झेपावतील तेव्हा ही त्यांची तिसरी अंतराळवारी असेल. 1998 मध्ये सुनीता विल्यम्स यांची नासामध्ये अंतराळवीर – Astronaut म्हणून निवड करण्यात आली. नासासोबत यापूर्वी त्यांनी 14/15 आणि 32/33 क्रमांकाच्या मोहिमा केल्या आहेत.

सुनीता विल्यम्स

फोटो स्रोत, Getty Images

एक्सपिडीशन 14/15 साठी त्या डिसेंबर 2006 ते जून 2007 अंतराळात होत्या. या काळात फ्लाईट इंजिनियर म्हणून काम करताना त्यांनी कोणत्याही महिला अंतराळवीराकडून करण्यात आलेल्या सर्वाधिक स्पेसवॉक्सचा विक्रम केला होता. तब्बल 29 तास 17 मिनिटांच्या कालावधीचे 4 स्पेस वॉक्स सुनीता विल्यम्य यांच्या नावावर आहेत. त्यांचा हा विक्रम नंतर अॅस्टॉनॉट पेगी व्हिटसन यांनी मोडला.

त्यानंतर जुलै 2012 मध्ये सुनीता विल्यम्स पुन्ह अंतराळात झेपावल्या. यावेळी त्या 4 महिने इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये होत्या.

एकूण दोन मिशन्ससाठी सुनीता विल्यम्स यांनी 322 दिवसांचा काळ अंतराळात घालवला आहे.

SOURCE : BBC