Home LATEST NEWS ताजी बातमी विजेच्या धक्क्यात एक हात गमावला, तरी अनमताला दहावीत 92% गुण

विजेच्या धक्क्यात एक हात गमावला, तरी अनमताला दहावीत 92% गुण

1
0

Source :- BBC INDIA NEWS

अनमता खरे

फोटो स्रोत, Anamata Khare

“एक हाथ गया तो हुआ यार क्या, मंजील अपनी पाऊंगी” अनमता अहमद या तरुणीने अभिनय केलेल्या ‘फुलपरी’ या गाण्यातील शब्द तिनेच खरे करून दाखवत आहे.

ऑक्टोबर 2022 मध्ये विजेचा धक्का लागल्याने 13 वर्षीय अनमता अहमदचा उजवा हात तिला गमवावा लागला. पण अनमताने परिस्थितीचा सामना करत आपली शाळा पूर्ण केली.

नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीएसई (ICSE) बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत अनमताला 92 टक्के गुण मिळाले आहेत.

बीबीसी मराठीशी बोलताना अनमता अहमद सांगते, “मला अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीतून जावं लागलं पण मला कोणाचीही सहानुभूती नको होती. उजवा हात गेला पण मी डाव्या हाताने लिहायला शिकले, दररोज सराव केला. अभ्यास केला आणि 92 टक्के गुण मिळवले.”

मुंबईतील गोरेगाव येथे राहणारी अनमता अहमद सीटी इंटरनॅशनल शाळेत शिक्षण घेत आहे. दोन वर्षांपूर्वी अनमता 13 वर्षांची असताना तिच्यासोबत एक मोठा अपघात घडला. पण तिने स्वत:ला सावरलं आणि धाडसाने त्यावर मात केली.

अभिनय क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेली अनमता लहानपणापासूनच शाळेतील मनोरंजन कार्यक्रम आणि खेळात सक्रिय सहभाग घेत होती. पण हसत्या-खेळत्या अनमताचं आयुष्य एका अपघाताने पूर्णपणे बदललं.

30 ऑक्टोबर 2022 रोजी अनमता आपल्या आत्याच्या घरी अलीगढ राहण्यासाठी गेली होती. तिकडे गच्चीवर खेळत असताना 11 KV केबलला हात लागून तिला इलेक्ट्रिक शाॅक बसला आणि ती बेशुद्ध पडली.

अनमता खरे

फोटो स्रोत, Anamata Khare

सुरुवातीला तिला स्थानिक हाॅस्पिटलमध्ये दाखल केलं. त्यानंतर दिल्ली येथे खासगी हाॅस्पिटलमध्येही उपचार झाले. नंतर मुंबईत उपचार सुरू केले. या दरम्यान तिच्या हातावर तीन वेळा शस्त्रक्रिया करावी लागली. अनमताचा उजवा हात यात काढावा लागला. तर डावा हातसुद्धा केवळ 20 टक्केच काम करत होता.

त्वचारोपणही करावं लागलं. या प्रसंगाविषयी बोलताना अनमता सांगते, “मला आजही तो क्षण लक्षात आहे. विजेचा धक्का लागल्यावर संपूर्ण शरीरात झिणझिण्या आल्या, डोळ्यासमोर अंधार आला, एक आवाज झाला, तो आवाज आजही तशाच्या तसा लक्षात आहे आणि नंतर मी बेशुद्ध पडले.”

अनमता खरे

फोटो स्रोत, Anamata Khare

“तीन शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. माझा उजवा हात गेला. डाॅक्टरांनी पालकांना सांगितलं की, तिच्यासाठी मानसिक धक्कासुद्धा आहे तिला शिक्षणातून ब्रेक घ्यायला सांगा आणि काही काळ लोकांमध्ये जाऊ नका. पण मला हे मान्य नव्हतं. मला घरी बसायचं नव्हतं. मी शाळेतही गेले आणि लोकांमध्येही जायला सुरुवात केली. कारण मी खचले असते तर माझे आई-वडील आणखी खचले असते,”

हा अपघात झाला त्यावेळी अनमता इयत्ता नववीत होती. तीन महिने ती हाॅस्पिटलमध्ये दाखल होती. त्यानंतर तिने पुन्हा शाळेत जाण्यास सुरुवात केली.

‘डाव्या हाताने लिहायला शिकले’

शाळेतलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी अनमताने डाव्या हाताने लिहायला सुरुवात केली. ती डाव्या हाताने लिहायला शिकली.

“मी दररोज सराव करायचे. हे खूप अवघड होतं. कारण मी एवढे वर्षं कधीच डाव्या हाताने लिहिलं नव्हतं. पण मला शिकायचं होतं. शालेय शिक्षण पूर्ण करायचं होतं. मी यासाठी खूप मेहनत घेतली. डाव्या हाताने लिहायला शिकले.” असं अनमता सांगते.

दहावीचं वर्ष विद्यार्थी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. बोर्डाची परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांनाही त्याचं वेगळं महत्त्व आणि दबाव येत असतो. पण अशा परिस्थितीतही अनमताने 92 टक्के गुण मिळवले.

अनमता सांगते,”मी शाळा आणि खासगी क्लासमध्ये शिकले. मी बाकी गोष्टींचा फार विचार केला नाही. मी अभ्यासावर लक्ष केंद्रीत केलं. मला कोणाचीही सहानुभूती नको होती. पण मला माझ्या मित्र परिवाराने खूप मदत केली. त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं मला. त्यांच्यासोबत मी वेळ घालवायचे. अभ्यास करायचे.”

दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी अनमताला उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी बोर्डाकडून रायटर उपलब्ध झाला. त्याचीही तिला मदत झाली कारण वेळेत पेपर पूर्ण करायचा असल्याने तिला रायटर घेण्याचा सल्ला देण्यात आला होता.

अनमता खरे

फोटो स्रोत, Anamata Khare

” घरी आल्यावर मी माझ्या दरवाजावर सहानुभूती नको ‘No sympathy’ असा फलक लावला.” असंही ती सांगते.

हाॅस्पिटलमधून बाहेर आल्यानंतर 20 दिवसांतच अनमताने एक म्युझिक व्हीडिओमध्ये अभिनय केला. अभिनेते पीयूष मिश्रा यांनी तिच्यासाठी गाणं लिहिलं. ‘फुलपरी’ असं या म्युझिक अल्बमचं नाव आहे. यावेळी अनमताने सुमारे 200 लोकांच्या उपस्थितीत सादरीकरण केलं होतं.

“मला माझ्या परफाॅरमन्समधून सगळ्यांना प्रोत्साहित करायचं आहे. त्यांनी परिस्थितीला घाबरून न जाता आहे त्या परिस्थितीचा सामना करत आयुष्य जगायला हवं.” असं अनमता सांगते.

अनमता मुंबईतच वाणिज्य शाखेत महाविद्यालयात प्रवेश घेणार आहे. पण तिला अभिनय किंवा फिल्म मेकींगमध्ये करिअर घडवण्याची इच्छा आहे.

इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (आयएससीई) आणि ‘आयएससी’ बोर्डाचे निकाल नुकतेच जाहीर झाले. दहावीचा निकाल 99.47 टक्के तर बारावीचा निकाल 98.19 टक्के लागला आहे.

तसंच दहावी परीक्षेत 99.65 टक्के मुलं तर 99.65 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर बारावी परीक्षेत मुलांचा निकाल 97.53 टक्के तर मुलींचा निकाल 98.12 टक्के लागला आहे.

संबंधित बातम्या

SOURCE : BBC