Home LATEST NEWS ताजी बातमी पुरुषांमध्ये लिंगाच्या कर्करोगाचं प्रमाण वाढलं, भारतात काय स्थिती? महत्त्वाची माहिती

पुरुषांमध्ये लिंगाच्या कर्करोगाचं प्रमाण वाढलं, भारतात काय स्थिती? महत्त्वाची माहिती

1
0

Source :- BBC INDIA NEWS

Penile cancer: पुरुषांमध्ये लिंगाच्या कर्करोगाचं प्रमाण वाढलं, भारतात काय स्थिती?

फोटो स्रोत, Getty Images

7 मे 2024, 16:19 IST

अपडेटेड 35 मिनिटांपूर्वी

2018 सालची गोष्ट. ब्राझिलमधले 63 वर्षीय निवृत्त कर्मचारी जोआव (नाव बदलले आहे) यांना त्यांच्या लिंगावर चामखिळ (मस्सा किंवा मोस) सारखं काहीतरी आढळून आलं, तेव्हा ते डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी गेले.

जोआव सांगतात, “मी निदान व्हावं म्हणून वेगवेगळ्या दवाखान्यात गेलो. पण सगळ्या डॉक्टरांनी मला सांगितलं की ही त्वचेची अतिरिक्त वाढ आहे, त्यांनी मला औषधही दिलं.”

पण औषध घेतल्यावरही ती मोस वाढत राहिली. जोआव यांच्या पत्नीसोबतच्या लैंगिक संबंधांवर आणि पर्यायानं वैवाहिक आयुष्यावरही त्याचा परिणाम झाला. नेमकं काय झालं आहे, हे शोधून काढायचंच असं त्यांनी पक्कं केलं.

पाच वर्ष जोआव वेगवेगळ्या डॉक्टर्स आणि विशेषज्ञांना भेटले. त्यांनी आणखी औषधं सुचवली आणि अनेकदा बायोप्सी (उतींच्या तुकड्याची वैद्यकीय चाचणी) केली.

“पण कशानंच काहीच कळत नव्हतं,” असं ते सांगतात. अखेर 2023 मध्ये निदान झालं.

जोआव यांना लिंगाचा कर्करोग – पिनाईल कॅन्सर झाला होता.

“ही एक अप्रिय गोष्ट होती कारण माझ्या लिंगाचा काही भाग कापावा लागणार होता मला तर माझं शीर कापल्यासारखं वाटत होतं,” असा जोआव सांगतात.

” हा एक असा कर्करोग आहे ज्याविषयी तुम्ही लोकांना सांगू शकत नाहीत कारण तुम्ही सांगितलं तर ते तुमच्यावर हसण्याची शक्यता असते.”

भारतात किती पुरुषांना हा कर्करोग झाला आहे?

कर्करोगाचा हा प्रकार तसा दुर्मिळ आहे पण अलीकडे जगभरात या आजाराचं प्रमाण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये वाढ होत आहे. जोआव राहतात त्या ब्राझीलमध्ये दर एक लाख पुरुषांमध्ये 2.1 जणांना पिनाईल कॅन्सर होत असल्याचं अलीकडे एका अभ्यासातून समोर आलं आहे.

पण जगात हे प्रमाण जास्त असणाऱ्या देशांमध्ये ब्राझिलसोबतच भारताचाही समावेश आहे.

2012 आणि 2022 या दहा वर्षांच्या काळात ब्राझिलच्या आरोग्य मंत्रालयात पिनाईल कॅन्सरच्या 21,000 रुग्णांची नोंद झाली. त्यात 4,000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर 6,500 जणांवर लिंगाचा भाग कापण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. म्हणजे साधारण दोन दिवसांत एक शस्त्रक्रिया.

ब्राझीलच्या मारान्हाओ राज्यात या रोगाचं प्रमाण जगात सर्वाधिक म्हणजे एक लाख पुरुषांमध्ये 6.1 रुग्ण एवढं जास्त आहे.

BBC

त्यानुसार, 2008 ते 2012 या कालावधीत पिनाईल कॅन्सरचं प्रमाण युगांडामध्ये सर्वात जास्त होतं. (दर एक लाख पुरुषांमध्ये 2.2 रुग्ण). त्यानंतर ब्राझिल (दर एक लाख पुरुषांमध्ये 2.1 रुग्ण), थायलंड (दर एक लाख पुरुषांमध्ये 1.4 रुग्ण) आणि मग भारताचा नंबर लागतो.

भारतात 2008 ते 2012 या काळात दर एक लाख पुरुषांमध्ये 1.4 जणांना पिनाईल कॅन्सरनं ग्रासलं.

कॅन्सर रिसर्च युके या संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार लिंगाचा कर्करोग झालेल्या पुरुषांपैकी 90 टक्के पुरुष, या रोगाचा आसपासच्या जननेंद्रियात प्रसार झाला नसेल तर पाच वर्ष किंवा त्याहून काही काळच जगतात.

लिंगाच्या कर्करोगाची लक्षणं आणि कारणं

पिनाईल कॅन्सर म्हणजे लिंगाच्या कर्करोगाच्या सुरुवातीला अनेकदा लिंगावर एखादा व्रण उठतो जो भरून येत नाही आणि सोबतच त्यातून तीव्र वास येणारा स्रावही येतो.

लवकर निदान केलं तर वेळेत उपचार करणं शक्य होतं आणि रुग्ण बराही होतो. बाधित भाग काढून टाकणे, रेडियोथेरपी केमोथेरपी असं साधारण उपचारांचं स्वरुप असतं.

आपण वेळेत उपाय केले नाही तर लिंग अंशतः किंवा पूर्णतः कापून टाकावं लागतं. तसच आसपासचे जननेंद्रियाचे भाग, जसं की अंडाशय काढावे लागू शकतात.

या लेखाच्या सुरुवातीला ज्यांची कहाणी सांगितली आहे जोआव यांचं लिंग जानेवारीत 2024 मध्ये अंशतः कापावं लागलं. ते सांगता की हा काळ अतिशय कठीण होता.

“असं काही आपल्याला होईल याची कल्पनाही आपण कधी करत नाही आणि जेव्हा झालं तेव्हा मी लोकांना त्याविषयी सांगूही शकत नव्हतो.”

” मला शस्त्रक्रिया करण्याची भीती वाटत होती पण दुसरा पर्यायही नव्हता. शस्त्रक्रियेनंतर पुढच्या काही आठवड्यांमध्ये मला सतत दुःखी वाटत होतं, हे मी नाकारत नाही. लिंगाचा काही भाग कापला आहे, ही जाणीव पुरूषांसाठी भयानक असते.”

काही रुग्णांचं लिंग पूर्णपणे काढून टाकावं लागतं. त्यांच्यासाठी आयुष्यातली मोठी उलथापालथही ठरते.

Mauricio Dener Cordeiro

फोटो स्रोत, SBU

थिएगो कॅमेलो मुरओ ब्राझीलच्या साओ पावलोमध्ये एसी कामार्गो कॅन्सर सेंटरमध्ये युरोलॉजी विभागात काम करतात. ते सांगतात, ” लिंगाचा फक्त काही भाग कापला असेल तरीही त्यातून मूत्रविसर्जन करता येतं.

“पण लिंग पूर्णतः काढून टाकावं लागलं, तर त्या शस्त्रक्रियेत मूत्रनलिका ही अंडकोष आणि गुदद्वाराच्या मध्य भागात वळवली जाते. त्या व्यक्तीला मग टॉयलेटवर बसून मूत्रविसर्जन करावं लागतं.”

तज्ञांच्या मते, धूम्रपान करणाऱ्यांना किंवा फिमोसिस (लिंगावरचं पुढचं चामड्‌याचं आवरण घट्ट असणे) सारखा त्रास असणाऱ्यांना लिंगाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो..

स्वच्छता हाही महत्त्वाचा घटक असू शकतो असं ब्राझिलियन सोसायटी ऑफ युरॉलॉजी चे मॉरिशियो डेनेर कोर्डेरो सांगतात.

“एखादा पुरुष जर लिंगावरची त्वचा स्वच्छ करत नसेल, तर त्यातून स्रवणारा द्राव साचून राहू शकतो. त्यातून जीवाणू संसर्गाचा धोका वाढतो.

“हे सातत्यानं घडलं तर गाठ किंवा ट्यूमर तयार होऊ शकतो.”

कोर्डेरो सांगतात की ह्युमन पॅपिलोमाव्हायरस अर्थात HPV या गटातील विषाणूंचा सातत्यानं संसर्ग झाला, तरी या कर्करोगाचा धोका वाढू शकतो.

HPV लस ठरते प्रभावी

HPV मुळे तोंडाचा कर्करोग, गुदद्वाराचा कर्करोग, महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि पुरुषांमध्ये लिंगाचा कर्करोग असे कर्करोग होऊ शकतात.

त्यामुळेच HPV प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्याची गरज असल्याचं कोर्डेरो अधोरेखित करतात.

HPV Vaccine

फोटो स्रोत, Getty Images

त्यामुळेच भारतात केंद्र सरकारनं या HPV लसीकरणचा कार्यक्रम राबवण्याचा निर्णय अलीकडे घेतला होता.

विकसनशील देशांत पिनाईल कॅन्सरचं आणि यामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण जास्त आहे. पण युरोपातही याची रुग्णसंख्या वाढत असल्याचं चीनच्या सन येत-सून विद्यापीठाच्या संशोधनातून दिसून आलं होतं.

ग्लोबल कॅन्सर रजिस्ट्रीच्या भाकितानुसार जगभरातच हे प्रमाण वाढत असून 2050 पर्यंत पिनाईल कॅन्सरनं ग्रस्त रुग्णांच्या संख्येत 77 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

लोकसंख्येत वृद्धांचं वाढतं प्रमाण हे यामागचं एक कारण असल्याचं तज्ज्ञ सांगतात. वयाची साठ वर्ष ओलांडलेल्या व्यक्तींमध्ये या कर्करोगाचं प्रमाण जास्त आहे.

कोर्डेरो सांगतातत, “पिनाईल कॅन्सर तसा दुर्मिळ आहे, पण तो रोखता येऊ शकतो. सगळ्या वयाच्या पुरुषांनी त्यासाठी आपल्या लिंगाची साबण आणि पाण्यानं रोज स्वच्छता राखायला हवी. शारीरिक संबंधानंतर लिंग स्वच्छ धुवायला हवं.”

लैंगिक संबंधांदरम्यान निरोध वापरणं, फिमोसिस झालं असल्यास सुंता करणं अशी पावलं उचलली तर पिनाईल कॅन्सरचा धोका कमी होतो.

(अतिरिक्त रिपोर्टिंग – रोने कार्वाल्हो, बीबीसी ब्राझिल)

SOURCE : BBC