Home LATEST NEWS ताजी बातमी ‘आमच्या तंबूजवळच्या कबरींवर कुत्री हल्ले करतात, त्यांना पाहून मुलं घाबरतात अन् मला...

‘आमच्या तंबूजवळच्या कबरींवर कुत्री हल्ले करतात, त्यांना पाहून मुलं घाबरतात अन् मला बिलगतात’

1
0

Source :- BBC INDIA NEWS

रेहाब अबू दक्का

फोटो स्रोत, bbc

तंबूला असलेल्या प्लास्टिकच्या बाहेर कुत्री गुरगुरत होती आणि आत घाबरलेली मुलं तो आवाज ऐकत होती. लगेचच रेहाब अबू दक्का यांची सहा मुलं त्यांना येऊन बिलगली. या परिस्थितीत त्यांना तेच सर्वात सुरक्षित ठिकाण असल्याचं वाटलं.

या मुलांनी आणि त्यांच्या आईनं अशा काही गोष्टी पाहिल्याचं सांगितलं, ज्या प्रत्यक्षात पाहिल्याशिवाय त्याबाबत वर्णन करणं किंवा भावना व्यक्त करणंही अत्यंत कठीण आहे. मुलांपासून अगदी काही मीटर अंतरावर कुत्री कबरींमधून मृतदेह बाहेर खेचत होते, याबाबत त्या चिमुकल्यांची भावना व्यक्त करायला शब्द कसे सापडणार?

गाझाच्या राफाहमधील आणीबाणीच्या काळात तयार करण्यात आलेल्या या कब्रस्तानाच्या भयावह स्थितीचं वर्णन करण्यासाठी त्यांच्याकडं पुरेसा शब्दसंग्रहही नाही.

रेहाब अबू दक्का यासाठी वर्णन करताना ‘भेदरलेले’ असा शब्द वापरतात.

हा शब्द अगदी नेमका आहे. पण यापलिकडंही बरंच काही आहे, हे त्यांना माहिती आहे.

कुत्र्यांना मृतदेहाचे लचके तोडताना मुलांनी पाहिलं आहे. कुंपणाजवळच एका मृतदेहाचा पाय पडलेला होता. त्यामुळं ते घाबरलेले आहेतच. अशी मुलं ज्यांना एकेकाळी घर होतं, ती शाळेत जायची, कुटुंब-समाजातील प्रवाहाबरोबर त्यांचं जीवन सुरू होतं ती आता निर्वासितांचं जीवन जगावं लागत आहे. तेही अशा परिसरात जिथं आजूबाजूला मृतदेहांची दुर्गंधी पसरलेली आहे.

(इशारा : या लेखातील मजकूर काही वाचकांना विचलित करणारा करणारा वाटू शकतो.)

“सकाळी काही कुत्री कबरीमधून एक मृतदेह बाहेर खेचून त्याचं मांस खात होती. रात्रीपासून आतापर्यंत मुलं घाबरलेली होती आणि त्यामुळं मला बिलगुन होती,” असं रेहाब अबू दक्का यांनी सांगितलं.

कुत्री दहा-बारांच्या घोळक्यानं येतात. मालकांचा मृत्यू झाल्यामुळं किंवा ते निर्वासित झाल्यामुळं काही पाळीव प्राणीदेखील रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांमध्ये मिसळले गेले. त्यामुळं भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली. ती कुत्री आता हिंस्र झाली असून जे काही मिळेल ते सर्व खाऊ शकतात. या कब्रस्तानामध्ये काही कमी खोल असलेल्या कबरी आहेत. त्याठिकाणी लोक नातेवाईकांचे मृतदेह घरी परतण्याची वाट पाहत, तात्पुरत्या स्वरुपासाठी तिथं ठेवतात. कुत्री लांब राहावी म्हणून काही लोकांनी या कबरींवर विटा रचून ठेवलेल्या आहेत.

रेहाब अबू दक्का या अशक्त बनल्या असून थकल्याही आहेत. कबरींमधून येणारा दुर्गंध टाळण्यासाठी त्यांनी नाक आणि चेहरा कपड्यानं झाकला होता. सकाळी एका व्यक्तीनं येऊन बाहेर आलेले मृतदेह पुन्हा व्यवस्थित पुरल्याचं सांगत त्या त्याचं कौतुक करत होत्या.

“मी किंवा माझ्या मुलांनी अशाप्रकारे कब्रस्तानाच्या जवळ राहावं हे मी स्वीकारू शकत नाही. माझा मुलगा तिसऱ्या वर्गात आहे. आज खेळता-खेळता त्यानं एका कबर आणि तिच्या मध्यभागी क मृतदेह असल्याचं चित्र काढलं. ही पॅलिस्टिनींची मुलं आहेत. मी आणखी काय काय सांगणार? दुःखदायक, हा शब्ही त्याबाबत सांगण्यासाठी पुरेसा नाही.”

डॉ.रीक पीपरकॉर्न

युद्धामध्ये ज्या लोकांची घरं उद्ध्वस्त झाली त्यापैकी अनेकांसाठी कब्रस्तान हेच आश्रयाचं स्थान बनलं. हे कब्रस्तानही त्यापैकी एक आहे. राफाहमध्ये सध्या जवळपास 14 लाख लोक आहेत. युद्धापूर्वीच्या याठिकाणच्या लोकसंख्येच्या तुलनेत हा आकडा जवळपास पाचपटीनं अधिक आहे.

नॉर्वेच्या रिफ्युजी काऊन्सिलच्या मते, प्रति चौरस किलोमीटरसाठी 22000 लोक एवढं हे प्रमाण असल्याचं समोर येतं. याठिकाणी भुकेचं संकट तर आहेच. पण त्याचबोरबर डायरिया, हेपेटायटिस ए आणि मेंदूज्वरासारखे आजारही पसरायला सुरुवात झाली आहे.

गाझामधील निर्वासितांना पोहोचता येईल, असं राफाह हे अंतिम ठिकाण आहे. याठिकाणी इजिप्तबरोबरची सीमा आहे. मोठ्या प्रमाणावरील निर्वासितांच्या संख्येमुळं ही सीमा सध्या बंद आहे. इस्रायलचं लष्कर जसजशी आगेकूच करत आहे, तसं तसे लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात शेवटी याठिकाणी पोहोचत आहेत.

रेहाब अबू दक्का यांनी यापूर्वीच तीन ठिकाणं बदलली आहे. तसंच इस्रायलच्या लष्कराचा पुन्हा दबाव आला तर, पुन्हा इथूनही जावं लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

शस्त्रसंधी झाली किंवा नाही झाली तरीही राफाहमध्ये असलेल्या हमासच्या चार तुकड्यांवर कारवाई करण्यासाठी लष्कराची मोहीम सुरुच राहणार असल्याचं इस्रायचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं आहे. कायमची युद्धबंदी करण्याचं आश्वासन मिळेपर्यंत कोणत्याही प्रकारचा करार करणार नसल्याचं हमासनं अगदी स्पष्टपणे म्हटलं आहे. अर्थमंत्री बेझालेल स्मोत्रिक हे या करारासंबंधीच्या चर्चांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. यांनी कोणतंही काम अपूर्ण सोडणार नसून, राफाहमध्ये पूर्ण विनाशाचं आव्हान केलं आहे.

“पण निर्वासित कुठे जातील?” असा प्रश्न जागतिक आरोग्य संघटनेते प्रादेशिक संचालक डॉ. रिक पीपरकॉर्न यांनी उपस्थित केला. ते नुकतेच राफाहचा दौरा करून परतले आहेत.

“आपल्यासमोर आधीच आरोग्याचं संकट आहे. पाणी, स्वच्छता आणि अन्न संकटही आहे. एक मानवी आपत्ती निर्माण झाली आहे. त्यामुळं यावर आणखी एक नवं मानवी संकट निर्माण होईल. आपल्याला एका ठरावीक प्रमाणात मृत्यू आणि आजारांची अपेक्षा आहे. पण जेव्हा लष्करी कारवाई होते त्यावेळी खूप मोठ्या संख्येनं लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळं आजारांचं प्रमाणही वाढतं.”

राफाहच्या युरोपियन हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारा चिमुकला.

डॉक्टर पीपरकॉर्न यांनी संयुक्त राष्ट्रांबरोबर अफगाणिस्तानात सात वर्ष काम केलं आहे. एवढ्या सहज घाबरून जाणाऱ्यांपैकी ते नाहीत. पण आम्ही जेव्हा त्यांना जेरूसलेममध्ये भेटलो तेव्हा ते थकलेले जाणवले. रोज सकाळी आणखी गंभीर परिणाम निर्माण करणाऱ्या संकटांच्या निश्चिततेसह उठणाऱ्या व्यक्तीला आलेला हा थकवा होता.

लोकांना जर याठिकाणाहूनही जावं लागलं तर त्यांना मदत करण्यासाठी आणखी रुग्णालये तयार करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना प्रयत्न करत आहे. पण जे लोक गंभीर आजारी आहेत, जे वृद्ध आहेत किंवा सध्या डायलिसिसवर उपचार घेणारे 700 रुग्ण यांचं काय होणार? 50 रुग्णांची क्षमता असलेल्या ठिकाणी या सर्वांवर उपचार सुरू आहेत.

“जर आरोग्य क्षेत्राचा विचार केला तर हे आधीच प्रचंड अडचणीत आहे. त्यात जर आणखी घुसखोरी झाली तर आणखी तीन रुग्णालयं गमावून बसू अशी स्थिती आहे. कारण कदाचित त्या रुग्णालयांपर्यंत पोहोचता येणार नाही, त्यांचं नुकसान झालेलं असेल किंवा ते पूर्णपणे नष्ट झालेले असतील. आम्ही त्यासाठीच्या योजनेवर काम करत आहोत.”

अल घलबान.

बीबीसीच्या माझ्या सहकाऱ्यांनी युद्धाच्या काळात रोज रुग्णालयांमध्ये छायाचित्रण करून त्याठिकाणच्या परिस्थितीसंदर्भातील पुरावे गोळा केले आहे. राफाहमधील युरोपियन हॉस्पिटलमध्ये लोक अगदी त्यांना जागा मिळेल त्याठिकाणी जमिनीवरही उपचार घेत आहेत. वार्डातच अन्नही तयार करतात. अंधाऱ्या परिसरात त्यांची मुलं फिरत असतात.

आपत्कालीन विभागात 11 वर्षीय यासिन अल घलबान हा चिमुकला बेडवर रडत होता. हवाई हल्ल्यात त्याचे दोन्ही पाय गुडघ्याखाली कापले गेले होते. “तो फक्त पेनकिलरवर जीवंत आहे,” असं त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या नातेवाईकांनी सांगितलं.

कब्रस्तानात मुलं कबरींपासून अवघ्या काही मीटर अंतरावर खेळत असल्याचं रेहाब अबू दक्का पाहत होत्या. कुत्री तिथून निघून गेली तरी मुलं आईच्या आसपासच राहिले. त्या लवकरच तिथून निघणार आहेत, कारण अशा परिस्थितीत मुलांना ठेवणं त्यांना सहन होत नाहीये.

इथं आशा असण्याचा काही विषयच नाही. गाझामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये परिस्थितीनुसार तुमची आशा बदलत असते. आप्तेष्टांच्या हत्येनं क्षणार्धात आशा संपुष्टात येते. जेव्हा तुम्हाला एका घाणेरड्या शिबरातून दुसऱ्या शिबिरात जावं लागतं आणि मुलांच्या एकापाठोपाठ येणाऱ्या प्रश्नांची तुमच्याकडं काहीही उत्तरं नसतात, तेव्हा तासा-तासाला किंवा अगदी क्षणा-क्षणाला आशा संपुष्टात येत असते.

(अतिरिक्त वार्तांकन-अॅलिस डोयार्ड आणि हानिन अब्दीन)

SOURCE : BBC