Home LATEST NEWS ताजी बातमी 25 हजार लोकसंख्या, क्षणार्धात मिळणारं नागरिकत्व; अमेरिकेच्या मधोमध स्थापन झालेला ‘हा’ नवा...

25 हजार लोकसंख्या, क्षणार्धात मिळणारं नागरिकत्व; अमेरिकेच्या मधोमध स्थापन झालेला ‘हा’ नवा देश कसा आहे?

17
0

Source :- BBC INDIA NEWS

स्लोजॅमस्तान

फोटो स्रोत, Slowjamastan Ministry of Propaganda

25 हजारपेक्षा जास्त स्वघोषित नागरिकांनी त्यांची निष्ठा एका नकली हुकूमशाहीप्रति जाहीर केली आहे. ही अशी राजवट आहे, जिथे क्रॉक्स (एक प्रकारची चप्पल) घालायला आणि रिप्लाय-ऑल ईमेल्सलाही बंदी आहे.

कॅलिफोर्नियातील कोचेला व्हॅलीतल्या खजुराच्या शेतीपासून मेक्सिकोच्या सीमेपर्यंत सूर्याच्या किरणाने तळपणाऱ्या सोनेरी वाळूचा वाळवंटी पट्टा पसरलेला दिसतो.

फिकट खाकी रंगाची छटा असलेल्या या प्रदेशात गुडघ्याएवढ्या उंचीची झुडपं आणि खुरटी झाडं दिसतात. किड्यांची किरकिर असते. आणि लांबवर एक पाणबुडीचा ठिपकाही दिसतो.

जगातला सर्वांत नवीन छोटा देश (मायक्रो नेशन).

11 एकरांच्या क्षेत्रात पसरलेल्या या वाळवंटी प्रदेशात एकदा प्रवेश केला, की एखाद्या वेगळ्याच दुनियेत आल्यासारखं वाटतं.

या ‘देशात’ क्रॉक्स चपलांवर बंदी घातली आहे. रिप्लाय-ऑल ईमेल पाठवणं कायद्यानेच निषिद्ध आहे.

तुम्ही वेगाने वाहन चालवू शकता, पण केव्हा? जेव्हा तुम्ही टॅको घेऊन गडबडीने घरी निघाला असाल तर.

या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे रॅकून.

या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहेत रँडी विल्यम्स. त्यांना ‘सुलतान ऑफ स्लोजॅमस्तान’ म्हणूनही ओळखलं जातं. जेव्हा ते या वाळवंटी प्रदेशावर आणि सुमारे 25 हजार नागरिकांवर राज्य करत नसतात, तेव्हा ते सॅन डिएगो इथल्या Z90 आणि मॅजिक 92.5 या रेडिओ स्टेशनचे कार्यक्रम संचालक असतात.

रेडिओवर ते ‘आर डब’ या नावाने ओळखले जातात. 1994 पासून ते सन डे स्लो जॅम हा रेडिओ कार्यक्रमही सादर करतात. हा कार्यक्रम जगभरातल्या जवळपास 250 हून जास्त रेडिओ स्टेशनवर प्रसारित केला जातो.

स्लोजॅमस्तानचे स्वतःचे सीमा एजंट आणि तपासणी नाके आहेत

फोटो स्रोत, Slowjamastan Ministry of Propaganda

प्रवासाची आवड असलेल्या रँडी विल्यम्स यांनी संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिलेल्या जगातल्या प्रत्येक देशाला भेट देण्याचं ठरवलं होत.

त्यांचं हे उद्दिष्ट 2020 पर्यंत जवळपास पूर्णही झालं होतं. आता केवळ एक देश उरला होता. पण तेव्हाच कोरोनाच्या साथीमुळे सगळं जग ठप्प झालं.

इतरांप्रमाणेच रँडीही घरातच अडकून पडले. त्यांच्याकडे वेळ खूप होता, पण कुठे जाता येत नव्हते. तेव्हा त्यांच्या मनात एक कल्पना आली:

“जर मी दुसऱ्या देशाला जाऊ शकत नसेन, तर मी स्वतःच एक देश का तयार करू नये?”

असा आकारास आला ‘स्लोजॅमस्तान’

“लहानपणी मला सर्जनशील गोष्टी करायला आवडायच्या. लिखाण, चित्र काढणं तर कधी शाळेचे प्रोजेक्ट. त्यामुळे ही कल्पना म्हणजे मला आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रोजेक्टच वाटला,” असं रँडी विल्यम्स उर्फ ‘सुलतान’ सांगत होते.

त्यांच्या वकिलातीत म्हणजेच त्यांच्या रेडिओ स्टेशनमधल्या ऑफिसमध्ये त्यांनी जगातल्या वेगवेगळ्या हुकूमशाही देशांमधल्या प्रचार साहित्याचा संग्रह ठेवला आहे.

“माझी सगळी सर्जनशीलता मी यामध्ये वापरू शकतो,” असं ते सांगतात.

यानंतर त्यांनी आपला जिवलग मित्र मार्क कोरोना यांना फोन करून ही कल्पना सांगितली. तो फक्त हसायला लागला.

“माझ्या डोक्यात लगेच ‘फॅमिली गाय’ या मालिकेतला एक भाग आला, ज्यात पीटरने स्वतःचा देश ‘पीटोरिया’ स्थापन केला होता, असं कोरोना म्हणाले.

“माझ्या मनात शंका होती. ठीक आहे, मित्रा. पण हा देश नेमका कुठे असणार? तुझ्या घरात का?”

पण विल्यम्स यांनी हार मानली नाही. त्यांनी जमीन खरेदीसाठीच्या वेबसाइटवर शोध सुरू केला. त्यांच्या काही अटी होत्या. जमीन पाच एकरपेक्षा जास्त असावी, डांबरी रस्त्याने पोहोचता येईल अशी असावी आणि सॅन डिएगो इथल्या त्यांच्या घरापासून गाडीने जाता येईल अशा अंतरावर असावी.

शेवटी त्यांना एक जागा सापडली. वाळू, झुडपे आणि दगडांनी भरलेली आणि अजूनही विकसित न झालेली जमीन. तिची किंमत होती, 19,500 डॉलर.

‘पाहताक्षणीच मी त्या जागेच्या प्रेमात पडलो,’ असं विल्यम्स यांनी म्हटलं.

ती जमीन त्यांनी 2021 मध्ये खरेदी केली.

अकरा एकरांच्या क्षेत्रात पसरलेल्या या वाळवंटी प्रदेशात एकदा प्रवेश केला, की एखाद्या वेगळ्याच दुनियेत आल्यासारखं वाटतं.

फोटो स्रोत, Slowjamastan Ministry of Propaganda

रँडी विल्यम्स यांनी आपल्या मित्राला, मार्क कोरोना यांना फिनिक्स इथं जाऊन राष्ट्राध्यक्षांसारखा दिसणारा मोठा टेबल आणायला सांगितलं आणि सदर्न कॅलिफोर्नियामध्ये आणला.

दोघांनी तो टेबल वाळवंटातल्या जमिनीवर मधोमध ठेवला आणि आपला ‘देश’ स्थापन करण्यासाठी परिसर चिन्हांकित करायला लागले. त्यांनी कॅलिफोर्निया स्टेट रुट 78 या रस्त्यावर फलक लावले. त्यावर त्यांनी नव्या देशाचे नाव लिहिलं होतं, रिपब्लिक ऑफ स्लोजॅमस्तान. सुरुवातीला विल्यम्स यांनी हे नाव गंमतीने ठेवलं होतं. पण नंतर तेच कायम झालं.

स्थानिक प्रशासनाला ही गोष्ट लक्षात आली. रस्त्याजवळ खूप फलक लावल्याबद्दल त्यांना नोटीस देण्यात आली. त्यामुळे विल्यम्स यांनी ते फलक थोडे मागे हलवले, जेणेकरून ते जिल्ह्याच्या नियमांमध्ये राहतील आणि तरीही त्यांच्या मायक्रोनेशनची माहिती लोकांनी मिळत राहिली.

कोरोना यांनी म्हटलं की, “लोक गाडीतून जाताना विचार करायचे की इथे नेमकं काय चाललं आहे. कदाचित त्यांना आम्ही दहशतवादी आहोत, असं वाटलं असावं. पण त्यामुळे आमच्याकडे लोकांचं जास्त लक्ष जायला लागलं.”

स्लोजॅमस्तान अनौपचारिक नागरिकत्वासाठी पासपोर्ट देतो, स्वतःचे चलन तयार करतो

फोटो स्रोत, Slowjamastan Ministry of Propaganda

पण रस्त्यावरील फलक ही फक्त सुरुवात होती. नंतर एक तात्पुरता सीमा तपासणी नाका तयार झाला. त्यानंतर ध्वज आणि पासपोर्टही आले. हळूहळू रिपब्लिक ऑफ स्लोजॅमस्तान खऱ्या देशासारखा आकार घेऊ लागला.

“मी अचानक पोलीस गाड्या, नाणी आणि इमिग्रेशन बूथ खरेदी करू लागतो,” असं रँडी विल्यम्स यांनी म्हटलं.

या चिमुकल्या देशाने (मायक्रो नेशन) स्वतःचं चलन छापणं आणि स्वतःचे पासपोर्ट देणेही सुरू केलं.

विल्यम्स यांनी स्वतःला या देशाचा सुलतान म्हणून घोषित केलं आणि त्यानुसार वेशभूषाही करायला लागले. गडद सनग्लासेस, इस्त्री केलेला गणवेश आणि गणवेशाला साजेशा गोष्टीही. त्यांचं म्हणणं आहे की, ही स्टाइल लिबियाचे हुकूमशाह मुअम्मर गद्दाफी यांच्या नाटकीय लष्करी शैलीची आठवण करून देणारी आहे.

सुलतानाच्या भूमिकेत गेल्यानंतर विल्यम्स यांचा आवाजही बदलतो आणि उच्चारही. ते त्याला जनरल फॉरेन अॅक्सेंट म्हणतात. यामध्ये स्वर लांब उच्चारले जातात. इतर शब्दांचेही उच्चार बदलतात.

आज पाच वर्षांनंतर स्लोजॅमस्तान अनौपचारिक नागरिकत्वासाठी पासपोर्ट देतो, स्वतःचे चलन तयार करतो आणि ध्वजवंदन समारंभही आयोदित करतो.

रिपब्लिक ऑफ स्लोजॅमस्तान या मायक्रो नेशनचे 120 देशांमधले जवळपास 25 हजार नागरिक आहेत.

फोटो स्रोत, Slowjamastan Ministry of Propaganda

ज्यांना या देशासोबत नातं अधिकृत करायचं आहे, त्यांच्यासाठी वेगवेगळी पदंही उपलब्ध आहेत. इथं तुम्हाला खासदार व्हायला निवडणूकही लढवावी लागत नाही.

रँडी विल्यम्स यांनी सांगितलं की, तुम्ही जर नॉर्थ कॅरोलिनामध्ये राहत असाल आणि तुम्हाला तुमचा लिंक्ड इन प्रोफाईल अधिक मजबूत करायचा असेल तर तुम्ही थोडीफार फी भरून एखादे पद निवडू शकता आणि अगदी संसदेचे सदस्यही होऊ शकता.

रिपब्लिक ऑफ स्लोजॅमस्तान या मायक्रो नेशनचे 120 देशांमधले जवळपास 25 हजार नागरिक आहेत. व्हॅटिकन सिटी, तुवालू आणि पलाऊ या मान्यताप्राप्त देशांपेक्षाही ही संख्या जास्त आहे.

या हुकूमशाही राजवटीत काही पदं मिळवण्यासाठी शुल्क घ्यावे लागते. (उदा. राजदूत पदासाठी दरमहा 10 ते 25 डॉलर), पण नागरिकत्व मात्र सर्वांसाठी मोफत आणि खुले आहे. अनेक लोक सोशल मीडियावरून या देशाशी जोडलेले आहेत, तर काही लोक प्रत्यक्ष कार्यक्रमांनाही उपस्थित राहतात.

उदाहरणार्थ, देशाच्या नौदलाच्या पहिल्या जहाजाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सर्वांसाठी खुला होता. यात एका जुन्या पाणबुडीचं लोकार्पण झालं. हे जहाज कथित तस्करीपासून देशाच्या संरक्षणासाठी आहे.

जगाच्या विवंचनांपासून सुटका

सुलतानाच्या मते, लोक वेगवेगळ्या कारणांमुळे स्लोजॅमस्तानचे नागरिक बनत आहेत. काहींना उत्सुकता असते, काहींना ते मजेशीर वाटते, तर काहीजण फक्त जगातील गोंधळापासून थोडा आराम शोधत असतात.

सुलतान सांगतात, “आजकाल सगळं किती विभाजन करणारे झाले आहे, हे सांगण्याची गरज नाही. फेसबुक उघडलं की, लोक राजकारणामुळे मित्र आणि कुटुंबीयांशीही भांडताना दिसतात. परिस्थिती खूपच वाईट झाली आहे. स्लोजॅमस्तान म्हणजे या सगळ्यापासून सुटका आहे. आमच्या देशाच्या राजकारणाशिवाय इथे इतर कोणत्याही राजकारणावर चर्चा करण्यास मनाई आहे.”

अमेरिकेतील राजकारणामुळे त्रस्त झालेल्या अनेक अमेरिकन लोकांना स्लोजॅमस्तान आकर्षित करत आहे.

फोटो स्रोत, Slowjamastan Ministry of Propaganda

अमेरिकेतील राजकारणामुळे त्रस्त झालेल्या अनेक अमेरिकन लोकांना स्लोजॅमस्तान आकर्षित करत आहे. विल्यम्स यांच्या मते, या देशाच्या नागरिकांपैकी सुमारे 50% लोक अमेरिकेचे आहेत. यात जागतिक पातळीवरूनही वाढ होत आहे. अलीकडे बांगलादेशमधून मोठ्या संख्येने अर्ज आले आहेत, त्यामुळे स्लोजॅमस्तानच्या आकर्षणाला सीमेचं बंधन नसल्याचं त्यांनी सांगितलं.

स्टीफनी हेडन यांनी स्लोजॅमस्तानबद्दल पहिल्यांदा जिओपार्डी या कार्यक्रमात ऐकलं. नंतर त्या Long Beach Travel and Adventure Show मध्ये विल्यम्स यांना भेटल्या.

हेडन यांनी म्हटलं, “माझ्या आयुष्यात आनंद आणल्याबद्दल मला सुलतान यांचे आभार मानायचे होते.”

त्या आता या देशाच्या नागरिक आहेत. त्यांच्या मते, या देशाच्या सोशल मीडियावरील पोस्ट्समुळे त्यांना आनंद मिळतो. या पोस्ट्समध्ये देशाच्या खास कायद्यांबद्दल मजेदार आठवणी असतात तसंच नवीन नागरिक त्यांचे स्लोजॅमस्तानचे पासपोर्ट दाखवतानाचे फोटो असतात.

त्या म्हणाल्या, “या सगळ्या गोष्टी मला आनंद देतात. स्लोजॅमस्तानचे हजारो नागरिकही याविषयी सहमत असतील. अमेरिकेत सध्या खूप कठीण काळ आहे, पण इथे काहीतरी आनंद देणारी गोष्ट आहे.”

वाळवंटापासून जागतिक व्यासपीठापर्यंत

जगभरात शेकडो चिमुकली राष्ट्रं (मायक्रो नेशन) अस्तित्त्वात असल्याचा अंदाज आहे. काही देश आंतरराष्ट्रीय समुद्रात आहेत, तर काही शांत उपनगरांमध्ये आहेत.

पुढच्या वर्षी स्लोजॅमस्तानमध्ये मायक्रोकॉन 2027 हा मायक्रो नेशन्सचा मेळावा आयोजित केला जाणार आहे. बॉम्बर रिपब्लिक पासून ड्रॅगन आएलपर्यंत 43 पेक्षा जास्त स्वयंघोषित राष्ट्रांचे प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. ते भू-राजकीय सार्वभौमत्वापासून देशाच्या शस्त्रास्त्र सज्जतेपर्यंत विविध विषयांवर चर्चा करतील.

सध्या स्लोजॅमस्तान आपल्या देशात अधिक नागरिक आणि पर्यटकांची वाट पाहत आहे.

सुलतानांच्या मते, पर्यटकांना स्लोजॅमस्तानच्या वाळवंटी प्रदेशात येण्याची परवानगी आहे. मात्र, सध्या तिथे रात्री राहण्याची सोय नाही. (तिथे एका धावपट्टीवर विमानाचे चिन्ह आणि विल्यम्स सलाम करतानाचा बोर्ड आहे, ज्यावर लिहिलं आहे- रँडी विल्यम्स आंतरराष्ट्रीय विमानतळ. लवकरच येत आहे-बहुधा) त्यामुळे MicroCon 2027 हा कार्यक्रम सॅन दिएगोमधल्या एका उंच इमारतीच्या पेंटहाऊसमध्ये आयोजित केला जाणार आहे.

सध्या स्लोजॅमस्तान आपल्या देशात अधिक नागरिक आणि पर्यटकांची वाट पाहत आहे.

फोटो स्रोत, Slowjamastan Ministry of Propaganda

विल्यम्स यांच्या मते, हे मायक्रोनेशन हे नेहमीच प्रवासाशी जोडलेले राहिले आहे. त्यांनी अलीकडील एका उदाहरणाचा उल्लेख केला. उझबेकिस्तानमधील एका नागरिकाने त्यांना संदेश पाठवला होता. विल्यम्स म्हणाले, “मी त्यांना सांगितलं की, अरे, मी तुमच्या देशात गेलो आहे आणि मी त्यांना फोटो दाखवला. आणि लगेचच आमच्यात एक नातं निर्माण झालं.”

त्यांना स्लोजॅमस्तान देखील अशाच भावनेवर उभं करायचं आहे. एक असं ठिकाण, जे थोडं वेगळं असलं तरी जगभरातील लोकांना जोडणारं असेल.

मे 2023 मध्ये विल्यम्स तुर्कमेनिस्तानला पोहोचले आणि त्यांचा अनेक वर्षांपूर्वी सुरू केलेला जगातील सर्व देशांना भेट देण्याचा संकल्प पूर्ण झाला. तोपर्यंत स्लोजॅमस्तान हे फक्त त्या प्रवासातली रिकामी जागा भरण्यासाठी नव्हतं, तर एक वेगळी कल्पन बनलं होतं. संस्कृती आणि सीमांच्या पलीकडे जाऊन लोकांना जोडण्याचा आणखी एक मार्ग.

विल्यम्स म्हणतात, “स्लोजॅमस्तान फक्त माझं नाही.” ते थोडं हसून म्हणतात, हो, मी हुकूमशहा आहे. पण खरं तर हा देश सगळ्यांचा आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी त्याचा अर्थ वेगळा आहे.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC