Home LATEST NEWS ताजी बातमी यूएईला 3.5 अब्ज डॉलर परत केल्यानंतर पाकिस्तान सौदी अरेबियाकडून कर्ज घेणार?

यूएईला 3.5 अब्ज डॉलर परत केल्यानंतर पाकिस्तान सौदी अरेबियाकडून कर्ज घेणार?

6
0

Source :- BBC INDIA NEWS

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि मोहम्मद बिन सलमान (फाइल फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

पाकिस्तानने संयुक्त अरब अमिरातीला (यूएई) साडेतीन अब्ज डॉलरच्या आर्थिक ठेवी परत देण्याची घोषणा केली आहे. यानंतर पाकिस्तानचे अर्थमंत्री मोहम्मद औरंगजेब यांनी सौदी अरेबियाकडून कर्ज घेण्यासह ‘सर्व पर्यायांवर सरकार विचार करत आहे’, असं सांगितलं.

सध्या वॉशिंग्टनमध्ये असलेले पाकिस्तानचे अर्थमंत्री मोहम्मद औरंगजेब यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, पाकिस्तान आपला परकीय चलन साठा मजबूत करण्यासाठी युरो बाँड्स काढणे तसेच इतर देश, आर्थिक संस्था आणि बँकांकडून कर्ज घेण्यासारख्या पर्यायांचा विचार करत आहे.

या मुलाखतीत मोहम्मद औरंगजेब यांनी सांगितलं की, मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम लक्षात घेऊन पाकिस्तानला भविष्यासाठी तेलाचा धोरणात्मक साठा तयार करावा लागेल आणि हळूहळू अपारंपरिक ऊर्जेकडे वळावं लागेल.

यूएईला ठेवी परत केल्यानंतर पाकिस्तान सौदी अरेबियाकडून कर्ज घेण्यासाठी चर्चा करत आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी अर्थमंत्र्यांनी सरकार ‘सर्व पर्यायांचा विचार करत आहे’, असं म्हटलं.

एप्रिलच्या सुरुवातीला पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने यूएईच्या आर्थिक ठेवी परत केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. आणि हा व्यवहार ‘सामान्य आर्थिक व्यवहार’ असल्याचं सांगितलं होतं.

यावर्षी युरो बाँड जारी होणार

उल्लेखनीय म्हणजे, गेल्या शनिवारी इस्लामाबाद येथे इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चेपूर्वी, शुक्रवारी रात्री सौदीचे अर्थमंत्री मोहम्मद बिन अब्दुल्ला अल-जदान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेतली होती.

दुसऱ्या दिवशी, शनिवारी सौदी संरक्षण मंत्रालयाने जाहीर केलं की, पाकिस्तानचा एक लष्करी ताफा पूर्व भागातील शाह अब्दुल अझीझ विमानतळावर पोहोचला आहे. या ताफ्यात पाकिस्तानी हवाई दलाच्या लढाऊ आणि सहाय्यक विमानांचाही समावेश आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि मोहम्मद बिन सलमान (फाइल फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

याच दरम्यान मोहम्मद औरंगजेब यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) आणि जागतिक बँक यांच्या वार्षिक बैठकीदरम्यान पाकिस्तानची सर्व कर्जे फेडण्याची क्षमता आहे, असं सांगितलं.

त्यांनी सांगितलं की, पाकिस्तानचा परकीय चलन साठा सध्या सुमारे 2.8 महिन्यांच्या आयातीइतका आहे. ही पातळी कायम ठेवणं भविष्यात देशाच्या एकूण आर्थिक स्थैर्यासाठी खूप महत्त्वाची बाब आहे.

सरकार युरो बाँड्स, इस्लामिक सुकोक आणि डॉलरमध्ये जारी होणारे तसेच रुपयाशी जोडलेले बाँड्स काढण्याचा विचार करत आहे, असं औरंगजेब यांनी सांगितलं.

यावर्षी युरो बाँड्स जारी केले जातील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर व्यापारी कर्ज घेण्याच्या शक्यतांवरही सरकार विचार करत आहे.

पाकिस्तानने यूएईला 3.5 अब्ज डॉलर का परत केले?

यापूर्वी पाकिस्तानने स्पष्ट केलं होतं की, करारानुसार स्टेट बँक ऑफ पाकिस्तान परिपक्व म्हणजेच मॅच्युअर होणाऱ्या ठेवी यूएईला परत करत आहे. आणि हा एक नियमित आर्थिक व्यवहार आहे, असंही त्यांनी म्हटलं होतं.

प्रवक्त्याने स्पष्ट केलं होतं की, पाकिस्तान आणि यूएई यांचे संबंध खूप जुने आणि बंधुत्वावर आधारित आहेत. हे संबंध व्यापार, गुंतवणूक, संरक्षण आणि लोकांमधील संपर्कावर आधारलेले असून काळानुसार ते अधिक मजबूत झाले आहेत.

पाकिस्तानने यूएईला 3.5 अब्ज डॉलर का परत केले?

फोटो स्रोत, Getty Images

परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनाआधीच, पाकिस्तानने यूएईकडून घेतलेल्या ठेवी आणि कर्ज परत करत असल्याच्या बातम्या पारंपरिक माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावरही येऊ लागल्या होत्या.

परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत दुजोरा दिल्यानंतर स्पष्ट झालं की, पाकिस्तान यूएईला ठेवी परत करत आहे.

यूएईने पाकिस्तानला किती ठेवी दिल्या होत्या आणि त्या अचानक परत करण्याचा पाकिस्तान सरकारचा निर्णय हा प्रदेशातील बदलत्या भू-राजकीय परिस्थितीमुळे घेतला गेला आहे का, की तो आधीच ठरलेला होता, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

बीबीसीने या प्रकरणी तज्ज्ञांशी चर्चा करून याचा तपास करण्याचा प्रयत्न केला आहे.

पाकिस्तानकडे यूएईच्या किती ठेवी आहेत?

पाकिस्तानचा परकीय चलन साठा सध्या सुमारे 21 अब्ज डॉलर आहे. यात 16 अब्ज डॉलर स्टेट बँक ऑफ पाकिस्तानकडे आणि 5 अब्ज डॉलर व्यापारी बँकांकडे आहेत.

केंद्रीय बँकेकडे असलेल्या 16 अब्ज डॉलरपैकी सुमारे 12 अब्ज डॉलरच्या ठेवी चीन, सौदी अरेबिया आणि यूएई यांसारख्या देशांनी दिल्या आहेत. यामुळे पाकिस्तानचा परकीय चलन साठा स्थिर ठेवता येईल.

पाकिस्तानकडे यूएईच्या किती ठेवी आहेत?

फोटो स्रोत, Getty Images

या ठेवींपैकी यूएईने पाकिस्तानच्या परकीय चलन साठ्यात सुमारे 2 अब्ज डॉलर ठेवले होते. याशिवाय यूएईने पाकिस्तानला सुमारे 1.5 अब्ज डॉलर कर्जही दिले आहे. त्यातील 45 कोटी डॉलरचे कर्ज 1990 च्या दशकात दिले गेले होते. अशा प्रकारे एकूण पाकिस्तानवर यूएईचे सुमारे 3.5 अब्ज डॉलरचे कर्ज आहे.

यूएईच्या ठेवी रोल ओव्हर कधी झाल्या?

यूएईने पाकिस्तानला 2018 मध्ये 2 अब्ज डॉलर्सच्या ठेवी दिल्या होत्या. ही रक्कम गेल्या आठ वर्षांपासून पाकिस्तानकडे आहे आणि अनेकदा तिचा कालावधी वाढवला (रोल ओव्हर) गेला आहे. मात्र, मागील वर्षी डिसेंबरमध्ये यूएईने ही ठेव वर्षभरासाठी न वाढवता, फक्त अल्पमुदतीच्या आधारावर ठेवण्यास सहमती दर्शवली.

या वर्षी फेब्रुवारी महिन्यात यूएईने पाकिस्तानला दिलेली 2 अब्ज डॉलरची ठेव दोन महिन्यांसाठी पुढे ढकलली होती. ही मुदत एप्रिलमध्ये संपत होती. आता पाकिस्तानने ती ठेव परत करण्याचा निर्णय घेतला आहे.

पडद्यामागची कारणे कोणती?

यूएईला पाकिस्तानने 2 अब्ज डॉलरची ठेव परत करण्याचा निर्णय अशा वेळी घेतला, जेव्हा मध्यपूर्वेत इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात तणाव आणि संघर्ष सुरू होता. या परिस्थितीचा परिणाम आखाती देशांवरही होत होता, त्यात यूएईचाही समावेश होता.

अशा परिस्थितीत भू-राजकीय व्यवहार तज्ज्ञ जाहिद हुसेन यांनी बीबीसीला सांगितलं की, यूएईला 2 अब्ज डॉलर परत देण्याचा निर्णयाचा भू-राजकीय परिस्थितीशी काहीही संबंध नाही. हा निर्णय वेगळ्या कारणांमुळे आणि आधी ठरलेल्या प्रक्रियेचा भाग आहे.

जाहिद हुसेन म्हणाले की, पाकिस्तानने या ठेवींवरील जास्त व्याजदर कमी करण्याची विनंती केली होती आणि त्या पुढे चालू ठेवण्यासाठी (रोल ओव्हर) मागणीही केली होती. पण यूएईने त्या फक्त अल्पकालीन आधारावरच वाढवायला सुरुवात केली.

हे सगळं अचानक घडलं किंवा यूएईने पैसे लगेच परत मागितले, हा समज चुकीचा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

जाहिद हुसेन यांनी सांगितलं की, या ठेवींवरील व्याजदर खूप जास्त होता. त्यामुळेच हे पैसे परत करण्याचा निर्णय घेतला गेला.

आर्थिक घडामोडींचे वरिष्ठ पत्रकार मेहताब हैदर यांच्या मते, सध्या परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट झालेली नाही. पण यूएईच्या ठेवी परत करण्याचा निर्णय हा मध्यपूर्वेतील बदलत्या भू-राजकीय परिस्थितीशी कुठेतरी जोडलेला असू शकतो.

ते म्हणाले की, अशा गोष्टी नेहमी स्पष्टपणे दिसत नाहीत, पण त्या मागे कुठेतरी त्या घडामोडींचा प्रभाव असतोच.

यूएईची ठेव परत केल्याने पाकिस्तानच्या परकीय चलन साठ्यावर काय परिणाम होईल?

पाकिस्तानकडे परकीय चलनाची राखीव क्षमता जास्त मजबूत नाही.

स्टेट बँकेकडे असलेल्या 16 अब्ज डॉलरपैकी 12 अब्ज डॉलर हे चीन, सौदी अरेबिया आणि यूएईच्या ठेवी आहेत.

मेहताब हैदर यांच्या मते, यूएईला 2 अब्ज डॉलर परत दिल्यामुळे पाकिस्तानच्या परकीय चलन साठ्यावर थोडा परिणाम होईल. पण काही आठवड्यांतच पाकिस्तानला आयएमएफकडून 1.2 अब्ज डॉलरचा हप्ता मिळणार आहे. त्यामुळे देशाचा परकीय चलन साठा पुन्हा स्थिर राहण्यास मदत होईल.

याशिवाय सरकार इतर मार्गांनीही परकीय चलन साठा वाढवण्याचा विचार करत आहे. या प्रक्रियेत पाकिस्तानने सौदी अरेबियालाही सहभागी केलं आहे, असं ते म्हणाले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC