Home LATEST NEWS ताजी बातमी ‘अशी आशा करतो की युद्ध पुन्हा सुरू नये, पण वाटतंय की होईल,’...

‘अशी आशा करतो की युद्ध पुन्हा सुरू नये, पण वाटतंय की होईल,’ वाटाघाटी फिस्कटल्यावर काय म्हणाले इराणी नागरिक?

4
0

Source :- BBC INDIA NEWS

इराण

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिका आणि इराण यांच्यात पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या शांततेसाठीच्या वाटाघाटी अद्याप तरी अयशस्वीच ठरलेल्या आहेत.

कोणताही ठोस करार झालेला नसल्याने सध्या नाजूक अवस्थेत असलेल्या युद्धविरामावर एकप्रकारे दबाव आलेला आहे.

एकीकडे, अमेरिकेच्या लष्कराने इराणच्या बंदरांमधून निघणाऱ्या जहाजांची नाकेबंदी करणार असल्याचं म्हटलं आहे, तर तेहरानने आपल्या शेजारील आखाती देशांच्या बंदरांवर प्रत्युत्तरादाखल हल्ले करण्याची धमकी दिली आहे.

उभय देशांमधील संघर्ष पुन्हा एकदा भडकण्याच्या भीतीने इराणी लोक परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत.

“मला खरंच वाटलं होतं की काहीतरी तोडगा निघेल,” असं तेहरानजवळील कराज शहरात राहणारा एक 20 वर्षांचा तरुण सांगत होता.

तो पुढे म्हणाला की, “मला वाटतं की युद्ध पुन्हा एकदा उद्या, पुढच्या आठवड्यात किंवा लवकरच कधीही सुरू होऊ शकतं.”

इराणमध्ये अधिकाऱ्यांनी गेल्या सहाहून आठवड्यांपासून इंटरनेट बंद करून ठेवलेलं आहे. त्यामुळे, देशांतर्गत लोकांशी संवाद साधणं अवघड झालेलं आहे.

इंटरनेट वापरावर निर्बंध घालण्याच्या निर्णयाचं समर्थन करण्यासाठी इराणी अधिकारी अनेकदा “देशाचं सायबर हल्ल्यांपासून संरक्षण करणं,” यासारखी कारणे देताना दिसतात.

बीबीसी न्यूज पर्शियनने अशा अनेक इराणी लोकांशी संवाद साधला आहे, जे सध्याच्या राजवटीच्या विरोधात आहेत.

पण, त्यांची ही मतं संपूर्ण इराणी समाजाचं प्रतिनिधित्व करत नाहीत.

इराणमधील एक गट काय म्हणतो?

“मी आशा करतो की युद्ध पुन्हा सुरू होणार नये, पण मला वाटतं की ते होईलच,” असं तेहरानमध्ये राहणारा एक 20 वर्षांचा तरुण म्हणाला.

पुढे त्यानं सांगितलं की, “आपलं मानसिक संतुलन बिघडू नये,” म्हणून तो स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे.

पण एक 20 वर्षांची मुलगी अजूनही सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करते आहे.

ती सांगते की, “आता परिस्थिती थोडी शांत आहे, त्यामुळे मला बरं वाटतंय. पण मला आशा आहे की, हे युद्ध लवकरच संपेल.”

इराण

फोटो स्रोत, Getty Images

“मला आशा आहे की, इंटरनेट पूर्ववत सुरू होईल. ते चर्चा करतील आणि सहमतीच्या एका करारवर पोहोचतील, अशी मला आशा आहे. कारण, जर युद्ध सुरूच राहिलं तर ही गोष्ट इराणसाठी अजिबात चांगली नसेल.”

अलीकडील संघर्षादरम्यान बीबीसीशी संपर्क साधलेले अनेक इराणी नागरिक इंटरनेटच्या सुविधेअभावी निराश आहेत.

त्यांच्या मते, यामुळे विश्वसनीय माहिती मिळवण्यावर मर्यादा आल्या आहेतच, शिवाय अनेक व्यवसायांचं मोठं नुकसानही झालेलं आहे.

“यात कुणीही जिंकत नाहीये,” असं तेहरानमध्ये कंटेंट क्रिएटर म्हणून काम करणाऱ्या एकानं म्हटलं.

“माझ्याकडे असलेली बचत मला जास्तीत जास्त दोन महिने पुरेल, पण त्यानंतर माझे पैसे संपून जातील.”

‘कुणीही जिंकत नाहीये’

दुसरा एक 20 वर्षांचा तरुण म्हणाला की, “जेव्हा अमेरिका आणि इस्रायल आमच्यावर बॉम्बहल्ला करत होते, त्या दिवसांपेक्षा आताचा शांततेचा हा काळ मला बरा वाटतोय, पण मी खूप चिंतीत आहे.”

“जरी त्यांच्यात काही करार झाला तरी, या कमकुवत अर्थव्यवस्थेमुळे परिस्थिती खूप कठीण होणार आहे. मला आशा होती की त्यांच्यात करार होईल, पण सध्या अस्वस्थतेचं वातावरण आहे.”

कर्जमध्ये राहणाऱ्या एका 30 वर्षीय व्यक्तीनं सांगितलं की, नोव्हेंबरमधील मध्यावधी निवडणुकांमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तडजोड करण्यास तयार नसतील, असा त्याला वाटतं.

तो म्हणाला की, “हे माझं वैयक्तिक मत आहे, पण मला वाटत नाही की अमेरिका माघार घेईल.”

“कोणत्याही प्रकारे मागे हटणं हे त्यांना निवडणुकीत पराभवाकडे नेईल.”

इराण

फोटो स्रोत, Getty Images

जानेवारी महिन्यात इराणमध्ये सरकार विरोधात आंदोलन करणाऱ्यांच्या झालेल्या हत्येमुळे संतप्त झालेल्या आणखी एका व्यक्तीनं म्हटलं की, इस्लामिक रिपब्लिकशी वाटाघाटी करणं निरर्थक आहे. त्याने इस्लामिक रिपब्लिकला “या देशातील मुलांचा मारेकरी” असंही संबोधलं.

पुढे त्यानं म्हटलं की, “ज्या रात्री माझ्या डोळ्यांदेखत रस्त्यावर गोळीबार होत होता, त्या रात्री मी कधीही विसरणार नाही.”

अमेरिकेतील ‘ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट्स न्यूज एजन्सी’नुसार (HRANA), इराणच्या सुरक्षा दलांनी जानेवारी महिन्यात सरकारविरोधी आंदोलकांवर आतापर्यंतची सर्वात कठोर कारवाई केली आहे. त्यामध्ये किमान 6,508 आंदोलक ठार झाले आणि 53,000 जणांना अटक करण्यात आली.

इराणच्या न्यायवैद्यक संघटनेच्या प्रमुखांनी सांगितलं की, अलीकडील युद्धात ठार झालेल्या 3,375 लोकांच्या मृतदेहांची ओळख अधिकाऱ्यांनी पटवली आहे.

अद्याप इराण आणि अमेरिका यांच्यातील शांतता चर्चेच्या नवीन फेरीसाठी कोणतीही तारीख निश्चित झालेली नाहीये.

त्यामुळे सध्या इराणच्या जनतेसमोर एक अत्यंत अनिश्चित असं भविष्य आ वासून उभं आहे.

(बीबीसी पर्शियन ही बीबीसी न्यूजची पर्शियन भाषेतील सेवा आहे. जगभरातील 24 दशलक्ष लोक बीबीसीच्या या सेवेचा वापर करतात. त्यापैकी बहुतेक लोक इराणमध्ये राहतात. इराणी अधिकारी त्यावर बंदी घालत असतात आणि त्यामध्ये नियमितपणे व्यत्यय आणत असतात.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC