Home LATEST NEWS ताजी बातमी ‘पत्र्याच्या घरात कुलर काम करत नाही जीव घाबरतो, उलट्या होतात’, सर्वाधिक तापमानात...

‘पत्र्याच्या घरात कुलर काम करत नाही जीव घाबरतो, उलट्या होतात’, सर्वाधिक तापमानात हातावर पोट असणारे कसे जगतात?

11
0

Source :- BBC INDIA NEWS

सीमा पांढरे यांचं झोपडीवजा घर पूर्णपणे पत्र्याचं आहे.

“रात्रभर झोप येत नाही. बाहेर झोपायला गेलं तर डास चावतात आणि घरात आलं तर गर्मी झोपू देत नाही. असं वाटतं दुसऱ्याच्या घरात निघून जावं. माझं बाळ पण राहत नाही. आम्ही काय करणार?”

उकाड्यामुळं हैराण झालेल्या सीमा पांढरे वैतागून बोलत होत्या.

सीमा अकोल्यात खरप भागात राहतात. त्यांचं झोपडीवजा घर पूर्णपणे पत्र्याचं आहे. त्यांच्या घराच्या भिंतीही पत्र्याच्याच आहेत. एवढ्या प्रचंड तापमानात त्या दोन मुलं, नवरा आणि सासूसोबत या पत्र्याच्या एका खोलीत राहतात.

एप्रिल 2026 मध्ये अकोल्यात सलग 8 दिवस तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वर होतं.

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, 26 एप्रिलला तर अकोल्यात 46.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. त्यादिवशी हे तापमान देशातील सर्वोच्च तापमान होतं.

त्यामुळं या वाढलेल्या तापमानामध्ये सर्वसामान्यांना जगणं कठिण होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

इतक्या तापमानात इथला कष्टकरी वर्ग, मजूर वर्ग, गरीब वर्ग कसा राहतो? हे पाहण्यासाठी आम्ही 7 मे रोजी अकोल्यात पोहोचलो.

तापमानातील वाढीचे कारण

एप्रिल महिन्याच्या शेवटी 8 दिवस तापमान 44 अंशाच्या वर होतं. त्या काळात हवामान विभागानं अकोल्यात उष्णतेच्या लाटेचा इशाराही दिला होता.

एप्रिलच्या या आठवड्यातील तापमान

  • 23 एप्रिल 2026 – 44.3 अंश सेल्सिअस
  • 24 एप्रिल 2026 – 45 अंश सेल्सिअस
  • 25 एप्रिल 2026 – 45.6 अंश सेल्सिअस
  • 26 एप्रिल 2026 – 46.9 अंश सेल्सिअस
  • 27 एप्रिल 2026 – 46.3 अंश सेल्सिअस
  • 28 एप्रिल 2026 – 45.2 अंश सेल्सिअस
  • 29 एप्रिल 2026 – 44.2 अंश सेल्सिअस
काही ठिकाणी महिला दुपारी बारा वाजेच्या उन्हात रस्त्याचं काम करताना दिसल्या.

पण, त्या काळात अकोल्याचं तापमान इतकं का वाढलं होतं? याबद्दल पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी 27 एप्रिलला बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं होतं की, “अकोल्यामध्ये 46.9 तापमान अंश सेल्सिअस तापमान असामान्य नाही. याआधीही 2019 मध्ये तापमान 47 अंश सेल्सिअसवर पोहोचलं होतं.

एप्रिल महिन्याच्या शेवटी अँटीसायक्लॉनिक सर्क्युलेशन 3-5 किलोमीटर अंतरावर होतं. त्यामुळं हवा जमिनीकडे दाबली जाते. त्यामुळे तापमान वाढ पाहायला मिळते.”

त्यामुळं एवढ्या तापमानात इथला कष्टकरी, मजूर, गरीब वर्ग कसा राहतो? हे पाहण्यासाठी आम्ही अकोल्यात पोहोचलो. 7 आणि 8 मे रोजी अनुक्रमे 40.1 अंश सेल्सिअस आणि 42.1 अंश सेल्सिअस तापमान होतं.

दुसऱ्यांच्या घरात निघून जावसं वाटतं

आम्हाला रखरखत्या उन्हामध्ये उभं असलेलं एक पत्र्याचं झोपडीवजा घर दिसलं. तिथं गेलो तर आम्हाला सीमा पांढरे भेटल्या.

सीमा यांचं सहा महिन्यांचं बाळ आहे. प्रचंड उकाड्यामुळं बाळ झोपूही शकत नाही, त्यामुळं त्यांनी कुलर घेतला. पण तापमान एवढं जास्त आहे की ‘या पत्र्याच्या घरात कुलरही काम करत नाही’ असं त्यांनी सांगितलं.

“अजिबात थंड हवा मिळत नाही. जीव घाबरतो. उलट्या होतात. दुसऱ्यांच्या घरात निघून जावसं वाटतं,” असं त्या सांगत होत्या.

अकोल्यात उन्हात लोकं कशी कामं करतात हे पाहण्यासाठी फिरताना आम्हाला अकोट फाईल भागात तीन महिला बारा वाजता कडाक्याच्या उन्हात रस्त्याचं काम करताना दिसल्या.

ऊन लागू नये म्हणून डोक्याला कापड बांधलेल्या आणि हातात फावडं घेतलेल्या ज्योती इंगळे यांच्याशी बोललो तर त्या म्हणाल्या, “आम्ही पूर्ण दिवस उन्हातच काम करतो. जीव घाबरतो, ऊन लागतं. पण, कोणाला सांगता? काम करावंच लागतं. 47 डिग्री तापमानातही आम्ही काम करतच होतो. घरी गेल्यावर फक्त झोपूनच राहावं वाटतं.”

ज्योती घरात कमावणाऱ्या एकट्या आहेत आणि खाणारी तोंडं चार. त्यातच दोन मुलींचं शिक्षण करावं लागतं. त्यांना स्वतःचं घरही नाही. भाड्याच्या घरात राहून त्या संसार चालवतात. त्यामुळं उन्हात दिवसभर दगड मातीची काम केल्याशिवाय पर्याय नसल्याचं त्या सांगतात.

रस्त्यावरील विक्रेते, बांधकाम मजूर यांच्या कामाच्या वेळा बदलण्याचे निर्देश सरकारनं दिले होते. दुपारी 12-4 या वेळेत सक्तीची विश्रांती घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

अकोट फाईल भागातल्याच सपना क्षीरसागर यांचं घरसुद्धा पत्र्याचं आहे. जास्त त्रास होऊ नये म्हणून त्यांनी घरात तीन खोल्यांमध्ये तीन कुलर लावले.

त्यांच्या घरातला कुलर सकाळी आठ वाजता सुरू झाला तर दुसऱ्या सकाळीच बंद होतो. पण, किचनमध्ये कुलर नाही. त्यामुळे तिथं स्वयंपाक करताना फार त्रास होतो.

त्या सांगतात, “किचनमध्ये जायची इच्छाच होत नाही. बाहेर कुलरच्या थंड हवेत राहावं वाटतं. पण, काय करता लेकरांसाठी यायला लागतं. वीज गेली तर चीडचीड होते. बाहेर जाऊन बसलं तर झळा लागतात. मग तब्येत खराब होते. या वर्षी पोटदुखी, ऊन आणि उलट्यांचा त्रास झाला तर 20 हजार रुपये लागले.”

सपना यांचे सासरे तर आजारी असतात. वीज गेल्यानंतर त्यांना प्रचंड त्रास होते. कारण, त्यांना त्या घरातून बाहेरही पडता येत नाही.

रस्त्यावरील छोट्या दुकानदारांच्या कमाईवर परिणाम

आम्ही अकोल्याच्या मार्केटमध्ये पोहोचलो तेव्हा गर्दी कमी होती. जे काही मोजके लोक बाहेर पडले होते ते कुठंतरी निवारा शोधत होते किंवा कोणी जायचं असेल तिथं लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. कारण, ऊनच तेवढं भयंकर आहे.

उन्हाच्या काळात लोक बाजारपेठेत येत नाही. त्यामुळं छोट्या दुकानदारांच्या कमाईवर परिणाम झाल्याचं चित्र आहे.

याच मार्केटमध्ये छत्रीच्या मदतीनं स्वतःचं उन्हापासून रक्षण करत कपडे विकणारे शारीख रेहमान सांगतात, “उन्हाचा खूपच त्रास होतो. रात्री घरी जातो तेव्हा लघवी करताना जळजळ होते. तब्येत बिघडते. पण आणखी जास्त त्रास होऊ नये म्हणून लिंबू पाणी, लस्सी, ऊसाचा रस पित असतो.”

शारीख सकाळी 9 वाजता मार्केटमध्ये येतात तर रात्रीचे 11 वाजेपर्यंत असतात. दिवसभर ते उन्हातच असतात.

शारीख हिवाळ्यात दिवसाचे 500 रुपये कमावयाचे. पण, आता 200 रुपयेही कमाई होत नसल्याचं ते सांगतात.

आंबेविक्री करणाऱ्या बिस्मिला शाह यांची परिस्थितीही काही वेगळी नाही. त्यांच्या डोक्यावर तर कुठलंही छप्पर नसताना तळपत्या उन्हात ते विक्रीसाठी बसतात.

“दिवसभर एकही गिऱ्हाईक नसतं आणि आलं तरी तो म्हणेल त्या भावात द्यायला लागतं. कारण, गिऱ्हाईक ऊन्हामुळे जास्त वेळ थांबत नाहीत”, असं शाह सांगतात.

रिक्षाचालकांचे उन्हात हाल

अकोला शहरात फिरताना आम्हाला आणखी एक गोष्ट दिसली ती म्हणजे सायकल रिक्षा. इथं लोक अजूनही सायकल रिक्षाचा वापर करतात.

45 अंश सेल्सिअस तापमानात सायकल रिक्षावाले डोक्यावर कुठलंही छप्पर नसताना हे मेहनतीच काम करतात. जवळपास आठ ते नऊ तास या उन्हात त्यांना काम करायला लागतं.

रिक्षाचालक विनोद सांगतात, “उन्हात खूप घाम येतो. मग छातीत दुखायला लागतं. कधी उठतो तर कधी बसतो. पण, सवारी मिळाली की एकसारखा दिवसभर चालत असतो. घरी गेल्यावर जेवण अजिबात होत नाही. दिवसभर जीव फक्त पाणी पाणी करतो.”

या उन्हात गेल्या 20-25 वर्षांपासून सातत्यानं काम करणारे काही रिक्षाचालक ऊन सवयीचं झाल्याचं सांगतात, पण त्यावेळी होणारा त्रास तर असतोच.

रिक्षाचालक मोहम्मह फिरोज दररोज उन्हात रिक्षा चालवत 20 किलोमीटर फिरतात.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर आम्हाला रिक्षाचालक मोहम्मह फिरोज भेटले. ते दररोज उन्हात रिक्षा चालवत 20 किलोमीटर फिरतात. सकाळी 9 वाजता घरातून निघाले की सहा वाजता काम आटोपून घरी जातात.

पण, ऊन आता सवयीचं झाल्याचं ते सांगतात. दिवसभरात ऊन्हाचा त्रास होऊ नये म्हणून ते लिंबू शरबत पितात हे मात्र आवर्जून सांगतात.

शहरात प्रचंड ऊन आहे. त्यामुळे महापालिकेसोबतच काही संस्थांनी सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाणाची सोय केली आहे. आम्ही ज्या ज्या भागात फिरलो तिथे असलेल्या पाणपोईवर देखील गर्दी दिसत होती. कारण, अकोला सर्वाधिक तापतं.

सरकारनं मार्गदर्शन सूचना जारी केल्यानंतरही उन्हात काम

रस्त्यावरील विक्रेते, बांधकाम मजूर यांच्या कामाच्या वेळा बदलण्याचे निर्देश सरकारनं दिले होते. दुपारी 12-4 या वेळेत सक्तीची विश्रांती घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पण, अकोल्यात लोकांना पोट भरण्यासाठी पर्याय नसल्यानं उन्हात येऊन काम करायला लागत असल्याचं ते सांगतात.

कामाशिवाय पर्याय नसणाऱ्या अशा मजुरांबद्दल काय? याबद्दल आम्ही निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे यांच्यासोबत संपर्क साधला.

ते म्हणतात, “खूप उन्हात काम करू नये यासाठी आम्ही सूचना दिलेल्या आहेत. तसेच कामगार विभागाला देखील आम्ही सूचना दिल्या आहेत की अशा कामगारांचे कामाचे तास कमी करावे. पण, ज्या मुजरांना उन्हात काम करायला लागत असेल त्यांच्यासाठी आम्ही एक वॉर रुम तयार केली आहे. कोणत्या मजुरांची तक्रार असेल तर ते अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वॉर रुमला संपर्क साधू शकतात.”

सीमा पांढरे यांचं झोपडीवजा घर पूर्णपणे पत्र्याचं आहे.

अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाचा वॉर रुमचा संपर्क क्रमांक 8065909844 असा आहे. यावर मजुरांना तक्रार करता येते.

सरकारच्या सूचना असल्या तरी या लोकांना उन्हात काम केल्याशिवाय पर्याय नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

असं उन्हात काम करायला लागलं तर वैद्यकीयदृष्ट्या नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे याबद्दल डॉ. विक्की आडे सांगतात, “शक्यतो उन्हात काम करूच नये. पण, ज्यांना पर्याय नाही त्यांनी व्यवस्थित काळजी घेऊन काम करायला पाहिजे. उन्हात काम करताना सुती कपडे वापरून पूर्ण शरीर झाकायला हवे.”

“कपडे पांढरे असतील तर अधिक उत्तम. महत्वाचं म्हणजे शरीरात पाण्याची कमी होता कामा नये.

भरपूर पाणी प्यायला हवं. उन्हात खूप घाम जातो. त्यामध्ये शरीरातले इलेक्ट्रोलाईट पण घामासोबत जातात. त्यामुळे शरीरातील पाण्याची कमी भरून काढण्यासाठी ओआरएस पण घेता येतं,” असं ते म्हणाले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC