Home LATEST NEWS ताजी बातमी डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन; मानसिक आरोग्य, साहित्य, समाजकार्य यांच्यातील दुवा हरपला

डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन; मानसिक आरोग्य, साहित्य, समाजकार्य यांच्यातील दुवा हरपला

11
0

Source :- BBC INDIA NEWS

आनंद नाडकर्णी

फोटो स्रोत, FACEBOOK/ANAND NADKARNI

Published 1 तासापूर्वी

वाचन वेळ: 4 मिनिटे

मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात चार दशकांहून अधिक काळ भरीव काम करणारे प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ, विचारवंत, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. आनंद नाडकर्णी यांचे आज सकाळी निधन झाले.

डॉ. आनंद नाडकर्णी यांचे विद्यार्थी आणि गेली अनेकवर्षं सहकारी असणारे डॉ. ओंकार जोशी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना त्यांचं निधन झाल्याची माहिती दिली.

वैद्यकीय उपचार, व्यसनमुक्ती, साहित्य, कला आणि मानसिक आरोग्य जनजागृती या अनेक क्षेत्रांत त्यांनी खोल आणि दीर्घकालीन ठसा उमटवला. मुक्तांगण आणि Institute for Psychological Health (IPH) सारख्या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी मानसिक आरोग्य सेवेला सामाजिक आंदोलनाचे स्वरूप दिले.

डॉ. आनंद नाडकर्णी यांचा जन्म 22 डिसेंबर 1958 रोजी झाला. ते प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ, विचारवंत, लेखक, नाटककार, कवी, संगीतकार, चित्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते होते.

मानसिक आरोग्य, साहित्य, कला आणि सामाजिक जाणीव या क्षेत्रांत त्यांनी केलेले कार्य दीर्घकाळ स्मरणात राहणारे ठरलं आहे. शहाण्यांचा सायकियाट्रिस्ट हे त्यांचं पुस्तक विशेष प्रसिद्ध आहे.

स्वभाव-विभाव, विषादयोग, मनोगती, कर्मधर्मसंयोग, मुक्तिपत्रे, एका सायकियाट्रिस्टची डायरी, गद्धेपंचवीशी, आरोग्याचा अर्थ, हे ही दिवस जातील, जन्मरहस्य अशा अनेक पुस्तकांचं लेखन त्यांनी केलं.

डॉ. नाडकर्णी यांना मार्च महिन्यात पॅनक्रियाटिक न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरचे निदान झाले होते. 6 मे रोजी मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर ते बरे होण्याच्या प्रक्रियेत होते.

मात्र 13 मेच्या रात्री त्यांना उलट्यांचा त्रास झाला आणि त्यानंतर अ‍ॅस्पिरेशन न्यूमोनिया झाला. त्याच रात्री आतड्याला झालेल्या छिद्रामुळे त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात आली. सुरुवातीला त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली होती.

त्यानंतर मात्र त्यांना हायपोटेन्शनचा त्रास झाला आणि पुढे हृदयविकाराचा झटका आला. 15 मे रोजी पहाटे 5 वाजता त्यांचे निधन झाले.

व्यसनमुक्तीसाठी विशेष कार्य

आनंद नाडकर्णी यांचा जन्म एका सुशिक्षित आणि संवेदनशील कुटुंबात झाला. त्यांचे वडील सुरुवातीला प्राध्यापक आणि नंतर प्राचार्य होते.

लहानपणी पोलिओच्या आजारामुळे त्यांना शारीरिक अडचणींचा सामना करावा लागला; मात्र बुद्धिमत्ता, सकारात्मक वृत्ती, संवेदनशीलता आणि अपार चिकाटी यांच्या जोरावर त्यांनी त्या अडचणींवर मात केली.

त्यांचे प्रारंभिक शिक्षण जळगाव, आंबेजोगाई, विलेपार्ले आणि ठाणे येथे झाले. पुढे ठाणे कॉलेजमधून त्यांनी विज्ञान शाखेत पदवी घेतली. त्यानंतर सेठ जी.एस. मेडिकल कॉलेजमधून MBBS (1980) आणि के.ई.एम. रुग्णालयातून Diploma in Psychological Medicine तसेच MD (मनोविकारशास्त्र) (1984) ही पदवी त्यांनी संपादन केली.

एमडी परीक्षेत ते मुंबई विद्यापीठाच्या सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. काही काळ त्यांनी के.ई.एम. रुग्णालयात अध्यापनाचे कार्यही केले.

आनंद नाडकर्णी

फोटो स्रोत, Anand Nadkarni/facebook

पदव्युत्तर शिक्षण चालू असतानाच मानसिक आरोग्याबाबतचे अज्ञान, पूर्वग्रह आणि उपचारांतील विषमता यांविरोधात संस्थात्मक पातळीवर काम करण्याची गरज त्यांनी ओळखली.

आयपीएच ही संस्था पुढे मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, अमिटी विद्यापीठ आणि इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाशी संलग्न मान्यताप्राप्त शैक्षणिक केंद्र म्हणून कार्यरत होती. ठाणे, पुणे आणि नाशिक या तीन शहरांमध्ये संस्थेचे कार्य सुरू होते.

व्यसनमुक्ती क्षेत्रातील त्यांचे कार्य विशेष उल्लेखनीय ठरले. 1980 च्या दशकात रस्त्यावर सापडलेल्या व्यसनी तरुणांवरील उपचारांपासून सुरू झालेला हा प्रवास पुढे मुक्तांगण व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रापर्यंत पोहोचला. ते ‘मुक्तांगण मित्र’ संस्थेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.

विविध औद्योगिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांसाठी त्यांनी मानसिक आरोग्य विषयक सल्लागार व प्रशिक्षक म्हणूनही काम केले. औद्योगिक क्षेत्रातील त्यांच्या मार्गदर्शक भूमिकेची दखल घेऊन इंडोको रेमेडीज या आघाडीच्या औषधनिर्माण कंपनीच्या संचालक मंडळावर त्यांची निवड करण्यात आली होती.

आनंद नाडकर्णी

फोटो स्रोत, Anand Nadkarni/facebook

डॉ. नाडकर्णी हे बहुआयामी साहित्यिक आणि कलावंत होते. त्यांनी 27 पेक्षा अधिक साहित्यकृती लिहिल्या होत्या. त्यामध्ये कादंबऱ्या, नाटके, कविता आणि मानसशास्त्रीय लेखनाचा समावेश होता.

हेही दिवस जातील, जत्रारहाट, सोबतीने चालताना, रंग माझा वेगळा यांसारख्या त्यांच्या नाटकांना विशेष मान्यता मिळाली.

कासव, कदाचित, देवराई आणि डॉ. काशिनाथ घाणेकर या मराठी चित्रपटांच्या निर्मितीत त्यांनी तज्ज्ञ म्हणून योगदान दिले होते. त्यांच्या लेखन-संगीतबद्ध मराठी आणि हिंदी गीतांचे 3 अल्बम प्रकाशित झाले होते.

कोरोना काळात त्यांनी मानसिक आरोग्याविषयी जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन आणि ऑफलाइन उपक्रम राबवले.

450 हून अधिक वेबिनार, शेकडो मुलाखती आणि सातत्यपूर्ण संवादातून त्यांनी लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आवाहन IPH हे यूट्यूब चॅनेल त्यांच्या मार्गदर्शनाखाली मानसिक आरोग्य विषयक देशातील महत्त्वाच्या व्यासपीठांपैकी एक ठरले होते.

वैद्यकीय, सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले होते. 2025 साली त्यांच्या आजवरच्या कार्याची दखल घेऊन त्यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला होता. सुमारे 4 दशके त्यांनी मनोविकारतज्ज्ञ म्हणून अविरत काम केले.

शहरी भागांपासून ग्रामीण आणि आदिवासी भागांपर्यंत मानसिक आरोग्य सेवा पोहोचवण्याचा त्यांचा ध्यास अखेरपर्यंत कायम राहिला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC