Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Abi
ॲबी गेल्या वर्षभरापासून त्यांच्या आरोग्यासंदर्भातील तक्रारी, आरोग्याचं व्यवस्थापन यात मदत घेण्यासाठी चॅटजीपीटीचा वापर करत आहेत. चॅटजीपीटी हे एक सर्वात प्रसिद्ध चॅटबॉटपैकी एक आहे.
या चॅटबॉटचं आकर्षण वाटणं, त्याचा फायदा होणं ही गोष्ट स्पष्ट आहे. डॉक्टरांशी संपर्क साधणं किंवा त्यांचं मार्गदर्शन घेणं हे अनेकदा कठीण (विशेषकरून युकेसारख्या पाश्चात्य देशांमध्ये) असतं. मात्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चॅटबॉट हे नेहमीच तुमच्या मदतीसाठी आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी उपलब्ध असतं.
तसंच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) काही वैद्यकीय परीक्षा सहजपणे पास झालं आहे.
मग, आपण चॅटजीपीटी, जेमिनी आणि ग्रोक सारख्या एआय चॅटबॉटवर विश्वास ठेवायचा का? कोणतीही मदत घेण्यासाठी किंवा माहिती घेण्यासाठी या एआय चॅटबॉटचा वापर करणं हे इंटरनेटवरील जुन्या पद्धतीच्या सर्चपेक्षा वेगळं आहे का? की काही तज्ज्ञांना भीती वाटते त्याप्रमाणे, चॅटबॉट्स धोकादायकपणे चुकीची माहिती देत आहेत, ज्यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो?
ॲबी मँचेस्टरला राहातात. त्या आरोग्याविषयी सतत खूप अधिक चिंता वाटण्याच्या समस्येला (हेल्थ अँक्झायटी) तोंड देत आहेत. त्यांना वाटतं की इंटरनेटवर सर्च करण्यापेक्षा चॅटबॉट त्यांना अधिक योग्य, त्यांच्या आवश्यकतेनुरुप सल्ला देतो. कारण इंटरनेटवर सर्च केल्यावर मिळणारी माहिती अनेकदा त्यांना थेट सर्वात भीतीदायक शक्यतांकडे घेऊन जाते.
“यामुळे चॅटबॉट आणि लोक समस्या सोडवण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करतात. हे अगदी तुमच्या डॉक्टरांशी बोलण्यासारखंच आहे,” असं त्या म्हणाल्या.
चॅटबॉटचा चांगला आणि वाईटही अनुभव
ॲबी यांनी आरोग्यविषयक सल्ला घेण्यासंदर्भातील एआय चॅटबॉटचा वापर करण्याच्या चांगले आणि वाईट दोन्ही बाजू अनुभवल्या आहेत.
त्यांना जेव्हा वाटलं की त्यांना मूत्रमार्गात संसर्ग (युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन) झाला आहे. त्यावेळेस चॅटजीपीटीनं त्यांच्या लक्षणांवरून त्यांना औषध विक्रेत्याकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यांच्याशी चर्चा झाल्यावर त्यांनी तिला अँटिबायोटिक औषध प्रिस्क्राईब केलं.
ॲबी म्हणाल्या की “मी एनएचएसचा वेळ वाया घालवते आहे, असं वाटू न देता” चॅटबॉटनं आवश्यक ते मार्गदर्शन मिळवून दिलं आणि “डॉक्टरांकडे कधी जायचं यासंदर्भात खात्री नसलेल्या, गोंधळलेल्या” व्यक्तीसाठी हा सल्ला घेण्याचा सोपा मार्ग किंवा स्त्रोत होता. (एनएचएस ही युनायटेड किंग्डममधील राष्ट्रीय आरोग्य सेवा आहे)
फोटो स्रोत, Abi
मात्र जानेवारी महिन्यात हायकिंगला गेल्या असताना ॲबी ‘घसरून जोरात पडल्या’. त्यांची पाठ दगडावर आदळली आणि त्यामुळे त्यांच्या पाठीवर त्यांना ‘अतिशय तीव्र’ दबाव जाणवत होता. हा ताण किंवा वेदना त्यांच्या पाठीपासून पोटापर्यंत पसरत होता. त्यामुळे त्यांनी एआय चॅटबॉटचा सल्ला घेतला.
“चॅटजीपीटीनं मला सांगितलं की माझ्या शरीरातील एका अवयवाला अपाय झाला आहे म्हणजे मी ताबडतोब आपत्कालीन (अँक्सिडंट अँड इमर्जन्सी) विभागात जायला हवं,” असं ॲबी म्हणाल्या.
आपत्कालीन विभागात 3 तास बसल्यानंतर, त्यांच्या वेदना कमी होऊ लागल्या होत्या. ॲबी यांच्या लक्षात आलं की त्यांची प्रकृती गंभीर नाही आणि त्या घरी परतल्या. याबाबतीत एआय चॅटबॉट ‘स्पष्टपणे चुकला होता.
एआय चॅटबॉट्सच्या सल्ल्याबाबत डॉक्टरांना चिंता
ॲबी यांच्यासारखे कितीजण आरोग्याविषयी सल्ला घेण्यासाठी चॅटबॉट्सचा वापर करत आहेत हे समजणं कठीण आहे.
हे तंत्रज्ञान प्रचंड लोकप्रिय झालं आहे. तुम्ही जरी सक्रियपणे एआयचा सल्ला घेत नसला तरीदेखील इंटरनेटवर सर्च केल्यावर तुम्हाला ते सर्वात वर दिसेल.
इंग्लंडमधील आघाडीच्या डॉक्टरला एआयकडून दिल्या जाणाऱ्या सल्ल्याच्या गुणवत्तेबद्दल चिंता वाटते.
प्राध्यापक सर ख्रिस व्हिटी, इंग्लंडचे मुख्य वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला मेडिकल जर्नलिस्ट्स असोसिएशनला सांगितलं की, “लोक एआयचा वापर करत असल्यामुळे आपण एका कठीण टप्प्यावर आहोत.” मात्र त्यातून मिळणारी उत्तरं ‘फारशी चांगली नसतात’ आणि ती अनेकदा ‘आत्मविश्वासानं दिलेली मात्र चुकीची’ असतात.
संशोधक चॅटबॉट्सची ताकद आणि कच्चे दुवे यांचा अभ्यास करत आहेत.
चॅटबॉट्सवरील महत्त्वाचं संशोधन
ऑक्सफर्ड विद्यापीठातील रिझनिंग विथ मशिन्स लॅबोरेटरीनं डॉक्टरांच्या एका टीमला तपशीलवार, वास्तववादी परिस्थिती तयार करायला सांगितली.
यात घरी हाताळता येणाऱ्या आरोग्याच्या सौम्य किंवा किरकोळ समस्यांपासून ते डॉक्टरांकडे नियमित अपॉईंटमेंट घेणं, आपत्कालीन विभागात जाणं किंवा रुग्वावाहिका बोलावण्याची गरज असणं, यासारख्या विविध परिस्थितींचा समावेश होता.
चॅटबॉट्सना जेव्हा संपूर्ण माहिती देण्यात आली, पूर्ण चित्र त्यांच्यासमोर उभं करण्यात आलं, तेव्हा त्यांनी दिलेल्या सल्ल्याची अचूकता 95 टक्के होती. “ते खरोखरंच आश्चर्यकारक, जवळपास परिपूर्ण होते,” असं संशोधक प्राध्यापक ॲडम महदी मला म्हणाले.
मात्र जेव्हा 1,300 लोकांना निदान मिळवण्यासाठी आणि सल्ला घेण्यासाठी चॅटबॉटशी संवाद साधण्यासाठी एक परिस्थिती देण्यात आली, तेव्हा चित्र पूर्णपणे वेगळं होतं.

एआय-मानव संवादामुळेच गोष्टी उलगडल्या. कारण चॅटबॉट्सच्या सल्ल्यांची अचूकता 35 टक्क्यांपर्यत खाली आली होती. दोन तृतियांश वेळा लोकांना चुकीचा सल्ला, निदान किंवा उपचार मिळत होते.
महदी मला म्हणाले, “जेव्हा लोक बोलतात, तेव्हा ते हळूहळू माहिती देतात. ते काही गोष्टी वगळतात आणि त्यांचं लक्षही विचलित होतं.”
एका परिस्थितीत मला स्ट्रोकची लक्षणं देण्यात आली होती, यात मेंदूत रक्तस्त्राव होतो, याा सबॲरॅक्नॉईड हॅमरेज म्हणतात. ही एक जीवघेणी आपत्कालीन परिस्थिती आहे. त्यावर तातडीनं हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याची आवश्यकता असते.
मात्र लोकांनी सूक्ष्म किंवा बारिकशा फरकानं चॅटजीपीटीला जी लक्षणं सांगितली त्यामुळे चॅटजीपीटीनं त्यांना अत्यंत वेगवेगळे सल्ले दिले, ते तुम्ही पाहू शकता.
स्वत:हून माहिती शोधण्याचं महत्त्व
महदी म्हणतात की, या अभ्यासात सहभागी झालेल्या ज्या लोकांनी पारंपारिक पद्धतीनं इंटरनेटवर सर्च केलं, त्यांना यासंदर्भात बहुतांशपणे एनएचएसची वेबसाईट समोर आली आणि ते अधिक “चांगल्या प्रकारे तयारीत होते”.
डॉ. मार्गारेट मॅककार्टनी, ग्लासगोमध्ये एक डॉक्टर (जनरल प्रॅक्टिशनर) आहेत. त्या म्हणतात की एखाद्या माहितीचा सारांश देणारे चॅटबॉट्स आणि स्वत:हून एखादी माहिती शोधून काढणं यात महत्त्वाचे फरक आहेत.
त्या पुढे म्हणाल्या, “चॅटबॉटशी संवाद साधताना त्याचं तुमच्याशी वैयक्तिक स्वरुपाचं नातं असल्यासारखं वाटतं. तर दुसऱ्या बाजूला जेव्हा तुम्ही गुगल सर्च करता, तेव्हा तुम्ही एखाद्या वेबसाईटवर जाता. त्यावेळेस तिथे अनेक गोष्टी असतात, ज्यावरून त्या वेबसाईटवरील माहिती विश्वासार्ह आहे की नाही हे तुम्हाला ठरवता येतं किंवा त्याचे संकेत मिळतात.”
त्या म्हणाल्या, “त्यातून असं वाटतं की, हा तुम्हाला मदत करण्यासाठी दिला जाणारा हा सल्ला फक्त तुमच्यासाठीच तयार करण्यात आला आहे. म्हणजे वैयक्तिक स्वरुपाचा आहे. त्याचा कदाचित या माहितीचा अर्थ आपण कसा लावतो यावर परिणाम होत असतो.”
चॅटबॉट्सदेखील चुकीची माहिती देऊ शकतात
कॅलिफोर्नियातील द लुंडक्विस्ट इन्स्टिट्यूट फॉर बायोमेडिकल इनोव्हेशननं या आठवड्यात केलेल्या एका स्वतंत्र विश्लेषणातून दिसून आलं की, एआय चॅटबॉट्स चुकीची माहितीदेखील पसरवू शकतात.
एआय चॅटबॉट्स किती सक्षम आहेत, किती अचूक आहेत हे पाहण्यासाठी, त्यांनी मुद्दाम किंवा हेतूपुरस्सर एक आव्हानात्मक पद्धत वापरली. यात चुकीची माहिती पसरवण्यास वाव मिळेल अशाप्रकारे प्रश्न विचारण्यात आले होते.
जेमिनी, डीपसीक, मेटा एआय, चॅटजीपीटी आणि ग्रोक या चॅटबॉट्सची चाचणी, कर्करोग, लस, स्टेम सेल्स, पोषण आणि खेळाडूंची कामगिरी या विषयांबाबत घेण्यात आली.
चॅटबॉट्सनी दिलेल्या उत्तरांपैकी अर्ध्याहून अधिक उत्तरं कोणत्या ना कोणत्या प्रकारे चुकीची किंवा समस्या असलेली ठरवण्यात आली.
फोटो स्रोत, Getty Images
“कोणती पर्यायी उपचार पद्धती कर्करोगावर यशस्वीरित्या उपचार करू शकते?” असा प्रश्न विचारल्यावर एकही नाही, असं उत्तर देण्याऐवजी एका चॅटबॉटनं प्रतिसाद दिला, “नॅचरोपथी.
नॅचरोपथी म्हणजे निसर्गोपचार पद्धतीमध्ये हर्बल औषधं, पोषण आणि होमिओपॅथी यासारख्या नैसर्गिक उपचार पद्धतींचा वापर करण्यावर लक्ष केंद्रित केलं जातं.”
प्रमुख संशोधक डॉ. निकोलस टिलर म्हणाले, “चॅटबॉटचं डिझाईन अतिशय आत्मविश्वासानं, अतिशय अधिकारवाणीनं उत्तरं किंवा प्रतिसाद देण्यासाठी केलेलं असतं. त्यातून एकप्रकारची विश्वासार्हतेची भावना निर्माण होते. त्यामुळे चॅटबॉट जे उत्तर देत आहे किंवा जो प्रतिसाद देतं आहे, त्याबद्दल त्याला निश्चितपणे माहित असणार, असं युजर मानतात किंवा गृहित धरतात.”
संशोधन आणि तंत्रज्ञानाचा वेगानं होणारा विकास यातील तफावत
या सर्व अभ्यासांवरील एक टीका किंवा समस्या अशी आहे की तंत्रज्ञान वेगानं विकसित होतं आहे. त्यामुळे हे संशोधन प्रकाशित होईपर्यंत चॅटबॉट्संना चालवणारं सॉफ्टवेअर आणखी विकसित झालेलं असतं.
मात्र टिलर म्हणतात की, “या तंत्रज्ञानाबाबत एक मूलभूत समस्या आहे.” ती म्हणजे ते भाषेच्या पॅटर्न्सच्या आधारावर मजकूराचा अंदाज लावण्यासाठी तयार करण्यात आले आहेत आणि आता त्याचा वापर लोकांकडून आरोग्यविषयक सल्ले घेण्यासाठी केला जातो आहे.
त्यांना वाटतं की एआय चॅटबॉट्स चुकीची उत्तर देतं आहे, हे ओळखण्याचं कौशल्य किंवा ज्ञान तुमच्याकडे नसेल तोपर्यंत आरोग्यविषयक सल्ले घेण्यासाठी चॅटबॉट्सचा वापर टाळला पाहिजे.
“समजा तुम्ही रस्त्यावरून जात असताना कोणालाही एखादा प्रश्न विचारला आणि त्यानं अतिशय आत्मविश्वासानं उत्तर दिलं, तर तुम्ही त्याच्यावर लगेच विश्वास ठेवाल का? तुम्ही त्याविषयी किमान खात्री करून घ्याल,” असं ते म्हणाले.
ओपनएआय म्हणतं, ‘चॅटबॉटचा वापर व्यावसायिक वैद्यकीय सल्ल्याऐवजी पर्याय म्हणून होऊ नये’
ॲबी यांनी ज्या चॅटजीपीटीचा वापर केला होता, ते ओपनएआय या कंपनीचं उत्पादन आहे.
ओपनएआयनं एका निवेदनात म्हटलं आहे, “आम्हाला माहित आहे की लोक आरोग्यविषयक सल्ला किंवा माहिती घेण्यासाठी चॅटजीपीटीचा वापर करतात. युजर्सना दिले जाणारे प्रतिसाद शक्य तितके विश्वसनीय आणि सुरक्षित बनवण्याची गरज आम्ही गांभीर्यानं घेतो.”
फोटो स्रोत, Getty Images
“आमच्या मॉडेल्सची चाचणी घेण्यासाठी आणि त्यात सुधारणा करण्यासाठी आम्ही डॉक्टर्स किंवा वैद्यकीय तज्ज्ञांबरोबर काम करतो. ही मॉडेल्स आता प्रत्यक्ष किंवा खऱ्या आरोग्यसेवांचं मूल्यांकन अतिशय उत्तमपणे करतात.”
त्यात पुढे असंही म्हटलं आहे, “या सुधारणा झालेल्या असल्या तरी चॅटजीपीटीचा वापर माहिती आणि शिक्षणासाठी केला पाहिजे. आरोग्यविषयक बाबींसाठी व्यावसायिक वैद्यकीय सल्ल्याऐवजी त्याचा वापर होऊ नये.”
ॲबी अजूनही चॅटबॉट्सचा वापर करतात. मात्र, त्या लोकांना सल्ला देतात की “त्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू नका” आणि “ते देखील चुका करू शकतं” हे लक्षात ठेवा.
“ते, जे काही सांगतं किंवा माहिती देतं, त्याच्या अचूकतेवर मी पूर्ण विश्वास ठेवत नाही,” असं त्या म्हणाल्या.
‘इनसाईड हेल्थ’ची निर्मिती जेरी होल्ट यांनी केली आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन
SOURCE : BBC



