Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Luca Carano
6 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. लुका कारानो जेव्हा आपल्या प्रेयसीसोबत बार्सिलोनामध्ये राहत होते तेव्हा त्यांनी रात्री जेवायला बाहेर जाताना आपल्या ‘लुना’ नावाच्या कुत्र्याला घरीच एकटं ठेवण्याचा निर्णय घेतला.
कुत्र्याच्या या पिलाला ते शक्यतो सोबतच घेऊन जायचे, पण त्या रात्री त्यांनी तिला घरीच ठेवलं होते.
“ती आता घरी एकटी असेल आणि कंटाळली असेल. लुनासाठी YouTube वर काहीतरी असायला हवं,” असे विचार त्यावेळी मनात आल्याचं कारानो सांगतात.
कारानो हे पायलट असून ते आता इटलीतील बोलोन्या (Bologna) येथे राहतात.
त्यांनी स्वतः त्यांच्या कल्पनेवर काम करायचं ठरवलं आणि ‘सिअॅस्टा डॉग टीव्ही’ (Siesta Dog TV) नावाचं YouTube चॅनल सुरू केलं.
विशेष म्हणजे कुत्र्यांना जे रंग स्पष्ट दिसतात त्याच रंगांचा वापर या व्हीडिओंमध्ये केला.
यामध्ये 10-10 तासांचे मोठे कार्टून्स आहेत. यात कधी अॅनिमेटेड न्यूयॉर्कच्या शहरात बागडणारी कुत्री दिसतात तर कधी शांत तलावाकाठी बदकांना पाहणारी कुत्री दाखवली जातात.
घरी एकटे राहणाऱ्या कुत्र्यांसाठी
कुत्र्यांचं मन शांत राहावं यासाठी या व्हीडिओंसोबत संथ संगीत किंवा ‘अॅम्बियंट’ म्युझिकचा वापर केला आहे. कारानो यांच्या एका व्हीडिओला तर चक्क 35 लाख व्ह्यूज मिळाले आहेत.
“लुना या व्हीडिओंचा किती आनंद घेते हे, मी स्वतः पाहिलं आहे. हे व्हीडिओ लावून कुत्र्याला घरी एकटं सोडताना आता काळजी वाटत नाही. कारण यामुळे कुत्री शांत राहतात, अशा अनेक लोकांच्या कमेंट्स मला येतात,” असं कारानो पुढे सांगतात.
कारानो यांनी सुरुवात केल्यापासून गेल्या 6 वर्षांत कुत्र्यांसाठीच्या टीव्हीचा हा ट्रेंड प्रचंड वाढला आहे.
आपल्या कुत्र्याला घरी एकटं सोडण्याची चिंता वाटणाऱ्या मालकांची संख्या मोठी आहे आणि हीच गरज ओळखून आता अनेक चॅनेल्सही या क्षेत्रात उतरले आहेत.
“आजकाल लोक पाळीव कुत्र्यांना मुलांसारखं प्रेम देतात त्यामुळं त्यांना एकटं सोडण्याची भीती मालकांना जास्त सतावते,” असं कनेक्टिकटमधील ‘सेंटर फॉर कॅनाइन बिहेविअर स्टडीज’चे संचालक निकोलस डोडमन सांगतात.
फोटो स्रोत, Luca Carano
यामुळेच कुत्र्यांसाठीच्या टीव्हीची मागणी वाढत असून ‘फोर पॉव्हजटीव्ही’ (Four Paws TV), ‘कार्टून डॉग म्युझिक’, ‘पपी ड्रीमस्केप’ आणि ‘स्लीपी कॅट्स’ अशा चॅनेल्सचा यात समावेश आहे.
या व्हीडिओंमध्ये कधी छोटी पिल्लं खेळताना दिसतात तर कधी खारींचे क्लोज-अप शॉट्स तर काही व्हीडिओंमध्ये प्राणी किंवा माणसं खेळण्यांशी खेळताना दिसतात.
इतर चॅनेल्सच्या तुलनेत कारानो यांच्या व्हीडिओंमध्ये प्रामुख्याने निळ्या रंगाच्या छटा (Blue hues) वापरल्या जातात. कारण कुत्रे हा रंग इतर रंगांच्या तुलनेत अधिक स्पष्टपणे पाहू शकतात. विशेष म्हणजे, ‘AI’ तंत्रज्ञानामुळे आता अशा प्रकारचे व्हीडिओ बनवणं खूपच सोयीचं झालं आहे.
आमचे काही व्हीडिओ AI द्वारे बनवलेले आहेत. तर आम्ही स्वतः तयार केलेले आहेत. तंत्रज्ञानामुळे आम्ही व्हीडिओंमध्ये हवे ते ठिकाण अगदी हवाईचा समुद्रकिनाराही दाखवू शकतो. मुळात हे व्हीडिओ AI ने बनवले आहेत की नाही यानं कुत्र्यांना काहीच फरक पडत नाही,” असं कारानो सांगतात.
कुत्री खरंच टीव्ही पाहतात का?
पण कुत्री खरंच टीव्ही पाहतात का? आणि त्याचा त्यांना काही फायदा होतो का? याबाबतच्या संशोधनातून संमिश्र मत समोर आलं आहे.
क्वीन्स युनिव्हर्सिटी बेलफास्ट’मधील ‘कॅनाइन बिहेविअर सेंटर’ने 2023 मध्ये 50 कुत्र्यांवर एक अभ्यास केला. एका रेस्क्यू शेल्टरमधील कुत्र्यांचा व्हीडिओला कसा प्रतिसाद मिळतो हे त्यांनी तपासून पाहिलं.
यात असं दिसून आलं की, एकूण वेळेपैकी कुत्र्यांनी केवळ 10.8% वेळच थेट टीव्ही स्क्रीनकडे पाहिलं.
या अहवालानुसार, “या प्रयोगादरम्यान कुत्र्यांनी टीव्हीकडे विशेष लक्ष दिलं नाही. सुरुवातीला थोडी उत्सुकता दाखवल्यानंतर काही वेळातच त्यांना टीव्हीची सवय झाली आणि त्यांचं कुतूहल संपलं.”
फोटो स्रोत, DogTV
कुत्र्यांच्या मानसिक आरोग्यासाठी त्यांच्या मनोरंजनाचे पारंपारिक मार्ग अधिक उपयुक्त असल्याचं मत संशोधक नोंदवतात.
“कुत्र्यांनी इतर कुत्री आणि माणसांशी खेळणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. विशेषतः एका ठिकाणी किंवा मर्यादीत जागेत राहणाऱ्या कुत्र्यांसाठी हाच चांगला विरंगुळा आहे,” असं संशोधकांंचं म्हणणं आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगो’च्या प्राध्यापिका इलेना हिर्स्की-डग्लस यांनी केलेल्या संशोधनातही हेच समोर आलं होतं की, कुत्रे टीव्ही स्क्रीनकडे फारसं लक्ष देत नाहीत.
प्राध्यापिका इलेना यांनी केलेल्या दोन संशोधनातून असं समोर आलं की, कुत्री सलग जास्त वेळ टीव्ही पाहू शकत नाहीत.
“कुत्री फक्त काही सेकंदांसाठीच स्क्रीनकडे पाहतात, हे माझ्या लक्षात आलं,” असं त्या म्हणाल्या.
मात्र, हा अभ्यास केवळ 2 कुत्र्यांच्या सवयींवर आधारित होता. दुसरीकडे, काही इतर संशोधनं मात्र अधिक सकारात्मक निष्कर्ष दाखवतात.
ऑबर्न युनिव्हर्सिटीने गेल्या वर्षी जुलैमध्ये एक अभ्यास प्रसिद्ध केला. यामध्ये त्यांनी 453 कुत्र्यांच्या मालकांकडून माहिती गोळा केली आणि त्यांची कुत्री टीव्ही पाहताना नक्की कशी वागतात याचे निरीक्षण केले.
संशोधकांनी प्रामुख्याने अशाच कुत्र्यांच्या वागणुकीचा अभ्यास केला जे आधीपासूनच टीव्ही पाहत होते.
“जेव्हा कुत्री टीव्ही पाहतात तेव्हा त्यांना त्यातलं जग अर्थपूर्ण वाटतं आणि त्यात दिसणाऱ्या विविध गोष्टी खऱ्या जगासारख्याच जाणवतात,” असं या अहवालात म्हटलं.
टीव्ही पाहिल्यामुळे कुत्र्यांना एक समृद्ध आणि सकारात्मक अनुभव मिळू शकतो, असंही त्यांना वाटतं.
मानसिक ताण कमी करण्यासाठी
बेक ल्युबेक अमेरिकेतील अॅरिझोना येथील ‘डॉग टीव्ही’च्या (DogTV) सीईओ आहेत. त्या कुत्र्यांसाठीचा टीव्ही फायदेशीर असल्याचं ठामपणे सांगतात.
या चॅनेलची सुरुवात 2012 मध्ये झाली होती.
“आमचे व्हीडिओ कुत्र्यांचा मानसिक ताण कमी करण्यास मदत करतात,” असा दावा बेक ल्युबेक करतात.
यासाठी त्या ‘पर्ड्यू युनिव्हर्सिटी’च्या एका अभ्यासाचा संदर्भ देतात. या अभ्यासानुसार, हे व्हीडिओ पाहणाऱ्या कुत्र्यांनी इकडे-तिकडे फेऱ्या मारण्याऐवजी एका जागी शांत बसून विश्रांती घेण्यात आणि स्वतःची निगा राखण्यात वेळ घालवला.
‘डॉग टीव्ही’वर खऱ्या कुत्र्यांचे व्हीडिओ असतात. ते एआयचा मर्यादीत वापर करतात, असं सांगण्यात आलं.
“आजकाल अनेक चॅनेल्स खूप व्हीडिओ बनवण्यासाठी AI चा वापर करत आहेत. पण मुक्या प्राण्यांच्या बाबतीत असे शॉर्टकट आम्हाला योग्य वाटत नाहीत. आम्ही अत्यंत विचारपूर्वक मोजक्या निर्मितीसाठी एआयचा वापर करतो,” असं ल्युबेक म्हणाल्या.
फोटो स्रोत, DogTV
डॉग टीव्ही’चे व्हीडिओ एडिट करताना रंगांमध्ये खास बदल केले. त्यामुळं ते कुत्र्यांना आकर्षित करू शकतात.
“लाल आणि हिरव्या रंगाला अधिक स्पष्ट केल्यास ते लक्ष वेधतात आणि कुत्री त्याकडं आकर्षित होतात,” असं ल्युबेक म्हणाल्या.
‘डॉग टीव्ही’वर असे अनेक कार्यक्रमात ‘एक्सपोजर थेरपी’चा वापर केला जातो. कुत्रे फटाक्यांच्या आवाजाला किंवा कारमधील प्रवासाला घाबरतात. पण त्याचे व्हीडिओ दाखवून हळूहळू त्यांचा आत्मविश्वास वाढवला जातो, असं त्या म्हणाल्या.
कुत्री जेव्हा अशा गोष्टी टीव्हीवर वारंवार पाहतील तेव्हा प्रत्यक्षात त्या गोष्टी समोर आल्यावर त्यांची भीती आणि अस्वस्थता कमी होते, असंही त्यांनी म्हटलं.
ल्युबेक यांच्या मते, प्रत्येक कुत्र्याचा स्वभाव आणि त्याची जात (ब्रिड) वेगळी असते. त्यामुळे त्यांची आवडही वेगवेगळी असते. एखाद्या कुत्र्याला शांत मैदानात बसलेली कुत्री पाहायला आवडतं. तर दुसऱ्या एखाद्याला बागेत एकमेकांचा पाठलाग करणारी किंवा खेळणारी कुत्री पाहण्यात जास्त मजा येते.
जे कुत्रे जास्त हालचाल करत नाहीत त्यांच्यासाठी टीव्ही खूप फायदेशीर ठरू शकतो, असं त्या म्हणतात.
“वयस्कर किंवा आळशी कुत्र्यांसाठी हे व्हीडिओ त्यांच्या मनाला चालना देण्याचं काम करतात. कारण जर ते शरीराने जास्त धावपळ करू शकत नसतील तरीही त्यांच्या मेंदूची कसरत होणं गरजेचं असतं,” असं ल्युबेक सांगतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC



