Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Yuri Gripas/Abaca/Bloomberg via Getty Images/TruthSocial/@realDonaldTrump
9 तासांपूर्वी
वाचन वेळ: 5 मिनिटे
व्हाईट हाऊसच्या पत्रकारांसोबत आयोजित अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या डिनर कार्यक्रमात गोळीबार झाल्यानंतर संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे.
गोळीबाराचे आवाज ऐकताच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शस्त्रसज्ज सुरक्षारक्षकांनी घेरलं आणि त्यांना सुरक्षितपणे कार्यक्रमस्थळाबाहेर नेलं.
यानंतर ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर दोन छायाचित्रे शेअर केली. त्यापैकी एका छायाचित्रात शर्ट नसलेला एक व्यक्ती जमिनीवर हात मागे करून पडलेली दिसते. या व्यक्तीला ‘संशयित हल्लेखोर’ मानलं जात आहे.
नंतर पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनीच सांगितलं की, त्यांनी त्यांनी ‘संशयित हल्लेखोराचे’ फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
या व्यक्तीबद्दल काही माहिती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली असून काही माहिती पोलिसांकडून समोर आली आहे.
कोण आहे ‘संशयित हल्लेखोर’?
अमेरिकन माध्यमांच्या वृत्तांनुसार, संशयित हल्लेखोर 31 वर्षीय असून, त्याचं नाव थॉमस अॅलन असं आहे. तो कॅलिफोर्नियातील टॉरन्स येथील रहिवासी आहे.
फोटो स्रोत, Luke Johnson/Getty Images
मेट्रोपॉलिटन पोलिस विभागाचे अंतरिम प्रमुख जेफ्री कॅरोल यांनी सांगितलं की, संशयित त्याच हॉटेलमध्ये पाहुणा म्हणून थांबला होता, जिथे कार्यक्रम होत होता. तो ज्या खोलीत राहात होता, त्या खोलीची तपासणी सुरू आहे.
जेव्हा जेफ्री कॅरोल यांना विचारण्यात आले, “संशयिताचा हेतू काय होता?”
त्यावर त्यांनी सांगितले की अद्याप हे स्पष्ट झालेले नाही.
फोटो स्रोत, TruthSocial/@realDonaldTrump
जेफ्री म्हणाले, “गोळीबार झाला म्हणजे सुरक्षेत त्रुटी होती, असे नाही. ज्या चेकपॉइंटवर संशयित पकडला गेला, तो विशेष कारणासाठी उभारण्यात आला होता आणि त्याने आपले काम केले.”
जेफ्री कॅरोल यांनी सांगितले की, संशयिताकडे अनेक शस्त्रे होती.
ते म्हणाले, “त्याच्याकडे एक शॉटगन, एक हँडगन आणि अनेक चाकू होते. संशयिताला गोळी लागलेली नाही आणि प्राथमिक तपासातून तो एकटाच हल्लेखोर होता, असे दिसते. आता लोकांना कोणताही धोका नाही.”
ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला कोर्टात हजर करणार
वॉशिंग्टन डीसीच्या महापौरांनी सांगितलं की, संशयितावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि तो पोलिस कोठडीत आहे.
अमेरिकन अॅटर्नी जीनिन पिरो यांनी सांगितलं की, संशयितावर दोन आरोप ठेवण्यात आले आहेत. एक म्हणजे, हिंसक गुन्ह्यादरम्यान शस्त्राचा वापर करणे आणि दुसरा म्हणजे, धोकादायक शस्त्राने फेडरल अधिकाऱ्यांवर हल्ला करणे.
संशयिताला सोमवारी फेडरल न्यायालयात हजर केले जाईल, असंही जीनिन पिरो यांनी सांगितलं.
फोटो स्रोत, Andrew Harnik/Getty Images
ट्रम्प यांनी हल्लेखोराविषयी काय सांगितलं?
या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांना माहिती दिली.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “हा कार्यक्रम अभिव्यक्ती स्वातंत्र्याला समर्पित होता आणि सर्वांना एकत्र आणणं हा त्यामागचा उद्देश होता. पण एक माणूस अनेक शस्त्रं घेऊन सिक्योरिटी चेकपॉइंटवर हल्ला करायला आला. सिक्रेट सर्व्हिसच्या शूर सदस्यांनी त्याला रोखलं.”
नुकताच सोशल मीडियावर ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा फोटो आणि गोळीबाराची सुरुवात दाखवणारे सीसीटीव्ही फुटेज शेअर करण्यात आलं आहे. संशयिताची प्रकृती खूपच गंभीर आहे.
ट्रम्प असंही म्हणाले की, या घटनेत एका सिक्रेट सर्व्हिस अधिकाऱ्यावर अगदी जवळून गोळी झाडण्यात आली, परंतु त्याच्या बुलेटप्रूफ जॅकेटमुळे त्याचा जीव वाचला.
फोटो स्रोत, Celal Gunes/Anadolu via Getty Images
ते म्हणाले, “मी नुकतंच त्या अधिकाऱ्याशी बोललो आहे आणि त्याची प्रकृती ठीक आहे. त्याचं मनोधैर्य उंचावलेलं आहे. त्याला मी सांगितलं की आम्ही त्याच्यावर प्रेम करतो आणि आदरही करतो.”
ट्रम्प म्हणाले की, या कार्यक्रमापूर्वी त्यांच्या टीमला सुरक्षेविषयीच्या कोणत्याही धोक्याची कल्पना नव्हती.
ते म्हणाले की, “यामागील हेतू काय होता हे मला माहीत नाही, पण संशयित खूपच गंभीर दिसतो.”
अध्यक्ष ट्रम्प म्हणाले, “संशयित 50 यार्ड अंतरावरून धावत आला आणि त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बंदुका बाहेर काढल्या. अधिकारी कॅलिफोर्नियातील संशयिताच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचले असून त्यांनी तपास सुरू केला आहे.”
प्रत्यक्षदर्शी BBC प्रतिनिधीनं काय सांगितलं?
बीबीसीचे नॉर्थ अमेरिकेतली प्रतिनिधी गॅरी ओ’डोनह्यू हेही त्या डिनर पार्टीत उपस्थित होते.
त्यांनी सांगितलं की, “ही घटना रात्री सुमारे 8:35 वाजता (अमेरिकन वेळेनुसार) घडली. आम्ही स्टेजपासून सुमारे 40 फूट अंतरावर बसलो होतो. मुख्य दरवाजे आमच्या समोर होते, साधारण 100 फूट अंतरावर.”
फोटो स्रोत, Yuri Gripas/Abaca/Bloomberg via Getty Images
ते पुढे म्हणाले, “मुख्य दरवाजाच्या दिशेने काही आवाज आले. ते नेमके कशाचे होते हे स्पष्ट नव्हते, पण ते मंद स्फोटांसारखे आवाज होते, जे सामान्यतः ऑटोमॅटिक फायरसारखे वाटतात.”
“ते आवाज सीक्रेट सर्व्हिसकडून येत होते की नाही, हे आम्हाला माहीत नाही. पण आता व्हाईट हाऊस पूलकडून सांगितले जात आहे की, शस्त्रधारी व्यक्तीने प्रवेशद्वारावरील मॅग्नेटोमीटरमधून जाण्याचा प्रयत्न केला आणि सीक्रेट सर्व्हिस व सुरक्षा पथकाने त्याला पकडले.”
याच हॉटेलमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष रेगन यांच्यावरही झाला होता हल्ला
ट्रम्प एका कार्यक्रमात असताना गोळीबार झाला त्या कनेक्टिकट ॲव्हेन्यूवरील वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमध्ये यापूर्वी 1981 मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्यावरही गोळी झाडण्यात आली होती. त्यावेळी ते जखमी झाले होते.
हा हल्ला 30 मार्च 1981 रोजी झाला होता. त्यावेळी हल्लेखोर जॉन हिंकले ज्युनियरने हॉटेलमधील एका कार्यक्रमातून परतणाऱ्या रेगन यांच्यावर गोळीबार केला होता.
रेगन या हल्ल्यातून बचावले, पण गंभीर जखमी झाले होते.
राष्ट्राध्यक्षांच्या गाडीला धडकून एक गोळी त्यांना लागली होती. त्यात त्यांच्या बरगडीचं हाड मोडलं आणि फुफ्फुसाला छिद्रही पडलं होतं. त्यांना तत्काळ जवळच्या जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. नंतर 11 एप्रिल रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
फोटो स्रोत, Getty Images
तत्कालीन व्हाईट हाऊस प्रेस सेक्रेटरी जेम्स ब्रेडी हेही या घटनेत जखमी झाले होते. सिक्रेट सर्व्हिसचे एक एजंट आणि स्थानिक मेट्रोपॉलिटन पोलीस विभागाचे एक अधिकारीही जखमी झाले होते.
या हल्ल्यामुळे ब्रेडी यांच्या मेंदूला इजा झाली आणि त्यांना आयुष्यभरासाठी अपंगत्व आलं. त्या जखमांचे आयुष्यभर परिणाम झाले आणि 2014 मध्ये झालेल्या त्यांच्या मृत्यूला त्या कारणीभूत ठरल्या असंही सांगितलं जातं.
हल्ल्यातील आरोपी हिंकलीला मानसिक स्थितीच्या कारणामुलं दोषी ठरवलं नाही. पण त्याला वॉशिंग्टन डी.सी. मदील एलिझाबेथ हॉस्पिटलच्या उच्च-सुरक्षा विभागात ठेवण्यात आलं. 2016 मध्ये त्याची सुटका झाली होती.
या हॉटेलच्या भिंतीवर गोळीबाराच्या जागेची आठवण म्हणून अजूनही एक फलक लावलेला आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC



