Home LATEST NEWS ताजी बातमी एक्झिट पोल : पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम आणि केरळमध्ये कुणाची सत्ता येऊ...

एक्झिट पोल : पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम आणि केरळमध्ये कुणाची सत्ता येऊ शकते?

4
0

Source :- BBC INDIA NEWS

मतदान

फोटो स्रोत, ANI

3 तासांपूर्वी

वाचन वेळ: 6 मिनिटे

पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानासह चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचे मतदान पूर्ण झाले आहे.

आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये 9 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले होते, तर तामिळनाडूमध्येही 23 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले होते.

पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल अशा दोन टप्प्यांत मतदान पार पडलं.

मतदान संपल्यानंतर या सर्व विधानसभांचे वेगवेगळे एक्झिट पोलही समोर आले आहेत.

एक्झिट पोल हे केवळ अंदाज असतात. या सर्व राज्यांच्या निवडणुकांची मतमोजणी 4 मे 2026 रोजी होणार असून त्यानंतरच अंतिम निकाल समोर येतील.

पश्चिम बंगालमध्ये कोणाला बहुमत?

पश्चिम बंगालबाबत आलेले वेगवेगळे एक्झिट पोल्स वेगवेगळे अंदाज सांगत आहेत.

294 जागांच्या पश्चिम बंगाल विधानसभेमध्ये बहुमतासाठी 147 जागांची गरज आहे.

पी-मार्क एक्झिट पोलमध्ये टीएमसीला 118–138, तर भाजपाला 150–175 जागा दिल्या आहेत.

मॅटराइज एक्झिट पोलमध्ये टीएमसीला 125–140, भाजपाला 146–161 आणि इतरांना 6–10 जागा दिल्या आहेत.

ममता बॅनर्जी

फोटो स्रोत, Getty Images

तामिळनाडूमध्ये द्रमुक आणि मित्र पक्षांना आघाडीचा अंदाज

तामिळनाडू विधानसभाातील 234 जागांसाठी 23 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले होते. येथे बहुमताचा आकडा 118 आहे.

मॅटराइझ एक्झिट पोलमध्ये द्रमुक आघाडीला 122–132, अण्णाद्रमुक आघाडीला 87–110, टीव्हीकेला 10–12 आणि इतरांना 0–6 जागा दिल्या आहेत.

पीपल्स पल्स एक्झिट पोलमध्ये द्रमुक आघाडीला 125–145 अण्णाद्रमुक आघाडीला 65–80, टीव्हीकेला 18–24 आणि इतरांना 2–6 जागा दिल्या आहेत.

एम.के. स्टॅलिन

फोटो स्रोत, Getty Images

आसाममध्ये एक्झिट पोल्स दाखवतंय भाजपला आघाडी

आसाम विधानसभेत 126 जागा आहेत आणि बहुमताचा आकडा 63 आहे.

बहुतांश एक्झिट पोल्समध्ये भाजप आघाडीस आघाडी दाखवली आहे.

ॲक्सिस माय इंडिया एक्झिट पोलमध्ये भाजप आघाडीला 88–100, काँग्रेस आघाडीला 24–36 जागा दिल्या आहेत.

मॅटराइज एक्झिट पोलमध्ये भाजप आघाडीला 85–95, काँग्रेस आघाडीला 25–32 आणि इतरांना 6–12 जागा दिल्या आहेत.

पीपल्स पल्स एक्झिट पोलमध्ये भाजप आघाडीला 68–72, काँग्रेस आघाडीला 22–26 आणि इतरांना 11–15 जागा दिल्या आहेत.

केरळमध्ये एलडीएफ विरुद्ध यूडीएफ

केरळ विधानसभेच्या 140 जागांसाठी 9 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले होते. येथे बहुमताचा आकडा 71 आहे.

ॲक्सिस माय इंडिया एक्झिट पोलमध्ये एलडीएफला 49 –62, यूडीएफला 78–90 आणि भाजप आघाडीला 0–3 जागा दिल्या आहेत.

मॅटराइज एक्झिट पोलमध्ये एलडीएफला 60–65, यूडीएफला 75–85 आणि भाजप आघाडीला 3–5 जागा दिल्या आहेत.

पीपल्स पल्स एक्झिट पोलमध्ये एलडीएफला 55–65, यूडीएफला 70–85 आणि भाजप आघाडीला 0–3 जागा दिल्या आहेत.

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, ANI

पाँडेचेरीमध्ये पुन्हा भाजप आघाडीचे सरकार येण्याची शक्यता

अलीकडील विधानसभा निवडणुकांच्या काळात केंद्रशासित प्रदेश पाँडेचेरीमध्येही 9 एप्रिल रोजी मतदान झाले होते.

पाँडेचेरी विधानसभेच्या 30 जागांसाठी बहुमताचा आकडा 16 आहे.

ॲक्सिस माय इंडिया एक्झिट पोलमध्ये भाजप आघाडीला 16–20, काँग्रेस आघाडीला 6–8 आणि इतरांना 3–7 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मतदान

फोटो स्रोत, ANI

निवडणुका आणि त्यानंतरच्या निकालापूर्वी नेहमी चर्चा सुरू होते ती विविध संस्था आणि वृत्तवाहिन्यांकडून प्रसिद्ध होणाऱ्या एक्झिट पोल्सची.

एक्झिट पोलबद्दल समजून घेण्यासाठी बीबीसीने प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक आणि सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग स्टडीज (CSDS) चे सहसंचालक प्राध्यापक संजय कुमार यांच्याशी चर्चा केली होती.

एक्झिट पोल म्हणजे काय आणि ते कसे करतात?

एक्झिट म्हणजे बाहेर पडणं. हा शब्दच या चाचण्या म्हणजे Polls बद्दल खूप काही सांगतो.

जेव्हा मतदार निवडणुकीसाठी मत देऊन केंद्रामधून बाहेर पडत असतो, तेव्हा त्यांना विचारलं जातं – तुम्ही कोणत्या पक्षाला वा उमेदवाराला मत दिलं, हे सांगाल का?

एक्झिट पोल्स करणाऱ्या संस्था त्यांच्या लोकांना मतदान केंद्राच्या बाहेर उभं करतात. जसजसे मतदार मतदान करून बाहेर येतात, त्यांना विचारलं जातं की त्यांनी कुणाला मत दिलं. इ

तरही काही प्रश्न त्यांना विचारले जातात. उदा. पंतप्रधान पदासाठी तुमचा आवडता उमेदवार कोण वगैरे.

सहसा प्रत्येक मतदान केंद्रावरील दर दहावा मतदार किंवा मग मतदान केंद्र मोठं असेल तर मग दर विसाव्या मतदाराला असे प्रश्न विचारले जातात. मतदारांकडून मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करून या निवडणुकीचे निकाल काय असतील याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला जातो.

2021साली केरळ, आसाम, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. पण सगळ्यांचं लक्ष होतं पश्चिम बंगालवर.

292 जागांच्या या विधानसभेत भाजपला 100 पेक्षा जास्त जागा मिळतील, असं बहुतेक एजन्सीजने म्हटलं होतं. ‘जन की बात’ नावाच्या एका एजन्सीने तर भाजपला 174 पर्यंत जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता. काहींनी तृणमूल काँग्रेसला जास्त जागा मिळतील, असं म्हटलं होतं, तर काहींनी भाजप पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापन करेल असं म्हटलं होतं.

पण निकाल जाहीर झाले तेव्हा ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेस पुन्हा एकदा सत्तेत आली. भाजपला 2016मध्ये तीन जागा मिळाल्या होत्या. त्या तुलनेत चांगली कामगिरी करत त्यांचा आकडा 75 पर्यंत पोहोचला, पण हा आकडा सत्ता स्थापनेसाठी पुरेसा नव्हता.

एक्झिट पोलविषयी नियम – कायदे काय आहेत?

एक्झिट पोल्सना रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल्स अॅक्ट 1951चा सेक्शन 126A लागू होतो.

भारतीय निवडणूक आयोगाने एक्झिट पोल्ससाठी काही नियम आखले आहेत. निवडणुकीवर कोणत्याही गोष्टीचा परिणाम वा प्रभाव पडू नये, यासाठी हे नियम असतात.

निवडणूक आयोग वेळोवेळी एक्झिट पोल्ससाठीच्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करतो. यामध्ये एक्झिट पोल कसे करावेत हे सांगितलं जातं. मतदानाच्या दिवशी एक्झिट पोलचे निकाल प्रसारित करू नयेत, असा नियम आहे.

निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून ते शेवटच्या टप्प्यातलं मतदान संपल्याच्या अर्धा तास नंतर पर्यंत एक्झिट पोलचे निकाल प्रसिद्ध करता येत नाहीत. यासोबतच मतदानानंतर एक्झिट पोलचे निकाल प्रसिद्ध करण्यासाठी ही पाहणी करणाऱ्या संस्थेला निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते.

एक्झिट पोलचे अंदाज सहसा बरोबर असतात का?

प्राध्यापक संजय कुमार याची तुलना हवामान विभागाच्या अंदाजांशी करतात.

ते म्हणतात, “एक्झिट पोलचे अंदाज हे देखील हवामान विभागाच्या अंदाजांसारखे असतात. काही वेळा ते अगदी अचूक असतात, काही वेळा आसपास असतात आणि काही वेळा ते बरोबर नसतात. एक्झिट पोलने दोन गोष्टींचा अंदाज बांधला जातो. मतदानाच्या टक्केवारीचा अंदाज बांधला जातो आणि त्या आधारे पक्षांना मिळणाऱ्या जागांचा अंदाज बांधला जातो.”

संजय कुमार सांगतात, “2004ची निवडणूक विसरून चालणार नाही. अटलबिहारी वाजपेयींचं सरकार पुन्हा येईल असं सगळ्या एक्झिट पोल्सनी म्हटलं होतं. पण एक्झिट पोल्सचे अंदाज चुकीचे ठरले आणि भाजप निवडणूक हरली.”

अनेकदा वेगवेगळे एक्झिट पोल्स वेगवेगळा अंदाज व्यक्त करतात, असं का? याचं उत्तर देताना प्रा. संजय कुमार एक उदाहरण देत सांगतात, “अनेकदा एकाच आजारासाठी वेगवेगळे डॉक्टर्स वेगवेगळ्या प्रकारे तपासण्या करतात. एक्झिट पोलबाबतही हे होऊ शकतं.

वेगवेगळ्या संस्थांनी वेगवेगळं सँपल घेतलं (चाचणी गट निवडला) किंवा वेगळ्या प्रकारे फील्डवर्क केल्याने असं होऊ शकतं.

काही एजन्सीज फोनवरून डेटा गोळा करतात तर काही एजन्सीज त्यांच्या कर्मचाऱ्यांना फील्डवर पाठवतात. यामुळे निकाल वेगवेगळे असू शकतात.”

भारतात एक्झिट पोल पहिल्यांदा कधी झाला होता?

1957च्या दुसऱ्या सार्वजनिक निवडणुकांदरम्यान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ओपिनियनने भारतात पहिल्यांदा निवडणूक चाचणी केली होती.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ओपिनियनचे प्रमुख एरिक डी कॉस्टा यांनी निवडणूक सर्वेक्षण केलं होतं, पण याला पूर्णपणे एक्झिट पोल म्हणता येणार नाही.

त्यानंतर 1980मध्ये डॉक्टर प्रणय रॉय यांनी पहिल्यांदा एक्झिट पोल केला. त्यांनीच पुन्हा 1984मध्ये एक्झिट पोल केला होता.

दूरदर्शनने 1996मध्ये एक्झिट पोल केला. पत्रकार नलिनी सिंह यांनी हे सर्वेक्षण केलं होतं, पण यासाठीची आकडेवारी गोळा करण्यासाठी सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग स्टडीज (CSDS) ने फील्ड वर्क केलं होतं.

त्यानंतर एक्झिट पोल्सचं हे सत्र सुरूच आहे. फक्त त्याकाळी एखाद-दोन एक्झिट पोल असत, आता डझनभर एक्झिट पोल्स होतात.

जगातल्या इतर देशांत एक्झिट पोल्स होतात का?

भारताच्या आधीपासून अनेक देशांमध्ये एक्झिट पोल्स होत आले आहेत. अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियासह जगभरातल्या अनेक देशांत एक्झिट पोल होतात.

अमेरिकेत 1936मध्ये सगळ्यात पहिल्यांदा एक्झिट पोल करण्यात आला. जॉर्ज गॅलप आणि क्लॉड रॉबिन्सन यांनी न्यूयॉर्क शहरात एक निवडणूक पाहणी केली.

राष्ट्राध्यक्ष पदासाठी कोणत्या मतदाराला मत दिलं हे यामध्ये मतदान करून बाहेर येणाऱ्या व्यक्तींना विचारण्यात आलं. फ्रँकलिन रुझवेल्ट ही निवडणूक जिंकतील, असा अंदाज या आकडेवारीवरून व्यक्त करण्यात आला.

प्रत्यक्षात ही निवडणूक रुझवेल्ट यांनीच जिंकली. यानंतर एक्झिट पोल इतर देशांतही लोकप्रिय झाले. ब्रिटनमध्ये 1937साली पहिल्यांदा एक्झिट पोल झाला. फ्रान्समध्ये 1938 मध्ये पहिल्यांदा एक्झिट पोल घेण्यात आला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC