Home LATEST NEWS ताजी बातमी ‘शिवाजी कोण होता?’ हे गोविंद पानसरे यांचं पुस्तक उर्दू भाषकांपर्यंत कसं पोहोचलं?

‘शिवाजी कोण होता?’ हे गोविंद पानसरे यांचं पुस्तक उर्दू भाषकांपर्यंत कसं पोहोचलं?

4
0

Source :- BBC INDIA NEWS

गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता?' पुस्तकाची उर्दू भाषेतील आवृत्ती

फोटो स्रोत, Sarfaraz Ahmed

सध्या गोविंद पानसरे यांचं ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक चर्चेत आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकावर आक्षेप घेत, कोल्हापुरातील प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करत धमक्या दिल्या.

गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांचा वेगळा पैलू समोर आणतं, ही गोष्ट राज्यातील अनेक इतिहासकारांनी आधीच अधोरेखित केली आहे.

पण या पुस्तकाचे एक महत्त्वाचे योगदान आहे, त्याची चर्चा सध्या झालेली दिसत नाही. ती म्हणजे, ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक पाकिस्तानात देखील पोहोचले होते. आणि या पुस्तकाने शिवाजी महाराजांविषयी नव्या पिढीला ओळख करुन दिली.

पाकिस्तानात एकेकाळी शिवाजी महाराजांच्या कार्याविषयी आदर होता, परंतु भारत-पाकिस्तानच्या राजकीय संबंधांचा परिणाम छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या आकलन आणि अध्ययनावर देखील झाला.

‘भारताने जगाला दिलेली रचनात्मक प्रतिभा – शिवाजी’ असा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात होता. त्यावरुन आपल्याला त्यांचे पाकिस्तानात असलेले महत्त्व समजू शकते.

1960 ते 70 च्या दशकापर्यंत पाकिस्तानी शालेय अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांविषयीचा उल्लेख असा उदारमतवादी आणि सकारात्मक होता.

काळ बदलला तसा भारताकडे पाहण्याचा पाकिस्तानी अभ्यासक्रमाचा दृष्टीकोन बदलला. प्रत्येक युद्धानंतर नकारात्मकता वाढीस लागली. संघर्षाने दिलेल्या द्वेषातून पाकिस्तानी अभ्यासक्रमात भारताविषयी आणि एकूण भारतीय उपखंडाच्या सांस्कृतिक वारशाविषयी नकारात्मकता दिसायला लागली.

‘आम्ही विरुद्ध ते’ अशा चौकटीत ही मांडणी अडकली. राज्यपुरस्कृत ज्ञाननिर्मिती अशा पद्धतीचे मूल्यभान देत असतानाही पाकिस्तानी ज्ञानक्षेत्रातील उदारमतवादी आणि धर्मनिरपेक्ष व्यक्तींनी नेहमीच भारताबद्दल आत्मीयता बाळगली आहे.

फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्या दखनी समाजाने आणि पूर्वीपासून कराची परिसरात राहणाऱ्या मराठी समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचे पाकिस्तानी ज्ञानक्षेत्राचे कुतूहल अबाधित ठेवले.

पाकिस्तानातील अलीकडील काही घटनांवरुन हे सिद्ध होते की, पाकिस्तानात महाराष्ट्रीयन ज्ञानपरंपरा आणि इतिहासाविषयी आस्था असणारा वर्ग आहे. त्यांची संख्या कमी असली तरी ते एका आशावादाचे प्रतिनिधित्व करतात.

गेल्या अनेक वर्षांमध्ये शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत पाकिस्तानात चर्चा होत नव्हती ती पुन्हा कॉम्रेड पानसरे यांच्या पुस्तकामुळे सुरू झाली.

पुस्तके

फोटो स्रोत, Sarfaraz Ahmed

गोविंद पानसरेंचे पुस्तक पाकिस्तानात कसे पोहचले, हे पाहण्याआधी आपण पाहू की पाकिस्तानातील इतिहासकारांनी शिवाजी महाराज तसेच महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल काय मत मांडलंय.

मुबारक अली हे पाकिस्तानातील महत्वाचे इतिहासकार आहेत. त्यांनी अभ्यासक्रमातील धर्मावर आधारित ध्रुवीकरणाच्या ज्ञाननिर्मितीवर सातत्याने टीका केली आहे. त्यांनी राज्य आणि धर्म या दोन गोष्टी वेगळ्या असायला हव्यात, त्यासाठी इतिहासाकडे वस्तुनिष्ठ दृष्टीतून पाहण्याची गरज असल्याचे मत मांडलंय.

त्यांचे एक पुस्तक भारतात राजकमल प्रकाशनने ‘इतिहासकार और मतांतर’ या शिर्षकाने प्रकाशित केले आहे. या पार्श्वभूमीवरच पाकिस्तानातील संख्येने अत्यल्प असणाऱ्या पण मराठी प्रागतिक ज्ञानपरंपरेचं स्वागत करणाऱ्या व्यक्तींनी कोणती भूमिका घेतली आहे? हे पाहणं महत्त्वाचं ठरतं.

लाहोरमध्ये उर्दूतून लिहिला गेला मराठेशाहीचा इतिहास

मौलवी इद्रीस खान नजीबाबादी यांनी ‘तारीख ए मराठा’ हे पुस्तक लाहोर येथून प्रकाशित केले होते. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर ‘उर्दू जुबान में मरहठा कौम के उरुज और जवाल पर सबसे पहिली और सबसे मुस्तनद किताब’ (उर्दू भाषेत मराठा समाजाच्या उदय आणि अस्तावर पहिले आणि विश्वसनीय ग्रंथ) असा उल्लेख आहे.

या पुस्तकाच्या भूमिकेत मौलवी इद्रीस लिहितात, “मराठा वंशाचा इतिहासावर आधारीत पुस्तक आतापर्यंत उर्दू भाषेत नव्हते. त्यामुळे मी हे पुस्तक लिहीत आहे. या पुस्तकापेक्षा चांगले काही लिहिले जाऊ शकत नाही. निश्चितच मी संक्षिप्त पद्धतीने हा इतिहास लिहीला आहे. मात्र इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची ज्ञानाची तहान यामुळे भागू शकते. हा प्रयत्न देश व समाजासाठी हितकारक ठरो. आमीन.”

या पुस्तकात सुरुवातीलाच शाह शरीफ या सुफी संताच्या नावावरुन शहाजी व शरीफजी यांचे नामकरण कसे केले, हे सांगितले आहे.

याचकाळात लाला लजपतराय यांनी ‘सिवाजी’ हे पुस्तक लिहीले. त्याच्या तब्बल नऊ आवृत्ती उर्दू भाषेत अवघ्या दहा ते पंधरा वर्षात प्रकाशित झाल्या आहेत. हे पुस्तक ‘लाला लजपत राय अँड सन्स ताजीराने कुतूब लाहोर’ यांनी प्रकाशित केले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांवरील उर्दू चरित्र ग्रंथ

लाहोरमधून ‘हालात महाराज शिवाजी मरहठा’ हे पुस्तक लाला दियाराम साहब आकिब यांनी हे पुस्तक लिहिले आहे. लाला दियाराम हे उर्दूतील महत्वाचे इतिहास अभ्यासक होते. त्यांनी ‘हालात ए बुद्ध’, ‘सवान ए उमरी गुरु नानक साहब’ वगैरे पुस्तकं लिहीली आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तक कमर्शिअल प्रिटींग वर्क्स लाहोर यांनी प्रकाशित केले आहे. ‘शेर ए दखन’ नावाचे एक पुस्तक उर्दूत शिवाजी महाराजांवर लिहिले आहे. हे पुस्तक मुन्शी मोहनलाल साहेब फहम लखनवी यांनी लिहीले आहे.’

‘तारीख ए महाराष्ट्र’ हे पुस्तक देवतास्वरुप भाई परमानंद यांनी लिहीलेले पुस्तकदेखील लाहोरच्या लजपत राय अँड सन्स ताजीराने कुतूबने प्रकाशित केले आहे.

शिवाय पाकिस्तानात उर्दूतून शिवाजी महाराजांवर स्वातंत्र्यपूर्वकाळात व स्वातंत्र्यानंतर 1960-70 पर्यंत लिखाण होत राहिले आहे. पण त्यानंतर परिस्थिती बदलली आणि शिवाजी महाराजांवरील चर्चा थांबली. किंवा ती नकारात्मक पातळीवर पोहोचली. असे असले तरी अलीकडच्या काळात पाकिस्तानी ज्ञानविश्वात काही सकारात्मक चर्चा घडत आहेत.

उल्लेखनीय गोष्ट ही आहे की, महाराष्ट्रातील प्रबोधनाच्या परंपरेची ओळख देखील पाकिस्तानातील वाचकांना झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी तिथे चर्चा होत असते.

‘शिवाजी कोण होता?’ तसेच फुले-शाहू-आंबेडकर यांची चरित्रे उर्दूतून लिहिण्यात आली आहेत आणि ही पुस्तकं पाकिस्तानात पोहोचली. यांच्यातील समान धागा म्हणजे सोलापुरातील दिवंगत विधिज्ञ आणि इतिहास अभ्यासक अ‍ॅड. सय्यद शाह गाजीउद्दीन.

अ‍ॅड. सय्यद शाह गाजीउद्दीन यांनी ही पुस्तकं उर्दूतून प्रकाशित केली. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे, गोविंद पानसरेंच्याच हस्ते अ‍ॅड. गाजीउद्दीनन यांनी भाषांतरित केलेल्या फुले आणि आंबेडकर चरित्राचे प्रकाशन झाले होते.

‘शिवाजी कोण होता?’ पाकिस्तानात कसं पोहोचलं?

अ‍ॅड. सय्यद शाह गाजीउद्दीन यांनी 2002 साली सोलापूरात ‘फुले शाहू आंबेडकर विचार मुस्लिम मंच’ची स्थापना केली. त्यानंतर ‘इदारा बराए मुतालिआ तहकीक व तारीख ए दखन’ (दखन इतिहास संशोधन व अभ्यास केंद्र) ची स्थापना केली.

या संस्थेच्या माध्यमातून गाजीउद्दीन यांनी 2006 साली गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे भाषांतर केले. याच वर्षी त्यांनी म. फुले यांच्यावर ‘महात्मा फुले हयात और कारनामे’ हे पुस्तक लिहिले. या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन सोलापुरात गोविंद पानसरे यांच्या हस्ते करण्यात आले होते.

गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता?' पुस्तकाची उर्दू भाषेतील आवृत्ती

फोटो स्रोत, Matin Shaikh

त्यानंतर 2008 साली गाजीउद्दीन यांनी डॉ. आंबेडकरांवर ‘बाबासाहब आंबेडकर हयात और कारनामे’ हे पुस्तक लिहीले. आणि 2009 साली ‘राजर्षी शाहू महाराज हयात और कारनामे’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकांवर उर्दू भाषेत सकारात्मक चर्चा झाली. आंबेडकरांवरील पुस्तकाची आवृत्ती अवघ्या पंधरा दिवसात संपली. तर फुलेंवरील पुस्तकावर पाकिस्तानातून उर्दू बुक रिव्ह्यू या समीक्षात्मक मासिकात प्रतिक्रिया छापून आल्या.

2009 साली पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील इस्लामकोट येथून सय्यद शाह गाजीउद्दीन यांना घनशामदास नारवाणी यांचा एक मेल आला. त्यात लिहिले होते. ‘पाकिस्तानच्या इस्लामकोटसारख्या दुर्गम भागात तुमचे शिवाजी कौन थे?, महात्मा फुले, शाहू यांच्यावरील ग्रंथ वाचायला मिळण्याचा आनंद अवर्णनीय आहे. सध्या तुमचे डॉ. आंबेडकरांवरील चरित्र वाचत आहे.’

त्यानंतर पाकिस्तानात गाजीउद्दीन यांच्या पुस्तकांवर चर्चा सुरू झाली. घनशामदास नारवाणी यांनी या पुस्तकाच्या सिंधी भाषांतराची इच्छा व्यक्त केली होती. पण ते हा प्रकल्प पूर्ण करु शकले नाहीत. दरम्यान, 31 जानेवारी 2013 साली सय्यद शाह गाजीउद्दीन यांचे निधन झाले.

गाजीउद्दीन यांच्या निधनानंतरही पाकिस्तानातून त्यांच्या पुस्तकावर प्रतिक्रिया येत राहिल्या. तसेच तेथील स्थानिक माध्यमांनी याची वेळोवेळी दखल देखील घेतली आहे.

पाकिस्तानातील सामाजिक कार्यकर्ते गणपतराय भिल यांना आंबेडकरांवरील पुस्तक मिळाले. गणपतराय भिल हे ‘सहमाही दलित अदब’ या त्रैमासिकाचे संपादक आहेत. त्यांनी अ‍ॅड. गाजीउद्दीन यांच्या कुटुंबीयांकडे ‘बाबासाहब आंबेडकर हयात और कारनामे’ या ग्रंथाच्या सिंधी भाषांतराची परवानगी मागितली आणि ‘पाकिस्तान दलित फोरम’ ने हे भाषांतर प्रकाशित केले.

या भाषांतरानंतर गाजीउद्दीन कुटुंबियांना गणपतराय भिल यांनी आभाराचे एक पत्र पाठवले. त्या पत्रात त्यांनी गाजीउद्दीन यांच्या सर्व पुस्तकांच्या सिंधी भाषांतराची योजना आम्ही आखत असल्याचे म्हटले होते. पाकिस्तानातील अनेक कार्यक्रमांमध्ये गणपतराय यांनी शिवाजी कौन थे?, महात्मा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेबांवरील ग्रंथासंदर्भात चर्चा घडवून आणली.

गणपतराय यांनी दिवगंत गाजीउद्दीन यांच्या कार्याचा गौरव करत, काही लेखही पाकिस्तानच्या ‘दलित अदब’ या नियतकालिकात लिहीले आहेत. त्यामध्ये ‘शिवाजी कौन थे?’ आणि इतर पुस्तकांच्या विषयी लिखाण केले आहे.

पाकिस्तान दलित फोरम आजही आपल्या कार्यक्रमांमध्ये, आंबेडकरांच्या जयंती सोहळ्यात आंबेडकरांसह शिवाजी, फुले शाहू यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. मागच्या काही दिवसात पाकिस्तानशी थेट पोस्ट व्यवहार बंद करण्यात आला आहे. त्यामुळे तेथून येणाऱ्या पुस्तकांच्या ऑर्डर आता थांबल्यात. पण दुबई वगैरे भागातील उर्दू विक्रेत्यांकडून या पुस्तकाची विक्री होत असल्याचे त्या विक्रेत्यांकडून गाजीउद्दीन यांच्या कुटुंबीयांना कळवले जाते. या सर्व ग्रंथांच्या अनेक आवृत्ती आजवर प्रकाशित झाल्या आहेत. तर ‘शिवाजी कौन थे’? या पुस्तकाच्या तब्बल 25 हजारहून आधिक उर्दू प्रती विकल्या गेल्या आहेत.

गोविंद पानसरेंनी लिहिलेले ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक केवळ मराठी समुदायासाठीच नाही तर देशातल्या उर्दू समाजासाठी देखील मोलाचा ठेवा आहे. महाराष्ट्रातील प्रबोधनाच्या परंपरेशी कटिबद्ध असलेल्या अ‍ॅड. गाजीउद्दीन यांनी याच हेतूने ते उर्दूतून आणले आणि देश-विदेशातील उर्दू भाषकांपर्यंत ते पोहचवले. त्यामुळे ‘शिवाजी कोण होता?’ हे केवळ पुस्तकच नाही तर आपल्या मराठी प्रबोधन परंपरेचा एक समृद्ध वारसा असल्याचे मला आवर्जून सांगावेसे वाटते.

(या लेखाचे लेखक सरफराज अहमद हे इतिहास अभ्यासक आणि सोलापूरस्थित ‘गाजीउद्दीन अकादमी’चे सदस्य आहेत.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC