Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
-
8 तासांपूर्वी
-
वाचन वेळ: 8 मिनिटे
झोपेत अचानक जाग आल्यावर छातीवर कुणीतरी बसल्यासारखं वाटणं, शरीर हलत नाही, बोलता येत नाही, आणि खोलीत कुणीतरी आहे अशी तीव्र जाणीव होणं…हा अनुभव अनेकांना आयुष्यात कधीतरी येतो. काहींना याला हार्ट ॲटॅक, पॅनिक ॲटॅक किंवा एखादी अदृश्य शक्ती कारणीभूत आहे असं वाटतं. प्रत्यक्षात मात्र या भीतीदायक अनुभवामागे स्लीप पॅरालिसिस हे कारण असतं.
स्लीप पॅरालिसिस नेमकं काय आहे, तो अनुभव कुणाला येतो, हार्ट ॲटॅकपासून तो कसा वेगळा आहे, आणि कधी डॉक्टरांकडे जायचं? हे सगळं या बातमीत सोप्या भाषेत समजून घ्या.
फोटो स्रोत, Getty Images
“अचानक जाग आली… शरीर हलत नव्हतं… छातीवर काहीतरी जड असल्यासारखं वाटत होतं… श्वास घ्यायला त्रास होतोय असं वाटलं… खोलीत कुणीतरी आहे अशी तीव्र जाणीव झाली.”
असे अनुभव सांगणारे अनेक रुग्ण घाबरून डॉक्टरांकडे येतात. काहींना हा हार्ट अॅटॅक असावा असं वाटतं. काही लोक हा पॅनिक ॲटॅक असेल असं समजतात.
काहीजण विशिष्ट समजुतींमुळे याला भूत, दडपण, किंवा काहीतरी ‘अदृश्य शक्ती’ जबाबदार असल्याचं मानतात. प्रत्यक्षात मात्र या भीतीदायक पण तात्पुरत्या अनुभवामागे एक वैद्यकीय कारण असतं ते म्हणजे स्लीप पॅरालिसिस.
याच अवस्थेत मेंदू स्वप्नातील दृश्यं वास्तवात घेऊन येतो म्हणून अनेकांना कुणीतरी खोलीत आहे, छातीवर बसलं आहे, किंवा काहीतरी वाईट होणार आहे असं वाटतं.
वैद्यकीय दृष्टिकोनातून हा अनुभव प्रचंड त्रासदायक असला तरी तो धोकादायक नसतो. हार्ट अॅटॅक, स्ट्रोक किंवा मनोविकार याच्याशी त्याचा थेट संबंध नसतो. मात्र योग्य माहिती नसेल तर भीती वाढते, पुन्हा झोपायची भीती वाटते आणि ताण‑तणाव अधिक वाढतो.
म्हणूनच डॉक्टर, कुटुंबीय आणि समाजाने या अनुभवाकडे ‘काल्पनिक’ किंवा ‘भ्रम’ म्हणून न पाहता, मन आणि शरीर यांच्या यंत्रणेतील एक नैसर्गिक गडबड म्हणून पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
स्लीप पॅरालिसिस म्हणजे काय?
स्लीप पॅरालिसिस ही झोपेशी संबंधित एक अवस्था (parasomnia) आहे. ती प्रामुख्याने झोपेतून जाग येताना किंवा झोप लागत असताना होते.
या वेळी व्यक्ती पूर्णपणे शुद्धीत असते, पण त्यांना काही सेकंदांपासून काही मिनिटांपर्यंत शरीर हलवता येत नाही किंवा बोलता येत नाही.
याचं मूळ कारण झोपेची REM (Rapid Eye Movement) अवस्था आहे. REM झोपेत आपण तीव्र स्वप्नं पाहतो आणि शरीर आपोआप ‘लॉक’ होतं, म्हणजेच स्नायूंना तात्पुरती शिथिलता (muscle atonia) येते. यामुळे आपण स्वप्न प्रत्यक्षात कृतीत आणत नाही. स्लीप पॅरालिसिसमध्ये हेच ‘लॉक’ जाग आल्यानंतरही काही वेळ टिकून राहतं.
फोटो स्रोत, Getty Images
या अवस्थेत श्वास घ्यायला त्रास होतोय असा भास होऊ शकतो, छातीवर दडपण जाणवतं, आणि मेंदू अजूनही स्वप्नाच्या प्रभावात असल्यामुळे भ्रमासारखे अनुभव येतात. आपल्या शेजारी किंवा अंगावर कुणीतरी बसलंय असं वाटतं, आवाज ऐकू येतात, काही लोकांना सावल्याही दिसतात.
तज्ज्ञांच्या मते ताण‑तणाव, अस्वस्थ झोप, झोपेची वेळ सतत बदलणं, डिप्रेशन, अँग्झायटी, झोप न लागणं (insomnia) किंवा नार्कोलेप्सी यांसारख्या स्थितींमध्ये स्लीप पॅरालिसिसची शक्यता वाढते.
बहुतांश प्रकरणांमध्ये हे अनुभव क्वचित येतात आणि त्यांचा कोणताही कायमस्वरूपी अपाय होत नाही. मात्र हे वारंवार होत असतील आणि झोपेचीच भीती वाटत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक ठरतं.
स्लीप पॅरालिसिसमध्ये मेंदू पूर्णपणे जागा होतो, पण शरीर अजूनही REM झोपेतील ‘muscle atonia’ अवस्थेत अडकलेलं असतं. या अवस्थेत शरीर हलत नाही, श्वसनासाठी आवश्यक मुख्य स्नायू काम करत असले तरी छातीवरील इतर स्नायूंवर नियंत्रण कमी झाल्याने श्वास अडकल्यासारखी भावना निर्माण होते.
आणि त्यामुळे दाब, गुदमरल्यासारखी भावना निर्माण होते. हा अनुभव भीतीदायक असला तरी तो शारीरिकदृष्ट्या धोकादायक नसतो.
याबद्दल डॉ. शीतल गोयल यांनी अधिक माहिती दिली. त्या मुंबई सेंट्रल इथल्या वोकहार्ट हॉस्पिटल्स येथे न्यूरोलॉजिस्ट सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्या सांगतात, ” रुग्ण जेव्हा कोणीतरी छातीवर बसलंय अशं सांगतात ते प्रत्यक्षात स्लीप पॅरालिसिसचे एक क्लासिकल लक्षण आहे. REM झोपेत स्नायू नैसर्गिकरित्या तात्पुरते शिथिल असतात. मेंदू जागा होतो, पण शरीर नाही म्हणून हालचाल करता येत नाही आणि छातीवर दाब जाणवतो.”
फोटो स्रोत, Getty Images
पनवेल येथील मनोविकारतज्ज्ञ डॉ. रिषभ वर्मा बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, “मनोविकारतज्ज्ञ म्हणून मला अनेकदा अशा अनुभवांमुळे प्रचंड घाबरलेले रुग्ण भेटायला येतात. त्यांना आपलं मानसिक संतुलन बिघडतंय असं वाटत असतं किंवा काहीतरी हार्ट ॲटॅकसारखं गंभीर काहीतरी आरिष्ट येणार असं त्यांना वाटत असतं. पण हा अनुभव भीतीदायक अशला तरी त्याचं वैज्ञानिक कारण मेंदूच्या जैविक प्रक्रियांवर म्हणजे न्यूरोबायोलॉजीवर आधारित असतं. या अनुभवाला स्लीप पॅरालिसिस असं म्हणतात.”
ते पुढं सांगतात, “वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर झोपेमध्ये असं कोणीतरी दाबून धरल्यासारखं वाटणं हे मेंदू आणि शरीर यांच्यातला संवाद तात्पुरता गमावल्यामुळे होतं. आपल्या मेंदूच्या झोपेच्या दोन प्रमुख अवस्था असतात Non‑REM आणि REM (Rapid Eye Movement).
REM झोपेदरम्यान मेंदू muscle atonia नावाची अवस्था निर्माण करतो, म्हणजेच स्नायूंना नैसर्गिकरित्या तात्पुरता बंदच करतो. यामागचा उद्देश आपण स्वप्नात जे पाहतो ते प्रत्यक्षात करू नये हा असतो.”
“स्लीप पॅरालिसिसच्या वेळी मेंदू मानसिकदृष्ट्या जागा होतो, पण शरीर अजूनही REM झोपेदरम्यान झालेल्या या पॅरालाइज्ड अवस्थेतच अडकलेलं असतं. म्हणजेच व्यक्ती प्रत्यक्षात ‘झोपलेल्या शरीरात जागी’ असते.”
मग कोणीतरी जवळ बसलंय असे भास का होतात?
डॉ. रिषभ वर्मा सांगतात, “जेव्हा मेंदूला कळतं की शरीर हलत नाहीय (पॅरालाइज आहे) पण व्यक्ती पूर्णपणे जागी आहे, तेव्हा मेंदू अतिसावध अवस्थेत (hyper‑vigilance) जातो. या वेळी अमिग्डाला म्हणजे मेंदूचं भीतीचं केंद्र अतिशय तीव्रपणे प्रतिक्रिया द्यायला लागतं आणि या पॅरालिसिसचं कारण शोधायला लागतं.”
“या भीतीचा अर्थ लावण्यासाठी मेंदू ‘रिकाम्या जागा भरतो’. म्हणजेच स्वप्नासारखी दृश्यं प्रत्यक्ष वास्तवात आणतो.” यामुळे
‘इन्क्युबस’: छातीवर एखादी सावली किंवा जड वस्तू बसल्यासारखी भावना.
‘इंट्रूडर’: खोलीच्या कोपऱ्यात कुणीतरी आपल्याकडे पाहत आहे, अशी तीव्र जाणीव.
असे अनुभव येतात.
‘हा’ हार्ट ॲटॅक नाही… कसं ओळखाल?
चुकीची माहिती ऐकल्यामुळे लोक अनेकदा गोंधळतात. तसेच रुग्णाच्या आजूबाजूचे लोकही गोंधळतात. ते स्वतःच रोगाचं निदान करुन उपचार ठरवायला लागतात. ही सवय अत्यंत धोकादायक आहे. हार्ट ॲटॅक आणि पॅनिक ॲटॅक यात फरक आहेच त्याहून स्लीप पॅरालिसिसचाही या दोन्हीशी संबंध नाही.
- चिंता आपल्या सर्वांना कमी अधिक प्रमाणात जाणवत असतेच पण अचानक तीव्रतेने चिंता वाटायला लागून जेव्हा गोंधळलेली अवस्था निर्माण होते तेव्हा पॅनिक ॲटॅक आला असं म्हणतात.
- पॅनिक ॲटॅक आलेल्या व्यक्तीला अचानक छातीत धडधडू लागतं, घाम येतो, भीती वाटते, अस्वस्थ वाटून कुठंतरी मोकळ्या हवेत जावं असं वाटू लागतं, तोंड सुकतं. सर्व लक्ष शरीराकडे केंद्रित होतं.
- अशा रुग्णाने घाबरुन अधिक धावपळ केल्यास हृदयाचे ठोके अधिक जलदगतीने पडून आणखी भीती वाटायला लागते. घाबरल्यामुळे या लक्षणांमध्ये अधिकच वाढ होते.
फोटो स्रोत, Getty Images
पॅनिक स्ट्रेस डिसॉर्डरमध्ये व्यक्तीला रात्री अचानक किंवा कधीही श्वास कोंडल्यासारखं वाटून हृद्ययाची धडधड वाढायला लागते. आपल्याला हृदयविकाराचा धक्का बसल्याची शंका येऊ लागते. यामागे रक्तामधील ॲड्रनलिन मोठ्या प्रमाणात वाढू लागतं आणि अत्यंत उत्तेजित अवस्था (एक्साइटमेंट) येऊ लागते. आता आपल्याला हृदयविकार किंवा कोणता तरी मोठा आजार झालाय, आपण मरणार असे विचार मनात येऊ लागतात.
बहुतांश लोकांना छातीत वाढलेली धडधड आणि इतर लक्षणं पाहून आपल्याला हार्ट ॲटॅक आला असं वाटू लागतं. त्यामुळे ते आणखीच घाबरतात आणि गुगलवर छातीत धडधड, उपाय कारणे वगैरे शोधू लागतात. त्यामुळे त्यांचा गोंधळच वाढतो. परंतु हृदयविकार आणि पॅनिक ॲटॅक यामध्ये असणारा फरक लक्षात घ्यावा लागेल.
फोटो स्रोत, Getty Images
अशी अवस्था आल्यावर व्यक्तीला थोड्यावेळाने बरं वाटत असेल आणि तो गुगल वगैरे वापरत असेल तर तो हार्ट ॲटॅक नसतो. कारण हार्ट ॲटॅक आलेल्या व्यक्तीला काहीही करता येत नाही. त्याला रुग्णालयात न्यावे लागते.
हार्ट ॲटॅकमध्ये घाबरल्यासारखे वाटून प्रचंड घाम येतो. व्यक्तीला छातीत तीव्र वेदना व्हायला लागतात आणि खालच्या जबड्यावरही परिणाम झाल्याचं दिसून येतं.
हार्ट ॲटॅक: स्लीप पॅरालिसिसमध्ये शरीर पूर्णपणे हलू शकत नाही किंवा बोलताही येत नाही, आणि हा अनुभव काही सेकंदांमध्ये किंवा मिनिटांमध्ये पूर्णपणे निघून जातो. याच्या उलट हार्ट ॲटॅकमध्ये छातीत सतत वेदना, इतरत्र पसरणारी (radiating) वेदना आणि प्रत्यक्ष हृदयाशी संबंधित धोका असतो. स्लीप पॅरालिसिसमध्ये असा कोणताही हृदयविकाराचा त्रास होत नाही.
पॅनिक ॲटॅक: स्लीप पॅरालिसिसमध्ये तीव्र घबराट येऊ शकते, पण पॅनिक ॲटॅक फक्त निद्रेच्या आसपासच नाही तर कधीही होऊ शकतो. शिवाय पॅनिक अटॅकमध्ये शरीर पूर्णपणे पॅरालाइज होत नाही, म्हणजे हालचाल पूर्णपणे बंद होत नाही.
मानसिक आजार: स्लीप पॅरालिसिस हा झोपेच्या एका टप्प्याशी संबंधित अनुभव आहे, तो मनोविकार किंवा सायकोसिस नाही. स्लीप पॅरालिसिसचा एपिसोड संपल्यानंतर रुग्णाला बहुतेक वेळा ही जाणीव होते की हा अनुभव केवळ मनाने निर्माण केलेला होता. उलट, दीर्घकालीन सायकोसिसमध्ये वास्तव आणि भास यांच्यातील फरक सतत धूसर राहतो.
या स्थितीशी शारीर-मानसिक ताण आणि अनियमित झोप यांचा कसा संबंध आहे?
स्लीप पॅरालिसिस हा अनेकदा व्यक्तीच्या जीवनशैलीचा आरसा अशतो. REM झोप विस्कळित करणाऱ्या सवयी किंवा परिस्थिती असेल, तर झोप‑जागेपणातील हे ‘अडथळे’ जास्त सहजपणे दिसून येतात.
डॉ. रिषभ वर्मा सांगतात,”स्लीप पॅरालिसिसला मी अनेकदा ‘जीवनशैलीचा बॅरोमीटर’ म्हणतो. जीवनशैलीतील विविध घटकांमुळे REM झोपेचे तुकडे होत असतील तर असे अडथळे वारंवार येण्याची शक्यता वाढते. ते सांगतात
झोपेची कमतरता (Sleep Deprivation): ‘REM rebound’: यामुळे झोप अधिक तीव्र आणि अस्थिर होते.
अनियमित दिनक्रम (Irregular Schedules): शिफ्ट ड्युटी करणारे कर्मचारी किंवा विद्यार्थी यांच्यात हे जास्त दिसते.
ताण आणि चिंता (Stress & Anxiety): कॉर्टिसोल या तणावाशी संबंधित हार्मोनचे प्रमाण जास्त झाल्यास झोपेच्या टप्प्यांमधील संक्रमण सुरळीत होत नाही.
पाठ टेकून झोपणे (Supine position): यामागची कारणे पूर्णपणे स्पष्ट नसली, तरी पाठ टेकून झोपणे हे स्लीप पॅरालिसिससाठी एक महत्त्वाचे शारीरिक ट्रिगर मानले जाते.”

डॉ. शीतल गोयल सांगतात, “स्लीप पॅरॅलिसिस’चा अनुभव हा भीतीदायक वाटू शकतो, पण तो सामान्य, तात्पुरता आणि बहुतेक वेळा निरुपद्रवी असतो. नियमित झोप, ताण कमी करणे आणि या स्थितीची योग्य माहिती ठेवणे हेच त्यावर सर्वोत्तम उपाय आहेत.”
हा सगळा मनाचा खेळ आहे असं म्हणून विषय संपवणं योग्य आहे का?
तांत्रिकदृष्ट्या हा अनुभव मनाशी संबंधित असला तरी हे सगळं तुमच्या मनात आहे असं म्हणून टाकणं हे या अनुभवामागे असणारी शरीराशी संबंधित वास्तविकता नाकारतं. या प्रसंगी येणारी पॅरालाइज अवस्था आणि श्वसनावर येणारी मर्यादा ही शरीरात घडत असते.
फोटो स्रोत, Getty Images
डॉ. वर्मा सांगतात, “रुग्णाला ‘हे सगळं तुमच्या मनात आहे असं ऐकल्यावर आपण वेडे आहोत किंवा काहीतरी काल्पनिक गोष्ट अनुभवत आहोत, अशी भावना येऊ शकते. उलट, त्या वेळी तुमचं शरीर प्रत्यक्षात काही काळ पॅरालाइज झालं होतं, असं मान्य केल्यास रुग्णाला ऐकून घेतलं गेल्याची जाणीव होते आणि तो स्वतःला फार एकटं समजणार नाही.”
डॉ. शीतल गोयलही याच मुद्द्याकडे लक्ष वेधतात. त्या सांगतात, ” असं थेट निकालात काढलं तर रुग्णाला दुर्लक्षित किंवा गैरसमज झाल्यासारखं वाटू शकतं. स्लीप पॅरॅलिसिस हा खरा शारीरिक (physiological) झोपेशी संबंधित अनुभव आहे, काल्पनिक नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. रुग्णाचा अनुभव मान्य करून त्यामागचे विज्ञान समजावून सांगितल्यास भीती कमी होते आणि पुन्हा होण्याची शक्यता घटते.”
डॉक्टरांकडे कधी जायचं?
कधीकधी (वर्षातून एक‑दोन वेळा) स्लीप पॅरालिसिसचा अनुभव येणं हे सामान्य मानलं जातं. मात्र काही परिस्थितीत उपचार किंवा वैद्यकीय सल्ल्याची गरज असते, असं डॉक्टर सांगतात.
हे अनुभव वारंवार म्हणजे महिन्यातून एकदा यायला लागले, झोपेची भीती वाटायला लागून निद्रानाशासारखी स्थिती तयार झाली किंवा कधीकधी हा अनुभव नार्कोलेप्सी या झोपेच्या आजाराचं लक्षण असू शकतो. या आजारात रुग्णाला दिवसभर खूप जास्त झोप येते.
फोटो स्रोत, Getty Images
डॉ. रिषभ वर्मा सांगतात, “आम्हाला पोस्ट‑ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) असलेल्या किंवा स्वभावतः जास्त चिंताग्रस्त (high‑trait anxiety) व्यक्तींमध्ये स्लीप पॅरालिसिससारखे अनुभव तुलनेने जास्त आढळतात. अशा प्रकरणांमध्ये मेंदू आधीच सतत ‘धोका ओळखण्याच्या’ (threat‑detection) अतिसावध अवस्थेत असतो.”
ते पुढं सांगतात, “हा अनुभव पारंपरिक अर्थाने पूर्णपणे ‘मानस-शारीरिक’ आजार नसला, तरी मनात असलेला कायमचा ताण हा झोप येणं आणि जाग येणं यांचा ताळतंत्र बिघडवतो.. त्यामुळे झोपेच्या चांगल्या सवयी म्हणजेच sleep hygiene मजबूत करणं हेच बहुतांश वेळा पहिलं आणि सर्वात प्रभावी पाऊल ठरतं.”
फोटो स्रोत, Getty Images
स्लीप पॅरालिसिसचा अनुभव भीतीदायक असू शकतो, पण तो कोणत्याही अदृश्य शक्तीचा परिणाम नाही. ही स्थिती म्हणजे काही मनोविकार नाही तसंच हा हार्ट ॲटॅकही नाही. हा अनुभव म्हणजे झोप आणि मेंदूच्या कार्यपद्धतीतील तात्पुरता गोंधळ आहे. त्यावर उपचार करता येतात. योग्य माहिती, ताणाचं नियंत्रण आणि झोपेच्या नियमित सवयी यामुळे ही भीती कमी करता येते.
जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात बदल करायचा असेल तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल, औषधं घ्यायची असतील तर डॉक्टरांची आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे.
आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC



