Home LATEST NEWS ताजी बातमी ‘घरात त्यांचा फोटो लावायची हिंमतही नाही’: पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांच्या वेदना

‘घरात त्यांचा फोटो लावायची हिंमतही नाही’: पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांच्या वेदना

11
0

Source :- BBC INDIA NEWS

पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ऐशान्या द्विवेदी यांचे पती शुभम यांचाही समावेश होता.

फोटो स्रोत, Tariq Khan/BBC Hindi

काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याला एक वर्ष झाला. तरी पीडितांच्या कुटुंबीयांच्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीत.

कानपूरच्या ऐशान्या द्विवेदी आपल्या खोलीतील आरशाकडे इशारा करत पती शुभम यांची आठवण सांगतात.

त्या म्हणतात, “मी त्यांना एकदा विचारलं होतं की, इथे आरसा का नाही. दुसऱ्याच दिवशी ते हा आरसा घेऊन आले.”

शुभम द्विवेदी त्या 26 जणांपैकी एक होते, त्यांची 22 एप्रिल 2025 रोजी कट्टरतावाद्यांनी हत्या केली होती.

पर्यटकांवर झालेला हा गोळीबार काश्मीरमधील अनेक दशकांतील नागरिकांवरील सर्वात घातक हल्ल्यांपैकी एक होता.

भारताने पहलगाम हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरलं होतं. सामान्य पर्यटकांची हत्या पाकिस्तानमध्ये असलेल्या एका संघटनेने केल्या होत्या, असा भारताचा आरोप होता.

परंतु, पाकिस्तानने नेहमीच हे आरोप फेटाळले आहेत.

या हल्ल्याच्या दोन आठवड्यानंतर भारताने पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी ‘कट्टरतावाद्यांचे अड्डे’ म्हणून हल्ले केले होते.

यानंतर अण्वस्त्रधारी शेजारी देशांमध्ये चार दिवस जोरदार गोळीबार आणि हवाई हल्ले झाले.

त्यानंतर अचानक शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली.

पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले अनेक जण तरुण पर्यटक होते. ते आपले लग्न, करिअर आणि आयुष्याची सुरुवात करत होते, पण त्यांचं जीवन क्रूरपणे हिरावून घेतलं गेलं.

(इशाराः या बातमीतील काही तपशील तुम्हाला विचलित करू शकतील)

या घटनेनंतर अनेक सरकारी निवेदनं आली, कठोर निर्बंध लादण्यात आले आणि काश्मीर खोऱ्यातील सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवण्यात आली.

परंतु, सर्वात जास्त परिणाम त्या लोकांवर झाला ज्यांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलं. वेळ गेल्यावरही दुःख कमी झाले नाही, पण ते व्यक्त करण्याची पद्धत बदलली.

‘माध्यमांशी बोलणं थेरपीसारखं, पण कधी कधी…’

ऐशान्यासाठी त्यांची बेडरूम आपल्या पतीच्या आठवणी जपण्याचं साधन बनली आहे.

त्या ज्या वस्तू जपून ठेवतात. इतरांना त्या वस्तू पाहिल्या तर काही खास वाटणार नाहीत. मात्र ऐशान्या यांच्यासाठी ते सगळं मौल्यवान आहे.

त्यांनी काहीही त्याच्या जागेवरून हलवलेले नाही. पलंग, कपाट आणि शुभम यांनी आणलेला आरसा-सगळं जसं होतं म्हणजे पूर्वीप्रमाणे तसंच ठेवलेलं आहे.

त्या पलंगाकडे बोट दाखवत त्या म्हणाल्या, “पलंगाचा तो भाग शुभमचा आहे. मी तिथे बसत नाही, झोपतही नाही. झोपतानाही मी त्या बाजूला जात नाही. मी तिथे उशी ठेवते.”

पहलगाममध्ये जिथे हत्या झाल्या, ते ठिकाण पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

फोटो स्रोत, Reuters

त्या आजही तो दिवस विसरू शकलेल्या नाहीत.

त्यांच्या लग्नाला अवघे दोन महिने झाले होते. आणि ते जोडपे त्यांच्या कुटुंबातील इतर नऊ सदस्यांसोबत सुट्टीसाठी पहलगामला गेले होते.

हल्ल्याच्या दिवशी शुभम आणि ऐशान्या बैसरन व्हॅली येथे गेले होते, तर कुटुंबातील बाकी सदस्य हॉटेलमध्येच थांबले होते.

नंतर दिलेल्या एका मुलाखतीत ऐशान्या यांनी सांगितलं की, ते मैदानात फिरत असताना एक व्यक्ती त्यांच्याकडे आला. त्याने त्यांच्या पतीला त्यांचा धर्म विचारला आणि मग त्यांना गोळी मारली. त्यांनी हल्लेखोरांकडे स्वतःलाही मारण्याची विनंती केली, पण त्यांनी तसं केलं नाही, असंही ऐशान्या यांनी सांगितलं.

“जगण्यासाठी माझ्याकडे शुभमच्या खूप आठवणी आहेत,” असं त्या बीबीसीला म्हणाल्या.

त्यांच्या फोनच्या लॉक स्क्रीनवर आजही त्यांच्या लग्नाचा एक खास क्षण आहे. गॅलरीमध्ये त्या वारंवार फोटो स्क्रोल करतात, ‘शुभमला पुन्हा पाहण्यासाठी.’

कधी कधी त्या त्यांचे जुने व्हीडिओ पाहतात आणि लक्षपूर्वक ऐकतात, जणू प्रत्येक छोटी गोष्ट मनात साठवून ठेवायची इच्छा असते.

ऐशान्या म्हणाल्या, “मी आठवण्याचा प्रयत्न करते की, त्यांचा आवाज कसा होता… ते कसे हसायचे.”

ऐशान्या द्विवेदी यांच्या फोनच्या वॉलपेपरवर त्यांच्या लग्नाचा फोटो आहे.

फोटो स्रोत, Tariq Khan/BBC Hindi

हल्ल्यानंतर काही महिन्यांनी ऐशान्या शुभमबद्दल अनेकदा बोलू लागल्या. सुरुवातीला लोक त्यांच्याबद्दल विचारत असल्यामुळे, आणि नंतर त्यांना थोडा दिलासा मिळत असल्यामुळे त्या बोलू लागल्या.

“माध्यमांशी बोलणं हे माझ्यासाठी थेरपीसारखं झालं आहे. आता मला त्याची सवय झाली आहे,” असं त्या म्हणतात.

पण दुःख अशा प्रकारे व्यक्त करणं त्यांच्यासाठी अडचणीचंही ठरलं.

त्यांना मोठ्या प्रमाणात ऑनलाइन ट्रोलिंगचाही सामना करावा लागला, असं द्विवेदी सांगतात.

भारताने पाकिस्तानमधील काही ठिकाणांवर हवाई हल्ले केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत भाषण केलं. त्यावेळी ऐशान्या म्हणाल्या होत्या की, त्या भाषणात त्यांनी पीडितांची नावंही घ्यायला हवी होती. यानंतर अनेकांनी त्यांना ऑनलाइन लक्ष्य केलं. तरीही त्या आपलं मत मांडण्यापासून मागे हटल्या नाहीत.

त्या म्हणाल्या, “मी बोलेन, मी बाहेर जाईन, मला जे करायचं आहे ते सगळं करेन. पती गमावल्यानंतर मी कसं वागावं हे ठरवणारे हे लोक (ट्रोल) कोण आहेत?”

ऐशान्यासाठी बोलण्याने त्यांना त्यांच्या दुःखाला थोडा दिलासा मिळतो. पण काही लोकांना आपलं दुःख वेगळ्या पद्धतीने व्यक्त करण्याचा दुसरा मार्ग असतो.

‘फोटो लावण्याचीही हिंमत नाही’

कर्नालचे राजेश नरवाल यांचे पुत्र विनय नरवाल यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. त्यांचं लग्न होऊन एक आठवडाही झाला नव्हता. 26 वर्षीय भारतीय नौदल अधिकारी विनय नरवाल काश्मीरमध्ये हनिमूनसाठी गेले असताना त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली.

हल्ल्यानंतर काही तासांतच, त्यांच्या पत्नी हिमांशी यांचा एक फोटो- ज्यात त्या त्यांच्या मृतदेहाजवळ बसलेल्या दिसतात. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

विनय नरवाल आपल्या हनीमूनसाठी पहलगामला गेले होते.

फोटो स्रोत, BBC Punjabi

घरात विनय यांच्या वस्तू अजूनही तशाच पॅक करून ठेवलेल्या आहेत. कुटुंबातील अनेक सदस्य त्यांचं नाव घेणंही टाळतात किंवा त्यांच्यासोबत काय घडलं याबद्दल बोलू इच्छित नसतात.

वडील राजेश नरवाल म्हणतात, “आमच्या कोणामध्येही हिंमत नाही. आम्ही तर घरात त्यांचा फोटोही लावण्याचं धाडसही करु शकत नाही.”

पण आठवणी त्यांचा सर्वत्र पाठलाग करतात.

विनय लहान असताना वडील आणि मुलगा अंगणात क्रिकेट खेळायचे. रोज कामावरून परतल्यावर राजेश यांचा दिनक्रम ठरलेला असायचा…विनय त्यांची वाट पाहत असायचा आणि खेळायला सांगायचा. सुटीच्या दिवसांत तर हा खेळ दिवसभर चालत असत.

राजेश म्हणतात, “आम्ही या दुःखातून सावरूच शकत नाही. आम्ही अजूनही शोकात बुडालो आहोत.”

ते पुढे म्हणतात, “काम करताना थोडं लक्ष दुसरीकडे जातं, पण घरी आलो की… कोणीतरी ताज्या जखमेला हात लावल्यासारखं वाटतं. वेदना असह्य होतात.”

आठवणी जपण्याच्या दोन्ही कुटुंबाच्या पद्धती वेगळ्या

दोन्ही कुटुंबांनी या कमतरतेसोबत जगण्याची सवय वेगवेगळ्या पद्धतीने लावून घेतली आहे.

एक कुटुंब बोलून आपल्या प्रिय व्यक्तीच्या आठवणी जिवंत ठेवतं, तर दुसरं कुटुंब शांत राहून त्या आठवणी जपून ठेवतं. पण दोन्ही कुटुंबं आता त्या कधीही भरून न येणाऱ्या पोकळीसह पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

राजेश नरवाल त्या दिवसांची आठवण काढतात जेव्हा ते मुलगा विनयसोबत क्रिकेट खेळायचे.

फोटो स्रोत, Kamal Saini/BBC Punjabi

कानपूरमध्ये ऐशान्या अजूनही विस्कटलेल्या आयुष्याला सावरायला शिकत आहेत.

त्या रोज सायंकाळी सासरच्या लोकांसोबत बसतात आणि सुमारे तासभर शुभमबद्दल बोलत असतात.

त्या म्हणाल्या, “मुलगा किंवा पती गमावल्याचं दुःख कधीच संपत नाही. परंतु, याचा अर्थ असा नाही की आपण जगणं सोडून द्यावं.”

त्या संगीत ऐकतात, लिहितात.

त्या म्हणतात, “लिहिताना मी रडते. पण रडणं, अगदी ओरडणंही गरजेचं आहे.”

त्या प्रशिक्षित नृत्यांगना असूनही, त्यांनी अजूनपर्यंत पुन्हा नृत्य सुरू केलेलं नाही.

“माझे पाय हलतच नाहीत,” असं त्या म्हणाल्या. तरीही त्यांना हे बदलू शकतं, अशी आशा आहे.

कधी कधी असे क्षण येतात, जे त्या नीट सांगू शकत नाहीत. त्या फक्त इतकंच म्हणतात की, ते क्षण विशेष वाटतात.

त्या सांगतात की, एका फ्लाइटमध्ये शुभमचं आवडतं गाणं ऐकत असताना त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिलं आणि त्यांना समोर इंद्रधनुष्य दिसलं.

एका सायंकाळी त्या बाल्कनीत आल्या तेव्हा त्यांनी चंद्राकडे पाहिलं आणि एका क्षणासाठी त्यांना वाटलं की, शुभमच त्यांच्याकडे पाहत आहे.

अशा क्षणांमुळे शुभम अजूनही त्यांच्यासोबत आहेत, असं त्यांना वाटतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC