Home LATEST NEWS ताजी बातमी अशोक खरातची पाचव्या गुन्ह्यात सुनावणी; कधीपर्यंत कोठडी, न्यायालयात नेमकं काय घडलं?

अशोक खरातची पाचव्या गुन्ह्यात सुनावणी; कधीपर्यंत कोठडी, न्यायालयात नेमकं काय घडलं?

18
0

Source :- BBC INDIA NEWS

अशोक खरात

नाशिकमधील लैंगिक शोषण आणि अनेकांची आर्थिक फसवणूक प्रकरणातील आरोपी अशोक खरात याला आज (19 एप्रिल) पाचव्या गुन्हात न्यायालयात हजर करण्यात आलं.

दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकून कोर्टाने खरातला 5 दिवसांची (23 एप्रिलपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली.

सरकारी वकील किरण बेंडभर यांनी याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं, “महिला अत्याचाराच्या पाचव्या गुन्ह्यात विशेष तपास पथकाने (SIT) ताबा घेतल्यानंतर आरोपी खरातला आज न्यायालयासमोर उपस्थित करण्यात आलं होतं.”

“आरोपीने पीडितेला तंत्रमंत्राच्या साह्याने आपल्यात दैवी शक्ती असून देवाचा अवतार असल्याचं सांगितलं आणि वारंवार लैंगिक अत्याचार केला. हा गंभीर आणि संवेदनशील गुन्हा असल्यामुळे आम्ही एसआयटीच्यावतीने युक्तिवाद केला. यानंतर न्यायालयाने आरोपीला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.”

अशोक खरातला 20 एप्रिलपर्यंतची न्यायालयीन कोठडी

दरम्यान, नाशिकमधील लैंगिक शोषण आणि फसवणूक प्रकरणातील आरोपी अशोक खरातला 13 एप्रिलला न्यायालयात हजर करण्यात आले होते. तेव्हा न्यायालयाने त्याला 20 एप्रिलपर्यंतची न्यायलयीन कोठडी सुनावली होती.

सुनावणीत न्यायालयाने अशोक खरातला नाव विचारले आणि पोलिसांविरुद्ध काही तक्रार आहे का असे विचारले होते. तेव्हा त्याने नाही असे सांगितले होते.

आरोपी खरातला गुन्हा क्रमांक 78/2026 प्रकरणी वर्ग करण्यासाठी विशेष तपास पथकाने अर्ज केला होता. या अर्जानुसार न्यायालयाने गुन्हा क्रमांक 78/2026 मध्ये आरोपीस वर्ग केले आणि ताबा घेण्यास मंजुरी दिली होती.

अशोक खरातने गर्भपात घडवून आणल्याचा आरोप

देव-धर्माच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण करणारा आरोपी अशोख खरातला 4 एप्रिलला व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते.

अशोक खरातने गर्भपात घडवून आणल्याचा आरोप नव्याने होतो आहे. त्यासंदर्भात, या सुनावणीत वकिलांमध्ये युक्तिवाद पहायला मिळाला होता.

दरम्यान, तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी या प्रकरणातील आणखी तपासासाठी आरोपीची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली होती.

तर, सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी आरोपी हा मास्टर माईंड आहे. तसेच, तो तपासात सहकार्य करत नाहीये असा दावा करत सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती.

आरोपीचे वकील सचिन भाटे यांनी हा युक्तिवाद मोडून काढण्याचा प्रयत्न करताना म्हटलं होतं, “आधीही त्यांना पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. या चौदा दिवसांच्या पोलीस कोठडीत त्यांनी खुलासे केलेले आहेत.”

माझ्याकडे अजून एकही गुन्ह्याची फिर्याद आलेली नसून मला एफ आय आर वाचायला मिळालेली नाही, असंही ते म्हणाले होते.

काही व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, पण ठराविक व्हिडीओ जाणीवपूर्वक व्हायरल केले गेले का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.

या युक्तिवादानंतर, कोर्टाने आरोपी अशोक खरातला 8 एप्रिलपर्यंत 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

‘खरातला शक्तिपीठ महामार्ग कुठून जाणार हे आधीच माहिती होते का?’

नाशिकमधील लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अशोक खरातने 2024 मध्ये शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या गावाजवळ जमीन खरेदी केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे खरातला शक्तीपीठ महामार्गाबाबत आधीच माहिती होती का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

याआधीही खरातने पुणे, शिर्डी, नाशिकसह इतर ठिकाणी कोट्यावधींची मालमत्ता खरेदी केल्याची माहिती तर समोर आली होती. याबाबत विशेष तपास पथकाने जवळपास 100 स्थावर मालमत्तेची कागदपत्रे ईडीकडे सोपविली. त्यानंतर ईडीने सर्व आर्थिक व्यवहाराच्या चौकशीची सुत्रं हाती घेतले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आरोपीच्या स्थावर मालमत्तेबाबत निवेदन दिले होते. आता खरातचे थेट शक्तिपीठ महामार्गाशी कनेक्शन असल्याचा आरोप होत आहे.

शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या गावातूनच खरातच्या 2000 डाळिंबाची झाडे असलेली जमीन मार्च 2024 त्याने स्वतः व पत्नीच्या नावे खरेदी केली. यावरून खरातचे प्रशासनामधील संबंधांवरही बोललं जात आहे.

आरोपी खरातच्या पॅन कार्डवरील व्यवहाराची तपासणी केली असता त्याने उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण गावात कोट्यवधींची जमीन खरेदी केल्याचं समोर आलं.

याच गावातून बहुचर्चित असा शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. कळमण गावातील गट क्रमांक 200/1 मधील 4.48 हेक्टर म्हणजे सुमारे 11 एकरांपेक्षा जास्तीची जमीन खरातच्या नावावर खरेदी करण्यात आली.

मार्च 2024 रोजी झालेल्या व्यवहारानुसार या जमिनीची किंमत 2 कोटी 40 लाख 91 हजार 200 रुपये इतकी असल्याची नोंद खरेदीखतात आहे.

याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृष्णा चांदगुडे यांनी प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, “उत्तर सोलापूरातील कळमण गावात खरातने अडीच कोटी रुपयात 11 एकर जमीन खरेदी केल्याची माहिती समोर आली. दस्ताला पॅन नंबर दिलेत. यावरून यंत्रणांना प्रॉपर्टी शोधता येते. असे असूनही फडणवीसांनी खरातच्या प्रॉपर्टीबद्दल दिलेल्या निवेदनात या जमिनीची माहिती नव्हती, असे का?”

“खरातला शक्तिपीठ महामार्ग नेमका कुठून जाणार आहे आणि या जमिनीवर 2000 झाडे आणि विहीर असल्याने पैसा गुंतवल्यास परतावा जास्त मिळेल याची माहिती नेमकी कोणी दिली? यामध्ये कोणत्या शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे का? याचा तपास होईल का?” असे प्रश्न त्यांनी विचारले.

7 दिवसांची पोलीस कोठडी

दरम्यान, राज्यभर गाजत असलेल्या, धार्मिक विधी आणि उपासनेच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करण्याच्या अशोक खरात प्रकरणात 24 मार्चला न्यायालयात सुनावणी झाली होती.

सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरात विरोधात दाखल झालेल्या पहिल्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी 24 मार्च संपणार होती. जिल्हा सत्र न्यायाधीश के. एच. पाटील यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली होती.

सरकारकडून सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी युक्तिवाद केला. तर अशोक खरातकडून सचिन भाटेंनी युक्तिवाद केला होता.

सरकारी वकील युक्तिवाद करताना म्हणाले होते, “पोलिसांनी अशोक खरातकडून 6 लाख रुपये, ॲपलचा लॅपटॉप, डीव्हीआर जप्त केले आहेत. तसंच एक काळ्या रंगाचं रिव्हॉल्व्हरदेखील जप्त करण्यात आलं आहे. त्यावर भारत सरकारचं चिन्ह आहे. त्यातील 5 गोळ्या वापरण्यात आल्या आहेत. त्या कशासाठी वापरण्यात आल्या याचा शोध घ्यायचा आहे.”

पोलीसांनी खरातच्या कार्यालयावर छापा टाकला असता, तिथे अनेक आक्षेपार्ह पुरावे हाती लागले आहेत.

सरकारी वकील म्हणाले होते, “खरातची मानसिक विकृती त्याच्या वागण्यातून दिसून येते. त्यानं 5 गोळ्या बळीसाठी वापरल्या का याचा शोध घ्यायचा आहे. तसंच शिवानिका संस्थानची मालमत्ता आणि तिथे होत असलेल्या अघोरी कृत्यांचा शोध घ्यायचा आहे.”

“यात मोठ्या व्यक्तीचा सहभाग आहे. साप, वाघ खरे आहेत की खोटे आहेत हे तपासायचं आहे. तसंच हरणाचं कस्तुरी कुठून आलं आणि हरणाची शिकार केला की याचाही शोध घेणं आवश्यक आहे. माननीय न्यायालयानं यापूर्वी मोठी पोलीस कोठडी (पीसी) दिली होती. मात्र पुढील तपासाठी पुन्हा 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची आवश्यकता आहे.”

राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर आरोपी अशोक खरातचे पाय धुत असल्याचा व्हीडिओ सुषमा अंधारे यांनी पोस्ट केला होता.

सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला होता, “खरातकडून जे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे, त्याचा वापर करून 5 जणांचा बळी दिल्याचा संशय आहे. याआधी 7 दिवसांचा पीसीआर दिला होता.”

“खरातच्या तपासातून अघोरी कृत्य समोर आलं आहे. त्याचबरोबर साप कुठून येत होता याचाही तपास करायचा आहे. हरणाची शिकार केल्याचाही संशय आहे. खरातनं अनेकांना कस्तुरी दिली. लैंगिक अत्याचार प्रकरणात डिजिटल पुरावे जमा करायचे आहेत. त्यासाठी आणखी 7 दिवसांचा पीसीआर द्यावा.”

आरोपीच्या वतीनं सचिन भाटेंनी युक्तिवाद केला होता. ते म्हणाले होते, “या 7 दिवसांच्या तपासाबाबत मला शंका आहे. यासंदर्भातील व्हीडिओ प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियात गेले आहेत. लॅपटॉप, डिव्हीआरचा यात उल्लेख होतो आहे. मात्र पेनड्राईव्हचा उल्लेख का होत नाहीये. खरातकडे पिस्तूलचा परवाना होता. या प्रकरणात सर्व तपास झालेला आहे. त्यामुळे आणखी कोठडी कशासाठी हवी?”

अशोक खरातवर 12 वा गुन्हा दाखल, कांदा व्यापाऱ्याला गंडा घातल्याचा आरोप

अशोक खरातच्या विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा 12 वा गुन्हा दाखल करण्यात आला. सिन्नर येथील कांदा व्यापाऱ्याला प्लॉट खरेदी व नफ्यात विक्री करण्यासाठी गुंतवणूक करण्यास सांगितले आणि तब्बल 85 लाख रुपयांना गंडा घातल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

संबंधित कांदा व्यापाऱ्याने खरेदी केलेली मोक्याची 60 लाख रुपये किमतीची जागा वृद्धाश्रम बांधण्यासाठी केवळ 22 लाख 25 हजार रुपयांच्या अल्प दरात खरेदी करून खरातने व्यापाऱ्याचा विश्वास संपादन केला.

या बदल्यात दुसऱ्या एका चांगल्या मोक्याच्या ठिकाणी जागा मिळवून देण्याचे आणि प्लॉट विक्रीच्या व्यवसायातून मोठा आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिषही खरातने व्यापाऱ्याला दाखवले.

याच आमिषाला बळी पडून संबंधित व्यापाऱ्याने खरातला वेळोवेळी एकूण 85 लाख रुपये दिले. मात्र, पैसे घेऊनही खरातने ना जागा दिली, ना व्यापाऱ्याने दिलेले पैसे परत केले, असं या व्यापाऱ्यानं तक्रारीत म्हटलं आहे.

जेव्हा व्यापाऱ्याने स्वतः दिलेल्या पैशांसाठी आणि पर्यायी जागेसाठी खरातकडे तगादा लावला, तेव्हा अशोक खरात उलट व्यापाऱ्यावरच रागावला, असा आरोप आहे.

“पैसे आणि जागेसाठी तगादा लावू नकोस, अन्यथा तुझ्यावर देवाचा कोप होईल,” असा शाप देत व्यापाऱ्याला मानसिक दडपणाखाली ठेवत पैसे व रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप आहे.

त्यानंतर व्यापाऱ्याने बातम्या बघून पोलिसांशी संपर्क करत अशोक खरात विरोधात तक्रार दाखल केली. यावर अशोक खरात किंवा त्याच्या वकिलांची बाजू अद्याप स्पष्ट झालेली नाही. ती मिळाल्यावर येथे अपडेट केली जाईल.

दरम्यान, अशोक खरात विरोधात आतापर्यंत एकूण 12 गुन्हे दाखल झाले आहेत. यातील 8 गुन्हे लैंगिक शोषणाचे असून 4 गुन्हे आर्थिक फसवणुकीचे आहेत.

धार्मिक व आध्यात्मिकतेच्या नावाखाली महिलांचे शोषण आणि श्रद्धा ठेवणाऱ्या नागरिकांची आर्थिक फसवणूक व लूट करणाऱ्या खरातच्या अडचणीत आता वाढ होताना दिसून येत आहे.

पोलीस व विशेष तपास पथक या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. खरात प्रकरणातील किती पीडित पुढे येतील याचा शोध यंत्रणा घेत आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात या प्रकरणी सविस्तर निवेदन दिले होते. यात त्यांनी म्हटलं होतं, “या प्रकरणात पोलिसांनी जलदगतीने कारवाई केली आहे. अशोक खरातला 17 मार्च 2026 रोजी अटक करण्यात आली. नाशिक गुन्हे शाखा 1 ने याचा तपास केला. आरोपीकडून 6 लाख 53 हजार 611 रुपये रोख जप्त करण्यात आले. यासह रिव्हॉल्वर, काडतूस, मुद्देमालही तपासात जप्त करण्यात आला आहे.”

“आरोपीचा मोबाईल फोन तपासात जप्त करण्यात आला असून मोबाईल डेटा हस्तगत करण्याचे काम सुरू आहे. बळी पडलेल्या महिलांना संपर्क करायचे काम सुरू आहे. या प्रकरणातील पीडित महिला समाजात नाव खराब होण्याच्या भीतीने तक्रारीसाठी पुढे येत नव्हत्या. त्या महिलांना धीर देऊन समोर आणलं जात आहे.”

“आरोपीवर तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महिलांना सुरक्षेची हमी देऊन, समुपदेशन करून त्यांना तक्रारी देण्यासाठी तयार करण्यात येणार आहेत. व्हीडिओ बंद होण्याबाबत कारवाई करण्यात येत आहे. पीडितेची ओळख समोर येईल अशा न्यूज चॅनेल्सना बीएनएसअंतर्गत नोटीस पाठवली आहे,” अशी माहिती फडणवीसांनी दिली होती.

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, ANI

“जप्त पेन ड्राईव्हमधील आरोपीने केलेल्या कृत्याचा तपास सुरू आहे. अजून काही महिला आणि आर्थिक फसवणूक केली आहे का? याचा तपास करण्यात येत आहे.”

“या भोंदूगिरीमध्ये कोणी शासकीय अधिकारी सहभागी आहे का? याचा तपासही सुरू आहे. ज्या अधिकाऱ्यांचा या भोंदूगिरीमध्ये सहभाग दिसेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल,” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं.

“या प्रकरणात आणखी माहिती समोर येते आहे. जे पुरावे समोर येत आहेत, त्यातून जे कनेक्शन समोर येत आहेत, त्याचा तपास सुरू आहे. यापुढे जो तपास होईल त्याचीही माहिती सभागृहाला देण्यात येईल”, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते.

खरातबरोबरच्या भेटीबाबत बच्चू कडू काय म्हणाले?

याबाबत बोलताना बच्चू कडू म्हणाले होते, “भोंदू बाबाचा आम्ही निषेधच करतो. कार्यकर्त्यांनी मला आग्रहानं महादेवाच्या मंदिरात नेलं. ते भोंदू बाबा तिथे होते. त्यांनी माझा सत्कार केला आणि मला फेटा बांधला.”

“कोणताही माणूस वयानं मोठा असल्यास आपण वाकून पाया पडतो. ती आपली संस्कृती आहे. तसं मी केलं. ती साधारण 4 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. हा बाबा थोतांड आहे हे माहीत असतानाही कधीकधी समाजमन राखण्यासाठी आम्हाला हे करावं लागतं. मात्र यापुढे आम्ही याबाबत काळजी घेऊ. त्यांचा आम्ही निषेधच करतो.”

बच्चू कडू

फोटो स्रोत, Bacchu Kadu

इतर अनेक मोठे नेते त्या संस्थानात जाऊन आले, पण त्यांच्याबाबत कुणी अद्याप प्रश्न विचारले नाहीत, असे देखील बच्चू कडूंनी म्हटले.

फिर्यादीचे वकील काय म्हणाले?

सुनावणी झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना फिर्यादीचे वकील ॲड. मधुकर यशवंत काळे म्हणाले होते, “सरकारी वकिलांनी सांगितलं की तपास केला असता खरातकडे कॉस्मोलॉजीसंदर्भात कोणतीही पात्रता दिसून येत नाही. त्यामुळे त्याबाबतही पोलिसांना तपास करायचा आहे. कारण खरातनं असा आभास निर्माण केला आहे की त्याला बऱ्याचशा गोष्टी येतात. या आभासातून त्यानं जनतेची फसवणूक केली.”

फिर्यादी महिलांचे व्हीडिओ, फोटो व्हायरल होत आहेत, त्याचा या प्रकरणात आणि विशेषकरून त्या महिलांवर काही परिणाम होईल का असं वाटतं का?

या प्रश्नावर फिर्यादीचे वकील, ॲड. मधुकर यशवंत काळे म्हणाले होते, “या प्रकरणातील जे पीडित लोक आहेत, विशेषकरून तरुण महिला आहेत, त्यांचे जर व्हीडिओ व्हायरल झाले, तर त्यांच्यासाठी ती एक बदनामीची बाब ठरेलच. त्याचबरोबर सामाजिकदृष्ट्या त्यांची एक मोठी कुचंबणा होणार आहे.”

“आपण समजू शकतो की, कुटुंबातील त्यांचं जे स्थान आहे, त्यालाही धक्का बसेल. समाजातही त्यांची बदनामी होईल. एकंदरित सामाजिकदृष्ट्या त्यांच्याबाबत वाईट प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशाप्रकारचे व्हीडिओ सोशल मीडियावर अजिबात प्रसारित होऊ नयेत आणि याबाबत कडक सूचना पोलिसांकडून दिल्या गेल्या पाहिजेत. जो कोणी हे व्हीडिओ प्रसिद्ध करेल त्याच्याविरोधात कठोर कारवाई करणं गरजेचं आहे.”

अशोक खरात

ॲड. काळे पुढे म्हणाले होते, “पोलीस कोठडी किती दिवसांची द्यायची हे न्यायालय ठरवतं. न्यायालयानं यावेळेस 7 ऐवजी 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली. न्यायालयासमोर पोलिसांनी रिमांड रिपोर्ट दाखल केला. या रिपोर्टचं वाचन करून न्यायालयानं असं ठरवलं की 7 दिवसांऐवजी 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी. कारण आधी 7 दिवसांची पोलीस कोठडी दिली होती.”

“तपासाकरता जास्तीत जास्त 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात येते. त्यामुळे आधीचे 7 आणि आता 5 असे 12 दिवस झाले. कदाचित त्याला पुन्हा हजर केल्यावर राहिलेले 2 दिवसदेखील न्यायालय वाढवून देऊ शकेल. पोलिसांनी जर त्यांची बाजू न्यायालयासमोर भक्कमपणे मांडली की, अजूनही आमचा तपास पूर्ण झालेला नाही. काही विशिष्ट मुद्द्यांबाबत अजूनही तपास करणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्हाला पुन्हा राहिलेले 2 दिवस कोठडी वाढवून देण्यात यावी. तर अशा परिस्थितीत न्यायालय ते देऊ शकतं.”

“मी न्यायालयाला सांगितलं की, या गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी आहे. आरोपीनं खूप वेगवेगळ्या स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत. प्रत्येक गुन्ह्याची तीव्रता ही वेगळ्या स्वरुपाची आहे. आर्थिक आहेच, तसंच लैंगिक गुन्हेदेखील आहेत. याव्यतिरिक्त अनेक स्वरुपाचे गुन्हे आहेत, जे अजूनही उघड झालेले नाहीत. या सर्व गोष्टींचा तपास करण्यासाठी आरोपीला पुन्हा 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी असा माझा युक्तिवाद होता. जर पोलीस कोठडी वाढवून दिली नाही, तर त्याचा विपरित परिणाम तपासावर होईल. तपासावर परिणाम झाल्यास सामाजिक न्याय होऊ शकणार नाही,” असं ॲड. काळे म्हणाले होते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC