Home LATEST NEWS ताजी बातमी नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीतील लैंगिक शोषण प्रकरणातल्या पीडितेनं काय सांगितलं? नऊ FIR मध्ये...

नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीतील लैंगिक शोषण प्रकरणातल्या पीडितेनं काय सांगितलं? नऊ FIR मध्ये कोणते आरोप?

5
0

Source :- BBC INDIA NEWS

बहुराष्ट्रीय कंपनीवरील लैंगिक शोषण प्रकरण

3 तासांपूर्वी

वाचन वेळ: 6 मिनिटे

नाशिकमधील एका बहुराष्ट्रीय कंपनीत महिला कर्मचाऱ्यांना धमकावून त्यांचं लैंगिक शोषण आणि मानसिक छळ केल्याचे आरोप याच कंपनीतील आठ महिलांनी केले आहेत.

या प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. पीडित महिलांनी या एफआयआरमध्ये अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

या कंपनीत काम करणारे कर्मचारी, एचआर विभागातील कर्मचारी आणि डिलिव्हरी पार्टनर अशा आरोपींच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बळजबरी, लैंगिक शोषण, लग्नाचे आमीष दाखवून फसवणूक, धार्मिक भावना दुखावणे अशा प्रकारचे अनेक आरोप पीडित महिलांनी केले आहेत.

या प्रकरणात एका महिलेसह एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे, तर एक महिला आरोपी फरार आहे.

कंपनीतील ज्या कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे, त्यांचं कंपनीनं निलंबन केलं गेलंय. तसंच, एका निवेदनाद्वारे कंपनीनं स्पष्टीकरण देत तपासात सहकार्य करत असल्याचं सांगितलंय.

तर डिलिव्हरी पार्टनर असलेल्या आरोपी महिलेच्या वकिलांनीही आरोप फेटाळून लावले आहेत.

या प्रकरणी सर्वात पहिला गुन्हा दाखल झाला, त्यावेळी एफआयआरमध्ये पीडित महिलेनं अनेक गंभीर आरोप केले आहेत.

आरोपींच्या वकिलांकडून प्रतिक्रियेसाठी बीबीसी मराठी प्रयत्न करत आहेत. त्यांची प्रतिक्रिया मिळाल्यानंतर इथे अपडेट करण्यात येईल.

पीडितेने FIR मध्ये काय सांगितलं?

तक्रार दाखल केलेली महिला 2023 पासून नाशिकमधील या बहुराष्ट्रीय कंपनीत असोसिएट या पदावर कार्यरत आहे.

एफआयआरनुसार, 2022 मध्ये त्यांची एका आरोपीशी भेट झाली होती. आरोपी त्यांचा मित्रच होता. ते एकाच महाविद्यालयात शिकलेले होते. मैत्री असल्यानं ते भेटू लागले. आरोपीनं महिलेला तो काम करत असलेल्या कंपनीत नोकरी लावून द्यायचं आश्वासन दिलं होतं.

दरम्यान, जुलै 2022 मध्ये या आरोपीनं एकदा महिलेकडं शारिरीक सबंध ठेवण्याची मागणी करत तिच्यावर बळजबरीही केली होती. महिलेनं विरोध केल्यानंतर त्यानं तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. महिलेनं विचार करून सांगते असं म्हटलं.

पुढे अनेकदा आरोपी महिलेला कॉलेज संपल्यानंतर भेटायला बोलवायचा. आरोपीनं महिलेला बीसीएची पदवी पूर्ण झाल्यानंतर या बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीसाठी मुलाखतीस जाण्यास सांगितलं आणि तिची असोसिएट पदावर निवड झाली. एकाच कंपनीत असल्यानं त्यांचं तिथंही नेहमी भेटणं बोलणं व्हायचं.

बहुराष्ट्रीय कंपनीवरील लैंगिक शोषण प्रकरण

याच कंपनीत आरोपीच्या ओळखीचा आणखी एक पुरुष आणि एक महिला यांच्याशी महिलेची ओळख झाली. हे चौघं अनेकदा सोबत असायचे. कॅन्टीनमध्ये किंवा फिरायला ते सोबत जायचे. पण या दरम्यान आरोपीसह ते दोघं असे तिघे मिळून महिलेला तुझा धर्म कसा वाईट आणि आमचा कसा चांगला असं सांगत असायचे. महिलेला तिच्या धर्माबाबतही अनेक वाईट गोष्टी बोलायचे.

ऑगस्ट 2024 मध्ये एकदा आरोपी या महिलेला एका रिसॉर्टवर घेऊन गेला आणि त्याठिकाणी शारीरिक संबंधांसाठी बळजबरी केली. त्यानंतर त्याचा कंपनीतील मित्र महिलेच्या घरी गेला आणि दोघांच्या नात्याबाबत कुटुंबाला सांगण्याची धमकी देत त्यानंही महिलेकडं शारीरिक सबंधाची मागणी केली.

नंतर तो महिलेसोबत ऑफिसमध्ये अनेकदा लैंगिक चाळे करू लागला. दोन्ही मित्र मिळून महिलेला तिचा धर्म वाईट असल्यानं तिनं त्यांचा धर्म स्वीकारावा असं सांगू लागले. त्याचे फायदे सांगण्याचा प्रयत्न ते करत होते. हे सर्व सुरू असलताना महिलेशी जवळीक साधण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असायचा.

नंतर फेब्रुवारी 2026 मध्ये एका महिलेचा पीडितेला फोन आला. ती महिला आरोपीची पत्नी असून त्यांना दोन मुलं असल्याचंही तिला समजलं. त्यावर महिलेनं आरोपीला “पहिली पत्नी असताना माझी फसवणूक का केली?” अशी विचारणा केली. त्यावर आरोपीनं उडवाउडवीची उत्तरं दिली. शिवाय “तुझ्याबरोबर लग्न करण्यात कधीच रस नव्हता”, असंही म्हणाला.

अशाप्रकारे आरोपी त्याचा एक मित्र आणि आणखी एक महिला यांनी पीडितेच्या धार्मिक भावना दुखावल्या.

तसंच, आरोपीनं पहिलं लग्न झालेले असताना खोटे बोलून, लग्नाचं वचन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. शिवाय, वारंवार लैंगिक छळही केला, अशा प्रकारची माहिती पीडितेनं पोलिसांना तक्रारीत दिली आहे.

नऊ FIR मध्ये अनेक आरोप

या महिलेनं दिलेल्या तक्रारीसह या प्रकरणात एकापाठोपाठ एक असे नऊ FIR दाखल करण्यात आले आहेत. या FIR मध्येही अनेक आरोप आहेत.

एफआयआर – 01 : जुलै 2022 ते फेब्रुवारी 2026 या काळात वडाळा रोडवरील एका बहुराष्ट्रीय कंपनीत तीन आरोपींनी एका महिला कर्मचाऱ्याच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. महिलेला धमकावून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले तसंच ऑफिसच्या लॉबीमध्ये तिच्यासोबत छेडछाड केली, असेही आरोप आहेत.

एफआयआर – 02 : मे 2023 ते 19 मार्च 2026 या काळात आणखी दोन आरोपींविरोधात त्याच महिलेची छेड काढल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची तिने कंपनीच्या एचआर विभागात तोंडी तक्रार केली. मात्र, एचआरमधील अधिकाऱ्यांनीही त्या दोघांच्या वर्तनाला प्रोत्साहन दिले.

एफआयआर – 03 : 2022 ते फेब्रुवारी 2026 या काळात आणखी एका आरोपीने एका मीटिंगमध्ये त्या महिलेला पाहिलं आणि तिच्या वैयक्तिक व वैवाहिक आयुष्याबद्दल, विशेषतः तिला मूल नसल्याबद्दल, अपमानास्पदरित्या कमेंट केली. तसेच, त्याने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.

एफआयआर – 04 : मे ते डिसेंबर 2025 या काळात पुन्हा एका आरोपीने महिलेला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लाजिरवाणे प्रश्न विचारले आणि तिच्या शरीराकडे पाहून, खासगी भागांकडे इशारा केला. तसेच धर्माबद्दल बोलून इतर महिलांच्या धार्मिक भावना दुखावल्या.

बहुराष्ट्रीय कंपनीवरील लैंगिक शोषण प्रकरण

एफआयआर – 05 : 2022 ते 23 मार्च 2026 या काळात संशयित आरोपींनी तरुणाला त्याच्या धर्मातील देवाबद्दल अपशब्द वापरले आणि त्याला एका विशिष्ट धर्माचे धार्मिक विधी जबरदस्तीने करण्यास भाग पाडले. त्याला बळजबरी मांसाहार खाऊ घातला आणि त्याचा धर्म बदलण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी त्याच्या धर्मातील महिलांबद्दलही अपशब्द वापरले.

एफआयआर – 06 : फेब्रुवारी 2024 ते 2026 या काळात संशयित आरोपींनी त्या महिलेच्या शरीराबद्दल अपमानास्पद आणि अश्लील भाष्य केले. त्यांनी जाणूनबुजून तिच्या शरीराला आणि पायांना स्पर्श करून तिची छेड काढली.

एफआयआर – 07 : जून 2025 ते मार्च 2026 या काळात पाच संशयित आरोपींनी महिलेचा पाठलाग करुन तिच्याबद्दल अश्लील भाष्य केले. कामाच्या ठिकाणी त्यांनी तिच्या शरीराला अयोग्य पद्धतीने स्पर्श केला आणि तिच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

एफआयआर – 08 : जानेवारी 2025 ते एप्रिल 2026 या काळात आरोपींनी महिलेला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारले आणि प्रेमाची मागणी केली. तसेच त्यांनी वारंवार अश्लील भाषा वापरून तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला, असेही आरोप आहेत.

एफआयआर – 09 : जानेवारी ते 1 एप्रिल 2026 या काळात दोन आरोपींनी कामाच्या ठिकाणी त्या महिलेसोबत अपशब्द वापरले आणि तिच्याशी गैरवर्तन केले. तसेच त्यांनी तिच्या शरीराबद्दल अपमानास्पद आणि अश्लील कमेंट केल्याचा आरोप आहे.

डिलिव्हरी पार्टनर आणि ईमेल

दरम्यान, या प्रकरणात कंपनीची डिलिव्हरी पार्टनर (प्रॉडक्ट ग्रोथ) असलेली महिलादेखील संशयित आहेत. या महिलेच्या पोलीस कोठडीत नाशिक न्यायालयाने 15 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.

पोलीस या दिशेनं तपास करताना काही गोष्टी समोर आल्या आहेत.

कंपनीच्या सर्व्हरवरून या महिलेला 78 ईमेल पाठवले होते. त्याचा तपास करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाशी त्याचा संबंध आहे का? हे तपासलं जात आहे. डिलिव्हरी पार्टनर असलेली ही महिला सातत्यानं आरोपींच्या संपर्कात असल्याचाही आरोप आहे.

पीडितेनं केलेल्या तक्रारीत तिला मदत करण्याऐवजी या महिलेनं तिचा आवाज दाबल्याचा आरोप सरकारी वकिलांनी केला आहे.

बहुराष्ट्रीय कंपनीवरील लैंगिक शोषण प्रकरण

दरम्यान, याबाबत डिलिव्हरी पार्टनर असलेल्या या महिलेच्या वकिलांनी आरोप फेटाळले आहेत.

“आमची अशील एचआर नसून त्या फरारही नव्हत्या,” असं वकिलांनी सांगितलं आहे.

त्या एचआर नव्हत्या. तर त्या 2026 मध्ये कंपनीत POSH च्या समितीत आल्या होत्या.

कामाच्या ठिकाणी महिलांचा छळ होऊ नये, यासाठी ही समिती काम करत असते.

“त्यांनी 31 तारखेला नाशिकमध्ये येऊन जबाब दिला होता. त्यावेळी कंपनीत एचआर आणि नाशिक कंपनीचे व्यवस्थापकही होते. आमच्या अशील फरार नव्हत्या, तरीही त्यांना अटक करण्यात आली आहे. तपासात आम्ही सहकार्य करत असून ईमेलचा ॲक्सेस दिला असून त्याआधीच 78 ईमेल पोलिसांना भेटले आहेत,” असंही त्यांच्या वकिलांनी सांगितलं.

संबंधित बहुराष्ट्रीय कंपनीचे निवेदन

या प्रकरणानंतर संबंधित बहुराष्ट्रीय कंपनीने निवेदन जारी केलं आहे.

या निवेदनात संबंधित कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटलं की, “आमच्या कंपनीत कोणत्याही प्रकारच्या छळवणूक आणि जुलूमाविरुद्ध दीर्घकालीन शून्य-सहनशीलता धोरण आहे. आम्ही नेहमीच आमच्या कर्मचाऱ्यांच्या कार्यस्थळी सुरक्षितता, सन्मान आणि कल्याणाच्या सर्वोच्च मानकांची खात्री केली आहे.”

बहुराष्ट्रीय कंपनीवरील लैंगिक शोषण प्रकरण

“नाशिकमधील या प्रकरणाची माहिती मिळताच आम्ही तात्काळ कारवाई केली असून अंतर्गत चौकशी प्रक्रिया सुरू केली आहे. तपासाअंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे.”

तसंच, “आम्ही स्थानिक कायदा अंमलबजावणी प्राधिकरणांसोबत पूर्ण सहकार्य करत आहोत. पुढील कोणतीही कारवाई या तपासाच्या निष्कर्षांवर आधारित असेल”, असंही कंपनीच्या प्रवक्त्यांनी नमूद केलं आहे.

तर आरोपींचे वकील बाबा सय्यद यांनी 10 एप्रिलला याबाबत भूमिका मांडताना हा प्रकार गैरसमजातून झाल्याचं म्हणत अधिक बोलण्यास नकार दिला होता.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC