Home LATEST NEWS ताजी बातमी तृतीयपंथी ‘गुरू माँ’ला पुन्हा अटक, मुलाला तृतीयपंथी बनवल्याचा आरोप, पोलिसांनी काय माहिती...

तृतीयपंथी ‘गुरू माँ’ला पुन्हा अटक, मुलाला तृतीयपंथी बनवल्याचा आरोप, पोलिसांनी काय माहिती दिली?

20
0

Source :- BBC INDIA NEWS

मुंबईत बांगलादेशी किन्नर माँ ला अटक

फोटो स्रोत, Salma Khan

बांगलादेशातून मुंबईच्या गोवंडी परिसरात आलेल्या आणि ‘गुरू माँ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या तृतीयपंथी गुरू माँ उर्फ बाबू खानला मुंबई पोलिसांनी 19 एप्रिल रोजी पुन्हा अटक केली आहे.

अल्पवयीन मुलांना तृतीयपंथी बनवून शरीरविक्री आणि वेश्या व्यवसायास भाग पाडण्याच्या आरोपात या ‘गुरू माँ’ला अटक झाली आहे.

यापूर्वी बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्डसारखी भारतीय कागदपत्रं 30 वर्षांपासून अवैधरित्या भारतात वास्तव्य केल्याचं तपासात समोर आल्यानंतर 17 ऑक्टोबर 2025 ला गुरू माँ उर्फ बाबू खानला अटक करण्यात आली होती. त्यानंतर दीड महिन्यापूर्वी ‘गुरू माँ’ला जामीन मिळाला होता.

बाबू खान (30) या आरोपीवर सध्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये 4 ते 5 गुन्हे दाखल आहेत.

यासंदर्भात आरोपी बाबू खानशी संबंधित असलेल्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांची बाजू समजू शकली नाही. त्यांची प्रतिक्रिया मिळाल्यास याठिकाणी अपडेट केली जाईल.

पोलिसांनी काय माहिती दिली?

गोवंडीतील तक्रारदाराच्या अल्पवयीन मुलाचं काही दिवसांपूर्वी अपहरण झालं होतं, अशी तक्रार करण्यात आली.

परिसरातील एका तृतीयपंथी टोळीनं मुलाचं अपहरण करून त्याला तृतीयपंथी बनवल्याची तक्रार या मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली होती.

तपासात या मुलाला लोकलमध्ये भीक मागण्यास लावण्यात येत असल्याची, तसंच त्याला शरीरविक्री व्यवसायास भाग पाडलं जात असल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली होती.

आरोपी 'गुर माँ'

फोटो स्रोत, Alpesh Karkare

त्यामुळं त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी u/s 139, 142, 352, 351(2) BNS सह कलम 4, 6, 8, 12, 17 पोस्को, तसेच कलम 5 स्त्री व मुले अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम, तसेच कलम 76 मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम, तसेच कलम 18 तृतीयपंथी व्यक्ती अधिनियम यानुसार गुन्हा दाखल केला.

पोलिसांना तपासादरम्यान आरोपी नवी मुंबईतील वाशी परिसरात वास्तव्यास असल्याचं समजलं. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला.

आरोपी पळून जात असताना पाठलाग करून त्याला ताब्यात घेतल्याचं मुंबई पोलिसांच्या कक्ष 6 गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे यांनी सांगितलं.

बीबीसी मराठीनं गुरू माँच्या वकिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्याबाबत माहिती मिळाल्यास याठिकाणी अपडेट करण्यात येईल.

यापूर्वीचे प्रकरण काय होते?

यापूर्वी पोलिसांनी गुरू माँ उर्फ बाबू खानला 17 ऑक्टोबर 2025 रोजी अटक केली होती.

तेव्हा कथित ‘गुरू माँ’ने बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्डसारखी भारतीय कागदपत्रे बनवून गेल्या 30 वर्षापासून अवैधरित्या भारतात वास्तव्य केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं होतं.

महत्त्वाचं म्हणजे, ‘गुरु माँ’च्या नावे मुंबईतील रफिक नगर आणि गोवंडीसह विविध भागांत 20 हून अधिक मालमत्ता असल्याची माहिती समोर आली होती.

तसेच, विविध पोलीस ठाण्यामध्ये 5 गुन्हे देखील आरोपीच्या नावावर आहेत.

“गुरु माँ’च्या आश्रयात 200 पेक्षा अधिक तृतीयपंथी मुंबई उपनगरात विविध ठिकाणी वास्तव्य करतात, अशी पोलीस तपासातील माहिती आहे.

सामाजिक कार्यकर्ते कृष्णा आडेलकर यांनी मुंबई पोलिसांना मुंबईत अवैधरित्या बांगलादेशी तृतीयपंथी असल्यासंदर्भात जानेवारी महिन्यात तक्रार दिली होती. यावरून ही कारवाई झाल्याचा दावा आडेलकर यांनी तेव्हा केला होता.

वर्तुळात आरोपी गुरू माँ

फोटो स्रोत, Alpesh Karkare

बांगलादेशी तृतीयपंथींच मोठं रॅकेट मुंबईत आहे. त्यातील एका व्यक्तीवर कारवाई झाली आहे, आणखी सर्व संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी आडेलकर करत आहेत.

त्यातच आडेलकर यांनी तृतीयपंथींची संघटना असणाऱ्या किन्नर माँ संघटनेवर आणि त्यांच्या प्रमुखांवरही बांगलादेशी नागरिक, तसंच लोकांची लूट करत असल्याचे आरोप केले.

या आरोपांनंतर किन्नर माँ संघटनेच्या तृतीयपंथी सदस्यांनी आपली बदनामी होत असल्याचं म्हटलं. तसंच, आडेलकरांवर कारवाई करण्याची मागणी करत, 20 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईतीलच विक्रोळीत 12 किन्नरांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

आडेलकर यांनी आपली बदनामी केली आणि ते सूडभावनेने असं करत आहेत, त्यांच्याविरोधात तक्रार करणार आहोत, अशी माहिती काही तृतीयपंथी सदस्यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती.

काही दिवसांपूर्वी इंदूर येथेही काही तृतीयपंथीयांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

बांगलादेशींविरोधातील कारवाईत मिळाली माहिती

गेल्या काही काळात सुरक्षा यंत्रणांनी भारतात अवैधरित्या राहणार्‍या बांगलादेशींविरोधात कठोर पावलं उचलली. त्यात घुसखोरी करून भारतात राहणाऱ्या हजारो बांगलादेशींना आतापर्यंत हद्दपार करण्यात आलं.

मुंबईतदेखील अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशींवर मुंबई पोलीस कारवाया करत होते. त्यातच मुंबईत अवैधरीत्या राहणाऱ्या बांगलादेशी विरोधात मोहीम सुरू असताना गोवंडी येथील रफिक नगर परिसराबाबत तक्रार आली. यानंतर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार बाबू खान उर्फ गुरु माँसह अनेक तृतीयपंथीयांसंदर्भात कागदपत्रांची जानेवारी महिन्यापासून गोवंडी पोलीस पडताळणी करत होते.

विक्रोळी येथे 20 ऑक्टोबर रोजी बारा किन्नरांनी फिनाईल पिऊन सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

फोटो स्रोत, Salma Khan

पोलीस पडताळणी दरम्यान गुरु माँच्या कागदपत्रात अनेक विसंगती आढळून आल्या. पोलिसांनी अधिक तपास केला असता बनावट कागदपत्र बनवली असल्याचं समोर आलं. तसेच गुरु माँ बांगलादेशी असल्याचं तपासात निष्पन्न झालं होतं.

त्यामुळे गोवंडी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी ‘गुरु माँ’ उर्फ बाबू अयलान खान हिच्या विरोधात बेकायदेशीर वास्तव्य आणि इतर कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करत तिला अटक केली होती.

गुरु माँ नक्की कोण आहे?

बाबू खान उर्फ गुरु माँ ही एक 36 वर्षीय तृतीयपंथी गुरु आहे. मुंबईतील गोवंडी रफिक नगर परिसरामध्ये गेल्या काही वर्षापासून ती वास्तव्यास होती.

ती मूळची बांगलादेशची असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.

गुरु माँ मुंबई उपनगरातील तृतीयपंथींना मार्गदर्शन आणि आश्रय देत असे. मुंबईच्या विविध भागांमध्ये 200 हून अधिक तिला मानणारे तृतीयपंथी अनुयायी आहेत.

मुंबईतील रफीक नगर आणि गोवंडीसह विविध भागांत 20 हून अधिक मालमत्ता असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

स्वतःच्या मालकीच्या असणाऱ्या घरांमध्ये इतर तृतीयपंथींना आश्रय देऊन त्यांच्याकडून प्रतिदिन पैसे गोळा करणे, तृतीयपंथींचे कागदपत्र बनवून देणे, त्यांच्याकडून विविध प्रकारचे काम करून घेणे. हे काम गुरु माँ करते, असं पोलिसांनी सांगितलं.

अनेक बांगलादेशी नागरिकांना भारतात आणून तिने तृतीयपंथी बनवण्याचा आरोप देखील तिच्यावर आहे.

पोलीस पडताळणी दरम्यान गुरु माँच्या कागदपत्रात अनेक विसंगती आढळून आल्या.

फोटो स्रोत, Salma Khan

गुरु माँ ने स्वतःला भारतीय नागरिक दाखवण्यासाठी जन्म दाखला, आधार कार्ड आणि पॅन कार्डसारखी अनेक बनावट कागदपत्रे तयार केली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या चौकशीत ही सर्व कागदपत्रे बनावट असल्याचं आढळल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली.

तपास यंत्रणा तिच्याशी संबंधित इतर लोकांचा आणि त्यांच्या ठिकाणांचा शोध घेत तपास करत आहेत.

यापूर्वी मानव तस्करी आणि फसवणूक यांसारख्या विविध कलमांखाली मुंबईतील शिवाजी नगर, नारपोली, देवनार, ट्रॉम्बे आणि कुर्ला पोलीस ठाण्यांमध्ये तिच्यावर गुन्हे दाखल आहेत.

10 ते 12 तृतीयपंथीयांचा आत्महत्येचा प्रयत्न

गुरु माँवर झालेल्या कारवाईनंतर माध्यमांशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते कृष्णा आडेलकर यांनी किन्नर माँ संस्थेचं आणि पदाधिकाऱ्यांचा नाव घेऊन त्यांच्यावरही कारवाईची मागणी केल्यानंतर तृतीयपंथींयांनी कृष्णा यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी केली.

तृतीयपंथींच्या होणाऱ्या बदनामीला आणि होणाऱ्या आरोपाविरोधात मुंबईतील विक्रोळी पार्क साईट भागातील 10 ते 12 तृतीयपंथींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. याचा व्हीडिओ सोशल मीडियावर देखील वायरल झाला होता.

या तृतीयपंथींना तत्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

तृतीयपंथींनी कृष्णा यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे

फोटो स्रोत, Salma Khan

त्यावेळी या घटनेसंदर्भात आणि होणाऱ्या आरोपात संदर्भात किन्नर माँ संस्थेच्या सलमा खान यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं होतं, “त्या व्यक्तीने केलेल्या आरोपात तथ्य नाही, हे आरोप खोटे आहेत. त्या व्यक्तीला संस्थेशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीच्या तक्रारीवरून अटक झाली होती.

यामुळे सूडबुद्धीने त्यांनी आरोप केले आहेत. आमचा आणि गुरु माँचा काहीही संबंध नाही. फोटो वगैरे बनावट असतील. बांगलादेशींविरोधात पोलीस योग्य कारवाई करतील.

पण आमच्या बदनामीने किन्नर समाज दुःखी झाला आहे. त्यामुळे आमच्या काही लोकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संबंधित व्यक्तीला जबाबदार धरून कारवाई करावी.”

महत्त्वाची सूचना

औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.

  • हितगुज हेल्पलाईन, मुंबई – 022- 24131212
  • सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
  • इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस – 9868396824, 9868396841, 011-22574820
  • नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स – 080 – 26995000
  • विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC