Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
अपडेटेड 43 मिनिटांपूर्वी
वाचन वेळ: 5 मिनिटे
शनिवारी (26 एप्रिल) वॉशिंग्टन हिल्टनमधून गोळीबारासारखा आवाज आल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इतर सरकारी अधिकाऱ्यांना तातडीनं बाहेर काढण्यात आलं.
गोळीबार झाल्याचा संशय आल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे समारंभातून घाईघाईने बाहेर पडले आहेत, अशी माहिती समोर आली.
पण नंतर त्यांना फक्त कार्यक्रम सुरू असलेल्या ठिकाणावरून दुसरीकडे नेण्यात आलं होतं हे समोर आलं. त्यामुळं ते कार्यक्रम असलेल्या हिल्टन हॉटेल परिसरातच असल्याचं समजलं.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः ट्रूथ सोशलवर हल्लेखोराला अटक करण्यात आल्याची माहिती दिली.
कार्यक्रमातील एका सुरक्षा अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, सात ते आठ गोळ्या झाडण्यात आल्या.
व्हाइट हाऊसमध्ये वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांसाठी डिनरचा कार्यक्रम ज्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता, तिथे ही घटना घडली आहे.
‘त्याला पकडण्यात आलंय’ – ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प यांनी गोळीबार करणाऱ्याला पकडण्यात आल्याची माहिती आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून दिली. तसेच, हा कार्यक्रम सुरू ठेवण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, आता हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
सशस्त्र सुरक्षा कर्मचाऱ्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना घाईघाईनं सुरक्षित स्थळी घेऊन जातानाची दृश्य दिसत होती. त्यानंतर राष्ट्राध्यक्षांचं म्हणणं समोर आलं आहे.
फोटो स्रोत, Getty Images
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून सांगितलं की, गोळीबार करणाऱ्याला “पकडण्यात आलं” आहे.
“मी अशी शिफारस केली आहे की आपण ‘कार्यक्रम चालू ठेवावा’, पण, मी पूर्णपणे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांच्या मार्गदर्शनानुसारच वागेन.”
“त्यांचा निर्णय काहीही असो, आजची संध्याकाळ नियोजित केल्यापेक्षा खूप वेगळी असेल, आणि आपल्याला तो कार्यक्रम पुन्हा करावाच लागेल,” असंही ते म्हणाले होते.
मात्र, आता हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. संशयित गोळीबारानंतर ट्रम्प यांनी कार्यक्रमस्थळ सोडलं आहे.
“फर्स्ट लेडी, उपराष्ट्राध्यक्ष आणि मंत्रिमंडळाचे सर्व सदस्य पूर्णपणे ठीक आहेत,” असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर लिहिलं आहे.
“हा कार्यक्रम पुढे ढकलला जाईल आणि 30 दिवसांच्या आत पुन्हा आयोजित केला जाईल,” असं राष्ट्राध्यक्ष म्हणाले आहेत.
ट्रम्प यांनी हल्लेखोराविषयी काय सांगितलं?
या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांना माहिती दिली.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “हा कार्यक्रम अभिव्यक्ती स्वातंत्र्याला समर्पित होता आणि सर्वांना एकत्र आणणं हा त्यामागचा उद्देश होता. पण एक माणूस अनेक शस्त्रं घेऊन सिक्योरिटी चेकपॉइंटवर हल्ला करायला आला. सिक्रेट सर्व्हिसच्या शूर सदस्यांनी त्याला रोखलं.”
नुकताच सोशल मीडियावर ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा फोटो आणि गोळीबाराची सुरुवात दाखवणारे सीसीटीव्ही फुटेज शेअर करण्यात आलं आहे. संशयिताची प्रकृती खूपच गंभीर आहे.
फोटो स्रोत, Getty Images
ट्रम्प असंही म्हणाले की, या घटनेत एका सिक्रेट सर्व्हिस अधिकाऱ्यावर अगदी जवळून गोळी झाडण्यात आली, परंतु त्याच्या बुलेटप्रूफ जॅकेटमुळे त्याचा जीव वाचला.
ते म्हणाले, “मी नुकतंच त्या अधिकाऱ्याशी बोललो आहे आणि त्याची प्रकृती ठीक आहे. त्याचं मनोधैर्य उंचावलेलं आहे. त्याला मी सांगितलं की आम्ही त्याच्यावर प्रेम करतो आणि आदरही करतो.”
ट्रम्प म्हणाले की, या कार्यक्रमापूर्वी त्यांच्या टीमला सुरक्षेविषयीच्या कोणत्याही धोक्याची कल्पना नव्हती.
ते म्हणाले की, “यामागील हेतू काय होता हे मला माहीत नाही, पण संशयित खूपच गंभीर दिसतो.”
अध्यक्ष ट्रम्प म्हणाले, “संशयित 50 यार्ड अंतरावरून धावत आला आणि त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बंदुका बाहेर काढल्या. अधिकारी कॅलिफोर्नियातील संशयिताच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचले असून त्यांनी तपास सुरू केला आहे.”
पतंप्रधान मोदींनी केलं ट्विट
या घटनेनंतर भारताचे पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवर लिहिलं आहे की, “वॉशिंग्टन डीसी येथील एका हॉटेलमध्ये नुकत्याच घडलेल्या घटनेनंतर, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, फर्स्ट लेडी आणि उपराष्ट्राध्यक्ष सुरक्षित आणि सुखरूप आहेत हे जाणून दिलासा मिळाला आहे.”
ते पुढे म्हणाले की, “त्यांच्या पुढील सुरक्षिततेसाठी आणि आरोग्यासाठी मी सदिच्छा व्यक्त करतो. लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नाही आणि त्याचा निःसंदिग्धपणे निषेध केलाच पाहिजे.”
बीबीसीच्या प्रतिनिधींनी काय पाहिलं?
बीबीसी न्यूजच्या इंद्राणी बसू यादेखीला कार्यक्रमात उपस्थित होत्या.
“स्थानिक वेळेनुसार रात्री सुमारे साडेआठ वाजता आम्ही खायला सुरुवातच केली होती, तेव्हा मला काच फुटल्यासारखा आवाज ऐकू आला. ‘कुणी वाईनच्या ग्लासेसचा ट्रे खाली पाडला का?’, असा विचार माझ्या मनात आला.
फोटो स्रोत, Reuters
पण, माझ्या उजवीकडे बसलेल्या बीबीसी नॉर्थ अमेरिका ब्युरो चीफने माझा हात ओढला आणि ओरडून खाली बसायला सांगितलं. आम्ही सर्वजण आमच्या टेबलाखाली गेलो. आम्हाला तिथं खूप वेळ होतो असं वाटलं, पण आम्ही फक्त पाच मिनिटं किंवा त्यापेक्षाही कमी वेळ तिथं होतं. अखेर धोका टळल्यासारखं वाटल्यावर आम्ही बाहेर निघालो.
समोर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काही वेळापूर्वी बसले होते, ती जागा रिकमा करण्यात आल्याची आम्ही पाहिलं.
पत्रकारांनी भरलेल्या या खोलीत पुढं जे घडले, त्याची अपेक्षा होतीच. बीबीसीचे परराष्ट्र विभागाचे वार्ताहर टॉम बेटमन यांनी टेबलाखालून आधीच एक व्हीडिओ चित्रित करून ब्रेकिंग न्यूज डेस्कला पाठवला होता. बीबीसीचे उत्तर अमेरिका वार्ताहर गॅरी ओ’डोनोघ्यू रेडिओसाठी माहिती पाठवत होते.
खोलीतील प्रत्येकजण बातमी देत होता.”
कार्यक्रमात उपस्थित पत्रकार काय म्हणाले?
व्हाईट हाऊस प्रतिनिधी बर्न्ड डेबसमन ज्युनियर यांनी याबाबत माहिती दिली.
“कार्यक्रमाच्या ठिकाणाची दारं बराच वेळ बंद होती. जवळपास 2500 आसनक्षमता असलेल्या याठिकाणी जवळपास सगळे उभे आणि त्यातील बरेच फोनवर बोलत आहेत.
वॉशिंग्टनमधील स्थानिक आणि अनेक आंतरराष्ट्रीय पत्रकार इथं उपस्थित आहेत. माझ्या आजूबाजूला अगदी जवळ पोलिटिको, डेली मेल आणि युरोप तसेच लॅटिन अमेरिकेतील विविध वृत्तसंस्थांचे प्रतिनिधी दिसत आहेत.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नुकतंच ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट करून संशयिताला अटक केल्याचं सांगितलं आहे. त्या पोस्टनुसार कार्यक्रम सुरू राहण्याची शक्यता फार कमी आहे. घटनेमुळं उपस्थित अत्यंत घाबरलेले आहेत.
फोटो स्रोत, Getty Images
इथलं वातावरण मला जुलै 2024 मध्ये पेनसिल्व्हेनियाच्या बटलरमध्ये झालेल्या गोळीबार आणि ट्रम्प यांच्यावरील प्राणघातक हल्ल्यानंतरच्या परिस्थितीसारखं वाटतं. पण महत्त्वाचा फरक म्हणजे शेकडो अधिक पत्रकार आहेत.”
पत्रकार कॅट्रिओना पेरी याही कार्यक्रमात उपस्थित होत्या. त्यांनीही याबाबत माहिती दिली.
“हिल्टनमधील या खोलीत असलेल्यांना अजूनही बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. माझ्या माहितीनुसार ज्या दारातून मोठा आवाज आला, ते दार बंदच आहे.
आत बंद असलेल्या पत्रकारांमध्ये अनेक उच्चपदावरील आहेत. पण रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर यांच्यासारख्या ट्रम्प प्रशासनातील सदस्यांना खोलीबाहेर नेण्यात आलं आहे.
उपस्थित लोक सिक्रेट सर्व्हिसच्या निवेदनाची वाट पाहत आहेत.”
नेमकं काय घडलं?
हॉटेल वॉशिंग्टन हिल्टनमध्ये राष्ट्राध्यक्ष बोलत असतानाच टेबलाजवळ झालेल्या गोंधळामुळे त्यांच्या बोलण्यात व्यत्यय आला.
अचानकच मोठा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर सिक्रेट सर्व्हिसच्या विविध सदस्यांनी “खाली बसा, खाली बसा” असं ओरडत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्या ठिकाणाहून बाहेर नेलं.
फोटो स्रोत, Getty Images
डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रमुख सल्लागार स्टीफन मिलर यांना गर्दीतून बाहेर काढलं जात असल्याचं दिसून आलं.
या गोंधळादरम्यान इतर बहुतेक उपस्थित सुरुवातीला खाली बसले होते, परंतु राष्ट्राध्यक्षांना बाहेर काढल्यानंतर ते आतच थांबले.
अंदाजे पाच गोळ्या झाडल्याचा आवाज ऐकू आला असल्याची माहिती आधी देण्यात आली होती. एफबीआयचे संचालक काश पटेल यांच्यासह वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना खोलीतून तातडीनं बाहेर काढण्यात आलं.
नेमकं काय घडलं यावर कोणतंही अधिकृत भाष्य अद्याप करण्यात आलेलं नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्रकार परिषदेतच याबाबत पुरेशी माहिती मिळण्याची शक्यता आहे.
(ही बातमी सातत्याने अपडेट होत आहे.)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC



