Home LATEST NEWS ताजी बातमी ‘हुं नथुराम’वरून गुजरातमध्ये गदारोळ; नाटकाचे प्रयोग रद्द; गांधीवाद्यांचे आक्षेप काय आहेत?

‘हुं नथुराम’वरून गुजरातमध्ये गदारोळ; नाटकाचे प्रयोग रद्द; गांधीवाद्यांचे आक्षेप काय आहेत?

15
0

Source :- BBC INDIA NEWS

'हुं नथुराम' (मी नथुराम) नाटकाची वृत्तपत्रातील जाहिरात.

फोटो स्रोत, Getty/BBC

अहमदाबादमध्ये होणारा ‘हुं नथुराम’ (मी नथुराम) या नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात आला आहे.

गुजरात काँग्रेसचे नेते आणि एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे हा प्रयोग रद्द करण्यात आला.

यापूर्वी राजकोटमध्येही काँग्रेसच्या विरोधानंतर या नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात आला होता. तिथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचे व्हीडिओही व्हायरल झाले होते.

या नाटकातून महात्मा गांधींच्या हत्येसाठी मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या नथुराम गोडसेबद्दल सांगितलं जात असल्याचे नाटकाचे निर्माते आणि कलाकार सांगतात. तर दुसरीकडे काँग्रेस नेत्यांनी मात्र या नाटकातून गोडसेला ‘खलनायकातून नायक’ दाखवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे.

या नाटकासाठी सेन्सॉर प्रमाणपत्र, राज्य सरकारची आणि पोलिसांची परवानगी घेतल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे. यापूर्वी गुजरातमध्ये वडोदरा, भावनगर आणि जामनगर येथे या नाटकाचे प्रत्येकी एक-एक प्रयोग झाले आहेत.

पण विरोधामुळे राजकोट आणि अहमदाबादमधील प्रयोग रद्द करण्यात आला आहे. हे नाटक मराठीतही सादर करण्यात आले असून त्यालाही वादांचा सामना करावा लागला आहे.

या प्रकरणावर नाटकाशी संबंधित लोक, काँग्रेसचे कार्यकर्ते आणि गांधीवादी काय म्हणतात, ते सविस्तरपणे जाणून घेऊया.

नाटकाशी संबंधित लोक काय म्हणतात?

बीबीसी गुजरातीशी बोलताना या नाटकाचे सादरकर्ते परितोष पेंटर म्हणाले की, “या नाटकात आम्ही गोडसेला हिरो म्हणून दाखवलेलं नाही. न्यायालयात आणि पोलीस ठाण्यात गोडसेनं जे सांगितलं, त्याचंच नाट्यरूपांतर करण्यात आलं आहे.”

“कोणाचीही बाजू न घेता हे नाटक तटस्थ पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडलं आहे. हे नाटक गुजरातीपूर्वी इंग्रजी, हिंदी आणि मराठीत सादर झालं आहे.”

मराठीत हे नाटक ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नावाने सादर करण्यात आले होते. त्या वेळीही या नाटकावर अनेक वाद झाले होते.

हुं नथुराम नाटकातील एक दृश्य.

फोटो स्रोत, परितोष पेंटर

ते पुढे म्हणाले की, “या नाटकात गांधीजींची हत्या करण्यापूर्वी गोडसेचे गांधीजींबाबतचे विचार आणि त्यांच्याविषयीचा आदरही दाखवला आहे. गोडसेचा गांधीजींशी असलेला विरोध फक्त भारत-पाकिस्तानच्या फाळणीपुरताच होता, असं त्याने न्यायालयात सांगितलं होतं. तेच आम्ही नाटकात मांडलं आहे.”

परितोष म्हणाले की, “या नाटकातून आम्ही गांधीजींच्या हत्येचं समर्थन करत नाही. गोडसे कधीही नायक असू शकत नाही आणि या नाटकातही तो नायक नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की, नाटकाला विरोध करणाऱ्यांनी ते एकदा पाहावं. नाटक नेमकं काय सांगतंय हे कळल्यानंतरच विरोध करावा.”

काँग्रेसचा या नाटकाला उघड विरोध का?

गुजरात प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित चावडा पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, “या नाटकाच्या माध्यमातून गुजरातमधील भाजप सरकार गांधीजींच्या मारेकऱ्याचं नाटक दाखवत आहे. कोणत्याही परिस्थितीत असं नाटक राज्यात दाखवलं जाऊ नये.”

या विषयावर आम्ही भाजपचे मुख्य प्रवक्ते डॉ. अनिल पटेल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही. संपर्क झाला आणि त्यांची बाजू मिळाल्यास त्याचा येथे समावेश केला जाईल.

हे आंदोलन प्रामुख्याने काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयूआयचे कार्यकर्ते करत आहेत.

अहमदाबादमधील निषेधाचे छायाचित्र.

फोटो स्रोत, Parthivraj Kathvadiya

या प्रकरणी बीबीसी गुजरातीने एनएसयूआयचे नेते पार्थिवराज सिंह काठवाडिया यांच्याशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी सांगितलं की, “काही लोकांना हे खूप वाईट वाटलं आणि ते संतापले, त्यामुळे तोडफोड झाली.”

मात्र त्यांनी स्पष्ट केलं की, “आमचा या नाटकाला विरोध आहे आणि तो पुढेही राहील. गोडसेची बाजू मांडून हे लोक काय सिद्ध करू पाहतात? नाटकात ‘गांधींचा वध केला’ असा शब्द वापरला जातो. आपल्या संस्कृतीत ‘वध’ हा शब्द असुरांच्या नाशासाठी वापरला जातो. त्यामुळेच गोडसेला खलनायकातून नायक बनवण्याचा प्रयत्न होत असल्याचं स्पष्ट होतं.”

राज्यात कुठेही अशा प्रकारचं नाटक सादर झालं, तर त्याला विरोध केला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

गांधीवादी काय म्हणतात?

सोशल मीडियावर या नाटकावर दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू आहे. एक गट ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा’ मुद्दा मांडत नाटकाचं समर्थन करत आहे. तर दुसरा गट गोडसेला ‘महान’ किंवा ‘कीर्तिमान’ व्यक्ती म्हणून दाखवण्याच्या प्रयत्नाला विरोध करत आहे.

तसेच, गांधींच्या गुजरातमध्ये त्यांच्या मारेकऱ्याचं नाटक सादर करून समाजाला नेमका कोणता संदेश दिला जात आहे, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

ग्राफिक्स

ज्येष्ठ गुजराती लेखक आणि गांधीवादी विचारवंत प्रकाश शाह यांनी बीबीसी गुजरातीशी संवाद साधला.

ते म्हणाले की, “हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, तर ही हुशारी आहे. पोलीस किंवा न्यायालयात गोडसेने सांगितलेल्या खोट्या गोष्टींचं नाट्यरूपांतर करण्यात आलं आहे. एका बाजूला फसवणूक आणि चलाखी आहे, तर दुसऱ्या बाजूला गांधी आहेत. नाटकात गांधींची बाजू मांडल्यासारखं दाखवलं जातं, पण तो प्रयत्न प्रत्यक्षात गांधींचा विरोध करण्यासाठीच आहे.”

मात्र, या नाटकाला विरोध करताना जो हिंसाचार झाला, तो घडायला नको होता, असं त्यांचं मत आहे.

ते ठामपणे म्हणाले की, “गांधींची मांडणीही गांधींच्याच मार्गाने केली पाहिजे.”

अहमदाबादमधील निषेधाचे छायाचित्र.

फोटो स्रोत, Parthivraj Kathvadiya

अहमदाबादच्या एच.के. आर्ट्स कॉलेजचे माजी प्राध्यापक हेमंतकुमार शहा आणि अर्थशास्त्राचे प्राध्यापक आत्मन शहा गुजरातमधील विविध ठिकाणी ‘गोडसे ने गांधी को क्यूं मारा – वाचिकम’ हा कार्यक्रम सादर करतात. हा कार्यक्रम अशोककुमार पांडेय यांच्या ‘उसने गांधी को क्यों मारा’ या पुस्तकावर आधारित आहे.

अलीकडेच त्यांच्या कार्यक्रमाचा शो सुरतमध्ये रद्द करावा लागला. मात्र दुसऱ्या बाजूला ‘हुं नथुराम’ हे नाटक सादर केलं जात आहे.

हेमंतकुमार शहा म्हणाले की, “गोडसेबाबत बोलायचं झालं तर सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की, त्याने गांधीजींना का मारलं? तो हिंदूराष्ट्राच्या विचारधारेचा होता, त्याला अखंड भारत हवा होता आणि गोडसेच्या मते महात्मा गांधी त्यासाठी सर्वात मोठा अडथळा होते. याच विषयावर आम्ही कार्यक्रम तयार केला आहे.”

मात्र अहमदाबादमध्ये गोडसेवरील नाटकासाठी हेमंतकुमार शहा यांनी तिकीटही घेतलं होतं. ते म्हणाले, “मला हे नाटक पाहायचं होतं. जर गोडसेच्या 52 पानांच्या न्यायालयीन निवेदनावरच हे नाटक आधारलेलं असेल, तर त्यात तथ्य असण्याची शक्यता नाही. कारण त्या निवेदनात फक्त खोट्या गोष्टी होत्या.”

हेमंतकुमार शहा म्हणाले की, “गुजरातमध्ये आतापर्यंत हिंदू विचारधारेच्या संघटनांमुळे नाटक किंवा चित्रपटांचे शो रद्द झाल्याची उदाहरणं आहेत. पण काँग्रेसमुळे अशा प्रकारचा कार्यक्रम रद्द होण्याची अनेक वर्षांतील ही कदाचित पहिलीच वेळ आहे.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC