Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, ANI
9 मिनिटांपूर्वी
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 7 मे 2025 रोजी मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले आहेत.
पहलगाममधील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
गृह मंत्रालयाच्या जनरल फायर सर्व्हिस, सिव्हिल डिफेन्स (नागरी संरक्षण ) आणि होमगार्ड अँड सिव्हिल डिफेन्स डायरेक्टरेट जनरलने 5 मे 2025 रोजी पाठवलेल्या सूचनांची प्रत बीबीसीकडे आहे. हे आदेश देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पाठवण्यात आले आहेत.
या आदेशात गृह मंत्रालयाने देशभरातील 244 सूचीबद्ध जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षणाचा सराव आणि मॉक ड्रिल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
नागरी संरक्षण कायद्यांनुसार, गृह मंत्रालयाला अशा मॉक ड्रिल आयोजित करण्यासाठी राज्यांना सूचना जारी करण्याचा अधिकार आहे.
मॉक ड्रिलमध्ये काय होईल?
मॉक ड्रिलमध्ये, आपत्कालीन परिस्थितीमध्ये लोकांची प्रतिक्रिया कशी असेल हे बघितलं जातं. यासाठी निवडक लोकांना आणि स्वयंसेवकांना प्रशिक्षण देखील दिलं जातं.
हल्ला, अपघात किंवा आग लागण्यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत आपली किती तयारी आहे, हे जाणून घेण्यासाठी सामान्यतः मॉक ड्रिल आयोजित केलं जातं.
गृहमंत्रालयाच्या पत्रानुसार, 7 मे रोजी होणारा मॉक ड्रिल शहर ते ग्रामीण भागांपर्यंत आयोजित केला जाईल.

फोटो स्रोत, ANI
या मॉक ड्रिलमध्ये अनेक प्रकारचे सराव केले जातील. यामध्ये एखादा हवाई हल्ला झाल्यास त्याची सूचना देण्याची यंत्रणा किती प्रभावी आहे हे जाणून घेण्यात येईल. तसेच नियंत्रण कक्षाच्या कामकाजाचे निरीक्षण केलं जाईल. एखादा हल्ला झालाच तर यंत्रणांनी कसं काम केलं पाहिजे याचादेखील सराव करण्यात येईल.
या काळात लोकांना त्यांच्या घरातील किंवा कार्यालयांमधील सर्व लाईट्स काही काळासाठी पूर्णपणे बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या जाऊ शकतात.
या मॉक ड्रिलमध्ये, वीज पूर्णपणे बंद पडल्यास काय उपाययोजना करता येतील हे देखील बघितलं जातं.
याशिवाय, आपत्कालीन परिस्थितीत नागरी संरक्षण विभागाचा प्रतिसाद, विशिष्ट ठिकाणाहून लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठीचं प्रशिक्षण इत्यादींचा समावेश देखील या ड्रिलमध्ये केला जातो.
आदेशानुसार, या मॉक ड्रिलमध्ये जिल्हा नियंत्रक, जिल्ह्यातील विविध अधिकारी, नागरी संरक्षण स्वयंसेवक, गृहरक्षक दल, एनसीसी, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) स्वयंसेवक, नेहरू युवा केंद्र संघटना आणि शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव
पहलगाम हल्ल्यात झालेल्या 26 जणांच्या मृत्यूनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. दरम्यान, दोन्ही देशांच्या राजकारण्यांकडून सातत्याने वेगवेगळी विधानं केली जात आहेत.
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी संध्याकाळी सांगितलं की, आमची ही जबाबदारी आहे की आम्ही देशाविरुद्ध कारवाई करणाऱ्यांना सैन्यासोबत मिळून सडेतोड उत्तर देण्यासाठी सज्ज राहू.
यासोबतच, संरक्षणमंत्र्यांनी कोणताही संकेत न देता एका कार्यक्रमात प्रेक्षकांना असेही सांगितले की, ‘तुम्हाला जे हवं आहे तेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली होईल.’

फोटो स्रोत, Getty Images
राजनाथ सिंह यांनी रविवारी संध्याकाळी दिल्लीतील सनातन संस्कृती जागरण महोत्सव कार्यक्रमात भाषण केले. यादरम्यान त्यांनी पहलगाम हल्ल्याचा किंवा पाकिस्तानचा उल्लेख केला नाही, मात्र संकेतांमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या.
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांसह अनेक राजकारणी भारताकडून लष्करी कारवाईची भीती व्यक्त करत आहेत. भारतातही अशी विधाने सातत्याने येत आहेत, ज्यात पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
गेल्या आठवड्यात पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, जर भारताने ‘पाकिस्तानमध्ये येणारं पाणी रोखलं किंवा त्याची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला, किंवा यासाठी काही बांधकाम केलं तर तर ते उद्ध्वस्त केलं जाईल.’
पाकिस्तानने काश्मीरमधील नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भागातले अनेक मदरसे रिकामे केले आहेत.
आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली?
काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सतत वाढत आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक निर्णय घेतले आहेत. सिंधू जल करार स्थगित करण्यासोबतच, भारताने पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व प्रकारच्या आयातीवर पूर्णपणे बंदी घातली आहे.
त्याच वेळी, जहाजबांधणी महासंचालनालयाने पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही असा आदेश काढला आहे.

फोटो स्रोत, ANI
परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (DGFT) 2 मे रोजी एक अधिसूचना जारी केली, ज्यामध्ये म्हटले आहे की, “पुढील आदेशापर्यंत पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आयातीवर तात्काळ बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”
भारताने उचललेल्या पावलांना पाकिस्ताननेही प्रत्युत्तर दिले आहे.
पाकिस्तानने भारताच्या मालकीच्या किंवा त्यांच्या मालकीच्या सर्व विमान कंपन्यांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. तसेच, वाघा सीमा देखील बंद करण्यात आली आहे.
पाकिस्तानने शीख यात्रेकरू वगळता सार्क व्हिसा वेव्हर प्रोग्रामअंतर्गत सर्व भारतीय नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा निलंबित केले आहेत आणि ते रद्द मानले जावेत असे म्हटले आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC