Home LATEST NEWS ताजी बातमी शोमॅन एन टी रामाराव यांची सत्ता जेव्हा सख्ख्या जावयानेच उलथवली होती

शोमॅन एन टी रामाराव यांची सत्ता जेव्हा सख्ख्या जावयानेच उलथवली होती

4
0

Source :- BBC INDIA NEWS

चंद्रबाबू नायडू आणि एन. टी. रामाराव

फोटो स्रोत, Getty Images

  • Author, रेहान फजल
  • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • 28 मे 2023

    अपडेटेड 3 तासांपूर्वी

दाक्षिणात्य सुपरस्टार आणि अत्यंत लोकप्रिय नेते म्हणून मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचलेले NTR म्हणजेच एन टी रामाराव यांचं वैयक्तिक आयुष्यही काही कमी नाट्यमय नव्हतं.

त्यांच्या भल्या पहाटे उठून भरपेट जेवण्याच्या सवयीपासून ते कुटुंब कलहाच्या बीजापर्यंत अनेक गोष्टींविषयी…

एनटीआर यांच्या काही सवयी अगदी अजब म्हणाव्या अशा होत्या. म्हणजे ते जगाच्या आधी तीन तास उठत असत. सूर्योदयापूर्वीच अगदी भरगच्च भरपेट जेवणही करत.

त्यांच्या पहिल्या पत्नीने आजन्म आपल्या पतीच्या सवयींप्रमाणे स्वतःचं घड्याळ लावून घेतलं. तीसुद्धा एनटीआर उठायच्या आधी उठायची. त्यांच्या मनाप्रमाणे सगळं तयार करून ठेवलेलं असायचं. अगदी अखेरपर्यंत ती हे सगळं करत होती. 1984 मध्ये कॅन्सरने तिचा मृत्यू झाला.

एनटीआर हा तसा एकटेपणात रमणारा माणूस. त्यांना जवळचे मित्र तसे कमीच होते. त्यांना भेटायला येणाऱ्यांमध्ये बऱ्याचदा निर्माते, दिग्दर्शक, वितरक आणि सिनेमाचे लेखक वगैरे मंडळी असायची. ज्यांच्याबरोबर त्यांचे केवळ व्यावसायिक संबंध होते.

एनटीआर यांना एकूण सात मुलं आणि चार मुली होत्या. पण त्यांच्याबरोबरही ते फार कमी वेळ घालवत असत.

बालकृष्ण या त्यांच्या मुलाने एकदा सांगितलेला किस्सा असा – ‘एकदा मी वडिलांना भेटायला त्यांच्या सिनेमाच्या सेटवर गेलो होतो. माझ्याबरोबर माझे काही मित्रही होते. तिथे सेटवर उपस्थित लोकांना बाबांनी माझा परिचय करून देताना माझा सगळ्याच धाकटा मुलगा असं सांगितलं. वर मी इंटरला असल्याचंही सांगितलं. या दोन्ही गोष्टी खऱ्या नव्हत्या. एक तर मी त्यांचा सगळ्या धाकटा मुलगा नव्हतो आणि त्या वेळी मी कॉलेजात नाही तर शाळेत शिकत होतो.’

इंदिरा गांधी यांच्यासोबत एन. टी. रामाराव

फोटो स्रोत, CLS PUBLISHERS

या मुलानेच सांगितलेल्या किश्शावरून अंदाज येईल की, एनटीआर यांना आपल्या अकरा मुलांबद्दल किती माहिती होती. कोण कुठल्या इयत्तेत शिकतंय ते जाऊ द्या, थोरला कोण धाकटा कोण याचीही ते गल्लत करत इतके ते आपल्या दुनियेत मशगुल असत.

द हिंदू या वृत्तपत्रात राजेंद्र प्रसाद यांनी लिहिलेल्या लेखात म्हटलं होतं, ‘एकदा एनटीआर आपल्या नातीच्या लग्नासाठी सिकंदराबादच्या एका कार्यालयात आले होते. हॉलमध्ये आलेल्या पत्रकारांशी ते एकटेच बसून संवाद साधत होते. त्यांच्या परिवाराचे सदस्य त्यांच्याकडे एक नजर टाकून एक शब्दही न बोलता निघून जात होते.’

लक्ष्मी पार्वती यांच्याशी वाढती जवळीक

एवढ्या मोठ्या परिवारात राहूनही तसे एकाकी जगणाऱ्या एनटीआर यांच्या आयुष्यात त्यांच्याहून अर्ध्या वयाच्या एका महिलेची एंट्री झाली. सुरुवातीला तर एक चाहती म्हणून ओळख झाली. मग तिने चरित्र लिहिण्यासाठी एनटीआर यांच्याबरोबर वेळ घालवला. त्यानंतर ती प्रेयसी झाली आणि शेवटी पत्नी. या महिलेचं नाव लक्ष्मी पार्वती.

लक्ष्मी पार्वती एनटीआर यांचा उल्लेख स्वामी असा करतात. त्या पाया पडून आपली भक्ती दर्शवत असत. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात एक साथीदार असावा ही इच्छा एनटीआर यांनी लक्ष्मी पार्वतींसमोर बोलून दाखवली.

एनटीआर यांचं चरित्र लिहिण्याचं मग एक निमित्त झालं आणि हे दोघे जवळ येत राहिले.

एनटीआर यांची दुसरी पत्नी लक्ष्मी पार्वती

फोटो स्रोत, Getty Images

एनटीआर अ बायोग्राफी या के. चंद्रहास आणि के. लक्ष्मीनारायण यांनी लिहिलेल्या पुस्तकात म्हटलं आहे, ‘लक्ष्मी पार्वती शनिवार-रविवार एनटीआर यांच्याबरोबरच राहायच्या आणि सोमवारी आपल्या घरी परत जायच्या. इतर दिवशी फोनवर बोलता यावं एनटीआर यांनी लक्ष्मी पार्वती यांच्या घरी टेलिफोनही लावून दिला होता. पुढे कित्येक वर्षांनी त्यांनी लक्ष्मी यांना जुनं टेलिफोन बिल दाखवलं होतं जे दोन लाख रुपयांचं होतं. उन्हाळ्याच्या सुट्टीत लक्ष्मी पार्वती संपूर्ण दोन महिने एनटीआर यांच्यासमवेत राहात. ‘

एनटीआर यांना पक्षाघाताचा झटका

एनटीआर आणि लक्ष्मी पार्वती यांच्या प्रेम संबंधांची चर्चा सुरू झाली तेव्हा एनटीआर यांनी कधी ते नाकारले नाहीत. लक्ष्मी यांनीदेखील संबंधांना इनकार केला नव्हता. पण एनटीआर यांच्या परिवाराला मात्र हे संबंध पसंत नव्हते.

एनटीआर अ बायोग्राफी

फोटो स्रोत, CLS PUBLISHER

लक्ष्मी पार्वती यांच्यावर एनटीआर यांचा गैरफायदा घेत असल्याचे आरोप करण्यात आले. त्यावर स्वतः एनटीआर यांनी उत्तर दिलं होतं. “आता या वयात शरीरसंबंध माझ्यासाठी महत्त्वाचे नाहीत. मला या वयात प्रेम, आपुलकी आणि साथ आवश्यक आहे. लक्ष्मी माझी केवळ साथीदार आहे.”

त्या वेळी लक्ष्मी पार्वतीसुद्धा विवाहित होत्या. आपली बायको परपुरुषाबरोबर राहते याविषयी त्यांचे पती सुब्बा राव यांचीही तक्रार होतीच. दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. ज्या दिवशी कोर्टाने लक्ष्मी पार्वती यांचा घटस्फोट मंजूर केला त्याच दिवशी एनटीआर यांना पक्षाघाताचा झटका आला.

के. चंद्रहास आणि लक्ष्मीनारायण लिहितात, “एनटीआर यांना हृदयविकार होता. तरीही ते जड जेवण भरपूर प्रमाणात घेत होते. मधुमेह होता, तरीही ते मिठाई खाणं त्यांनी सोडलं नव्हतं. आपली औषधंसुद्धा ते नियमितपणे घेत नसत. तब्येतीकडे दुर्लक्ष करूनही सत्तरीच्या वयात त्यांचा चेहरा चमकदार दिसायचा. चेहऱ्यावर सुरकुत्याही पडलेल्या नव्हत्या. एनटीआर यांच्या या आजापणात लक्ष्मीपार्वती त्यांची सुश्रुषा करत होत्या.”

लक्ष्मी पार्वती यांच्याशी विवाह

एनटीआर उपचारांसाठी अमेरिकेत गेले होते. तिथून परतल्यावर तिरुपती इथे लक्ष्मी पार्वतींशी लग्न करण्याची घोषणा त्यांनी केली.

एनटीआर हे त्यांची दुसरी पत्नी लक्ष्मी पार्वती यांच्यासोबत

फोटो स्रोत, Getty Images

त्या वेळी व्यासपीठावरून बोलताना त्यांनी आपल्याला कसं एका स्त्रीने मृत्यूच्या जबड्यातून बाहेर काढलं याचं वर्णन केलं. तिची इच्छा असेल तर मी तिच्याशी लग्नाला तयार आहे, असंही त्यांनी भाषणात सांगितलं आणि ओरडून लक्ष्मी पार्वती यांना व्यासपीठावर बोलवून घेतलं. आपल्या लाखो समर्थकांसमोर त्यांच्या साक्षीनेच लक्ष्मी यांच्या गळ्यात मंगळसूत्र घालायला ते तयार होते.

त्या वेळी कार्यक्रमात सगळ्यात पहिल्या रांगेत बसलेल्या त्यांच्या जावयाला पुढे काय होणार याचा अंदाज आला आणि त्यांनी तातडीने तिथली वीजच घालवली. परिसरात एकदम अंधार पसरला. एनटीआर यांचं भाषण संपलं आणि लोकांना समजलंच नाही नेमकं की,लक्ष्मी यांना मंगळसूत्र घातलं की नाही? एनटीआर यांच्या त्या जावयाचं नाव चंद्राबाबू नायडू.

या प्रकरणानंतर एनटीआर बरेच नाराज झाले. त्यांना मनवण्याचे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले.

चंद्रबाबू नायडू यांचं बंड

23 ऑगस्ट, 1995 रोजी एनटीआर सत्तेच्या शिखरावर होते आणि पुढच्या आठ दिवसात त्यांना पायउतार व्हावं लागलं. त्या आठ दिवसात चंद्राबाबू नावाच्या वादळाने एनटीआर यांचं पद गेलं आणि ते आठवड्याभरात माजी मुख्यमंत्री होऊन गेले.

असं म्हणतात की, लक्ष्मी पार्वती एनटीआर यांच्या आयुष्यात आल्या नसत्या तरीही चंद्राबाबू नायडूंनी एनटीआरची सत्ता उलथवून टाकण्याचे प्रयत्न केलेच असते.

एनटीआर आणि लक्ष्मी पार्वती यांच्या लंडन दौऱ्याचा फोटो

फोटो स्रोत, HARPER COLLINS

लेखक रामचंद्र मूर्ती कोंडूभाटला ‘एनटीआर अ पॉलिटिकल बायोग्राफी’ या त्यांच्या पुस्तकात म्हणतात, ‘एनटीआर कोणताच सल्ला मानण्याच्या मनस्थितीत नसायचे. त्यांची सत्ता निरंकुश होती आणि ते मनमानी करत असत. अनेकदा ते भावनिक होत असत आणि छोट्यामोठ्या गोष्टींबाबत संशय घेत असत. लक्ष्मी पार्वती यांचं त्यांना जणू वेड लागलं होतं. नायडूंनी याचा वापर करत ज्या प्रकारे एनटीआर विरोधात वातावरण निर्माण केलं ते त्यांच्या धोरणात्मक चतुराईचं उदाहरण आहे. कोणाला, कोणाच्या विरोधात आणि कधी वापरायचं हे नायडू यांना चांगलंच माहीत होतं.’

चंद्राबाबू नायडूंनी आपले मेहुणे डॉक्टर दग्गूबत्ती वेंकटेश्वर राव यांना उपमुख्यमंत्रिपदाचं आमिष दाखवून आपल्याकडे वळवून घेतलं. त्यांना खरं तर माहीत होतं की ते त्यांचा हा शब्द पूर्ण करू शकणार नाहीत.

अशा प्रकारे हरिकृष्ण आणि दग्गूबत्ती हे दोघेही एनटीआर विरोधी मोहिमेत सामील झाले.

या विरोधकांच्या निशाण्यावर लक्ष्मी पार्वती होत्या असं एनटीआर यांना वाटत होतं तोपर्यंत त्यांनी हे बंड फार गंभीरपणे घेतलं नाही. पण जेव्हा त्यांना कळलं की, खरं तर ते स्वतःच खऱ्या निशाण्यावर होते, तेव्हा वेळ निघून गेलेली होती.

एनटीआर आपला मुलगा डग्गुबती वेंकटेश्वर राव याच्यासोबत

फोटो स्रोत, CLS PUBLISHERS

कोंडुभाटला लिहितात, ‘एनटीआर खरं तर शोमॅन होते. त्यांच्याकडे लोकांना वेड लावेल असा करिश्मा होता. पण त्यांना आपल्या बहुतेक आमदारांचं नावही माहीत नसायचं. त्यांना सर्वसाधारण राजकारण्यांशी बोलणंच आवडायचं नाही. त्यांचे प्रश्न सोडवणं तर दूरची गोष्ट होती. दुसरीकडे चंद्राबाबूंनी एनटीआर यांच्या पाठीमागे आमदारांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी जंग जंग पछाडलं. नायडूंची महत्त्वाकांक्षा वेळीच समजून घेण्यास एनटीआर कमी पडले.’

एनटीआर यांचा राजीनामा

लक्ष्मी पार्वती इतरांसाठी एक सर्वसामान्य आणि स्वार्थी बाई वाटत असली तरी एनटीआर यांच्यासाठी लक्ष्मी पार्वतींचं स्थान फार खास होतं. पत्नीपेक्षाही वरचं स्थान देऊन ते लक्ष्मी यांना आपली बहुमूल्य साथीदार मानत.

एनटीआर

फोटो स्रोत, HARPER COLLINS

चंद्रबाबू नायडूंनी एनटीआर यांची समजूत काढण्यासाठी तीन सदस्यीय प्रतिनिधीमंडळ पाठवलं होतं. यात दोन मंत्री होते – अशोक गजपती राजू आणि देवेंदर गौड.

हे प्रतिनिधी मंडळ चार मागण्यांसह एनटीआरना भेटले. आठ आमदारांचं निलंबन मागे घ्यावं, लक्ष्मी पार्वती यांची पाठराखण करणाऱ्या आठ मंत्र्यांची हकालपट्टी, सरकारी आणि पक्षाच्या कारभारापासून लक्ष्मी पार्वती यांना दूर ठेवणे आणि तेलुगू देशम पार्टीच्या कार्यकारिणीची पुनर्रचना करणे असे ते ४ विषय होते.

एटीआर यांनी चारही मागण्या फेटाळून लावल्या.

वर एनटीआर त्यांना असं म्हणाले की, “लक्ष्मी पार्वतीमुळे निर्माण झाल्यात अशा तुमच्या समस्या मला तुम्ही सांगा. माझ्या पत्नीचा अशा प्रकारे अपमान मी कसा काय सहन करणार? माझ्या पत्नीवर नियंत्रण ठेवण्यास सांगण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? तुम्ही सगळे मिळूनसुद्धा माझं काही बिघडवू शकत नाही. गरज पडली तर पक्षाचं विभाजन करण्यासही मी कचरणार नाही.”

चंद्रबाबू नायडू आणि एनटी रामाराव यांचा जुना फोटो

फोटो स्रोत, CLS PUBLISHERS

एनटीआर यांच्या खरमरीत उत्तरानंतर तीनही नेते शांत राहिले आणि काहीच न बोलता तिथून निघून गेले. नायडू यांनी १७१ आमदारांना आपल्या बाजूने वळवलं होतं. ते त्यांच्यासमवेत व्हॉइसरॉय हॉटेलात एकत्र होते. तिथूनच त्यांनी राज्यपालांना फॅक्स केला आणि एनटीआर यांना विधानसभेत बहुमत राहिलेलं नाही असा दावा केला. एनटीआर यांना याचा पत्ता लागला तेव्हा त्यांनी आकाश पाताळ एक केलं.

विधानसभा विसर्जित व्हावी यासाठी त्यांनी जोरकस प्रयत्न केले पण त्यांना यश मिळालं नाही. राज्यपालांनी एनटीआर यांना ३० ऑगस्टपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत दिली. एनटीआर यांनी माजी राज्यपाल रामलाल यांचं उदाहरण पुढे करत १५ डिसेंबरपर्यंतची वेळ देण्याची मागणी केली. पण राज्यपाल कृष्णकांत यांनी त्यांची मागणी फेटाळून लावत बहुमत सिद्ध करण्यासाठी केवळ एक दिवसाचा वेळ वाढवून दिला. आता एनटीआर यांना ३१ ऑगस्टपूर्वी बहुमत सिद्ध करावं लागणार होतं.

या दरम्यान एनटीआर आजारी पडले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. राज्यपाल त्यांना बघायला रुग्णालयात गेले त्या वेळीच एनटीआर यांनी आपला राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला. त्याच दिवशी चंद्राबाबू नायडू तेलुगू देशम या विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडले गेले. त्याच्या पुढच्याच दिवशी त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

चंद्राबाबूंना भेटण्यास नकार

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर लगेच चंद्राबाबू नायडू आपली पत्नी भुवनेश्वरी आणि मुलगा लोकेश यांच्यासह एनटीआर यांच्या निवासस्थानी त्यांना भेटायला गेले.

तिघांनाही व्हिजिटर्स हॉलमध्ये तब्बल एक तास तिष्ठत ठेवण्यात आलं. एनटीआर यांनी त्यांना वर आपल्या खोलीत यायचा निरोप दिला नाही की, ते स्वतः आपल्या जावयाला भेटायला खाली आले नाहीत.

शेवटी तासाभरानंतर एनटीआर यांचे सचिव भुजंग राव यांनी नायडूंना येऊन सांगितलं की, एनटीआर अस्वस्थ आहेत आणि आत्ता भेटण्याच्या अवस्थेत नाहीत.

डावीकडून चंद्रबाबू नायडू, लक्ष्मी पार्वती, एनटीआर आणि राज्यपाल कृष्णकांत

फोटो स्रोत, CLS PUBLISHERS

चंद्राबाबूंनी भुजंग यांच्याकडेच पुष्पगुच्छ दिला आणि तिथून निघून गेले. जावई आणि सासऱ्यांमध्ये कायमचं वितुष्ट आलं होतं हे तेव्हाच स्पष्ट झालं.

चंद्रहास आणि के लक्ष्मीनारायण लिहितात, ‘एनटीआर यांच्याजवळ राजकीय सल्लागारांची कमतरता होती. त्यामुळे आमदार आपल्यापाशी जोडून ठेवण्याचा मार्ग त्यांना कुणी सुचवला नाही. या बाबतीत लक्ष्मी पार्वती चंद्राबाबू नायडूंच्या वरचढ ठरल्या. सर्वसाधारणपणे समुद्र शांत असतो त्यावेळी पुढे वाढून ठेवलेल्या वादळाची कल्पना लोकांना येत नाही. एनटीआर यांची हीच चूक झाली. बराच काळ ते उदास होऊन बसून राहिले आणि त्यांना आपली चूक उमगली तेव्हा खूप उशीर झालेला होता.’

हिंदू वृत्तपत्राचे प्रतिनिधी राजेंद्र प्रसाद लिहितात, ‘जर लक्ष्मी पार्वती गृहिणी बनून राहण्यातच समाधानी असत्या आणि त्यांना राजकीय महत्त्वाकांक्षा नसती, तर एनटीआर त्यांच्या मृत्यूपर्यंत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले असते का? आणि चंद्राबाबू नायडू यांनी त्यांच्या सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली असती का? यावर अंदाज बांधले जाऊ शकतात.’

जावयाला कधीच केलं नाही माफ

एनटीआर यांनी आपल्या पत्नीसाठी सगळं काही सोडून दिलं. आपली मुलं, मुली, नातवंडांनाही त्यांनी दूर केलं. शेवटी सत्ताही त्यांच्या हातून गेली. त्यांच्या सख्ख्या जावयाने कुटुंबीयांच्याच मदतीने एनटीआर यांना सत्तेतून पायउतार केलं.

आंध्र प्रदेश विधानसभेत डाव्या बाजूने गजपती राजू, चंद्रबाबू नायडू आणि एनटी रामाराव

फोटो स्रोत, CLS PUBLISHERS

एनटीआर यांनी याबद्दल चंद्राबाबूंना कधीच माफ केलं नाही. ७ सप्टेंबरला विधानसभेचं अधिवेशन सुरू झालं त्या वेळी एनटीआर यांना त्यांचं निवेदन वाचू दिलं गेलं नाही.

विधानसभेच्या सभापतींनी सांगितलं की, अविश्वास ठरावाचा निकाल लागल्यानंतरच एनटीआर यांना सभागृहात बोलण्याची अनुमती देण्यात येईल.

चंद्राबाबू नायडूंना तेलुगू देशमच्या १८३ आमदारांचं समर्थन होतं. एनटीआर यांनी राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जयप्रकाश नारायण, सी एस राव आणि त्यांचे काही सहकारी एनटीआरना भल्या पहाटेच भेटायला आले.

एनटीआर आपल्या नेहमीच्या उठायच्या वेळेआधीच जागे झालेले होते. त्यांनी या मंडळींना आपल्या स्टडीमध्ये बोलावून घेतलं आणि त्यांच्यात अशा गप्पा झाल्या की जणू काही झालंच नव्हतं. या भेटीच्या वेळी एनटीआर यांचे शेवटचे शब्द होते- ‘मी मुख्यमंत्री म्हणून तर जन्माला आलो नव्हतो. त्यामुळे मी मुख्यमंत्री पदावर राहो किंवा न राहो काय फरक पडतो…’

अंत्ययात्रेत गर्दीचा उच्चांक

सत्तेवरून पायउतार व्हावं लागल्यांतर चारच महिन्यांत १७ जानेवारी १९९६ रोजी हृदयविकाराचा झटका आल्याने एन टी रामाराव यांचं निधन झालं. अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव लालबहादूर शास्त्री स्टेडियममध्ये ठेवण्यात आलं.

एनटीआर

फोटो स्रोत, HARPER COLLINS

लक्ष्मी पार्वती त्यांच्या पार्थिवाच्या उशाशी एका खुर्चीवर रडत बसल्या होत्या. एनटीआर यांच्या चेहऱ्याला हात लावत त्या सतत रडत होत्या. लक्ष्मी पार्वती यांचे समर्थक आमदार त्या वेळी जवळ उपस्थित होते. एनटीआर यांचा मुलगा हरिकृष्ण तिथे पोहोचले त्या वेळी लक्ष्मी पार्वतींच्या समर्थकांवर ओरडून त्यांनी कुटुंबीयांसाठी जागा द्यायला सांगितलं.

एनटीआर यांच्या पार्थिवाजवळ फक्त लक्ष्मी पार्वती यांनाच एकट्याने थांबायची परवानगी मिळाली. कुणीतरी एनटीआर यांच्या पहिल्या पत्नीचा फोटो घेऊन आलं आणि त्यांच्या पार्थिवाच्या शेजारी तो फोटो ठेवण्यात आला. थोड्या वेळासाठी लक्ष्मी उठून टॉयलेटला जाण्यासाठी म्हणून तिथून दूर झाल्या, तेवढ्या वेळात त्या बसल्या होत्या ती खुर्ची तिथून हटवण्यात आली. शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करत त्यांची खुर्ची पुन्हा ठेवावी लाहली आणि हरिकृष्ण यांच्यासाठी वेगळी खुर्ची मागवून तीही तिथे ठेवण्यात आली.

एनटीआर यांच्या अंत्ययात्रेत लाखो लोक सहभागी झाले होते. मृत्यूसमयी सत्तेवर नसूनही एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी अंत्ययात्रेला गर्दी करण्याची ही कदाचित महात्मा गांधींनंतरची पहिलीच वेळ असावी.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा

परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. ‘गोष्ट दुनियेची’, ‘सोपी गोष्ट’ आणि ‘3 गोष्टी’ हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)

SOURCE : BBC