Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Ashish Vaishnav/SOPA Images/LightRocket via Getty Images
4 तासांपूर्वी
वाचन वेळ: 5 मिनिटे
‘पोन्नियन सेल्वन 2’ या चित्रपटातील ‘वीरा राजा वीरा’ हे गाणं ठाकर बंधूंनी संगीतबद्ध केलेल्या ‘शिवस्तुती’मधून घेतलं आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने 13 फेब्रुवारी रोजी म्हटलं आहे.
या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या एकल न्यायाधीशांच्या बेंचने दिलेला निर्णय कायम ठेवला आहे.
भारतीय शास्त्रीय गायक फय्याज वसीफुद्दीन ठाकर यांनी 2023 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती.
याचिकेत त्यांनी म्हटलं होतं की, “दिग्दर्शक मणिरत्नम यांनी बनवलेल्या ‘पोन्नियिन सेल्वन 2’ चित्रपटातील ‘वीरा राजा वीरा’ हे गाणे माझे वडील नासिर फयाजुद्दीन ठाकर आणि झहीरुद्दीन ठाकर यांनी रचलेल्या ‘शिव स्तुती’ या संगीतातून कॉपी केलं आहे.”
वसीफुद्दीन ठाकर यांनी याचिकेत म्हटलं आहे की, दोघांच्या निधनानंतर कुटुंबातील कायदेशीर वारसांमध्ये झालेल्या करारानुसार त्यांना त्या गाण्याचा कॉपीराइट मिळाला होता.
चित्रपटाच्या टीमने ‘वीरा राजा वीरा’ गाण्याच्या साऊंड रेकॉर्डिंगसाठी आपल्याला योग्य श्रेय दिले नाही, असं त्यांनी म्हटलं.
चित्रपट बनवणाऱ्या कंपन्या मद्रास टॉकीज, लायका प्रॉडक्शन आणि संगीतकार ए.आर. रहमान यांनी नुकसान भरपाई द्यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.
‘ए.आर. रहमान काय म्हणाले?’
सुनावणीदरम्यान ए.आर. रहमान यांच्या वकिलांनी वसीफुद्दीन ठाकर यांचे आरोप फेटाळले. रहमान यांच्या बाजूने सांगितलं गेलं की ‘शिव स्तुती’ हे ध्रुपद शैलीचं पारंपरिक संगीत आहे.
‘वीरा राजा वीरा’ हे गाणे पाश्चात्य संगीताच्या आधारावर तयार केले आहे आणि ते फक्त हिंदुस्तानी संगीत परंपरेपुरते मर्यादित नाही. असा त्यांचा युक्तिवाद आहे.
सार्वजनिक क्षेत्रात असलेल्या शास्त्रीय रचनांवर कोणताही व्यक्ती विशेष हक्क असल्याचा दावा करू शकत नाही, असं ए.आर. रहमान यांच्यावतीने सांगितलं गेलं.
दिल्ली उच्च न्यायालयात दोन वर्षे सुरू असलेल्या या खटल्याचा मागील वर्षी 25 एप्रिलला निर्णय जाहीर झाला होता.
निर्णय देताना न्यायाधीशांनी सांगितलं की ‘वीरा राजा वीरा’ हे गाणे ‘शिव स्तुती’च्या संगीतावर आधारित आहे आणि प्रेरित होऊन काही बदलांसह तयार करण्यात आले आहे.
फोटो स्रोत, Getty Images
न्यायाधीशांनी निर्णयात सांगितलं की, ए.आर. रहमान यांचे संगीत याचिकाकर्त्यांच्या हक्कांचे उल्लंघन करते आणि हे गाणे कुठल्याही ओटीटी आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होताना त्याची क्रेडिट स्लाइड बदलावी, असा आदेश दिला.
त्यांनी सांगितलं की, क्रेडिट स्लाइडवर हे संगीत दिवंगत उस्ताद नासिर फयाजुद्दीन ठाकर आणि झहीरुद्दीन ठाकर यांच्या ‘शिव स्तुती’वर आधारित आहे, असं लिहिलं पाहिजे.
ए.आर. रहमान यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारकडे 2 कोटी रुपये जमा करावे, जे प्रकरणाच्या अंतिम निकालावर अवलंबून असेल, असंही न्यायाधीशांनी आदेशात सांगितलं.
त्याचबरोबर ए.आर. रहमान यांनी फिर्यादी वसीफुद्दीन ठाकर यांना खटल्याचा खर्च म्हणून 2 लाख रुपये द्यावेत, असंही न्यायालयाने म्हटलं.
याविरुद्ध ए.आर. रहमान यांच्या बाजूने दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठात अपील करण्यात आले होते.
खंडपीठाने ए.आर. रहमान यांच्या विरोधात दिलेला निर्णय रद्द केला. त्यानंतर वसीफुद्दीन ठाकर यांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केलं होतं.
‘रागावर कोणचाही दावा नाही’
शुक्रवारी (13 फेब्रुवारी) सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.
सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी सांगितलं की, ए.आर. रहमान यांनी मान्य केलं आहे की, ‘वीरा राजा वीरा’ हे गाणं ठाकरवाणी संगीत परंपरेशी संबंधित आहे.
त्यांनी रहमान यांच्या वकिलाला विचारलं की, “हे गाणं सर्वात प्रथम याचिकाकर्त्यांच्या पूर्वजांनीच गायलं, असं म्हणता येईल का?”
यावेळी ए.आर. रहमान यांच्याकडून उपस्थित असलेले वरिष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी काही माहिती दिली.
ते म्हणाले की, “1991 मध्ये कुंटेचा, 2015 मध्ये उदय पावलकर, 2017 मध्ये निर्मला दवे आणि 2023 मध्ये कबीरी गरुम यांनी या संगीताचा वापर केला, तेव्हा याचिकाकर्त्याने कोणताही आक्षेप घेतला नाही.”
फोटो स्रोत, Getty Images
यावर वसीफुद्दीन ठाकर यांच्या बाजूने सांगण्यात आलं की, “आम्ही रागावर हक्क सांगत नाही. आम्ही फक्त संगीताच्या रचनेवर हक्काचा दावा करत आहोत.”
सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी हस्तक्षेप करत सांगितलं की, “हा तज्ज्ञांमधील वाद नाही. तुमचे याचिकाकर्ते हे एक व्यावसायिक संगीतकार आहेत. ते शास्त्रीय संगीताचे अनुयायी आहेत आणि त्यांना सन्मान आणि ओळख मिळण्याची अपेक्षा आहे.”
सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या एकल न्यायाधीशांनी ए.आर. रहमान यांना 2 कोटी रुपये जमा करण्याचा दिलेला आदेश कायम ठेवला.
न्यायमूर्तींनी ए.आर. रहमान यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उत्तर देण्यासाठी वेळ दिला आणि या प्रकरणाची सुनावणी 20 फेब्रुवारीपर्यंत स्थगित केली.
‘कॉपीराइट वाद का सुरू आहे?’
चित्रपट समीक्षक आणि वरिष्ठ पत्रकार आर.एस. अंधानन यांनी बीबीसी तमिळला सांगितलं होतं की, “जेव्हा इलायराजा यांनी आपल्या गाण्यांसाठी कॉपीराइट हक्काचा दावा करत खटले दाखल करणं सुरू केलं, तेव्हा अशी प्रकरणं समोर येऊ लागली.”
संगीतकार इलायराजा त्यांच्या गाण्यांचा वापर करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करत आहेत. त्यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये जारी केलेल्या एका निवेदनात याचा उल्लेखही केला होता.
इलायराजा यांनी म्हटलं होतं की, “2014 पासून माझ्या गाण्यांवर असलेली न्यायालयाची बंदी हटवली जाईल आणि याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.”
फोटो स्रोत, Getty Images
इलायराजा यांनी मागील वर्षी एप्रिलमध्ये अभिनेता अजित कुमारचा चित्रपट ‘गुड, बॅड, अगली’ मध्ये त्यांनी रचलेल्या तीन गाण्यांचा परवानगीशिवाय वापर केल्याबद्दल चित्रपटाच्या टीमला नोटीस पाठवली होती.
त्यांनी ‘ओथा रूपयम थारीन’, ‘एन जोडी मांजा कुरुवी’ आणि ‘इलामायी इधो इधो’ या गाण्यांसाठी 5 कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे.
कॉपीराइटबाबत बीबीसी तमिळशी बोलताना वकील सर्वनन म्हणाले की, “संगीतावरील हक्कांबाबत जागरूक लोक न्यायालयात जाऊन हक्कांचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे एक स्वागतार्ह पाऊल आहे.”
ते सध्या इलायराजांच्या बाजूने दाखल करण्यात आलेले कॉपीराइट खटले पाहत आहेत.
सर्वनन म्हणतात, “जेव्हा एखादा चित्रपट तयार होतो, तेव्हा त्यातील संगीत, गाणी आणि बॅकग्राउंड म्युझिकसाठी (पार्श्वसंगीत) पैसे दिले जातात. चित्रपट रिलीज झाल्यानंतर तो संपूर्ण विकला जाऊ शकतो. त्यानंतर गाण्यांसह चित्रपट प्रदर्शित केला जाऊ शकतो.”
“पण जेव्हा गाण्यांचा स्वतंत्र वापर केला जातो, तेव्हा त्याचे अधिकार फक्त संगीतकाराकडे असतात. हा त्याच्या संगीताच्या कामावरचा हक्क असतो. हे बौद्धिक संपदा अधिकारांतर्गत येते.”
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC



