Home LATEST NEWS ताजी बातमी ‘वारंवार महत्त्व सिद्ध करावं लागत असेल तर मी राहणार नाही’, वर्ल्ड कप...

‘वारंवार महत्त्व सिद्ध करावं लागत असेल तर मी राहणार नाही’, वर्ल्ड कप खेळण्याबद्दल विराटने दिलं ‘हे’ उत्तर

21
0

Source :- BBC INDIA NEWS

विराट कोहली

फोटो स्रोत, AFP via Getty Images

Published 23 मिनिटांपूर्वी

वाचन वेळ: 5 मिनिटे

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून (आरसीबी) खेळत असलेल्या विराट कोहलीनं पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात (वनडे वर्ल्ड कप) खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

अर्थात विराट म्हणाला आहे की “जिथे त्याच्या महत्त्वाबद्दल प्रश्न उपस्थित होतील, तिथे तो राहणार नाही.”

आयपीएलची फ्रँचायजी असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (आरसीबी) पॉडकास्टमध्ये विराह कोहली म्हणाला, “भारतीय संघातील माझ्या स्थानाबद्दल मी गोष्टी अधिक गुंतागुंतीच्या करू इच्छित नाही. जर मला सातत्यानं माझं महत्त्व सिद्ध करावं लागणार असेल, तर अशा वातावरणात मी राहणार नाही.”

या मुलाखतीत विराटनं स्पष्ट केलं की त्याच्या संघातील महत्त्वाबद्दल वारंवार बदलत असलेली मतं त्याला अजिबात आवडत नाहीत.

आयपीएलच्या या हंगामात विराट कोहली आरसीबीकडून खेळताना उत्तम कामगिरी करतो आहे. त्याची फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यांचं अनेकदा कौतुक झालं आहे.

वरच्या फळीत खेळणाऱ्या 37 वर्षांच्या विराट कोहलीनं आयपीएल 2026 च्या 12 सामन्यांमध्ये दमदार फलंदाजी करत 53.77 च्या सरासरीनं 484 धावा केल्या आहेत.

आयपीएलच्या या हंगामात धावांचा विचार करता विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर हेनरिक क्लासेन (508 धावा) आणि दुसऱ्या क्रमांकावर साई सुदर्शन (501 धावा) आहे.

विराटला ऑरेंज कपचा प्रबळ दावेदार मानलं जात आहे. गुणतालिकेत 16 गुणांसह आरसीबी पहिल्या क्रमांकावर आहे.

2027 वर्ल्ड कपमध्ये खेळण्याबद्दल काय म्हणाला विराट?

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली फक्त एकदिवसीय सामन्यांमध्येच खेळतो. त्यानं 2024 मध्ये टी20 आंतरराष्ट्रीय आणि 2025 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये खेळणं थांबवलं होतं.

गेल्या काही वर्षांमध्ये एकदिवसीय सामन्यांची संख्या खूपच कमी झाली आहे. त्यामुळे विराटची उपस्थितीदेखील कमी झाली आहे. अशा परिस्थितीत, पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकामध्ये विराट कोहली खेळणार की नाही, याबद्दल अंदाज बांधले जात आहेत.

2027 च्या विश्वचषकात खेळण्याचा त्याचा विचार आहे का? या प्रश्नावर विराट सकारात्मक उत्तर दिलं.

विराट म्हणाला, “मी नेहमीच तयार असतो. कारण हेच माझ्या दैनंदिन आयुष्य आहे. मी व्यायाम करतो. घरी चांगलं आरोग्यदायी अन्न खातो. हे फक्त क्रिकेट खेळण्यासाठीच नाही, तर मला याचप्रकारे जगायला आवडतं. त्यामुळे मी या स्थितीत आहे. 2027 च्या विश्वचषकात खेळण्याबद्दल वगैरे मला अनेकवेळा विचारण्यात आलं आहे.”

तो पुढे म्हणाला, “मला उत्तर माहिती आहे. म्हणजे मी माझं घर का सोडेन, माझं सामान का आवरेन आणि म्हणेन की मला माहिती नाही मला काय करायचं आहे.

निश्चितच, जर मी खेळत असेन, तर मला क्रिकेट खेळायचं आहे. मला पुढे खेळायचं आहे. भारतासाठी विश्वचषकात खेळणं ही जबरदस्त गोष्ट आहे. मात्र मी म्हटल्याप्रमाणे, महत्त्व दोन्ही बाजूंनी असलं पाहिजे.”

आयपीएलच्या या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या तीन फलंदाजांमध्ये विराट कोहलीचा समावेश आहे.

फोटो स्रोत, AFP via Getty Images

संघात असण्याची इच्छा असूनही, भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यानं विराट कोहली आणि दुसरा एकदिवसीय खेळाडू रोहित शर्मा यांच्या भवितव्याबद्दल अद्याप काहीही स्पष्टपणे सांगितलेलं नाही.

आयपीएल 2026 ची सुरुवात होण्याच्या आधीच गौतम गंभीर इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाला होता, “2027 च्या विश्वचषकाची तयारी आयपीएलनंतर सुरू होईल. आम्हाला विश्वचषकाआधी 25-30 एकदिवसीय सामने खेळायचे आहेत.”

गौतम गंभीर पुढे म्हणाला, “दक्षिण आफ्रिकेत क्रिकेट खेळणं सोपं नाही. आम्ही संघातील कॉम्बिनेशन पाहू आणि जे खेळाडू तिथल्या वातावरणात चांगली कामगिरी करू शकतात अशा खेळाडूंचा शोध घेण्याचा प्रयत्न करू. निवड समिती आणि प्रशिक्षक हे काम करतील. आयपीएल 2026 संपल्यानंतर एकदिवसीय विश्वचषक 2027 बद्दलचं आमचं चित्र स्पष्ट होईल.”

“माझा दृष्टीकोन अगदी स्पष्ट आहे. मी ज्या वातावरणात आहे, तिथे जर माझं महत्त्वं असेल आणि त्यांनाही वाटत असेल की मी काही मोलाची कामगिरी करू शकतो, तर मी तिथे राहेन.

मात्र जर मला ही जाणीव करून देण्यात आली की, मला माझं महत्त्व सिद्ध करायचं, तर मी त्या ठिकाणी राहणार नाही,” असं विराट कोहलीनं भर देत म्हणाला.

अर्थात, 14 जुलै ते 19 जुलैपर्यंत इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत विराटचा समावेश असण्याची शक्यता आहे.

‘संघाची इच्छा आहे तोपर्यंत खेळत राहणार’

विराट कोहली म्हणाला की जोपर्यंत संघाची इच्छा असेल तोपर्यंत तो खेळत राहील.

“मी माझी तयारी प्रामाणिकपणे करतो आहे. मी खेळाकडे ज्याप्रकारे पाहतो, त्यात मी खेळाबद्दल प्रामाणिक आहे. मी मान खाली घालून मेहनत करतो. जेव्हा मी खेळत असतो तेव्हा मी इतर कोणत्याही खेळाडूइतकी किंवा त्याच्यापेक्षा अधिक मेहनत करतो. मी खेळ योग्यप्रकारेच खेळतो,” असं विराट म्हणाला.

खेळाबद्दल दृष्टीकोनाबद्दल बोलताना विराट म्हणाला की तो नेहमीच कठीण परिश्रम घेण्यास तयार असतो. इतकंच काय, एक क्षेत्ररक्षक म्हणून “40 व्या षटकापर्यंत एका बाउंड्रीपासून दुसऱ्या बाउंड्रीपर्यंत पळण्यासाठी”देखील तो तयार असतो.

“मी असं करेन कारण मी त्याच दृष्टीनं तयारी करतो. मला 50 षटकं क्षेत्ररक्षण करावं लागेल यासाठी मी तयार असतो. याप्रकारे कामगिरी केल्यानंतर जर मला माझी किंमत आणि महत्त्व सिद्ध करावं लागलं, तर मग माझ्यासाठी ती जागा नाही,” असं विराट पुढे म्हणाला.

ग्राफिक्स

यावर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या न्यूझीलंडविरुद्ध 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील धावांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बनला. याबद्दल अनेकांनी कौतुक केलं.

विराट कोहलीनं दोन दशकांनंतर 2025-26 च्या सीझनमध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये पुनरागमन करण्याचा उल्लेख देखील केला. तो दिल्लीसाठी दोन सामने खेळला आणि त्यानं एक शतकदेखील केलं. याबरोबरच तो लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 16,000 धावा करणारा खेळाडूदेखील बनला.

“मी तिथे काहीही सिद्ध करायला जात नाही हे माझ्या मनात पूर्णपणे स्पष्ट होतं. मी तिथे खेळायला जाणार होतो कारण मला हा खेळ आवडतो. विजय हजारे ट्रॉफीदेखील मी याच विचारानं खेळलो होतो,” असं तो म्हणाला.

“मला वाटत होतं की इतका प्रदीर्घ काळ खेळलो आहे. अजूनही माझ्यामध्ये ती प्रेरणा आहे का? मात्र जसं मी ठरवलं की ‘मला खेळायचं आहे कारण माझं खेळावर प्रेम आहे’, तसं मला फलंदाजीत मजा येऊ लागली. मला पुन्हा लहान मुलासारखं वाटू लागलं. मला वाटलं की, मी आणि माझा खेळ यातच सगळं आहे,” असं विराट म्हणाला.

‘गोष्टी अवघड करू नका’

विराट कोहली म्हणाला की त्याला खेळण्यातून आनंद मिळतो. मात्र जिथे त्याच्या निवडीनंतर देखील प्रश्न उपस्थित केले जातात अशा वातावरणात मात्र त्याला खेळायला आवडत नाही.

“ज्या क्षणी मला ही जाणीव होते की लोक माझ्यासाठी अडचणी निर्माण करत आहे, किंवा काही म्हणत आहेते तेव्हा प्रामाणिकपणे थेट बोला नाहीतर गप्प राहा आणि मला खेळू द्या,” असं विराट म्हणाला.

“तुम्ही एखाद्या कामाच्या ठिकाणी गेलात आणि लोक म्हणाले की त्यांना तुमच्या क्षमतेवर विश्वास आहे. मग एक आठवड्यानंतर तेच लोक तुमच्या कामाबद्दल प्रश्न उपस्थित करू लागले, तर मग प्रश्न निर्माण होतो?” असं तो पुढे म्हणाला.

विराट कोहली जुलैमध्ये इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या अवे सीरिजमध्ये खेळताना दिसण्याची शक्यता आहे.

फोटो स्रोत, AFP via Getty Images

“एकतर पहिल्याच दिवशी सांगा की मी चांगला नाही किंवा माझी गरज नाही. मात्र जर तुम्ही म्हणाला असाल की मी चांगला आहे आणि तुम्ही इतर काही विचार करत नाही आहात. तर मग गप्प राहा. जर तुम्ही रिझल्टनुसार विचार बदलू लागलात, तर मग कधीच सारखा दृष्टीकोन ठेवू शकणार नाहीत.”

एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात महान फलंदाजांमध्ये विराटचा समावेश होतो. विराट कोहलीनं 311 सामन्यांमधून 58.71 च्या सरासरीनं 14,797 धावा केल्या आहेत.

त्यानं एकदिवसीय करिअरमध्ये 54 शतकं आणि 77 अर्धशतकं झळकावली आहेत. दबावाखाली असताना धावांचा पाठलाग करत जबरदस्त कामगिरी केल्यामुळे त्याला ‘चेस मास्टर’देखील म्हटलं जातं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन

SOURCE : BBC