Home LATEST NEWS ताजी बातमी ‘लॉरेन्स ऑफ पंजाब’ वेब सीरिजवरून वाद: सिद्धू मुसेवालाच्या वडिलांचा आक्षेप

‘लॉरेन्स ऑफ पंजाब’ वेब सीरिजवरून वाद: सिद्धू मुसेवालाच्या वडिलांचा आक्षेप

27
0

Source :- BBC INDIA NEWS

 'लॉरेन्स ऑफ पंजाब' वेब सीरिजचे पोस्टर

फोटो स्रोत, zee5

“पूर्वी इथं भगतसिंग यांना हिरो मानलं जायचं. आता त्याच ठिकाणी लॉरेन्स बिश्नोईला हिरो मानलं जात आहे.”

हा संवाद झी फाइव्हच्या यूट्यूब चॅनलवर प्रसारित होणाऱ्या ‘लॉरेन्स ऑफ पंजाब’ या डॉक्युमेंटरी सिरीजच्या ट्रेलरमध्ये ऐकायला मिळतो.

‘लॉरेन्स ऑफ पंजाब’ या वेब सिरीजमधील हा संवाद पंजाबबद्दलचा आहे.

‘लॉरेन्स ऑफ पंजाब’ ही सिरीज 27 एप्रिल रोजी झी फाइव्ह या ओटीटी फ्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

ही सिरीज दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्या प्रकरणात नाव आलेल्या लॉरेन्स बिश्नोईच्या आयुष्यावर आणि त्याच्या गुन्हेगारी टोळीच्या उदयावर आधारित आहे, असं ट्रेलरवरून वाटतं.

विद्यार्थी राजकारणातून गुन्हेगारी जगतात प्रवेश केलेला लॉरेन्स बिश्नोई 2015 पासून भारतात तुरुंगात आहे.

तो सध्या गुजरातमधील साबरमती कारागृहात आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, तसेच त्याच्या टोळीवर पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येचेही आरोप आहेत.

झी फाइव्ह हा भारतातील एक मोठा ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. तो झी एंटरटेनमेंट इंटरप्रायझेसच्या मालकीचा आहे.

या सिरीजचे दिग्दर्शन राघव दार यांनी केले आहे, तर निर्मिती रिव्हरलँड एंटरटेनमेंटने केली आहे.

सिरीजचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर पंजाबमधील अनेक राजकीय नेत्यांनी या सिरीजवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

बीबीसी पंजाबीने झी फाइव्हच्या प्रतिनिधींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

ट्रेलरमधील संवाद आणि गाणी

यूट्यूबवर रिलीज झालेला ‘लॉरेन्स ऑफ पंजाब’ सिरीजचा ट्रेलर 2 मिनिटे 13 सेकंदांचा आहे.

ट्रेलरच्या सुरुवातीलाच पंजाबमधील खलिस्तानी चळवळीच्या काळाबद्दल बोललं आहे. त्याकाळाबद्दल असं म्हटलं आहे की, “प्रत्येकाच्या घरात खायला अन्न आहे की नाही माहीत नाही, पण त्यांना शस्त्रं मात्र हवी आहेत.”

सिरीजमध्ये लॉरेन्स टोळीबद्दल माहिती देताना एक व्यक्ती म्हणते की, “लॉरेन्स बिश्नोई गँगची खासियत अशी आहे की, ते एखाद्या कंपनीसारखं चालवतात.”

ट्रेलरमध्ये लॉरेन्स बिश्नोई दाखवताना पार्श्वभूमीत एक गाणं वाजतं. ‘काळं आयुष्य आणि काळे व्यवहार आमचे’ असे त्याचे शब्द आहेत.

ट्रेलरच्या शेवटी माजी खासदार आणि सुफी गायक हंसराज हंस यांचा, ‘पंजाब दी फिजा उदास है’, असा संवाद आहे.

ट्रेलरमध्ये दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येची घटनाही दाखवली आहे.

राजा वारिंग यांची वेब सीरिजवर बंदी घालण्याची मागणी

पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनीही या वेब सिरीजवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यांनी झी फाइव्हचे तक्रार अधिकारी अक्षय जोशी यांना तक्रारीची प्रत पाठवली आहे.

अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, आयटी नियम 2021 चं उल्लंघन आणि सार्वजनिक शांततेला धोका आहे. त्यामुळे ‘लॉरेन्स ऑफ पंजाब’ ही वेब सिरीज तत्काळ थांबवावी किंवा त्याचं प्रसारण पुढे ढकलावं.

“प्रचार साहित्य आणि विश्वासार्ह सार्वजनिक स्रोतांनुसार ही सिरीज कथितपणे संघटित गुन्हेगारी नेटवर्कशी संबंधित कुख्यात लॉरेन्स बिश्नोईच्या जीवनावर आणि त्याच्या कृत्यांवर आधारित आहे. त्याच्यावर न्यायालयात अनेक गंभीर गुन्हेगारी प्रकरणं प्रलंबित आहेत,” असं राजा वारिंग यांनी आपल्या तक्रारीत पुढे म्हटलं आहे.

2023 मध्ये पोलीस लॉरेन्स बिश्नोईला न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जाताना.

फोटो स्रोत, Reuters

राजा वारिंग यांनी झी फाइव्हच्या वेबसाइटवर ‘लॉरेन्स ऑफ पंजाब’ सिरीजबाबत दिलेल्या माहितीबद्दलही प्रश्न उपस्थित केले आहेत.

वारिंग यांनी म्हटलं की, “या वेबसिरीजच्या वर्णनावरून ती एका गँगस्टरच्या जीवनाचं उदात्तीकरण करेल असं वाटतं. यामुळे बेकायदेशीर कृत्यांना प्रोत्साहन मिळू शकतं.”

“ही मालिका गुंडांचं उदात्तीकरण करते आणि पीडितांच्या (मुसेवाला कुटुंबासारख्या लोकांच्या) भावनांशी खेळते. त्यामुळे यावर बंदी घातली पाहिजे,” अंस वारिंग यांनी म्हटलं.

या मालिकेविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याची घोषणाही वारिंग यांनी केली आहे.

सिद्धू मुसेवालाच्या वडिलांचा विरोध

सिद्धू मुसेवालाचे वडील बलकारसिंग सिद्धू यांनी मंगळवारी (21 एप्रिल) मानसा येथे माध्यमांशी बोलताना या वेब सिरीजवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

जून 2022 मध्ये सिद्धू मुसेवालाच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्याची आई चरणकौर आणि वडील बलकारसिंग सिद्धू.

फोटो स्रोत, Getty Images

बलकारसिंग म्हणाले की, “या वेब सिरीजचं नावच चुकीचं आहे. लॉरेन्स बिश्नोई हा कोणताही राष्ट्रीय पुरस्कार विजेता किंवा हिरो नाही. जर तो हिरो असेल, तर त्याला तुरूंगात का ठेवलं आहे?”

त्यांनी सरकारवरही प्रश्न उपस्थित केला आहे. अशा प्रकारच्या डॉक्युमेंटरी बनवण्याला परवानगी कशी दिली जाते, असा सवाल त्यांनी केला आहे.

कोट कार्ड

भाजप आणि अकाली दलाचा विरोध

पंजाब भाजपचे नेते फतेहजंग बाजवा यांनी या प्रकरणी पंजाब सरकारला प्रश्न विचारले आहेत. त्यांनी म्हटलं की, तरुणांनी रोल मॉडेल म्हणून गँगस्टर निवडायचा की भगतसिंग आणि शिवराम राजगुरू यांना? सरकारने अशा वेब सिरीजवर कठोर कारवाई करून त्याचे प्रसारण थांबवावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

अकाली दलाचे प्रवक्ते अर्शदीप केलर यांनी या वेब सिरीजवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटलं की, ही सिरीज एका सुनियोजित षड्यंत्राचा भाग आहे, ज्यामुळे पंजाबची बदनामी केली जात आहे. यात पंजाबमधील तरुणांना गँगस्टर म्हणून दाखवलं जात आहे. त्यामुळे ही वेब सिरीज तत्काळ बंद करावी.

पंजाब बॉर्डर रेंजचे डीआयजी यांना लेखी तक्रार देऊन ही वेब सिरीज बनवणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली असल्याची माहिती भाजप युवा मोर्चा पंजाबचे राज्य सचिव कुलबीरसिंग आशू अंबा यांनी दिली आहे.

वेब सिरीजमध्ये सहभागी झालेल्यांची प्रतिक्रिया

‘लॉरेन्स ऑफ पंजाब’ या वेब सिरीजच्या ट्रेलरमध्ये सहभागी असलेल्या पंजाबमधील एका वृत्तवाहिनीच्या व्यवस्थापकीय संपादक नितिका माहेश्वरी यांनी बीबीसी पंजाबीला प्रतिक्रिया दिली.

“वेब सिरीजवर बंदी घालावी की नाही याबद्दल मी काहीही सांगू शकत नाही,” असं त्या म्हणाल्या.

“मला या वेब सिरीजची कथा काय आहे, याबद्दल काहीच माहिती नाही. टीमने माझ्याकडून मुलाखतीत पंजाब, गँगवॉर आणि इतर गुन्हेगारी घटनांबद्दल माहिती मागितली होती, ती मी त्यांना दिली. या वेब सिरीजमध्ये माझा सहभाग फक्त इतकाच होता.”

लॉरेन्स बिश्नोईवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

‘लॉरेन्स ऑफ पंजाब’च्या टीमने आपलीही मुलाखत घेतली होती, असं पंजाब पोलिसांचे माजी एडीजीपी आणि सध्याचे काँग्रेस नेते गुरिंदरसिंग ढिल्लोन यांनी बीबीसी पंजाबीला सांगितलं

ते म्हणाले की, “मी ट्रेलरमध्ये नाही आणि सिरीजमध्ये असेल की नाही याचीही खात्री नाही. टीमने माझ्याशी संपर्क करून मुलाखत घेतली. पण या वेब सिरीजची कथा काय आहे, याची माहिती दिली नव्हती. माजी पोलीस अधिकारी म्हणून कॅमेऱ्यासमोर मी पंजाबमधील वाढत्या गँगस्टर आणि गुन्हेगारीबद्दल तसेच त्यावरील उपायांबाबत माहिती दिली.”

राजा वारिंग यांनी सिरीज बंद करण्याची मागणी केली आहे. त्यावर ढिल्लोन म्हणतात की अनेकदा ट्रेलर आणि प्रत्यक्ष सिरीज वेगळी असते. त्यामुळे पूर्ण सिरीज पाहिल्याशिवाय ते याबद्दल काहीही मत देऊ शकत नाहीत.

बीबीसी पंजाबीने ‘लॉरेन्स ऑफ पंजाब’ सिरीजचे दिग्दर्शक राघव दार आणि रिव्हरलँड एंटरटेनमेंट यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर त्याचा बातमीमध्ये समावेश केला जाईल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC