Home LATEST NEWS ताजी बातमी ‘राज्यसभेतील आपच्या दोन-तृतीयांश खासदारांचा भाजपप्रवेश’; राघव चढ्ढांच्या घोषणेवर संजय सिंह काय म्हणाले?

‘राज्यसभेतील आपच्या दोन-तृतीयांश खासदारांचा भाजपप्रवेश’; राघव चढ्ढांच्या घोषणेवर संजय सिंह काय म्हणाले?

20
0

Source :- BBC INDIA NEWS

खासदार राघव चढ्ढा आणि संजय सिंह

फोटो स्रोत, ANI/AAM Admi Party/X

24 एप्रिल 2026, 16:18 IST

अपडेटेड 5 तासांपूर्वी

वाचन वेळ: 4 मिनिटे

राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा यांनी आम आदमी पक्ष (आप) सोडून भाजपमध्ये सहभागी होणार असल्याची घोषणा केली आहे.

राघव चढ्ढा यांनी संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली.

ते म्हणाले, “आम्ही ठरवलं आहे, राज्यसभेतील आपचे दोन-तृतीयांश खासदार घटनेतील तरतुदींनुसार आता भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.”

या महिन्याच्या सुरुवातीला आपने राज्यसभेतील उपनेतेपदाची जबाबदारी राघव चढ्ढा यांच्याऐवजी अशोककुमार मित्तल यांच्याकडे दिली होती.

राघव चढ्ढा यांनी आम आदमी पक्षाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला.

ते म्हणाले की, मी नेहमीच जनतेच्या प्रश्नांवर बोलत आलो आहे. त्यामुळे पक्षाचं नेमकं काय नुकसान झालं असेल?

राघव चढ्ढा यांनी आणखी काय म्हटलं?

राघव चढ्ढा म्हणाले, “ज्या आम आदमी पक्षाला मी मोठ्या कष्टाने उभं केलं आणि माझ्या तारुण्यातील 15 वर्षे दिली, तो पक्ष आता त्याच्या मूळ तत्त्वांपासून आणि मूल्यांपासून दूर गेला आहे. आता हा पक्ष देशाच्या हितासाठी नाही, तर स्वतःच्या स्वार्थासाठी काम करत आहे.”

आपने राघव चढ्ढा यांची राज्यसभेतील पक्षाच्या उपनेतेपदावरून हकालपट्टी केली होती.

फोटो स्रोत, Getty Images

“तुमच्यापैकी अनेक लोक मला गेल्या काही वर्षांपासून सातत्याने सांगत होते आणि मलाही जाणवत होतं की, मी योग्य माणूस आहे, परंतु चुकीच्या पक्षात आहे.”

“मी पुन्हा सांगतो, ‘मी योग्य माणूस आहे, परंतु चुकीच्या पक्षात आहे,’ त्यामुळे आज मी आम आदमी पक्षापासून स्वतःला वेगळं करत असून थेट लोकांकडे जात आहे,” असंही ते म्हणाले.

‘ऑपरेशन लोटस’ सुरू असल्याचा आपचा दावा

आम आदमी पक्षाचे राज्यसभेतील नेते संजय सिंह यांनी शुक्रवारी (24 एप्रिल) दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेतली. त्यांनी राघव चढ्ढा यांच्यासह पक्षाच्या 7 खासदारांच्या भाजप प्रवेशाला ‘ऑपरेशन लोटस’ असं नाव दिलं.

संजय सिंह म्हणाले, “आपने राघव चढ्ढा यांना आमदार-खासदार बनवलं, त्यांना सर्व काही दिलं. पण त्यांनी पक्षाशी विश्वासघात केला. त्यामुळे पंजाबमधील लोक त्यांना कधीही माफ करणार नाहीत.”

आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह

फोटो स्रोत, AAM Admi Party/X

ते पुढे म्हणाले, “राघव चढ्ढा, अशोक मित्तल, राजेंद्र गुप्ता, विक्रमजीत सिंग साहनी, स्वाती मालीवाल आणि हरभजन सिंग यांना आम आदमी पक्षाने आणि जनतेने सामान्य स्तरावरून संसदेत पोहोचवलं. पण या सातही जणांनी पंजाबच्या लोकांचा विश्वासघात केला आणि भगवंत मान यांच्या सरकारलाही धोका दिला आहे.”

“भगवंत मान यांचं सरकार चांगलं काम करत असल्यामुळे ऑपरेशन लोटस’ खेळलं जात आहे. यासाठी ईडी आणि सीबीआयचा वापर केला जात आहे. अशोक मित्तल यांच्या घरी 2-3 दिवसांपूर्वी ईडीचा छापा टाकण्यात आला, दबाव टाकून त्यांना तोडलं,” असा आरोप सिंह यांनी केला.

ते जोर देऊन म्हणाले, “हे ‘ऑपरेशन लोटस’ आहे आणि ते अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पंजाबच्या लोकांना फसवण्यासाठी सुरू करण्यात आलं आहे.”

एकेकाळचे केजरीवाल यांचे विश्वासू रणनीतीकार

2013 मध्ये जेव्हा अण्णा हजारे यांचं इंडिया अगेन्स्ट करप्शन हे आंदोलन शेवटच्या टप्प्यात होतं, तेव्हा राघव चढ्ढा यांची अरविंद केजरीवाल यांच्याशी ओळख झाली होती.

व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट असलेले राघव चढ्ढा त्यावेळी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेऊन भारतात परतले होते.

डेली ओच्या वृत्तानुसार, राघव चढ्ढा यांचं पक्षातील पहिलं काम हे दिल्ली जनलोकपाल विधेयकाचा मसुदा तयार करणारे वकील राहुल मेहरा यांना सहाय्य करण्याचं होतं. ही जबाबदारी त्यांना अरविंद केजरीवाल यांनी दिली होती.

राघव चढ्ढा हे पक्षाचे सर्वात तरुण प्रवक्ते बनले आणि अल्पावधीतच ते टेलिव्हिजनवर आम आदमी पक्षाचा प्रमुख चेहरा बनले होते.

राघव चढ्ढा आणि अरविंद केजरीवाल

फोटो स्रोत, Kabir Jhangiani/NurPhoto via Getty Images

आम आदमी पक्षाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीप्रमाणे, राघव चढ्ढा हे 2013 मध्ये पक्षाचा जाहीरनामा तयार करणाऱ्या टीमचे सदस्य होते. काही काळासाठी ते पक्षाचे कोषाध्यक्षही होते.

एक दशकापूर्वी अरविंद केजरीवाल यांच्या टीममध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी झालेले राघव चढ्ढा आता त्यांच्या सर्वात विश्वासू रणनीतीकारांमध्ये गणले जात.

2019 मध्ये राघव चढ्ढा यांनी दक्षिण दिल्लीच्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण त्यांना अपयश आले होते. त्यानंतर 2020 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी दिल्लीच्या राजेंद्र नगर मतदारसंघातून विजय मिळवला होता.

राघव चढ्ढा

फोटो स्रोत, ANI

मार्च 2022 मध्ये राघव चढ्ढा आणि 4 इतर जणांना आम आदमी पक्षाने पंजाबकडून राज्यसभेसाठी उमेदवारी दिली होती. त्या वेळी राघव चढ्ढा अवघ्या 33 वर्षांचे होते आणि ते सर्वात तरुण खासदार झाले होते.

2022 मध्ये पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या मोठ्या विजयामध्ये राघव यांची महत्त्वाची भूमिका होती, असं म्हटलं गेलं. पंजाबमधील यश पाहून पक्षाने 2022 च्या अखेरीस त्यांना गुजरात विधानसभा निवडणुकीची जबाबदारी दिली आणि त्यांना सह-प्रभारी बनवले होते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC