Home LATEST NEWS ताजी बातमी रमजान: रोजा सोडताना खजूरच का खातात? श्रद्धेसोबतच दडलंय आरोग्याचं मोठं गुपित

रमजान: रोजा सोडताना खजूरच का खातात? श्रद्धेसोबतच दडलंय आरोग्याचं मोठं गुपित

9
0

Source :- BBC INDIA NEWS

खजूर खाणारी महिला

फोटो स्रोत, AFP via Getty Images

जगभरातील कोट्यवधी मुस्लीम रमजानच्या महिन्यात एक खास गोष्ट पाळतात ती म्हणजे सूर्यास्तानंतर खजूर खाऊन आपला रोजा म्हणजे उपवास सोडतात.

महिनाभर चालणाऱ्या रमजानमध्ये पहाटेपासून संध्याकाळपर्यंत काहीही न खाता-पिता राहून आत्मचिंतन केले जाते. इस्लाममधील पाच महत्त्वाच्या नियमांपैकी हा एक मुख्य नियम आहे.

उपवास सोडताना खजूर खाण्याची पद्धत स्वतः पैगंबर मोहम्मद यांनी सुरू केली होती आणि इस्लामचा पवित्र ग्रंथ असलेल्या ‘कुराण’मध्येही याचे अनेक संदर्भ मिळतात.

पण खजूर खाण्यामागे फक्त श्रद्धाच नाही, तर आरोग्याचे मोठे गुपितही दडलेले आहे. दिवसभर उपाशी राहिल्यानंतर शरीराला लगेच ताकद देण्यासाठी खजूर हे जगातील सर्वात उत्तम फळ मानले जाते.

खजूरमध्ये असं काय खास आहे?

दिवसभर उपवास केल्यानंतर खजूर खाणं हे शरीरासाठी एकदम ‘परफेक्ट’ आहे. ब्रिटनमधील प्रसिद्ध आहार तज्ज्ञ शहनाझ बशीर, ज्या स्वतः रोजा पाळतात, त्या सांगतात की, “जेव्हा आपण उपवास सोडतो, तेव्हा आपल्या शरीराला सगळ्यात आधी ‘ग्लुकोज’ची गरज असते, कारण त्यातूनच आपल्याला ताकद मिळते.”

इतर कोणत्याही पदार्थाच्या तुलनेत खजूरमधील नैसर्गिक साखर आपल्या रक्तातील शुगर लेव्हल लगेच वाढवते. बाकी पदार्थ पचायला आणि त्यातून ऊर्जा मिळायला वेळ लागतो.

शहनाझ यांच्या मते, खजुराचं खरं गुपित हेच आहे की, यात साध्या साखरेसोबतच शरीराला आवश्यक असलेले ‘कार्बोहायड्रेट्स’ सुद्धा भरपूर प्रमाणात असतात.

याचाच अर्थ असा की, खजूर खाल्ल्यामुळे शरीराला दिवसभर पुरेल इतकी ताकद हळूहळू मिळत राहते. जे लोक बराच वेळ उपाशी राहतात, त्यांच्यासाठी तर हे फळ म्हणजे एक वरदानच आहे.

फक्त एवढंच नाही, तर खजूरमध्ये व्हिटॅमिन B6, A आणि K सोबतच भरपूर प्रमाणात आयर्नदेखील असतं. यामुळे अगदी कमी वेळात आपल्या शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक घटक मिळतात आणि थकवा दूर होतो.

डिहायड्रेशनपासून बचाव : खजुराची किमया

खजूर सुकामेवा असला, तरी तो शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यास मोठी मदत करतो. यात नैसर्गिकरीत्या ‘पोटॅशियम’ असते, जे शरीरात इलेक्ट्रोलाईटसारखे काम करते आणि पाणी पेशींपर्यंत पोहोचवण्यास मदत करते.

आहार तज्ज्ञ बशीर सांगतात, “अनेकजण उपवास सोडताना खजूर आणि पाणी एकत्र घेतात. ऊर्जा मिळवण्यासाठी आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण भरून काढण्यासाठी हे एक उत्तम कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे मग बाहेरून वेगळे इलेक्ट्रोलाईट घेण्याची गरजच उरत नाही.”

आहारतज्ञ बशीर

फोटो स्रोत, Shehnaz Bashir

बऱ्याच जणांना वाटतं की रमजानमध्ये वजन कमी होईल, पण जर इफ्तारमध्ये भरपेट खाल्लं, तर वजन उलट वाढू शकतं. म्हणूनच एक जुनी आणि आरोग्यदायी परंपरा पाळली जाते ती म्हणजे विषम संख्येत जसे की 1, 3 किंवा 5 खजूर खाणे आणि लगेच नमाज पठण करणे.

यामुळे होतं असं की, जेव्हा आपण नमाज पठण करत असतो, तेव्हा आपलं शरीर खजुरातील फायबर पचवायला सुरुवात करतं.

आहार तज्ज्ञ बशीर सांगतात, “खजूर खाल्ल्यामुळे शरीराला एक सिग्नल मिळतो की अन्न पोटात गेलंय आणि पचन सुरू झालंय.” यामुळे नमाजनंतर जेव्हा आपण जेवायला बसतो, तेव्हा उगाचच जास्त खाण्याची इच्छा होत नाही आणि आपलं वजनही नियंत्रणात राहतं.

पोटाच्या तक्रारी? खजूर आहे ना

रोजा ठेवताना बऱ्याचदा अनेकांना बद्धकोष्ठता किंवा पोट फुगल्यासारखं वाटतं. कारण दिवसभर पोट रिकामं असल्यामुळे आपल्या आतड्यांची हालचाल मंदावते.

पण खजूरमध्ये ‘फायबर’ भरपूर असतं, जे तुमचं पोट साफ ठेवण्यास मोठी मदत करतं. तज्ज्ञांच्या मते, निरोगी राहण्यासाठी रोजच्या आहारात 30 ग्राम फायबर असणं गरजेचं आहे.

आहार तज्ज्ञ बशीर सांगतात, “रमजानमध्ये कधीकधी आपल्याला तेलकट किंवा गोड खाण्याची खूप इच्छा होते. पण जर आपण जेवणाचं आधीच नियोजन केलं, तर आपल्या शरीराला पुरतं फायबर मिळेल याची खात्री करता येते.”

तसं पाहिलं तर, खजूर फक्त उपवासापुरते मर्यादित न ठेवता आपण सर्वांनीच ते रोज खायला हवेत. अगदी दिवसाची सुरुवात चहा-बिस्किटांऐवजी 2 ते 3 खजुरांनी करून पाहा. फायदे नक्कीच होतील.

तुम्हाला खजूर आवडत नसतील तर?

धार्मिक कारणांव्यतिरिक्त, आरोग्याच्या कारणांमुळेही अधूनमधून उपवास करणे लोकप्रिय होत आहे.

बशीर म्हणतात, “हे जवळजवळ रमजानमध्ये आपण ज्या पद्धतीने उपवास करतो त्यासारखेच आहे.”

जर तुम्हाला खजूर आवडत नसतील, तर त्याचे शेकडो प्रकार आहेत – काही चघळण्यास कठीण असतात, काही खूप मऊ असतात, काही जाड असतात आणि काही पातळ असतात.

खजूर हा फायबरचा उत्तम आणि नैसर्गिक स्रोत

फोटो स्रोत, Getty Images

बशीर सल्ला देतात, “वेगवेगळ्या प्रकारांचा प्रयत्न करा.”

आणि जर तुम्हाला तरीही त्या आवडत नसतील, तर त्या स्मूदीमध्ये वापरून पहा.

त्या म्हणतात, “खजूर आणि दूध एकत्र मिसळा, थोडे दही आणि काजू घाला, मिसळा आणि अशा प्रकारे प्या.”

“ते खरोखरच एक उत्तम अन्न आहे जे अनेक महत्त्वाच्या गरजा पूर्ण करते.”

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC