Source :- BBC INDIA NEWS

मोदी उद्घाटन करणार, त्याच्या 1 दिवस आधीच रिफायनरीला लागली भीषण आग
3 तासांपूर्वी
राजस्थानमधल्या एका नवीन तेल रिफायरीला 20 एप्रिलला भीषण आग लागली. बालोतरा जिल्ह्यातील पचपदरा या रिफायनरीचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते 21 एप्रिलला उद्घाटन होणार होतं.
सोमवारी रिफायनरीच्या Crude Distillation Unit (CDU) मध्ये आग लागताच भयंकर धूर निघताना दिसत होता. घटनास्थळी तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आणि अनेक तास आग नियंत्रित करण्याचं काम सुरूच होतं.
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या उपस्थितीत मोदी या भारतातल्या पहिल्या ग्रीनफील्ड एकत्रिकृत रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल कॉम्पलेक्सचं उद्घाटन करणार होते. सरकारच्या माहितीनुसार या प्रकल्पात 79 हजार 450 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.
या आगीच्या घटनेत कुणालाही इजा झाली नाही आणि घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे, असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने सांगितलं.
हा उद्घाटनाचा कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला आहे, असंही सांगण्यात आलं.
HPCL राजस्थान रिफायनरी लिमिटेड कंपनीची ही रिफायनरी आहे. ही कंपनी हिंदुस्तान पेट्रोलियम आणि राजस्थान सरकारची संयुक्त कंपनी आहे. त्यात राजस्थान सरकारची 26 टक्के भागीदारी आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC



