Home LATEST NEWS ताजी बातमी भोंदूबाबांच्या जाळ्यात महिला कशा अडकतात; ‘बाई आता तरी तू शहाणी हो’ –...

भोंदूबाबांच्या जाळ्यात महिला कशा अडकतात; ‘बाई आता तरी तू शहाणी हो’ – ब्लॉग

4
0

Source :- BBC INDIA NEWS

अशोक खरात

(या बातमीतील काही तपशील विचलित करू शकतात)

आसाराम बापू मुलींच्या लैंगिक गुन्ह्यात शिक्षा भोगत आहे. राम रहीम, नित्यानंद, नारायण साई अशी अनेक नावे आहेत.

महाराष्ट्राचा विचार केल्यास आयटी इंजिनिअरची फसवणूक करणारा दीपक डोळस, स्त्रीची योनीपूजा करणारा वाघमारे बाबा, नुकताच उघडकीस आलेला पुण्यातील वैद्य बाबा प्रकरण, असे असंख्य प्रकरणं अवती भवती उघडकीस आलेत.

या भोंदूची शोषण मूलक कामगिरी-भोंदूगिरी सर्वात मोठी, सर्वच अंगाने ‘बहरली’ आहे.

पैसा-संपत्ती-फसवणूक, iगैरव्यवहार, शोषण यासाठी बाबाने अपार कष्ट (?) घेतले. देवाच्या-धर्माच्या-दैवीशक्तीच्या नावाखाली या भोंदूबाबाने शेकडो स्त्रियांचं लैंगिक शोषण केलं.

या शोषणाचे अनेक व्हीडिओ समाज माध्यमात फिरत आहेत. समाजमाध्यमांवरील प्रतिक्रिया पाहिल्या तर अनेक जण या महिलांनाच जबाबदार ठरवत आहेत.

या पार्श्वभूमीवर या शोषणाला त्या महिला स्वतः कारणीभूत आहेत का? यात समाजाची काहीच भूमिका नसते का? पुरुषांचे लैंगिक शोषण झाल्यास तेथे पुरुष कारणीभूत असतात का? तेव्हा अशा चर्चा होतात का? शोषकाबद्दल सहानभूती बाळगत टीका मात्र स्त्रियांवरच का? खरात किंवा अन्य बाबांना मंत्री, आमदार, खासदार प्रतिष्ठा मिळवून का देतात? या लेखातून समजून घेऊयात.

भोंदूगिरीपेक्षा महिलांवरच चर्चा केंद्रित का?

खरात प्रकरणात ज्या स्त्रियांचे शोषण झाले या सर्व स्त्रिया मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग किंवा उच्चभ्रू कुटुंबातील होत्या, असं चित्र समोर आलं. सर्वच स्त्रियांच्या संबंधाने चर्चा सुरू झाल्या. चर्चांचा सूर हा एकांगी होता व आहे.

“या स्त्रिया स्वतःहून बाबाकडे गेल्या. शोषणाला त्या महिला स्वतः कारणीभूत आहेत. त्यांच्या संमतीनेच अशोक खरात लैंगिक संबंध ठेवत होता. या स्त्रियाच दोषी आहेत,” असे आरोप करण्यात आले.

मात्र, खरातच्या भोंदूगिरीच्या चर्चेपेक्षा स्त्रीसंबंधाचीच चर्चा जास्त रंगलेल्या दिसत आहेत.

स्त्रीवर अगदी बालपणापासून कुटुंबातून संस्कारच असे होतात की, नवऱ्याचं, मुलाचं व्यावसायिक यश, आरोग्य, लग्न, त्याचं कल्याण हे जणू स्त्रीवरच पूर्णपणे अवलंबून असतं. त्यासाठी तिने देव-धर्म-कर्मकांड-उपास-तापास-बाबा-बुवा-माता या कोणत्याही मार्गाने ते मिळवण्याची जणू सक्तीच असते.

अशोक खरात

फोटो स्रोत, UGC

एखाद्या कुटुंबातील मुलगी मोठी होत असताना तिच्या घरातील वातावरण पाहते. घराच्या भरभराटीसाठी आपली आई विविध व्रतवैकल्ये आणि पूजा करताना ती पाहते. तेच संस्कार घेऊन त्याला प्रथा-परंपरेचे लेबल लावून अगदी विज्ञान शाखेत पी.एच.डी. मिळवलेली मुलगीही ही व्रत वैकल्ये करते.

निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती या विज्ञानाच्या कसोट्या त्या वेळी ती पूर्णपणे विसरते. चिकित्सेला दुर्लक्षित करते. विज्ञानाच्या पदव्या केवळ पोटार्थी शिक्षण म्हणून आहेत का?

‘समाजानेच तिला डोहात लोटलं’

कुटुंबाचं भलं व्हावं, अपत्यप्राप्ती त्यात मुलगाच हवा यासाठी अनेकदा कुटुंबातून, नातेवाईकांकडून आणि समाजाकडून खूप मोठा दबावही असतो. त्या दबावातून अनेकदा स्त्रिया भोंदूबाबा-बुवा यांच्या शोषणाला बळी पडतात. यासाठी कधी-कधी त्या मृत्यूचाही धोका पत्करतात.

अनेक वर्षांपूर्वीची ही घटना आहे.

उषा बाजीराव रेपाळे यांची. बाजीरावाच्या पहिल्या 2 पत्नींना मुलबाळ झालं नाही म्हणून त्याने उषाशी रीतसर लग्न केलं. उषालाही मुलबाळ होत नाही असं लक्षात आल्यावर उषा आगतीकतेपोटी पारनेर तालुक्यातील मौलचौंडवीच्या डोहात अंघोळीसाठी गेली.

या प्रकरणाचा संदर्भ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोलकर यांनी देखील दिला आहे.

हिरवी साडी-हिरव्या बांगड्या घालून डोहात उतरण्यापूर्वी ती म्हणाली, “मी सातव्या दिवशी डोहातून बाहेर येईल.”

उषा खोल अति भयंकर डोहात अंघोळीसाठी उतरली. ती दुसऱ्या दिवशी फुगून (प्रेत) वरती आले.

डोहाच्या परिसरात वाद्य वाजत होते. यात्रा भरली होती. उषाचा जयजयकार सुरू होता. अंनिसचे कार्यकर्ते तिथे गेले. पोलिसात तक्रार केली. पोलीस निष्क्रिय, तर जमलेले लोक उषा सातव्या दिवशी पुन्हा जिवंत होईल असं म्हणत होते.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

शेवटी कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्याने उषाचं प्रेत बाहेर काढलं गेलं. केवळ अपत्य प्राप्तीसाठी कुटुंब व समाजाच्या दबावापोटी उषाने मृत्यूस जवळ केलं. उषाला जीवाची भीती वाटली नसेल का? या डोहात आपला अंत होऊ शकतो हे तिला समजलं नसेल का? परंतु इथे अगतिकता, दबाव, अंधश्रद्धा या बाबी सरस ठरल्या. समाजानेच तिला डोहात लोटलं.

अनेकदा तरूण मुलींचे विवाह जुळत नाहीत. म्हणून आई-वडील बुवा-बाबांकडे नेतात. भोंदू त्यांना कधी पवित्र संगमावर अंघोळ तर कधी मंत्र-तंत्र पूजा विधी या बहाण्याने एकटं गाठतात, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करतात.

यात काही चुणचुणीत मुली प्रतिकार करतात, आवाज उठवतात. आजच्या काळात जीवघेणी स्पर्धा-शिक्षण, नोकरी, बढती या चक्रात मुली स्त्रिया देखील अडकतात. कुटुंब, संस्कार, समाज, रूढी, अन्य लोकांचं अनुकरण यातून अगदी विशी-पंचविशीच्या मुली ते मध्यमवयीन स्त्रियाही अशा भोंदूच्या दरबारात हजेरी लावतात.

बुवा-बाबांच्या दरबारात स्त्रियांसह पुरुषांचेही शोषण

भोंदू दरबारात अनेक स्त्रियांचं आर्थिक शोषणासोबत लैंगिक शोषणही होतं. बुवा-बाबांच्या दरबारात व्यापार-नोकरी-पैसा-बढती-भरभराट यासाठी पुरुषही जातात. पुरुषांचंही आर्थिक शोषण होतं. काहीवेळा लैंगिक शोषणही होतं.

पुण्यातील तामदार या तरुण (वय वर्षे 29) भोंदूकडे अनेक तरुणांची रांग लागत होती. पुणे परिसरातील हजारो लोक (मुख्यतः पुरुष) त्याचे भक्त होते. तो छुप्या अॅपद्वारे भक्तांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन वर्तमान-भविष्य सांगत असे.

शेकडो पुरुषांचं तिथं लैंगिक शोषण झालं. हे तरुण स्वच्छेने जात होते का? या लैंगिक शोषणाच्या क्रियेत ते स्वच्छेने सामील होत होते का? पुरुषांच्या बाबतीत मात्र फारशा चर्चा घडत नाहीत.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

स्त्रियांवर झालेले पारंपारिक संस्कार, मनुस्मृतीचा पगडा, ‘बालपणा मंधी बापाचे नाव | लगीन झाल्यावर पती हा देव | म्हातारपणी मुलाला भ्यावं | या विचारधारेचा पगडा. यातूनच घरातील पुरुषाचं ऐकलंच पाहिजे, त्याचे हित जोपासलेच पाहिजे या भावनेतूनच स्त्री बुवा बाबांकडे जायला प्रवृत्त होते.

हल्ली स्त्रिया हॉटेलिंग, सहली, सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त बाहेर पडायला लागल्या आहेत. पूर्वी स्त्रियांना बाहेर पडणं, बोलणं, समाजात मिसळण्यास मर्यादा होत्या. परंतु धार्मिक कार्यक्रम, धार्मिकतेच्या नावाखाली भोंदूच्या दरबारात जाण्याला कुणाचाही आक्षेप नव्हता व नाही. त्यातूनही स्त्रिया या तथाकथित धार्मिकतेकडे खेचल्या गेल्या.

शोषकाबद्दल सहानभूती बाळगत टीका मात्र स्त्रियांवरच का?

कधी त्या मुलगा व्हावा म्हणून भावनगरच्या पार्वती अम्माकडे जातात, कधी नवऱ्याची दारू सोडवण्यासाठी वाघमारे बाबाकडे जावून योनी पूजा करत लैंगिक शोषणाला बळी पडतात. तर कधी नवऱ्याची बदली, प्रमोशन, आर्थिक भरभराट, अपत्य प्राप्ती या-ना त्या कारणासाठी खरात बाबा सारख्या भोंदूकडे जातात.

कधी नवऱ्या समवेत तर कधी एकट्या. तिथे झालेले-केले गेलेले लैंगिक शोषणही पवित्र कृती मानली जाते. स्त्रीचं शोषण झालं तरीही शोषकाबद्दल सहानभूती बाळगत टीका मात्र स्त्रियांवर होते.

“स्त्रिया शिकल्या तर स्त्रिया अश्लील पत्र लिहितील, अक्षराच्या आकाराच्या अळ्या त्यांच्या नवऱ्याच्या ताटात पडतील, अधर्म होईल,” असे म्हणत सनातन्यांनी स्त्री शिक्षणाला विरोध केल्याचा इतिहास आहे.

त्यानंतरच्या कालखंडात प्रतिकूल परिस्थितीत वैद्यकीय शिक्षण घेऊन आनंदीबाई जोशी पहिल्या महिला डॉक्टर झाल्या. स्वतःचा झालेला बालविवाह धाडसाने नाकारून रखमाबाई राऊत यांनी शिक्षण घेत डॉक्टर झाल्या आणि वैद्यकीय व्यवसाय सुरू करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर बनल्या.

पहिल्या महिला वकील कॉर्नोलीआ सोराबजी, संशोधन क्षेत्रात काम करत पी.एच.डी. मिळवणाऱ्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ कमलाताई सोहनी या सर्वच स्त्रीयांनी प्रखर विरोध पत्करून चिवटपणे, संघर्ष करत आपण सर्वांसमोर शिक्षणाचा आदर्श निर्माण केलाय.

परंतु खऱ्या अर्थाने या स्त्रियांनी आपल्याला शिक्षणाची कवाडं खुली करून देत अपार कष्ट, जिद्द, चिकाटी, ज्ञानलालसा, बुद्धिवाद वैचारिक प्रगल्भता याचा वस्तूपाठही दिला. त्यांनी खऱ्या अर्थाने पाया घातला. स्त्रियांना शिक्षण प्रवाहात आणतांनाच त्यांनी स्वाभिमान, व्यक्ती स्वातंत्र्य, स्त्री-पुरुष समानता, अंधश्रद्धामुक्त जीवन यांचेही धडे स्त्रीवर्गाला अप्रत्यक्षपणे दिले आहेत. या सर्व विदुषींचे आपण वारस आहोत.

अशोक खरात आणि रुपाली चाकणकर

इतिहासात डोकावलं तर आदिलशाहाच्या सरदाराने पुण्यावर लोखंडी नांगर फिरवला, पुणे बेचिराख केले. पुण्यात मधोमध एक लोखंडी खांब रोवला व लोकांना सांगितले की, पुण्यात जो कुणी येऊन राहिल त्याचा निर्वंश होईल. राजमाता जिजाउंनी पुढाकार घेऊन पुण्यात शेती केली. सोन्याचा नांगर फिरवला. स्वतः पुण्यात राहिल्या. कृतीतून अंधश्रद्धा नष्ट केली.

त्यानंतर पुन्हा लोक पुण्यात वास्तव्यास आले. शहाजी राजे यांचे निधन झाल्यानंतर राजमाता जिजाउंनी सती न जाता आयुष्य स्वराज्यासाठी वेचलं. राजमाता जिजाऊंसारख्या कणखर स्त्रीचा वारसा आपल्याला लाभला. अंधश्रद्धा, स्त्री-पुरुष भेदावर परखड प्रश्न विचारणाऱ्या ताराबाई शिंदेच्या आपण वारस आहोत.

बुवाबाबांकडे जाणाऱ्यांबाबत असं बोलल जातं की अज्ञान, अंधश्रद्धा, दारिद्र्य यामुळे लोक बुवा-बाबा-भगताकडे जातात. खराताच्या शोषणाला बळी पडलेल्या स्त्रीया मात्र उच्चभ्रू वर्गातल्या आहेत, शिकलेल्या आहेत.

सख्यांनो आपण केवळ बाहुल्या नाहीत. शिक्षण डिग्री केवळ लग्न जमण्याचं साधन किंवा नोकरीची हमी नाही. शिक्षण आधी स्वतःसाठी असतं. प्रत्येक ठिकाणी परिस्थितीला प्रश्न विचारा “का? कसे? असेच का?” आणि उत्तर शोधा.

पुण्यातल्या एका आय.टी. इंजिनिअर जोडप्याला एका भोंदूने 14 कोटींना फसवलं. मुंबईत एका 10 वी पास व्यक्तीने क्लासवन अधिकारी असल्याचं भासवून अनेकींशी लग्न केलं, फसवलं. 6 वर्षांपूर्वी पुण्यातील सख्या बहिणींशी लैंगिक संबंध प्रस्थापित करणारा बाबा पकडला गेला.

एवढं सर्व घडतं, वृत्तपत्रात छापून येतं, दूरदर्शन व अन्य वाहिन्यांवर बातम्या दाखवल्या जातात. अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या (अंनिस) चळवळी प्रबोधनाचे काम सातत्याने करतात. तरीही अद्याप अपेक्षित बदलापर्यंत आपण पोहचलेलो नाही.

खरात किंवा अन्य बाबांना मंत्री, आमदार, खासदार प्रतिष्ठा मिळवून का देतात?

भारतीय संविधानामध्ये हक्कांसोबत कर्तव्यही सांगितलेली आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार-प्रसार आणि अंगीकार करणे हे एक त्यातले महत्त्वाचे कर्तव्य आहे. तसेच जनतेची मालमत्ता, आरोग्य यांचे रक्षण करणे हे कल्याणकारी राज्याचे कर्तव्य राज्यघटनेने सांगितले आहे.

असं असूनही आज परिस्थिती खूप निराळी दिसते आहे. खरातसारख्या भोंदूंना राजाश्रय मिळतो. खरात किंवा अन्य बड्या बाबांना मंत्री, आमदार, खासदार यांच्याकडून प्रतिष्ठा प्राप्त करून दिली जाते. त्यांचे आर्थिक हित जोपासले जाते. संरक्षण दिलं जातं.

या भोंदूंच्या तालावर सत्ताधीश नाचत असतात. राजकारणी हातात भोंदूंचे गंडेदोरे तावीत अंगठ्या मिरवतात. हे लोक संविधानाची शपथ घेत विसंगत कृती करत असतात.

महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आहे. हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर 2 वर्षांच्या आत कायद्याच्या अंतर्गत नियमावली तयार करणे अपेक्षित होते. परंतु महाराष्ट्र अंनिसने सातत्याने पाठपुरावा करूनही अद्याप नियमावली तयार केली गेली नाही.

कायद्याच्या प्रचार-प्रसार अंमलबजावणीसाठी जे प्रयत्न होणे अपेक्षित होते ते प्रयत्नही शासन करायला धजावत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार-प्रसार व अंगीकार करण्यासाठीची भूमिका व मानसिकता निर्माण करण्याचे कामही शासकीय यंत्रणा करत नाहीच. परंतु असे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही अनेकदा विरोधाला सामोरे जावे लागते.

राज्य महिला आयोग, केंद्रीय महिला आयोग यांनाही याबाबत जाब विचारणे आवश्यक वाटते. खेदाची बाब म्हणजे अशोक खरात प्रकरण उजेडात आल्यानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनाच राजीनामा द्यावा लागला.

शेकडो नव्हे, तर हजारो महिलांचं बुवाबाजीच्या माध्यमातून शोषण होत असताना महिला आयोगांना आपली जबाबदारी निभावता येत नसेल तर? किंबहुना स्त्रियांना सजग सतर्क चिकित्सक बनवण्याचा प्रयत्नही होताना दिसत नाही.

स्त्रिया अंधश्रद्धांना बळी पडत आहेत. शोषकांचं भक्ष्य बनतात. माणूस चंद्रावर राहण्यासाठी प्रयत्नशील आहे. विज्ञानाने गरुडझेप घेतली, जग जवळ आलं. तरीही स्त्रिया अंधश्रद्धामूलक कृती करतात. त्यांना जाणीवपूर्वक अंधश्रद्धेच्या जाळ्यात ओढलं जातं, अनिष्ट रूढी, प्रथा परंपरा फलज्योतिष, अंधश्रद्धेच्या दरीत ढकललं जातं.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

‘बाई गं ! आपणच शहाणं व्हायला हवं’

SOURCE : BBC