Home LATEST NEWS ताजी बातमी फैज अहमद फैज यांच्या नज्मवरून नागपुरात देशद्रोहाचा गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

फैज अहमद फैज यांच्या नज्मवरून नागपुरात देशद्रोहाचा गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

5
0

Source :- BBC INDIA NEWS

नागपूर, फैज अहमद फैज

उर्दू भाषेतील कवी फैज अहमद फैज यांची प्रसिद्ध नज्म ‘हम देखेंगे’ गायली म्हणून नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते वीरा साथीदार यांच्या स्मृतीनिमित्त 13 मे 2025 रोजी नागपुरात आयोजित कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात फैज यांची नज्म गायल्यानं, कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

16 मे 2025 रोजी जनसंघर्ष समितीचे अध्यक्ष दत्तात्रय शिर्के यांच्या तक्रारीवरून नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवताना आयोजकांसह इतरांवर देशद्रोहाचंही कलम लावलं आहे. त्यानंतर तपास सुरुवात केलीय.

हे नेमकं काय प्रकरण आहे, जाणून घेऊया.

नेमकं प्रकरण काय?

13 मे 2025 रोजी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते वीरा साथीदार यांच्या स्मरणार्थ नागपुरात वीरा साथीदार स्मृती समन्वय समिती आणि समता कला मंचतर्फे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम विदर्भ हिंदी साहित्य संघाच्या इमारतीत आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात ‘प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह’ वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नागपुरातील जनसंघर्ष समितीचे अध्यक्ष दत्तात्रय शिर्के यांनी कार्यक्रमाच्या आयोजक पुष्पा वीरा साथीदार यांच्यासह उपस्थित कलाकारांविरोधात 16 मे रोजी सीताबर्डी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

कार्यक्रमात प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

वीरा साथीदार यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात ‘समता कला मंचा’कडून कवी फैज अहमद फैज यांची कविता सादर करून, नंतर एका कलाकाराद्वारे ‘आक्षेपार्ह वक्तव्य’ करण्यात आल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे.

शिर्के यांनी तक्रारीत सदर कवितेत ‘सब ताज उछाले जाएंगे, सब तख्त गिराये जाएंगे.. हम देखेंगे’ अशा स्वरुपाचे बोल असल्याचं नमूद केलंय आणि त्यावर आक्षेप घेतलाय.

शिर्के यांनी सदर कार्यक्रमाची चित्रफित एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर पाहिली होती, ज्यामध्ये एक पुरुष आक्षेपार्ह वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्या चित्रफितीची युट्यूब लिंकदेखील त्यांनी तक्रारीत नमूद केली आहे.

तक्रारदार काय म्हणाले?

या प्रकरणी आम्ही तक्रारदार दत्तात्रय शिर्के यांच्याशी संपर्क साधला. शिर्के म्हणाले, “13 मे रोजी आयोजित या कार्यक्रमात उपस्थित एका कलाकाराने एक कविता सादर केली. या कवितेनंतर त्यांनी एक आक्षेपार्ह विधान केलं. या कार्यक्रमाची चित्रफित मी एबीपी माझावर पाहिली. त्यानंतर युट्यूबवर जाऊन पाहिली, नंतर तक्रार नोंदवली.

“त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर आमचा आक्षेप आहे, अशा प्रकारचे विधान केले जाऊ नये, असं आमचं म्हणणं आहे. तसेच त्यांची भूमिकादेखील संशयास्पद होती, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार मी दाखल केली. सदर कार्यक्रमाची युट्यूब लिंकदेखील तक्रारीत नमूद केलेली आहे.”

समता कला मंच

फोटो स्रोत, YT/Samata Kala Manch

तसंच, तक्रारदार शिर्के पुढे म्हणाले की, “एबीपी माझा न्यूजच्या युट्यूब चॅनेलवर प्रकाशित झालेल्या चित्रफितीत एका पुरुषाने ‘जो गाने के माध्यम से ये सत्ता हिली थी उसका तख्त हिला था, उसी तरह हमारे देश मे भी ये तख्त हिलाने की जरुरत है. आज हम जिस दौर मे जी रहे है, ये दौर फासीवादी का है | ये दौर अभिव्यक्ती की आझादी छिननेवाला है. ये दौर तानाशाही का है…’ असं आक्षेपार्ह वक्तव्यही केलं.”

या प्रकरणावर आम्ही आयोजकांशी संपर्क साधून त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. प्रतिक्रिया मिळाल्यानंतर बातमीत अपडेट केलं जाईल.

पोलिसांचं म्हणणं काय?

सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर गुन्हा दाखल झाला. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

या प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलिस निरीक्षक राखी गेडाम यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, “नागपूरस्थित दत्तात्रय शिर्के यांनी 16 मे रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली. वीरा साथीदार स्मृतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे.

“त्यांनी सदर कार्यक्रमाची लिकंदेखील तक्रारीत नमूद केली आहे. अशाप्रकारचे कार्यक्रम आयोजित करून हेतुपुरस्सर जनतेची दिशाभूल करून देशाच्या सार्वभौमतेला धोका निर्माण करण्याचं बेकायदेशीर कृत्य केल्याचं तक्रारदारानं तक्रारीत नमूद केलंय.”

कार्यक्रमातील आयोजकांसह इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फोटो स्रोत, iStock

पोलीस निरीक्षक गेडाम पुढे म्हणाल्या की, “सदर फिर्यादीच्या तक्रारीवरुन कार्यक्रमाच्या आयोजक पुष्पा वीरा साथीदार यांच्यासह एक अनोळखी पुरुष आणि एका अनोळखी महिलेविरोधात संशयितांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 152, 196, 353, 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”

तसंच, “संशयितांमध्ये समितीच्या आयोजक पुष्पा वीरा साथीदार यांच्यासह एक अनोळखी पुरुष आणि एका अनोळखी महिलेचा समावेश असून पुढील तपास सुरु आहे,” असंही पोलीस निरीक्षक गेडाम यांनी सांगितलं.

कोणकोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झालाय?

भारतीय न्याय संहितेच्या कलम 152, 196, 353, 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • कलम 152 – हे कलम राजद्रोहाशी संबंधित आहे आणि ते भारताच्या सार्वभौमत्व, एकता आणि अखंडतेला धोका निर्माण करणाऱ्या कृत्यांसाठी आहे
  • कलम 196 – धर्म, जात, भाषा, जन्मस्थान, निवासस्थान आदिंच्या आधारे विविध समुहांमध्ये वितुष्ट निर्माण करणारे कृत्य करणे तसेच सद्भाव राखण्यास अडथळा निर्माण करणे, या प्रकरणी हा गुन्हा दाखल केला जातो.
  • कलम 353 – मुद्दाम एखादी अफवा किंवा विधानं ज्यामुळे समाजात तेढ निर्माण होईल, किंवा दोन गटांत वाद निर्माण होईल किंवा समाजात भीती निर्माण होईल असं विधान किंवा कृत्य करणे, सार्वजनिक शांतता भंग करणे किंवा अशाप्रकारची अफवा पसरवणे. देशातील कायदा व सुव्यवस्थेला अडथळा निर्माण होईल अशी कृत्य किंवा भाष्य करणे.

ज्यांचा स्मृतिदिन साजरा केला गेला, ते वीरा साथीदार कोण होते?

वर्धा जिल्ह्यातील जोगीनगर इथे बालपण गेलेल्या वीरा साथीदार यांचं खरं नाव विजय वैरागडे.

आडनावावरून जात कळते म्हणून त्यांनी कधीही आडनाव लावलं नाही. सामान्य लोकांचा आंदोलनाताला साथीदार म्हणून वीरा साथीदार असं नाव त्यांनी लावलं.

वीरा साथीदार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नागपुरात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, Facebook / Veera Sathidar

वीरा साथीदार यांनी ‘विद्रोही’ नावाच्या मासिकाचे संपादन केले. पत्रकार म्हणून काम करताना त्यांनी शोषित-पीडितांना न्याय देण्यासाठी मोठा संघर्ष केला होती. ‘रिपब्लिकन पँथर’ संघटनेच्या माध्यमातून ते वंचितांसाठी काम करत होते. त्यांची व्याख्यानं विशेष देशभर गाजली होती.

फैजच्या नज्मवरून इतका वाद का?

फैज अहमद फैज (1911-1984) हे उर्दू भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक होते. त्यांनी लिहिलेल्या कविता, नज्म इत्यादींनी लोकप्रियतेची शिखरं गाठली.

आपल्या रचनांमधून सत्तेला जाब विचारताना फैज बिथरत नसत. ‘हम देखेंगे’ ही त्यांनी लिहिलेली प्रसिद्ध नज्म त्यातलीच.

खरंतर 1979 साली लिहिलेल्या नज्मचे तत्कालीन संदर्भ होते पाकिस्तानच्या राजवटीशी.

पाकिस्तानचे तेव्हाचे हुकूमशहा जनरल झिया-उल-हक यांच्या विरोधात ही कविता लिहीण्यात आली होती.

मात्र, पुढे अनेकदा या नज्मवरून कायम सत्ताधारी बिथरत राहिले आणि वेगवेगळ्या संदर्भाना नज्मशी संबंधित वाद उद्भवत राहिले आहेत.

फैज अहमद फैज

फैज अहमद फैज यांचं 1984 साली निधन झालं.

त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे 1986 मध्ये पाकिस्तानातील लाहोरच्या अल-हमरा आर्ट्स काऊन्सिलच्या ऑडिटोरियममध्ये गझल गायिका इक्बाल बानो यांनी फैज यांची ‘हम देखेंगे’ ही नज्म गायली होती.

इक्बाल बानो यांच्या धारदार आवाजानं फैज यांनी नज्म अक्षरश: अजरामर केली.

अशी आहे फैज यांची संपूर्ण नज्म :

हम देखेंगे

लाज़िम है कि हम भी देखेंगे

वो दिन कि (क़यामत का) जिसका वादा है

जो लोह-ए-अज़ल (विधि के विधान) में लिखा है

जब ज़ुल्म-ओ-सितम के कोह-ए-गरां (बड़े पहाड़)

रुई की तरह उड़ जाएँगे

हम महकूमों (शासितों) के पाँव तले

ये धरती धड़-धड़ धड़केगी

और अहल-ए-हकम (सत्ताधीश) के सर ऊपर

जब बिजली कड़-कड़ कड़केगी

जब अर्ज-ए-ख़ुदा के काबे से सब बुत (मूर्ति यहां सत्ता का प्रतीक) उठवाए जाएँगे

हम अहल-ए-सफ़ा (साफ़-सुथरे लोग) मरदूद-ए-हरम (प्रवेश से वंचित लोग)

मसनद पे बिठाए जाएँगे

सब ताज उछाले जाएँगे

सब तख़्त गिराए जाएँगे

बस नाम रहेगा अल्लाह का

जो ग़ायब भी है हाज़िर भी

जो मंज़र (दृश्य) भी है नाज़िर (दर्शक) भी

उट्ठेगा अन-अल-हक़ (मैं सत्य हूं) का नारा

जो मैं भी हूँ और तुम भी हो

और राज करेगी ख़ल्क़-ए-ख़ुदा (आम जनता)

जो मैं भी हूँ और तुम भी हो

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC