Source :- BBC INDIA NEWS

33 मिनिटांपूर्वी
22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या सशस्त्र हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत असलेला सिंधू नदी करार तत्काळ स्थगित केला आहे. यानंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचं म्हणणं आहे की, पाकिस्तान भारताकडून उचलल्या गेलेल्या पावलांवर तात्काळ प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही.
बीबीसी उर्दूने दिलेल्या माहितीनुसार, एका पाकिस्तानी वृत्तवा हिनीशी बोलताना त्यांनी म्हटलं की, भारतामध्ये घडलेली घटना निंदनीय आहे आणि दहशतवादाचं समर्थन कधीही केलं जाऊ शकत नाही.
सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा करार तात्काळ स्थगित करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. यावर बोलताना पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटलंय की, भारत दीर्घकाळापासून या करारातून बाहेर पडू इच्छित होता.
पाकिस्तान भारताच्या कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्याच्या अवस्थेत 100 टक्के आहे.
पुढे त्यांनी म्हटलंय की, पहलगामच्या घटनेसाठी दुसऱ्यांना दोष देण्याऐवजी भारताने स्वत:लाच दोषी ठरवलं पाहिजे.
“पहलगामचा हल्ला भारताकडूनच करण्यात आला असेल आणि हे एक ‘खोटं अभियान’ सुरु असेल, अशीही शक्यता आहे,” असंही वक्तव्य त्यांनी केलं आहे.
ते म्हणाले की, “कुणीतरी भारताला हे विचारलं पाहिजे की जर काश्मीरमध्ये निष्पाप लोक मारले जात असतील तर तिथे अनेक दशकांपासून उपस्थित असलेले सात लाख सैनिक काय करत आहेत?”
पहलगाममध्ये झालेल्या या हल्ल्यात एकूण 26 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याच्या क्षणी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणचे अनेक पर्यटक उपस्थित होते. त्यातील 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर काहीजण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची (CCS) काल बुधवारी बैठक पार पडली.
या बैठकीत सिंधू जल करार रद्द करण्यासह पाच मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह सुरक्षा समितीचे सदस्य उपस्थित होते.
दहशतवादाविरोधात आम्ही भारतासोबतच- ऋषी सुनक
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या कट्टरतावादी हल्ल्यावर ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्ही अतिव दु:खात आहोत’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर त्यांनी लिहिलंय की, “पहलगाममध्ये झालेल्या नृशंस हल्ल्यामध्ये नवविवाहिता, लहान मुले आणि आनंद साजरा करायला आलेल्या कुटुंबीयांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आलं आहे. त्यांच्याबाबत आमच्या मनात प्रचंड दु:ख आहे.”
ऋषी सुनक यांनी म्हटलंय की, ब्रिटन तुमच्या दु:खात सामील आहे. दहशतवाद कधीही जिंकणार नाही. आम्ही भारतासोबत आहोत.
काय आहेत कॅबिनेटचे मोठे निर्णय?
1) 1960चा सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा करार तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात येईल, जोपर्यंत पाकिस्तान सीमेपलिकडच्या दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत ही स्थगिती लागू राहील.
2) अटारी बॉर्डर तात्काळ प्रभावाने बंद करण्यात येईल. ज्या नागरिकांनी वैध कागदपत्रांच्या आधारे सीमा ओलांडली आहे त्या पाकिस्तानी नागरिकांना 1 मे 2025 पर्यंत यामार्गाने भारत सोडण्याचे आदेश.
3) पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सूट योजना (SVES) या योजनेखाली भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. याआधी पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेले कोणतेही असे व्हिसा रद्द मानले जातील. सध्या सार्क व्हिसा योजनेअंतर्गत भारतात असलेल्या कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारत सोडण्यासाठी 48 तासांची मुदत देण्यात आलेली आहे.

फोटो स्रोत, X/Narendra Modi
4) नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षण/लष्करी, नौदल आणि हवाई सल्लागारांना ‘पर्सना नॉन ग्राटा’ घोषित करण्यात आलं आहे. त्यांना भारत सोडण्यासाठी एक आठवड्याची मदत देण्यात आलेली आहे. इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातून भारताच्या संरक्षण/नौदल/हवाई सल्लागारांना परत बोलावण्यात आलेलं आहे. संबंधित उच्चायोगांमधील ही पदे रद्द मानली जातात. दोन्ही उच्चायोगांमधून सेवा सल्लागारांचे पाच सहाय्यक कर्मचारी देखील काढून घेतले जातील.
5) 1 मे 2025पर्यंत आणखी कपात करून उच्चायुक्तालयात काम करणाऱ्यांची संख्या 55 वरून 30 पर्यंत कमी केली जाईल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC