Home LATEST NEWS ताजी बातमी पत्नी बेपत्ता झाल्याची पतीकडून तक्रार दाखल, मग तिचा मृतदेह वेडिंग ड्रेसच्या बॅगेत...

पत्नी बेपत्ता झाल्याची पतीकडून तक्रार दाखल, मग तिचा मृतदेह वेडिंग ड्रेसच्या बॅगेत सापडला

9
0

Source :- BBC INDIA NEWS

कर्स्टीचा मृतदेह सापडण्याच्या एक आठवडा आधी तिचा पती पॉल ग्रॅबहम यांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती

फोटो स्रोत, Family of Kirsty Wilkinson

(इशारा: या लेखात मानवी अवशेष आणि मृत्यूचं विचलित करणारं तपशीलवार वर्णन आहे, ते काही वाचकांना अस्वस्थ करू शकतं.)

कर्स्टी विल्किन्सनचं प्रेम फुलणं आणि विवाह ठरणं फार झटपट झालं. तिला लग्नासाठी एक अतिशय योग्य ड्रेस सापडला. मग फेब्रुवारी 2008 मध्ये तिच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाच्या दिवसाच्या आधी, तिनं हा वेडिंग ड्रेस म्हणजे लग्नात परिधान करायचा पोशाख व्यवस्थित ठेवण्यासाठी एक गुलाबी रंगाची सुटकेस विकत घेतली.

फक्त एक वर्षानंतर ती गुलाबी सुटकेस एका भयानक शोधात धक्कादायकरित्या पुन्हा समोर आली. त्यातून एका क्रूर मारेकऱ्याचा शोध सुरू झाला.

त्या मारेकऱ्याला कशाप्रकारे शिक्षा देण्यात आली, याची कहाणी एका नवीन माहितीपटातून समोर आली आहे.

ट्रकचालकाला सुटकेसमध्ये सापडला मृतदेह

ती 6 एप्रिल 2009 ची सकाळ होती. एका ट्रकचालक युकेतील M4 या महामार्गावरून ट्रक बाजूला घेतला आणि दक्षिण वेल्समधील पोर्थकॉलजवळच्या एका अंडरपासमध्ये त्यानं ट्रक पार्क केला. तिथे रस्त्याच्या कडेला असलेल्या उतारावर एक सुटकेस दिसली.

वरच्या पुलावरून जाणाऱ्या एखाद्या कारच्या टपावर सामान ठेवण्यासाठी असलेल्या रॅकवरून ती सुटकेस खाली पडली असावी असं त्या ट्रकचालकाला वाटलं. त्यानं ती उचलली आणि उघडण्यास सुरुवात केली. ती उघडत असताना त्याला त्यामध्ये एक हात आणि रक्तानं माखलेले काही सोनेरी केस दिसले.

तिथून 20 मैल अंतरावरील स्वानसी शहरात, डोरियन लॉईड या वरिष्ठ तपास अधिकाऱ्याला काही दिवसांपूर्वी एका बेपत्ता व्यक्तीच्या प्रकरणात मदत करण्यासाठी बोलावण्यात आलं होतं.

ती बेपत्ता व्यक्ती म्हणजे 24 वर्षांची कर्स्टी ग्रॅबहम होती. तिचं लग्नाआधीचं नाव कर्स्टी विल्किन्सन होतं. एक आठवड्यापूर्वी, 30 मार्चला तिचा पती पॉल यानं कर्स्टी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. कर्स्टी आदल्या शुक्रवारी रात्री मित्रमंडळींबरोबर बाहेर गेली होती. त्यावेळेस परतताना शेवटचं तिच्या मित्रांनी तिला पाहिलं होतं.

पॉलनं कर्स्टी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवल्यावर पोलिसांनी तिच्या घराची वरवरची तपासणी केली होती. मात्र त्यांना त्यात काहीही चुकीचं, संशयास्पद आढळलं नव्हतं. मात्र जेव्हा पोलीस अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं की एम4 वर सापडलेला मृतदेह एका तरुणीचा आहे, तेव्हा लॉईड यांना घटनास्थळी बोलावण्यात आलं.

सुटकेसमधील भयावह दृश्यं

ते सांगतात, “ते भयानक दृश्य होतं. आम्हाला त्या सुटकेसमध्ये 2 काळ्या रंगाच्या बॅग, कचरा टाकण्यासाठी वापरायच्या प्लास्टिकच्या पिशव्या सापडल्या.”

“एक पिशवी मृतदेहाच्या डोक्यावर होती आणि दुसरी पिशवी तिच्या पायांवर ठेवण्यात आलेली होती. त्या मृतदेहाला एका गुलाबी सूट कॅरियरमध्ये गुंडाळलेलं होतं.”

तपास पथकाला तो मृतदेह कर्स्टीचा असल्याचा संशय होता. मात्र त्यांना तशी खात्री नव्हती.

पेनी रॉबर्ट्स, बीबीसी वेल्सचे माजी मुख्य रिपोर्टर आहेत. त्यांनी त्यावेळेस या प्रकरणाचं वार्तांकन केलं होतं. त्या म्हणाल्या, “त्याच शहराच्या आसपास कर्स्टीच्या वर्णनासारखीच एक महिला बेपत्ता झाली होती. ही गोष्ट खूपच अविश्वसनीय वाटते.”

कर्स्टी विल्किन्सन खूपच कोमल मनाची, संवेदनशील होती. ती लोकांना खूश ठेवण्याचा प्रयत्न करायची, असं तिच्या आई म्हणतात

फोटो स्रोत, Family of Kirsty Wilkinson

कर्स्टीच्या घरापासून 20 मैल अंतरावर तो मृतदेह सापडला होता. या गोष्टीमुळेदेखील शंका वाढल्या. यासंदर्भात लॉईड म्हणाले की, “एखादा मृतदेह इतक्या अंतरावर नेला जाणं ही खूप दुर्मिळ घटना होती.”

ती पीडित कर्स्टी असल्याचे पुरावे मिळत असल्याचं, तिच्या आई, कॅथी ब्रूमफिल्ड यांना त्यांच्या सर्वात लहान मुलीचा मृतदेह ओळखण्याचं अत्यंत वाईट काम करावं लागलं.

त्यांनी बीबीसी वन वेल्सच्या ‘द ट्रूथ अबाउट माय मर्डर’ या मालिकेला सांगितलं की, “ती एखाद्या भयपटातील पात्रासारखी दिसत होती. तिचं नाक तुटलेलं होतं, जबडा तुटलेला होता. त्यांनी तिचे केस धुतले होते, मात्र त्यावर अजूनही रक्त होतं. ती माझ्या लहान मुलीसारखी दिसत नाही.”

“तिची चेहरेपट्टी पूर्णपणे बदलली होती. फक्त तिच्या भुवयांच्या आकारामुळेच मी तिला ओळखू शकले. मला इतका मोठा धक्का बसला होता की मी रडूदेखील शकले नाही.”

लॉईड म्हणाले की कर्स्टीनं तिच्या लग्नाचा ड्रेस सांभाळून ठेवण्यासाठी जी गुलाबी कॅरियर किंवा पिशवी खरेदी केली होती, त्याच गुलाबी पिशवीत तिचा मृतदेह गुंडाळलेला होता. ही ” विशेषकरून अतिशय वेदनादायी बाब होती.”

पॉल ग्रॅबहमविषयी पोलिसांना संशय

पोलिसांनी जेव्हा ग्रॅबहमला सांगितलं की, त्या सुटकेसमधील मृतदेह त्याच्या पत्नीचा आहे. त्यावेळेस त्याची प्रतिक्रिया, कोणत्याही प्रश्नाला ‘नो कॉमेंट’ असं उत्तर देण्याची आणि त्या धक्कादायक बातमीवर कोणतीही भावना न दाखवण्याची होती. त्यातून संशय निर्माण झाला.

मात्र तपास अधिकाऱ्यांना संशयापलीकडे अधिक पुराव्यांची आवश्यकता होती. याच बाबतीत पॅथोलॉजी टीमचे निष्कर्ष कर्स्टीच्या मारेकऱ्याला शोधण्यात अत्यंत महत्त्वाचे ठरले.

शवविच्छेदनातून कर्स्टीवर मृत्यूपूर्वी झालेल्या हिंसेचं खरं स्वरूप समोर आलं.

डॉ. रिचर्ड शेफर्ड, गृह विभागातील माजी फॉरेन्सिक पॅथॉलॉजिस्ट आहेत. ते म्हणाले, कर्स्टीच्या शरीरावरील जखमांचं प्रमाण आणि त्या ज्याप्रकारे पसरलेल्या होत्या, त्यावरून हा हल्ला ‘हिंसक, क्रूर आणि दीर्घकाळ चालल्याचं’ दिसत होतं.

कर्स्टीच्या गळ्याभोवती हाताच्या बोटांच्या ठशांचे व्रण होते. तसंच तिच्या जिभेच्या मागच्या बाजूचं हाड मोडलेलं होतं. यावरून तिच्यावर वापरण्यात आलेल्या बळाचं किंवा ताकदीचं प्रमाण दिसून येतं.

दरम्यान, पोलीस कर्स्टी आणि ग्रॅबहम यांच्या नात्याबद्दलची माहिती गोळा करत होते.

फक्त तीन महिन्यात प्रेम आणि लग्न, लग्नानंतर मात्र तणावच तणाव

कॅथी म्हणाल्या की, कर्स्टी एक ग्लॅमर मॉडेल म्हणून काम करत होती. ती दुसऱ्या एका पुरुषाबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, तिनं अचानक सांगितलं होतं की, ती पॉल नावाच्या माणसाशी लग्न करणार आहे.

त्यांचे प्रेमसंबंध फार वेगानं जुळले होते. कर्स्टी आणि पॉल यांची भेट झाल्यापासून फक्त तीन महिन्यातच त्या दोघांनी लग्न केलं होतं. मात्र काही दिवसांतच कॅथी यांना त्यांच्या मुलीच्या वागण्यात बदल झालेले दिसून आले.

कॅथी ब्रूमफिल्ड म्हणाल्या की कर्स्टीचं लग्न झाल्यानंतर तिच्या वागण्यात बदल झाला होता आणि ती 'खूपच तणावाखाली' असायची

फोटो स्रोत, Yeti Television/BBC Cymru Wales

कर्स्टी ‘पूर्वीसारखी राहिली नव्हती’. तिचं वागणं, मूड, दिसणं एकंदरीत सर्वकाही बदललं होतं. जेव्हा तिचा पती बाहेर हॉर्न वाजवायचा, तेव्हा ती एखाद्या ‘घाबरलेल्या सशासारखी’ घराबाहेर पळत जायची.

कॅथी म्हणाल्या, “ती खूपच मानसिक तणावात होती, अस्वस्थ होती. आम्हाला तो आवडत नव्हता.”

या दोघांनी एकमेकांना लिहिलेल्या पत्रांमधून त्यांच्या नात्यातील समस्या समोर आल्या. फॉरेन्सिक मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कॅट्रिन विल्यम्स यांनी या जोडप्यांबाबतच्या पुराव्यांचा अभ्यास केला.

“या नात्यात आम्हाला जबरदस्तीनं नियंत्रण ठेवण्याच्या वर्तनाचे काही पुरावे दिसत आहेत.”

“यामध्ये त्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणं, त्यांना इतरांपासून वेगळं पाडणं आणि कोणत्या मित्रमंडळींना भेटतात त्यावर नियंत्रण ठेवणं या गोष्टींचा समावेश असू शकतो. ही परिस्थिती या थराला जाऊ शकते की जोडीदार त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवू लागतो.”

कॅथी म्हणतात की, ग्रॅबहमनं एका पार्टीत तर कर्स्टीचा गळा दाबला होता. तो इतक्या जोरात दाबला होता की तिला वाटलं होतं की “ती आता खरोखरंच मरणार आहे.”

पोलिसांना सापडले महत्त्वाचे पुरावे

ग्रॅबहमच्या विरोधात त्यांना हिंसाचार केल्याचे पुरावे वाढत चालले होते, मात्र तरीदेखील त्यानं कर्स्टीचा मारेकरी सापडत नव्हता.

त्यानं पोलिसांना सांगितलं की, कर्स्टी ज्या रात्री बेपत्ता झाली त्या रात्री तो कर्स्टीबरोबर बाहेर गेला होता. तो खूप दारू प्यायला होता आणि एकटाच घरी परत आला होता. त्यानं दावा केला की तो जेव्हा जागा झाला, तेव्हा कर्स्टी तिची हँडबॅग, पर्स आणि फोनसह तिथून निघून गेलेली होती.

कर्स्टीबरोबर कॅथी, कर्स्टी छोटं बाळ होती आणि नंतर ती 5 फूट 1 इंच उंच झाली होती, तिच्या पतीपेक्षा ती एक फूट कमी उंच होती

फोटो स्रोत, Family of Kirsty Wilkinson

मात्र, शेजाऱ्यांनी पहाटे 3 ते 4 च्या दरम्यान काही आवाज ऐकले होते. कर्स्टीला त्या रात्री तिच्या मैत्रिणींनी त्यांच्या घरी थांबवण्याची विनंती करूनदेखील ती त्यांच्याकडे न राहता घरी परतली होती. त्यानंतर थोड्या वेळानं शेजाऱ्यांनी आवाज ऐकले होते.

खालच्या फ्लॅटमधून त्यांना कोणीतरी तोंड दाबून ओरडल्याचा आवाज ऐकू आला. त्यानंतर काहीतरी आपटण्याचे आवाज आले आणि बाथरुममधून एखादी जड वस्तू ओढली जात असल्याचा आवाज आला.

कर्स्टी आणि ग्रॅबहम त्या रात्री ज्या बारमध्ये गेले होते, तिथल्या एका साक्षीदारानं सांगितलं की त्यानं कर्स्टीला सफरचंदाचे तुकडे असलेली सँग्रिया दिली होती.

शेफर्डनं सांगितलं की शवविच्छेदनाच्या अहवालात कर्स्टीच्या लहान आतड्यात सफरचंदाचा एक तुकडा आढळला होता. ही गोष्ट “कर्स्टीचा मृत्यू पहाटे 3 आणि 4 वाजेच्या दरम्यान झाला असण्याच्या गोष्टीशी बरोबर जुळते.”

घरातच सापडले कर्स्टीच्या रक्ताचे डाग

कर्स्टीचा मृत्यू त्याच फ्लॅटमध्ये झाला होता, याबद्दलचा पुरावा पोलिसांना हवा होता. वरिष्ठ फॉरेन्सिक वैज्ञानिक क्लेअर मोर्स यांनी तो पुरावा शोधून काढला.

क्लेअर यांना फ्लॅटच्या भिंतीवर रक्ताचे छोटे डाग दिसले. तीव्र फॉरेन्सिक लाईटमध्ये त्यांना जमिनीवर आणखी रक्ताचे डाग आढळले.

पॉल ग्रॅबहमला पत्नीच्या हत्येसाठी किमान 19 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली

फोटो स्रोत, PA Media

त्यांना नुकत्याच रंगवलेल्या छताखालीदेखील डाग सापडले. तसंच त्यांनी बाथरूमसह फ्लॅटच्या इतर भागांमध्येही रक्ताचे डाग शोधून काढले.

त्यांची डीएनए चाचणी करण्यात आली. त्यातून ते रक्त कर्स्टीचं असल्याचं सिद्ध झालं. फॉरेन्सिक तज्ज्ञांना कर्स्टीच्या रक्ताचे सूक्ष्म अंश ग्रॅबहमच्या कपड्यांवरही सापडले.

ग्रॅबहमच्या विरोधातील खटला अतिशय भक्कम करण्यासाठी त्यांना या गोष्टीचा पुरावा हवा होता की त्यानं कर्स्टीचा मृतदेह त्या अंडरपासमध्ये हलवला होता.

फोन रेकॉर्ड्सवरून, 31 मार्चला 10:30 वाजता कर्स्टीचा मृतदेह जिथे टाकण्यात आला होता तिथे ग्रॅबहमचा मोबाईल असल्याचं दिसून आलं. कारण ग्रॅबहमनं त्याच वेळेस तिथून एक संदेश पाठवला होता आणि त्याला एक संदेश आला होता.

ग्रॅबहमला 19 वर्षांचा तुरुंगवास

जानेवारी 2010 मध्ये ग्रॅबहमवर कर्स्टीच्या हत्येचा खटला चालवण्यात आला. तर 4 फेब्रुवारीला त्याला कर्स्टीच्या हत्येसाठी दोषी ठरवण्यात आलं.

ग्रॅबहमला किमान 19 वर्षांसाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

रॉबर्ट्सना तो खटला आठवतो. “न्यायालयात ग्रॅबहमच्या वागण्यात कधीही बदल झाला नाही. त्यानं कोणतीही भावना दाखवली नाही. त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव उमटले नाहीत.”

हेली आणि कर्स्टी विल्किन्सन या बहिणींचं 'एकेमकांवर खूप प्रेम होतं', कर्स्टीच्या मृत्यूमुळे हेली पूर्णपणे उदध्वस्त झाली होती, असं त्यांच्या आईनं सांगितलं

फोटो स्रोत, Family of Kirsty Wilkinson

कर्स्टीच्या मृत्यूचा आघात तेवढ्यावरच थांबवणार नव्हता. त्याला आणखी एक दुर्दैवी वळण येणार होतं.

तिला दोन मोठ्या बहिणी होत्या. त्यातील एक हेली, कर्स्टीपेक्षा फक्त 16 महिन्यांनी मोठी होती. ती कर्स्टीच्या खूप जवळ होती.

कॅथी म्हणाल्या, “या दोन्ही बहिणींचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. हेली म्हणाल्या की, मला वाटलं की माझाच एक भाग माझ्यापासून हिसकावून घेण्यात आला आहे. मी माझ्या धाकट्या बहिणीशिवाय जगू शकत नाही.”

“हेली खूप जास्त प्रमाणात मद्यपान करू लागली. कोव्हेंट्री येथील वॉल्सग्रेव्ह हॉस्पिटलमध्ये ती माझ्या कुशीतच मरण पावली.”

त्या म्हणाल्या, “त्या दोघीही खूप तरुण वयातच गेल्या.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC