Home world news marathi ‘नासा’ला मंगळावर सापडली सोन्याची टेकडी! वैज्ञानिकही थक्क; हे ‘सोनं’ पृथ्वीवर आणण्यासाठी स्पेशल...

‘नासा’ला मंगळावर सापडली सोन्याची टेकडी! वैज्ञानिकही थक्क; हे ‘सोनं’ पृथ्वीवर आणण्यासाठी स्पेशल प्लॅन

6
0

Source :- ZEE NEWS

NASA Mars Gold Found Scientists On Perseverance Rover: अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था असलेल्या ‘नासा’च्या पर्सिव्हरन्स रोव्हरच्या माध्यमातून मंगळ ग्रहावरील थक्क करणारी माहिती समोर येत आहे. नव्याने केलेल्या संशोधनामध्ये मंगळ ग्रहावर अनेक लहान-मोठ्या टेकड्या आढळून आल्या आहेत. या माध्यमातून मंगळाच्या भूतकाळावर प्रकाश टाकण्यास मदत होणार आहे. सध्या ‘नासा’चा हा रोव्हर जेजेरो क्रेटरजवळ भटकंती करुन माहिती गोळा करत आहे. जेजेरो क्रेटर हा भाग पूर्वी एक तलाव होता असं वैज्ञानिकांचं म्हणणं असल्याने या भागातील नवं संशोधन मंगळासंदर्भातील सर्व संकल्पना मोडीत काढणारं ठरु शकतं, असं म्हटलं जात आहे.

मागील चार वर्षांमध्ये पहिल्यांदाच…

डिसेंबर महिन्यामध्ये पर्सिव्हरन्स रोव्हर मंगळावरील एका टेकडीच्या उतारावर भ्रमंती करत होता. या टेकडीला विच हेजल हिल नावाने ओळखलं जातं. मंगळावरील तापमान सध्याच्या तपमानापेक्षा फार वेगळं होतं तेव्हाची गुपितं या टेकडीत दडल्याचं सांगितलं जातं. ‘स्पेस डॉट कॉम’ने दिलेल्या वृत्तानुसार, मागील काही महिन्यांमध्ये या रोव्हरने पाच टेकड्यांवरील दगड, मातीचे नमुने गोळा केले आहेत. या रोव्हरने आतापर्यंत एकूण पाच टेकड्यांचं सविस्तर परिक्षण केलं आहे तर 83 टेकड्यांवर लेझरच्या मदतीने चाचण्या केल्या आहेत. मागील चार वर्षांमध्ये पहिल्यांदाच रोव्हरने मंगळवारील लॅण्डींगनंतर इतक्या वेगाने काम केल्याचं, ‘नासा’ने म्हटलं आहे.

सोन्याचा केला उल्लेख

दक्षिण कॅलिफॉर्नियामधील नासाच्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेमधील पर्सिव्हरन्स रोव्हरच्या प्रकल्पावर काम करणाऱ्या वैज्ञानिक केटी मॉर्गन यांनी एक प्रतिक्रिया नोंदवताना, जेजेरो क्रेटरच्या पश्चिमेकडील भाग हा वैज्ञानिकांसाठी सोन्यासारखा आहे. या ठिकाणी अशा काही टेकड्या आढळून आल्या आहेत ज्या सर्वात आधी मंगळाच्या गर्भातून वर आल्या आहेत. कदाचित येथील टेकड्यांची निर्मिती उल्कावर्षावामुळे झाली असावी. या उल्कांमध्येच जेजेरो क्रेटर तयार करणाऱ्या उल्केचाही समावेश असल्याचं सांगितलं जातं. या रोव्हरला एक खास टेकडी सापडली असून त्याचं नाव ‘सिलव्हर माऊंटन’ असं आहे. ही टेकडी जवळपास 3.9 अब्ज वर्ष जुनी असू शकते असा अंदाज आहे. ज्यावेळेस मंगळावर मोठ्याप्रमाणात उल्कापात होत होता त्यावेळी या टेकडीची निर्मिती झाली असावी. रोव्हरच्या एक्स अकाऊंटवरुन दिलेल्या माहितीनुसार, ही टेकडी आतापर्यंतची सर्वात वेगळी टेकडी आहे. या टेकडीपासून जवळच अजून एक टेकडी सापडली असून त्यामध्ये सर्पेंटाइन नावाचं खनिज आहे. पाणी आणि ज्वालामुखी एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा सर्पेंटाइनची निर्मिती होती. या दोघांच्या एकत्र येण्याच्या क्रियेतून हायड्रोजन गॅसची निर्मिती होते. पृथ्वीवरील जीवनासाठी हायड्रोजन आवश्यक गोष्ट आहे. त्यामुळे या डोंगरांमधून सापडणारे घटक हे वैज्ञानिकांसाठी सोन्याहून कमी नसल्याचं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. सर्पेंटाइन सापडलेल्या टेकडीचा सोन्याची टेकडी असा उल्लेख आता केला जात आहे. तसेच या टेकडीवरील दगड-मातीचे नमुने हे मानवाला अंतराळात स्थायिक होण्याच्या दृष्टीकोनातून सुरु असलेल्या संशोधनाच्या दृष्टीने सोन्यासारखेच असल्याचं सांगितलं जात आहे.

डेटा एकत्रित करुन संशोधन

मॉर्गन यांनी, “मागील चार आठवडे वैज्ञानिकांसाठी फारच कामाचे ठरले. अजूनही आम्हाला असं वाटतंय की वेच हिलजवळ आपल्याला सांगण्यासारखं बऱ्याच गोष्टी आहेत. आम्ही सध्या रोव्हरने गोळा केलेल्या सर्व डेटाचा एकत्रित वापर करुन पुढील संशोधन करत आहोत,” असं म्हटलं.

हे ‘सोनं’ पृथ्वीवर आणलं तर…

वेच हिलमध्ये अजून बरीच गुपितं लपलेली असल्याची शक्यता वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. रोव्हर जो डेटा गोळा करत आहे त्यावरुन पुढील संशोधन कोणत्या टेकडीवर करायंच हे ठरवलं जाणार आहे. “मंगळावरील हा प्रदेश वैज्ञानिकांचं कुतूहल वाढवणारा आहे. प्रत्येक पावलावर नवीन टेकडी नवी रहस्य उलगडत आहे,” असं मॉर्गन म्हणाल्या. या टेडक्यांवरील माती, दगडाचे नमुने पृथ्वीवर आणून मंगळावर खरोखरच कधी काळी जीवन अस्तित्वात होतं का हे वैज्ञानिकांना तपासून पाहायचं आहे. मात्र हे काम फार कठीण आहे. यासाठी फार पैसे आणि कालावधी लागणार. नासाकडून यासाठी विशेष प्लॅन आखला जात आहे. पर्सिव्हरन्स रोव्हर मंगळवारील अनेक रहस्यांवर प्रकाश टाकत आहे. जेजेरो क्रेटरजवळच्या टेकड्या मंगळ पूर्वी कसा होता हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. मंगळवारही जीवन होतं की नाही हे या संशोधनामधून समोर येईल. खरोखरच ही माहिती समोर आली तर ते मानवासाठी फार मोठं यश असेल. खरंच मंगळावरील जीवनाचं कोडं उलगडलं तर तो दिवस फार दूर नसेल जेव्हा माणूस मंगळावर वस्ती करेल. हे संशोधन एका अर्थाने मानवाला अंतराळामध्ये वस्ती करण्यासाठी लागलेल्या लॉटरीसारखं ठरु शकतं इतकं महत्त्वाचं आहे.

SOURCE : ZEE NEWS