Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty/Reuters
अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी लष्करप्रमुख रँडी जॉर्ज यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्यास सांगितलं आहे.
पेंटागॉनचे मुख्य प्रवक्ते शॉन पार्नेल यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटलं, “जॉर्ज हे अमेरिकन लष्कराचे 41 वे लष्करप्रमुख (चीफ ऑफ आर्मी स्टाफ) म्हणून तात्काळ प्रभावाने सेवानिवृत्त होत आहेत.”
तेथील लष्करप्रमुखांचा कार्यकाळ साधारणपणे 4 वर्षांचा असतो.
रँडी जॉर्ज यांनी वेस्ट पॉइंट मिलिटरी अकादमीमध्ये शिक्षण घेतले होते. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी 2023 मध्ये त्यांची या पदासाठी निवड केली होती.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकत्याच केलेल्या भाषणात म्हटलं होतं की, इराणविरुद्ध सुरू असलेलं अमेरिका-इस्रायल युद्ध लवकरच संपणार आहे.
अशावेळी अमेरिकेतील लष्करप्रमुखांना हटवण्यात आलं आहे.
रँडी जॉर्ज यांनी पहिल्या आखाती युद्धात आणि नंतर इराक व अफगाणिस्तानमधील अलीकडील संघर्षांमध्ये सेवा बजावली होती.
कारण स्पष्ट नाही
रँडी जॉर्ज यांना पदत्याग करण्यास का सांगण्यात आलं? या प्रश्नाचं उत्तर मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही.
संरक्षण विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सीबीएसशी बोलताना सांगितलं, “आम्ही त्यांच्या सेवेबद्दल आभारी आहोत, पण सैन्यात नेतृत्वबदलाची वेळ आली होती.”
पेंटागॉनचे प्रवक्ते पार्नेल म्हणाले, “जनरल जॉर्ज यांनी बजावलेल्या अनेक दशकांच्या सेवेबाबत युद्ध विभाग कृतज्ञ आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो.”
फोटो स्रोत, Win McNamee/Getty Images
अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराचे उपप्रमुख (व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ) जनरल क्रिस्टोफर लानेव्ह हे हंगामी लष्करप्रमुख म्हणून त्यांची जागा घेतील.
लानेव्ह यांच्याबद्दल बोलताना पार्नेल म्हणाले, “लानेव्ह यांना प्रत्यक्ष कारवाईचा अनेक दशकांचा अनुभव आहे.”
पार्नेल असेही म्हणाले की, संरक्षण मंत्री हेगसेथ यांना लानेव्ह यांच्यावर पूर्ण विश्वास आहे की, ते सरकारच्या व्हिजननुसार काम करतील.
फोटो स्रोत, Getty Images
रँडी जॉर्ज यांनी बुधवारी (1 एप्रिल) वेस्ट पॉइंट मिलिटरी अकादमीला भेट दिली होती. तेव्हा अकादमीने त्या भेटीचे फोटो प्रसिद्ध करत असं म्हटलं होतं की, रँडी यांनी भविष्यातील लष्करी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं.
पेंटागॉनमध्ये आल्यापासून, हेगसेथ यांनी नौदल ऑपरेशन्सचे प्रमुख आणि हवाई दलाचे उपप्रमुख यांच्यासह डझनहून अधिक वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची बदली केली आहे.
अॅटर्नी जनरल पाम बाँडी यांचीही उचलबांगडी
अॅना फेगे आणि बर्न्ड डिब्शमन ज्युनियर, व्हाईट हाऊसमधून
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅटर्नी जनरल पाम बाँडी यांना त्यांच्या पदावरून हटवलं आहे. बाँडी या ट्रम्प यांच्या दीर्घकाळच्या सहकारी आणि त्यांच्या प्रशासनाच्या कट्टर समर्थक होत्या.
अमेरिकेत अॅटर्नी जनरल हे देशाचे सर्वोच्च कायदा अंमलबजावणी अधिकारी असतात.
‘ट्रुथ सोशल’वरील एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी पाम बाँडी यांची प्रशंसा केली असून त्या खासगी क्षेत्रात नवीन भूमिकेत रुजू होतील, असं म्हटलं आहे.
जेफ्री एपस्टीनशी संबंधित फायली प्रसिद्ध करणे आणि त्याच्या चौकशीवरून निर्माण झालेल्या वादामुळे बाँडी यांचा न्याय विभागातील कार्यकाळ चर्चेत होता.
फोटो स्रोत, Reuters
अलीकडच्या आठवड्यांत पदावरून हटवण्यात आलेल्या ट्रम्प प्रशासनातील त्या दुसऱ्या अधिकारी आहेत. यापूर्वी मार्चमध्ये क्रिस्टी नोएम यांना होमलँड सिक्युरिटी प्रमुख पदावरून हटवण्यात आलं होतं. माजी उपप्रमुख टॉड ब्लँच हे बाँडी यांच्या जागी नियुक्त होतील.
बाँडी म्हणाल्या की, ब्लँच यांच्याकडे या पदाची सूत्रं सोपवण्याची संपूर्ण जबाबदारी त्या पार पाडतील. या पदावर काम करणं हा फार मोठा ‘सन्मान’ होता, असंही त्या म्हणाल्या.
बाँडी यांनी सांगितलं की, खासगी क्षेत्रातील आपल्या नवीन भूमिकेत ‘राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि या प्रशासनासाठी लढत राहीन.’ मात्र, खासगी क्षेत्रातील आपली नवीन भूमिका नेमकी काय असेल, हे त्यांनी स्पष्ट केले नाही.
इराणमधील सर्वात मोठ्या पुलावर हल्ला केल्याचा ट्रम्प यांचा दावा, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची कठोर प्रतिक्रिया
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने इराणमधील सर्वात मोठ्या पुलावर हल्ला केला आहे.
‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या व्हीडिओमध्ये स्फोट झालेल्या ठिकाणी काळ्या धुराचे लोट दिसत आहेत.
त्यांनी म्हटलं, “इराणमधील सर्वात मोठा पूल उद्ध्वस्त करण्यात आला आहे. आता पुन्हा याचा वापर होऊ शकणार नाही.”
डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला इशारा दिला आहे. ते म्हणाले, “इराण अजूनही एक महान देश बनू शकतो. त्यामुळे त्यांनी आता आमच्याशी करार केला पाहिजे, नाहीतर खूप उशीर होईल आणि इराणमध्ये काहीही उरणार नाही.”
फोटो स्रोत, X/@araghchi
“अपूर्ण पुलांसहित नागरी पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांमुळे इराणचे नागरिक शरणागती पत्करणार नाहीत. असे हल्ले केवळ शत्रूची गोंधळलेली परिस्थिती आणि त्यांचं खचलेलं मनोधैर्य दाखवतात,” असे अराघची म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “प्रत्येक पूल आणि इमारत पूर्वीपेक्षा अधिक मजबूतपणे पुन्हा बांधली जाईल. पण अमेरिकेच्या विश्वासार्हतेला झालेली हानी कधीही भरून काढता येणार नाही.”
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC



