Home LATEST NEWS ताजी बातमी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला, 20 हून अधिक जणांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला, 20 हून अधिक जणांचा मृत्यू

4
0

Source :- BBC INDIA NEWS

जम्मू काश्मीर

फोटो स्रोत, PTI

  • Author, माजिद जहांगीर
  • Role, बीबीसी प्रतिनिधी, श्रीनगरहून
  • 22 एप्रिल 2025, 19:00 IST

    अपडेटेड 56 मिनिटांपूर्वी

जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसर भागात पर्यटकांवर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 20 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत.

मंगळवारी (22 एप्रिल) झालेल्या या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी या परिसराला वेढा घातला. तसंच, वैद्यकीय टीमदेखील घटनास्थळी पोहोचली आहे.

या हल्ल्यातील जखमींना अनंतनागमधील सरकारी वैद्यकीय कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

या हल्ल्याच्या घटनेनंतर भारताचे गृहमंत्री अमित शाह तातडीने जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचले. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाह यांच्यासह अमित शाह यांनी सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला.

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाह यांनी या घटनेनंतर ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलंय की, “या घटनेमुळे मला धक्का बसला आहे. मला यावर विश्वास बसत नाही. आमच्या पर्यटकांवर झालेला हल्ला निषेधार्ह आहे. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांची माहिती गोळा केली जात आहे.”

पहलगामला ‘भारताचं स्वित्झर्लंड’ म्हटलं जातं. इथं भारत आणि जगभरातून पर्यटक फिरण्यासाठी येत असतात.

अलीकडच्या काही वर्षांमध्ये सर्वसामान्य नागरिकांवर झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे.

बीबीसीचे प्रतिनिधी माजिद जहांगीर यांनी गुजरातमधून आलेल्या पर्यटकाशी बातचित केली. पर्यटकांच्या ज्या गटावर हल्ला झाला होता, त्या गटामध्येच हा पर्यटकदेखील होता.

या पर्यटकानं सांगितलं की, “अचानक हल्ला झाल्यामुळे तिथे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. प्रत्येकजण ओरडत, रडत तिथून पळू लागला.”

सैनिक

फोटो स्रोत, Getty Images

पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या ठिकाणी महाराष्ट्रातील नागपूरचं एक कुटुंब उपस्थित होतं. हे कुटुंब जम्मू-काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेलं होतं.

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना नागपूरच्या या कुटुंबाने आपला अनुभव सांगितला. ते म्हणाले, “आम्ही तिथे फिरायला गेलो होतो. तेथून बाहेर पडताना गोळीबारचा आवाज आमच्या कानावर पडला. या आवाजानं सर्वजण सैरावैरा पळायला लागले. आम्हीही मागे वळून न पाहता, तिथून कसंबसं बाहेर पडलो. या गोंधळात माझ्या पत्नीचा पाय फ्रॅक्चर झाला. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत.”

महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू – मुख्यमंत्री फडणवीस

पहलगाममधील हल्ल्याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी माहिती देताना म्हटलं की, “पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या, आप्तस्वकियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.”

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील पर्यटकांबाबत माहिती दिली. फडणवीस म्हणाले, “जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या आम्ही संपर्कात आहोत. पहलगाम ज्यांच्या अखत्यारीत येते, ते काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांनाही फोन करुन माहिती घेतली. आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रातील दोन पर्यटकाचा मृत्यू झाला असून, त्यात दिलीप डिसले, अतुल मोने असे दोघे आहेत.”

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

“स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 2 जण जखमी झाले आहेत. त्यातील एक माणिक पटेल हे पनवेलचे आहेत. एस. भालचंद्रराव हे दुसरे जखमी आहेत. सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर आहे,” अशीही माहिती फडणवीसांनी दिलीय.

तर पहलगाममधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आहेत. मुंबई पोलीस आयुक्तालयाने सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि उपायुक्तांना त्यांच्या अधिकारक्षेत्रात सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

मोदी म्हणाले, ‘हल्लेखोरांना सोडणार नाही’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाममधील घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय.

एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन आपली प्रतिक्रिया देताना मोदी म्हणाले, “जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. घटनेतील जखमी झालेले लोकं लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो.”

नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, “पीडितांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. या घृणास्पद कृत्यामागील लोकांना सोडलं जाणार नाही, योग्य ती कारवाई केली जाईल. त्यांचा अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आमचा संकल्प अढळ आहे आणि तो आणखी मजबूत होईल.”

विरोधी पक्षनेते राहुल गांधी काय म्हणाले?

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल गांधी म्हणाले, “जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचा मृत्यू आणि अनेकजण जखमी झाल्याची घटना निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी आहे. आपल्या नातेवाईकांना गमावणाऱ्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. घटनेतील जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो.”

राहुल गांधी

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, “दहशतवादाविरोधात संपूर्ण देश एकजूट आहे. सरकारनं जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सामान्य असल्याच्या थापा मारण्यापेक्षा योग्य ते पाऊल उचलून कारवाई करावी. जेणेकरुन अशा घटनांना आवर घालता येईल आणि निर्दोष भारतीयांना आपला जीव गमवावा लागणार नाही.”

पूर्ण ताकदीनं उत्तर देऊ – अमित शाह

या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तातडीने जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचले आहेत.

अमित शाह यांनी एक्स या सोशल मीडियावर लिहिलंय की, “पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या कट्टरतावादी हल्ल्यामुळे मला दु:ख झालं आहे. या हल्ल्यात मारले गेलेल्या लोकांच्या कुटुंबाबरोबर माझ्या संवेदना आहेत.”

अमित शाह म्हणाले की, “या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना सोडलं जाणार नाही आणि त्यांना पूर्ण ताकदीनं उत्तर दिलं जाईल.”

अमित शाह पुढे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींना या हल्ल्याची माहिती देण्यात आली आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांबरोबर त्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली आहे.”

अमित शाह

फोटो स्रोत, Getty Images

जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या हल्ल्याचा निषेध करत म्हटलं आहे की, “हल्लेखोरांना सोडलं जाणार नाही.”

त्यांनी एक्सवर लिहिलं आहे, “पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा मी कठोर शब्दात निषेध करतो. हा घृणास्पद हल्ला करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही. माझं डीजीपी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांशी बोलणं झालं आहे. आर्मी आणि पोलीस दलानं या परिसराला वेढा घातला आहे आणि ते त्यांची कारवाई करत आहेत.”

तर पीडीपीच्या प्रमुख महबूबा मुफ्ती यांनीदेखील या हल्ल्याचा निषेध केला आहे.

त्यांनी एक्स या सोशल मीडियावर लिहिलं आहे की, “पहलगामध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा मी कठोर शब्दात निषेध करते. याप्रकारचा हिंसाचार अजिबात स्वीकारार्ह नाही. ऐतिहासिकदृष्ट्या काश्मीरनं पर्यटकांचं मनापासून स्वागत केलं आहे. त्यामुळे या हल्ल्याची ही दुर्मिळ घटना खूपच चिंताजनक आहे.”

कंट्रोल रूमचे इमर्जन्सी नंबर जारी

जम्मू-काश्मीरच्या माहिती आणि जनसंपर्क विभागानं इमर्जन्सी कंट्रोल रूमचे संपर्क क्रमांक जारी केले आहेत.

श्रीनगरमधील इमर्जन्सी कंट्रोल रूम :

  • 0194-2457543
  • 0194-2483651
  • 7006058623 (आदिल फरीद, ADC श्रीनगर)

अनंतनाग इमर्जन्सी कंट्रोल रूम :

अनंतनागमध्ये पर्यटकांच्या माहितीसाठी विशेष डेस्क तयार करण्यात आलाय. खालील संपर्क क्रमांकावर संपर्क करता येईल.

  • 01932222337
  • 7780885759
  • 9697982527
  • 6006365245

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC