Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
-
20 मिनिटांपूर्वी
-
वाचन वेळ: 10 मिनिटे
अशी गोष्ट जी सत्य असतानाही चुकीची आहे असं ठरवून एखाद्याला शिक्षा झाली तर?
आणि त्याही पुढे जाऊन, ती शिक्षा चुकीची होती हे तब्बल ‘साडेतीनशे’ वर्षांनंतर कुणी मान्य केलं तर?
थोडं विचित्र आणि गंमतीशीर वाटतंय ना? पण इतिहासात हे खरोखरंच घडलेलं आहे.
इयत्ता पहिलीतल्या मुलाला शाळेमध्ये जी साधी गोष्ट शिकवली जाते, ती गोष्ट सांगितली म्हणून आयुष्यभर अंधाऱ्या नजरकैदेत राहण्याची शिक्षा एका व्यक्तीच्या वाट्याला आली होती.
आयुष्याच्या शेवटी शेवटी ही व्यक्ती आंधळी झाली आणि त्यातच मरण पावली.
असं काय सांगितलं होतं या व्यक्तीनं? आणि तब्बल 350 वर्षांनंतर तीच व्यक्ती बरोबर होती, हे कसं काय मान्य करण्यात आलं?
‘तरीही तीच फिरते’
‘पृथ्वी ही विश्वाच्या मध्यभागी असून सूर्य आणि चंद्रासहित इतर सर्व ग्रहगोल पृथ्वीभोवती फिरतात.’
हे वाक्य अर्थातच चुकीचं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की, सूर्य हा ग्रह नसून तो आपल्या सूर्यमालेच्या मध्यभागी असणारा तारा आहे.
त्याच्याभोवती पृथ्वीसहित आठ ग्रह फिरतात. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह असून तो पृथ्वीभोवती फिरतो. पृथ्वीही स्वत:भोवती फिरते.
मात्र, सुमारे चारशे वर्षांपूर्वीचं सत्य काही वेगळंच होतं. तेव्हाच्या युरोपामध्ये बायबलप्रणीत ‘पृथ्वीमध्य सिद्धांत’ धर्ममान्य होता.
फोटो स्रोत, Getty Images
तेव्हाचा तोच धर्मसंमत समज होता.
ज्याचा या समजावर विश्वास असेल, तोच त्या काळच्या समाजातला सभ्य इसम तर जो या समजावर अविश्वास व्यक्त करेल, तो असभ्य किंबहुना धर्मद्रोही, अशी व्यवस्था होती.
त्याआधीच्या जवळपास 1500 वर्षांपासून युरोपात हाच समज होता. हा विचार ॲरिस्टॉटल या ग्रीक विचारवंतानं मांडलेला विचार होता. त्याने मांडून ठेवलेल्या प्रत्येक शब्दाला तेव्हाच्या युरोपात मोठं वजन होतं.
त्याचा हाच अवकाशाच्या रचनेचा विचार बायबलमध्ये स्वीकारण्यात आला होता.
यासंदर्भात ‘लढे विवेकवादाचे’ या पुस्तकात प्रा. प. रा. आर्डे यांनी म्हटलंय की, “ॲरिस्टॉटल हा ‘आर्मचेअर फिलॉसॉफर’ होता. चंद्र, सूर्य, तारे म्हणजेच आकाशस्थ ग्रहगोल हे एका खास इथर नामक पदार्थांपासून निर्माण झालेत, अशी त्याची कल्पना होती. या आकाशातील पदार्थांना स्वत:ची अशी गती असते आणि ही गती अचल अशा देवाने त्यांना दिली आहे. तसेच, आकाशातील हे गोल स्वत:चं तेजस्वी असून, अमर आणि गुळगुळीत आहेत. हे विचार बायबलमध्ये स्वीकारले गेले.”
फोटो स्रोत, Getty Images
त्यामुळे,ॲरिस्टॉटलपुरस्कृत या पृथ्वीमध्य सिद्धांतावर शंका घेईल, वेगळं मत मांडेल त्याला बायबलद्रोही ‘पाखंडी’ ठरवून शिक्षा दिली जायची.
‘धर्म आणि विज्ञान’ या पुस्तकात बर्ट्रांड रसेल म्हणतात की, “मध्ययुगीन तत्त्वेत्यांना बायबल, कॅथलिक पंथाची तत्त्वे व जवळजवळ तितक्याच प्रमाणात ॲरिस्टॉटलची वचने ही सर्व वादातीत वाटत होती.”
अनेकांनी हा ॲरिस्टॉटलप्रणीत पृथ्वीमध्य सिद्धांत डावलण्याचा प्रयत्नही केला. मात्र, तो फोल ठरला. काहींचा तर त्यासाठी जीवही घेण्यात आला.
मात्र, तरीही एका व्यक्तीनं ‘तरीही तीच फिरते’ अशी भूमिका घेत या सिद्धांताला विज्ञानाच्या कसोटीवर पुराव्यानिशी आव्हान दिलं आणि त्याची किंमतही मोजली.
ती व्यक्ती होती गॅलिलिओ गॅलिली.
कोपर्निकस ते गॅलिलिओ व्हाया ब्रुनो
खरं तर गॅलिलिओच्याही आधी कोपर्निकसने पृ थ्वीमध्य सिद्धांताच्या विरोधात जात ‘पृथ्वीच सूर्याभोवती फिरत असावी,’ असं म्हणणं मांडत ‘सूर्यकेंद्री सिद्धांत’ मांडला होता.
मात्र, पाखंडी ठरवलं जाऊन देहदंडाची शिक्षा मिळेल, या भीतीपोटी कोपर्निकसने आपलं पुस्तक मित्राला दिलं आणि आपल्या मृत्यूनंतर ते प्रसिद्ध कर, असं सांगितलं.
त्यामुळे, त्याला याची थेट किंमत मोजावी लागली नाही. शिवाय, ‘या पुस्तकातील विचार काल्पनिक आहेत, आणि प्रत्यक्ष वास्तव वेगळं असण्याची शक्यता बरीच आहेत,’ अशी वाक्यं असल्याने धर्मपीठाची प्रतिक्रिया सौम्य झाली असावी.
पण, कोपर्निकसनंतर ज्यांनी ज्यांनी त्याचा हा ‘सूर्यकेंद्री सिद्धांत’ उचलून धरला, त्यांना त्याची फळं भोगावी लागली.
फोटो स्रोत, Getty Images
अशी फळं भोगणाऱ्यांपैकी एक होता जिओर्दानो ब्रुनो.
‘धर्म आणि विज्ञान’ या पुस्तकात बर्ट्रांड रसेल म्हणतात की, “धर्म आणि विज्ञान यात समोरासमोर जी पहिली फैरी झडली, व जी काही बाबतीत संस्मरणीय ठरली, तिचे स्वरूप खगोलविषयक होते. जिला आपण आज ‘सूर्यमाला’ म्हणतो, तिचा केंद्रबिंदू पृथ्वी की सूर्य हा त्यातला वादाचा विषय होता.”
सूर्यकेंद्री सिद्धांताचा पुरस्कार करणाऱ्या ब्रुनोला पाखंडी ठरवण्यात आलं आणि रोममध्ये जिवंत जाळण्यात आलं.
फोटो स्रोत, Getty Images
‘लढे विवेकवादाचे’ या पुस्तकात प्रा. प. रा. आर्डे लिहितात की, “ब्रुनोने आपल्या या नव्या संशोधनाद्वारे कोपर्निकसच्या सूर्यकेंद्री सिद्धांताला मान्यता दिली. एवढेच नव्हे, तर त्याने विश्व हे अमर्याद आहे आणि त्यात आपल्या सूर्यमालेसारख्या कित्येक रचना अस्तित्वात आहेत, अशी क्रांतिकारी कल्पना मांडली.”
त्याला पाखंडी ठरवून धर्मपीठामध्ये खटला चालवण्यात आला तेव्हा त्याला त्याच्या विधानांवरून माघार घेण्यास सांगण्यात आलं. त्याने हा आदेश धुडकावून आपल्या मतावर ठाम राहणं पसंत केलं.
इतकी सारी भयावह पार्श्वभूमी असतानाही, ग्रहगोलांच्या स्वरूपाबाबतचे दावे-प्रतिदावे हे अधांतरिच होते. त्यांना पुराव्यांची जोड नव्हती.
ती जोड मिळवून दिली ती गॅलिलिओने.
कोण होता गॅलिलिओ गॅलिली?
गॅलिलिओ हा इटालियन गणिती, भौतिकीविद आणि खगोलअभ्यासक होता.
शास्त्रीय अध्ययनाची निरीक्षणं, प्रयोग, गणित व सिद्धांत अशी तर्कशुद्ध पद्धती त्याने रूढ केल्यानं त्याला आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचा जनक देखील मानलं जातं.
त्याचा जन्म 15 फेब्रुवारी 1564 साली इटलीतील पीसा गावी झाला. त्याचं सुरुवातीचं शिक्षण फ्लॉरेन्सजवळच्या व्हाललाँब्रॉझा येथे झालं.
तिथे त्यानं ग्रीक, लॅटिन, तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान, प्राचीन वाङ्मय, धर्मशास्त्र इ. विषयांचा अभ्यास केला.
त्याला चित्रकला, संगीत आणि काव्य यांचीही आवड होती. वैद्यकाच्या अध्ययनासाठी 1581 साली तो पीसा विद्यापीठात दाखल झाला. तिथे त्यानं ॲरिस्टॉटलच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. मात्र, त्याचा कल गणिताकडेच होता.
फोटो स्रोत, Getty Images
त्यानं 1604 साली खऱ्या अर्थानं खगोलाचा अभ्यास करण्यास सुरूवात केली.
1609 साली त्यानं दूर्बीण बनवण्यास सुरुवात करून पुष्कळ दूरदर्शक अर्थात दूर्बीण बनवली व काही विकल्याही.
त्याच्या प्रथम दूरदर्शकाची वर्धनक्षमता (वस्तूची प्रतिमा मोठी करण्याची क्षमता) तीन होती. ती बत्तीसापर्यंत वाढवण्यात तो यशस्वी झाला.
मात्र, जेव्हा त्यानं ती आकाशाकडं वळवली, तेव्हा खरं तर त्याच्या आयुष्यालाच ग्रहण लागलं असं उपरोधानं म्हणता येईल.
सुरूवातीला गॅलिलिओनं आपली दूर्बीण चंद्रावर रोखली.
त्याला लक्षात आलं की, चंद्राचा पृष्ठभाग खडबडीत आहे. त्याच्यावर डोंगर-दऱ्या आहेत. मात्र, बायबलमध्ये तर चंद्र-तारे गुळगुळीत पूर्ण गोलाकार चेंडूसारखे आहेत, असं लिहिलेलं होतं. या विचारांना गॅलिलिओनं संशोधनाअंती धक्का दिला.
गॅलिलिओचा दुसरा आश्चर्यकारक शोध म्हणजे, पृथ्वीचं चांदणं. पृथ्वी आणि चंद्र दोन्हीही परप्रकाशी आहेत, आणि सूर्याकडून येणारा प्रकाश चंद्रावरून परावर्तीत होतो, हे त्यानं पुराव्यानिशी सप्रमाण सिद्ध केलं.
नुसत्या डोळ्यांनी अवकाशात काहीही दिसत नाही, त्या ठिकाणी दूर्बीण रोखली तर नवे तारेही गॅलिलिओला आढळून आले.
अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे बायबलप्रणीत कित्येक कल्पनांना धक्का बसत गेला.
फोटो स्रोत, Madhushree Publication
मूळात गॅलिलिओ स्वत: बायबलवर निष्ठा असलेला सश्रद्ध कॅथलिक ख्रिश्चन होता. पण, चिकित्सेला परवानगी न देणारी श्रद्धा आणि उघड्या डोळ्यांना दिसणारं निरिक्षणाअंतीचं ज्ञान-विज्ञान यांच्या झगड्यात त्याचं अंतर्मन विज्ञानाधिष्ठीत सत्याकडंच धाव घ्यायचं.
गॅलिलिओला आपल्या दूर्बिणीतून गुरू या ग्रहाभोवती ठराविक अंतरावर चार उपग्रहदेखील आढळले.
या संशोधनामुळे, ‘सूर्याभोवती पृथ्वी आणि इतर ग्रहगोल फिरतात,’ या कोपर्निकसच्या सिद्धांताला पुराव्यानिशी पुष्टी मिळते, असं गॅलिलिओच्या लक्षात आलं.
माणिक कोतवाल गॅलिलिओच्या ‘दूरदर्शी’ या चरित्रात लिहितात की, “प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसणारा पुरावा खोडून काढण्यासाठी पवित्र धर्मग्रंथाचा आधार घ्यायचा, ही गोष्ट गॅलिलिओला फार हिणकस वाटत असे. ‘देवाने दिलेल्या दृष्टीच्या वरदानाची किंमत ज्यांना कळत नाही, ते आंधळे होण्याच्या लायकीचे आहेत,’ असं तो खेदाने म्हणत असे.”
‘अहो गॅलिलिओच्या सुपुत्रांनो, तुम्ही आकाशाकडे कशाला टक लावून पाहत आहात?’
‘धर्म आणि विज्ञान’ या पुस्तकात बर्ट्रांड रसेल म्हणतात की, “मध्ययुगात पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं निरीक्षणाने न काढता, ती ॲरिस्टॉटलच्या अथवा धर्मशास्त्राच्या वचनातून अनुमानपद्धतीनेच काढली जात. म्हणजे धर्म आणि विज्ञान यांच्यातला झगडा हा खरे पाहिल्यास आप्तवचन आणि प्रत्यक्ष निरिक्षण यातला झगडा होता.”
आणि साहजिकच गॅलिलिओ गॅलिली हा दूर्बिणीतून दिसलेल्या प्रत्यक्ष निरिक्षणांच्या अर्थात विज्ञानाच्या बाजूनं होता.
बर्ट्रांड रसेल म्हणतात की, “गॅलिलिओने प्रायोगिक व तांत्रिक कौशल्य व शास्त्रीय निष्कर्ष यांना गणित शास्त्राच्या नियमाच्या चौकटीत बसवलं, हे त्यांच वैशिष्ट्य होय.”
मात्र, ॲरिस्टॉटलपंथीयांनी दूर्बिणीतून पाहण्याचं साफ नाकारलं आणि गुरूच्या भोवतालचे चंद्र हा एक दृष्टीभ्रम आहे, असं ते हट्टानं प्रतिपादन करू लागले.
फोटो स्रोत, Getty Images
मात्र, गॅलिलिओ एवढ्यावरच थांबला नाही. त्यानं आणखी काही गोष्टी उजेडात आणल्या आणि धर्ममार्तंडाच्या छातीत धडकी भरली.
शुक्राला चंद्रासारख्याच कला असतात, हे त्यानं दूर्बीणीतून दाखवून दिले. चंद्रावर पर्वत असल्याच्या शोधाचा धक्का पचवतो न पचवतो तोवर त्यानं सूर्यावरही डाग आहेत, हे दाखवून दिलं आणि आणखीनच कहर माजवला.
यामागचं कारण सोपं होतं.
फोटो स्रोत, Getty Images
बर्ट्रांड रसेल आपल्या पुस्तकात सांगतात की, “कारण, या शोधाचा रोख जगन्निर्मात्याचं कार्य सदोष आहे हे सिद्ध करण्याकडे दिसतो, असे लोक म्हणू लागले. परिणामी, कॅथलिक विद्यापीठातील शिक्षकांना सूर्यावरील डागांचा उल्लेख करण्यास बंदी घालण्यात आली. ही बंदी काही विद्यापीठांमध्ये कित्येक शतके चालू होती.”
“एका डॉमिनिकन धर्मोपदेशकाने ‘अहो गॅलिलिओच्या सुपुत्रांनो, तुम्ही आकाशाकडे कशाला टक लावून पाहत आहात?’ या धर्मवचनावर निरूपण करताना ‘भूमिती हे सैतानाचं शास्त्र आहे, आणि गणितशास्त्र हे सर्व प्रकारच्या पाखंडी मतांचे प्रणेते असल्याने त्यांना हद्दपार केलं पाहिजे, असे उद्गार काढल्याने त्याला बढती मिळाली होती’,” असंही रसेल आपल्या पुस्तकात सांगतात.
अखेर तो दिवस उजाडलाच जेव्हा पोपने गॅलिलिओला धार्मिक न्यायसभेसमोर हजर राहण्याची आज्ञा केली.
गॅलिलिओ विरुद्ध धर्मपीठ
‘इन्क्विझीशन’ (Inquisition) अर्थात न्यायसभेनं गॅलिलिलोला आपण केलेल्या प्रमादांचा त्याग करण्याचा आदेश दिला.
ब्रुनोला जाळलं जाण्याच्या घटनेच्या अवघ्या 16 वर्षांनंतर गॅलिलिलो धर्मपीठासमोर उभा होता.
माणिक कोतवाल यांनी मराठीमध्ये ‘दूरदर्शी’ या नावानं गॅलिलिओचं चरित्र लिहिलं आहे.
या चरित्रात त्या लिहितात की, “ब्रुनोच्या प्रखर क्रांतिकारी व्यक्तित्वाने गॅलिलिओ निश्चितच प्रभावित झाला होता. मात्र, ईश्वर, विश्व, स्वर्ग याविषयींची ब्रुनोची वक्तव्ये फार श्रवणीय असली, तरी त्याचा दृष्टीकोन वैज्ञानिकाचा नव्हता. गॅलिलिओला विज्ञानाच्या मार्गाने सत्यााच शोध घ्यायचा होता, ब्रुनोसारखे हौतात्म्य पत्करायचे नव्हते.”
फोटो स्रोत, Getty Images
त्यामुळे, गॅलिलिलोने 26 फेब्रुवारी, 1616 रोजी त्यांनी सांगितल्याप्रमाणे शपथपूर्वक त्याग केला. यापुढे आपण कोपर्निकसची मतं स्वीकारणार नाही तसेच त्याचा तोंडी अथवा लेखी प्रचार करणार नाही, असं त्यानं शपथपूर्वक वचन दिलं.
लढे विवेकवादाचे या पुस्तकात प. रा. आर्डे लिहितात की, ” ‘पृथ्वीच सूर्याभोवती फिरते’, या मतासाठी त्याला अनेकदा तंबी मिळाली. त्याचे मित्र पोपची समजूत काढायचे. त्यानंतर मग गॅलिलिओने ‘कोपर्निकस चुकीचा होता’ असे लिहून द्यायचे आणि पुन्हा पलटी खायची असे बरेच वर्षे चाललं.”
फोटो स्रोत, राजहंस प्रकाशन
बर्ट्रांड रसेल ‘धर्म आणि विज्ञान’ पुस्तकात सांगतात की, “गॅलिलियो आशावादी होता, आणि आपली बुद्धिमत्ता मूर्खाविरुद्ध वापरण्यास तो सदैव प्रवृत्त असे. 1623 साली त्याचा मित्र कार्डिनल बाबेरिनी हा ‘आठवा अर्बन’ ही बिरुदावली धारण करून पोपपदावर आरूढ झाला. त्यामुळे गॅलिलियोला थोडी सुरक्षितता वाटू लागली. पण ती निराधार होती हे लवकरच दिसून आले.”
त्यानंतर, गॅलिलिओनं जगातील दोन महान सिद्धांतावर चर्चा’ (Dialogues on the two greatest Systems of the world) हे पुस्तक हे लिहिण्यास घेतलं. ते 1630 साली पूर्ण होऊन 1632 साली प्रसिद्ध झालं. या पुस्तकात त्याने ‘टॉलेमी’ आणि ‘कोपर्निकस’ या दोन सिद्धांताच्यामध्ये ‘ग्रहगोलांच्या भ्रमणाचा प्रश्न’ वरकरणी अनिर्णित ठेवला असला तरी संबंध पुस्तकात वस्तुतः कोपर्निकसच्याच सिद्धांताचा जोरदार पुरस्कार केला आहे. तो एक उत्कृष्ट ग्रंथ होता आणि युरोपभर मोठ्या औत्सुक्याने वाचला जात होता.
पण खवळलेल्या धर्ममार्तंडांनी आता त्याला पुन्हा एकदा निर्णायक निवाड्यासाठी धार्मिक न्यायसभेसमोर हजर राहण्याचा आदेश दिला.
कोठडीतील अंधारी नजरकैद
गॅलिलिओनं पुन्हा एकदा आपली चूक कबूल केली तरच त्याला एरव्ही दिल्या जाणाऱ्या शिक्षेपेक्षा सौम्य शिक्षा दिली जाणार होती.
त्यामुळे, गॅलिलिओनं जमिनीवर गुडघे टेकून न्यायसभेनं तयार केलेली एक लांबलचक जंत्री वाचून दाखवली.
तो म्हणाला की, “मी या चुकांचा व पाखंडी मतांचा त्याग करतो.”
फोटो स्रोत, Getty Images
पण असं सांगितलं जातं की, तरीही न्यायसभेतून बाहेर पडताना तो पुटपुटला होता की, ‘तरीही तीच फिरते…’
त्यानंतरचं उर्वरित आयुष्य त्याला एकांतवासात तसेच मौनव्रतात काढावं लागलं.
न्यायसभेनं त्याच्या सर्व हालचालींवर निर्बंध घातले आणि त्याची आपल्या कुटुंबीयांशी तसेच मित्रांशी भेट होऊ दिली नाही.
तो 1637 साली आंधळा झाला आणि 1642 साली मरण पावला.
बर्ट्रांड रसेल आपल्या पुस्तकात सांगतात की, “ख्रिस्ती धर्म संस्थेच्या नियंत्रणाखाली असलेल्या सर्व विद्वज्जन परिषदातून आणि शैक्षणिक संस्थांतून कोपर्निकसचा सिद्धांत खरा असल्याचे शिकविण्यास चर्चने बंद घातली. ‘पृथ्वी फिरते’ असे शिकविणारे सारे ग्रंथ 1835 सालापर्यंत ‘निषिद्ध ग्रंथांच्या यादीत’ समाविष्ट करण्यात आले होते.”
‘गॅलिलिओ रचिला पाया, न्यूटन झालासे कळस’
ज्यावर्षी गॅलिलिओ मरण पावला, त्याच वर्षी न्यूटनचा जन्म झाला. त्याने गॅलिलिओने रचलेल्या विज्ञानाधिष्ठित इमारतीचा पाया मजबूत तर केलाच, शिवाय ती इमारत कळसाला पोहोचवली.
‘लढे विवेकवादाचे’ या पुस्तकामध्ये प. रा. आर्डे सांगतात की, “गॅलिलिओच्या मृत्यूनंतर तब्बल 340 वर्षांनी म्हणजे 1982 साली सूर्य आणि पृथ्वी यांच्यापैकी कोण कोणाभोवती फिरते या विषयीचा खटला चर्चमध्ये उभा राहिला. त्यावर दहा वर्षे वाद-प्रतिवाद चालू राहिला. 31 ऑक्टोबर 1992 साली पोपने निकाल दिला की, ‘गॅलिलिओला चांगली वागणूक मिळाली नाही आणि पृथ्वीच सूर्याभोवती फिरते.’ त्याअगोदर तीन वर्षे म्हणजे, 1989 साली झेप घेतलेलं ‘गॅलिलिओ’ हे अंतराळयान 1995 साली गुरू ग्रहापर्यंत पोहोचलं. तेव्हा विसाव्या शतकाने गॅलिलिओला केलेला तो सलामच होता. याच गुरूचे चार चंद्र 385 वर्षांपूर्वी गॅलिलिओने दूर्बीणीतून पाहिले होते.”
फोटो स्रोत, Getty Images
मात्र, चर्चने 1992 मध्ये गॅलिलिओ निर्दोष होता, असं थेट जाहीर केलेलं नाही.
पण त्या काळातील धर्मतज्ज्ञांनी बायबलचा शब्दशः अर्थ लावण्यात चूक केली होती, हे मात्र अधिकृतपणे मान्य केलं आहे.
“हा वेदनादायक गैरसमज आता भूतकाळातील आहे, हे अलीकडील ऐतिहासिक अभ्यासातून मिळालेल्या स्पष्टीकरणांवरून आपल्याला हे निश्चित करता येतं,” असं चर्चने म्हटलेलं आहे.
पण, चारशे वर्षांपूर्वी एका मानवानं अपरिमित धैर्य दाखवून डोक्यावर चमचमणाऱ्या नभोमंडळाकडं चिकित्सकपणे नजर वळवली आणि अखिल मानवजातीला हे नभोमंडळ भेदण्याची आस लागली.
थोडक्यात, इतिहास असं सांगतो की, गॅलिलिओचं नभोमंडळाला ग्रासणं वाया गेलं नाही.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC



