Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Getty Images
2 तासांपूर्वी
आपल्या शरीराच्या प्रत्येक क्रियेसाठी पाण्याची गरज असते. परंतु, अतिप्रमाणात पाणी पिणं हे शरीरासाठी घातक ठरू शकतं. अनेकवेळा भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, गरज नसताना पाणी पिणं हे ‘हायपोनेट्रेमिया’सारख्या गंभीर स्थितीला कारणीभूत ठरु शकतं.
पाणी हे जीवनासाठी अत्यावश्यक आहे, परंतु, वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की आपल्या शरीराला पाण्याची गरज अनेक गोष्टींवर अवलंबून असते.
गरजेनुसार पाणी न पिल्यास शरीरात पाण्याची कमतरता म्हणजेच डिहायड्रेशन होऊ शकते, पण खूप जास्त पाणी पिणं सुद्धा जीवघेणं ठरू शकतं का?
आपल्या शरीराच्या वजनापैकी सुमारे 60 टक्के भाग हा पाण्याचा असतो. हे पाणी आपल्या पेशींमध्ये, शरीराच्या अवयवांमध्ये, रक्तात आणि इतर भागांमध्ये असतं.
स्कॉटलंडमधील स्टर्लिंग विद्यापीठातील हायड्रेशन तज्ज्ञ डॉ. निडिया रॉड्रिग्ज-सँचेझ म्हणतात, “पाणी हे एक पोषक तत्त्व आहे. आपण प्रथिने, जीवनसत्त्वे, कार्बोहायड्रेट आणि फायबर्सकडे लक्ष देतो, पण पाण्याला आपल्या जीवनातील एक महत्त्वाचं पोषक तत्त्व मानत नाही.”
शरीरातील पाण्याचं महत्त्व
पाणी जवळपास प्रत्येक शारीरिक क्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. हार्वर्ड मेडिकल स्कूलनुसार, त्याच्या काही प्रमुख भूमिका पुढीलप्रमाणे आहेत –
- पोषक घटक आणि ऑक्सिजन पेशींपर्यंत पोहोचवणं.
- मूत्राशयातून जीवाणूंना बाहेर काढणं.
- अन्न पचवण्यास मदत करणं.
- बद्धकोष्ठता होण्यापासून रोखणं.
- रक्तदाब सामान्य ठेवणं.
- सांध्यांना आराम देणं.
- शरीराच्या अवयवांचं संरक्षण करणं.
- शरीराचे तापमान नियंत्रित करणं आणि
- इलेक्ट्रोलाइटचं (सोडियम) संतुलन राखणं.
पुरेसं पाणी प्यायलं नाही तर काय होईल?
आपलं शरीर सतत घाम, लघवी आणि अगदी श्वास घेत असताना सुद्धा पाणी शरीरातून बाहेर टाकत असतं. शरीर आणि त्यातील अवयव व्यवस्थित कार्य करण्यासाठी, शरीरातून बाहेर गेलेलं पाणी पुन्हा भरणं आवश्यक असतं. या प्रक्रियेला वॉटर बॅलन्स म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
शरीर जेवढं पाणी घेतं त्यापेक्षा जास्त पाणी बाहेर टाकत असतं, त्यामुळं डिहायड्रेशन होऊ शकतं. यामुळं आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.
डिहाइड्रेशनची लक्षणं
- गडद पिवळ्या रंगाची आणि तीव्र वास असलेली लघवी
- नेहमीपेक्षा कमी वेळा लघवी करणं
- चक्कर येणं
- थकवा जाणवणं
- तोंड, ओठ आणि जीभ कोरडी पडणं
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, गंभीर परिस्थितींमध्ये डिहायड्रेशनमुळं त्रास होणं, हृदयाचे ठोके वाढणे आणि अगदी शरीराचे अवयवही काम करणं थांबवू शकतात.
जास्त पाणी पिणे हे धोकादायक ठरु शकतं का?
जास्त पाणी पिण्याचे धोके
- मळमळ आणि उलटी होणं
- डोकेदुखी
- फिट्स येणं, गंभीर अवस्थेत असताना कोमात जाणं
- भास होणं
- थकल्यासारखं वाटणं
- अस्वस्थ वाटणं, चिडचिड होणं
- स्नायू कमकुवत होणं किंवा पायात गोळे येणं
काही लोकांना हे आश्चर्यकारक वाटू शकतं, परंतु जास्त पाणी पिणे धोकादायक ठरु शकतं. त्याचे परिणाम गंभीर असू शकतात.
कमी कालावधीत जास्त पाणी प्यायल्यानं हायपोनेट्रेमिया म्हणजेच पाण्याची नशा होऊ शकते. हे तेव्हा घडतं जेव्हा तुमच्या रक्तातील सोडियमचे प्रमाण धोकादायकरित्या कमी होतं, ज्यामुळं शरीराच्या पेशी फुगतात.
हायपोनेट्रेमियाची लक्षणं
- मळमळ आणि उलटी होणं
- डोकेदुखी
- फिट्स येणं, गंभीर अवस्थेत असताना कोमात जाणं
- भास होणं
- थकल्यासारखं वाटणं
- अस्वस्थता आणि चिडचिड होणं
- स्नायू कमकुवत होणे किंवा पायात गोळे येणं
2018 मध्ये जोहाना पेरी या लंडन मॅरेथॉनमध्ये भाग घेण्यासाठी त्यांची मुलगी आणि जावयासोबत ट्रेनिंग घेत होत्या. त्या दिवशी खूप ऊन होतं. त्यावेळी धावपटूंना पाणी देणाऱ्या स्वयंसेवकांकडून त्यांनी पाणी घेऊन ते भरपूर प्रमाणात पिलं होतं.
जोहाना बीबीसीच्या द फूड चेन कार्यक्रमात बोलत होत्या. “मला त्या मॅरेथॉनमधील खूप कमी गोष्टी आता आठवतात. माझी अवस्था खूप वाईट झाली होती,” असं त्या म्हणाल्या.
या मॅरेथॉननंतर त्या तीन दिवस आयसीयूमध्ये होत्या. शर्यतीदरम्यान, त्यांच्या पतीनं एक व्हीडिओ बनवला होता. ज्यात त्या फिनिश लाइन ओलांडताना दिसत आहेत, परंतु जोहाना यांना ते अजिबात आठवत नव्हतं.
त्या आठवून सांगतात की, “माझे पती आणि इतर काही मित्र तिथे होते. मला पाहून त्यांनी हात उंचावले. माझ्या अंगात त्राण नव्हते. आम्ही कसंबसं घरी पोहोचलो आणि मी बेशुद्ध पडले. मी खरोखरच त्यावेळी खूप आजारी पडले.”
“मी अक्षरशः इतकं पाणी प्यायले होते की, यामुळं माझ्या शरीर आणि मेंदूच्या कार्यासाठी आवश्यक असलेले सर्व क्षार आणि पोषक घटकही त्यामुळं निघून गेले होते.”
जेव्हा शरीर आपल्या क्षमतेपेक्षा आणि गरजेपेक्षा जास्त प्रमाणात द्रव पदार्थ घेतो, तेव्हा काय होऊ शकतं, हे जोहाना यांच्या या प्रसंगातून दिसून येतं.
द्रव पदार्थ रक्तप्रवाहात झपाट्यानं शोषले जातात. शोषले गेलेले अतिरिक्त द्रव पदार्थ किडनी फिल्टर करते आणि त्यानंतर मूत्र तयार होतं. मात्र, माणसाची किडनी दर तासाला केवळ एक लिटर द्रवपदार्थावर प्रक्रिया करु शकते.
आपल्याला किती पाण्याची गरज आहे?
युरोपियन फूड सेफ्टी आथॉरिटी महिलांना दररोज दोन लिटर आणि पुरुषांना अडीच लिटर पाणी पिण्याचा सल्ला देते. यामध्ये केवळ आपण जे पाणी पितो तेच नाही तर अन्नासह सर्व स्त्रोतांमधून शरीरात प्रवेश करणाऱ्या पाण्याचा देखील यात समावेश आहे.
फळे, भाज्या, तांदूळ आणि अगदी शेंगदाण्यांसह बहुतेक पदार्थांमध्ये पाणी असतं. उदाहरणार्थ, कलिंगडमध्ये सुमारे 92 टक्के पाणी असतं.
परंतु हा सल्लाही प्रत्येकासाठी सारखाच असू शकत नाही.

फोटो स्रोत, Getty Images
स्कॉटलंडमधील एबरडीन विद्यापीठाचे प्रोफेसर जॉन स्पीकमन हे स्वतः जगभरातील अभ्यासाचा एक भाग होते. या अभ्यासात 23 देशांतील पाच हजारांहून अधिक लोकांच्या पाणी पिण्यावर लक्ष ठेवण्यात आलं होतं.
प्रोफेसर स्पीकमन सांगतात की, “20 ते 60 वयोगटातील पुरुषांना दररोज सुमारे 1.8 लिटर पाण्याची गरज असते. त्याच वयोगटातील महिलांना दिवसाला 1.5 ते 1.6 लिटर पाण्याची गरज असते. जेव्हा तुम्ही 85 वर्षांचे व्हाल तेव्हा तुम्हाला दिवसाला फक्त एक लिटर पाण्याची गरज असते.”
परंतु एखाद्या व्यक्तीला किती पाण्याची गरज आहे, हे त्याचं वजन, शारीरिक हालचाली, वय, लिंग आणि पर्यावरणीय परिस्थिती यांसारख्या अनेक घटकांवर अवलंबून असतं.
“जर तुम्ही उष्ण आणि दमट भागात राहत असाल, तर तुमची पाण्याची गरज थंड आणि कोरड्या ठिकाणी राहणाऱ्या व्यक्तींपेक्षा जास्त असेल,” असं ते म्हणतात.
तहान हे तुमच्या शरीलाला जास्त पाण्याची गरज आहे, हे सांगण्याचा नैसर्गिक संकेत आहे.
लघवीचा रंग देखील शरीरातील पाण्याचं प्रमाण दर्शवतो. लघवीचा हलका पिवळा रंग हे तुमच्या शरीरात पुरेसं पाणी असल्याचं लक्षण आहे, तर गडद पिवळा रंग पाण्याच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं.
एखाद्या व्यक्तीला उलट्या किंवा जुलाब होत असल्यास, त्याच्या शरीराला जास्त प्रमाणात द्रवपदार्थाची गरज असते. ज्यामुळं शरीरातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचं संतुलन राखलं जातं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC