Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC
रत्नागिरीजवळच्या साखरी नाटे बंदरावर आम्ही पोहोचतो. वेळ सकाळची आहे. ज्यांना जायचं होतं त्या बोटी सकाळी लवकरच मासेमारीसाठी गेल्या आहेत. ज्या बोटी गेल्या काही दिवस समुद्रात होत्या, त्या पहाटेच परतल्या आहेत.
परतलेल्या बऱ्याच बोटींवरचे मासे बंदरावर उतरवून घेऊन राज्यभरातल्या मार्केटकडे कधीच निघून गेले आहेत. पण काही उरलेल्या बोटींतून अजूनही माल उतरवणं चालू आहे. त्यातली एक आमच्या समोर आहे. काही छोटे, काही मोठे मासे बाहेर काढले जाताहेत. बर्फाच्या लाद्या फुटताहेत. झुंबड उडाली आहे.

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC
पण सगळ्या हालचालीत काही तरी वेगळं वाटतं. ते नजरेला नेहमीचं, सवयीचं नाहीये. थोडं व्यवस्थित पाहिल्यावर मग उमगतं, की ते काय आहे. ते चेहरे नवे आहेत. हे चेहरे कोकणच्या बंदरांवर पूर्वी कधी पाहिले नव्हते.
थोडी चौकशी केली की समजतं की हे सगळे मच्छिमार नेपाळी आहेत.
हो कोकणातली गेल्या काही वर्षांमधली विस्मयचकित करणारी नवीन कहाणी आहे. समुद्रातून येणाऱ्या दूरदेशीच्या प्रवाशांना वर्षानुवर्षं सामावून घेणाऱ्या कोकणपट्टीनं गेल्या काही वर्षांत हजारो नेपाळींना सामावून घेतलं आहे.
साखरी नाटे बंदर बरंच जुनं आहे. इथं पिढ्यानं पिढ्या मासेमारीचा व्यवसाय मुस्लीम व्यावसायिकांकडे आहे. त्यांच्या बोटी, पण त्यावर खलाशीकाम करणारे स्थानिक असायचे किंवा कर्नाटकच्या किनारी भागातून यायचे. पण दशकभराच्या काळात जशी गरज वाढत गेली तशी नेपाळी मच्छिमारांनी ती भरुन काढली.
“या एका बंदरावर सध्या तीन ते चार हजार नेपाळी मच्छिमार तरी असतील,” इथले व्यावसायिक अमजद बोरकर या जेट्टीवर बोलत असताना सांगतात.
आणि हे केवळ नाट्याला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातल्या जवळपास सगळ्याच बंदरांवर ही स्थिती आहे. पारंपारिक मासेमारी आता नेपाळींवर अवलंबून झाली आहे.

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC
पण कोकणची ही नवी नेपाळी कहाणी फक्त समुद्रकिनाऱ्यावरच थांबत नाही. ती गोष्ट आंब्याच्या बागांमधूनही फिरते.
मासेमारीपेक्षाही बरीच वर्षं अगोदर नेपाळी कामगार हे या आंब्याच्या बागांमध्ये स्थिरावले आहे. इथंही तोच धागा आहे. स्थानिक मजूर कमी झाले आणि नेपाळी वाढत गेले.
उपजिविकेसाठी स्थलांतर ही मानवाच्या आजवरच्या आर्थिक इतिहासातली अटळ प्रक्रिया आहे.
ती प्रक्रिया नेपाळलाही नवी नाही आणि कोकण किनारपट्टीलाही नाही. गेल्या काही वर्षात ती या दोन्ही एकमेकांपासून हजारो किलोमीटर अंतरावरच्या प्रदेशांना जोडणारी ठरली आहे.
‘इसलिए यहां इंडिया मे आते है…’
नाटे बंदरात खोल समुद्रात जाऊन आलेल्या बोटींकडे जाण्यासाठी आम्हाला एका छोट्या नावेतून थोडं पुढे समुद्रात जावं लागतं. एक नेपाळी व्यक्तीच शिताफीनं नाव वल्हवत एका आत थांबलेल्या बोटीजवळ घेऊन जाते. बोटीवर गेल्यावर एक वेगळंच आयुष्य समोर येतं.
त्या बोटीवर दहा ते पंधरा नेपाळी नागरिक आहेत. सगळेच या बोटीवरचे मच्छिमार. दोन दिवसांपूर्वी परत आले आहेत आणि बहुतेक दुसऱ्या दिवशी परत पहाटे समुद्रात जाण्याची तयारी सुरू आहे. या सगळ्यांचं जणू घरच ही बोट झाली आहे.

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC
या बोटीवरच्या गटाचा प्रमुख वाटावा असा एक जण पुढे येऊन बोलू लागतो. त्याचं नाव बिक्रम चौधरी. मी विचारतो, मासे पकडून काही दिवस बंदरावर आल्यावरही बोटीवरच राहता? इथं घर वगैरे भाड्यानं घेऊन काही दिवस गावात राहत नाही?
“त्या भाड्यासाठी पैसे कशाला खर्च करायचे? सोबत कुटुंब नाही, कोणी नाही. त्यापेक्षा इथं बोटीवरच होतंय ना सगळं,” बिक्रम सांगतो.
त्यानंतर सगळीकडे फिरवून एकेक गोष्ट दाखवत बिक्रम आम्हाला जणू एक गाईडेड टूर देतो. त्याच्या सोबत आलेले इतर मच्छिमार मुख्यत्वे नेपाळच्या कैलाली या भागातले आहेत. इथल्या प्रत्येकाच्या कहाणीत एकच समान धागा आहे. नेपाळमध्ये कमावण्यासाठी काही नाही, म्हणून इकडे येतो.

गेल्या दशकभरात नेपाळी मच्छिमारांची संख्या कोकणात वाढत गेली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मिळून अशा मच्छिमारांची संख्या 20 हजारांवर आहे, असं सांगितलं जातं. ते या बोटींवर राहतात, इथेच जेवतात आणि इथंच कामही करतात.
पण मुख्य प्रश्न असा आहे की ते इथल्या समुद्राशी, वातावरणाशी जुळवून कसं घेतात? नेपाळमध्ये तर समुद्र नाही आणि खोल समुद्रातली मासेमारी तर कोकणातल्या सगळ्या स्थानिकांना जमते असं नाही.
“आमच्या भागात समुद्र नाही, पण मोठ्या नद्या आहेत. तिथं आम्ही मासेमारी करत असतो. पण इथे आलो की त्रास होतोच. जेव्हा खोल समुद्रात जातो तेव्हा काय करावं सुचत नाही. पण हळूहळू आम्ही सरावतो. जाळी टाकणं, रोपण मारणं सगळं आम्ही शिकून घेतो. एकदा सवय झाली की मग पुढे काही त्रास नाही,” बिक्रम सांगतो.

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC
अमजद बोरकर चार दशकांपेक्षा अधिक काळ हा व्यवसाय नाटे बंदरावर पाहताहेत. इथं येऊन दशकभरात स्थिरावलेल्या नेपाळी मच्छिमारांना बघून त्यांनाही आश्चर्य वाटतं. नेपाळी व्यक्तीची सोशिकता हे त्यांना इथे टिकण्याचं कारण वाटतं.
“हे लोक अगदी सुरुवातीपासून समुद्राशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करतात. सिझन जेव्हा सुरू होतो, जेव्हा ते सप्टेंबरच्या आसपास इथे येतात, तेव्हा त्यांना जरुर त्रास होतो. कारण पावसाळ्यानंतर समुद्र खूपच खवळलेला असतो. पण या लोकांना मानायला पाहिजे की त्यांनी समुद्री जीवनाशी जुळवून घेतलं आहे. ज्यांनी कधी समुद्र पाहिलाही नव्हता, ते सगळी कामं सहजासहजी करतात,” अमजदभाई सांगतात.

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC
कोकणचे मासेमारी व्यावसायिक स्थानिक आहेत. इथे कर्नाटक आणि इतर किनारी भागातून स्थानिक मच्छिमार पूर्वीही काम करायला येत असत.
पण मासेमारीचं तंत्र बदललं, अधिक खलाशांची गरज निर्माण झाली. कधीकाळी राखणदारीसाठी येणा-या नेपाळींनी ती पूर्ण केली.
हे केवळ एकट्या नाटे बंदरातच चित्रं आहे असं नाही. आम्ही रत्नागिरी शहराजवळच्या मिरकरवाडा बंदरात जातो. शेकडो बोटी तिथंही लागल्या आहेत. त्याच्या मालकांना भेटतो. इथंही हजारोंच्या संख्येनं नेपाळी मच्छिमार आहेत.
त्यांच्याशी बोलतांना एक समजतं की, यातले काही जण पूर्वी राखणदारीसाठी वा आंब्याच्या बागांमध्ये काम करण्यासाठी आले होते. मग त्यातले काही जण गरज निर्माण झाली तसे मासेमारीकडे सरकले.

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC
“आम्ही यांच्यातल्या एक मुख्य जण असतो, त्याच्याशी बोलतो. तो त्याच्या गावातून किंवा जिल्ह्यातून बाकी लोकांना गोळा करतो. त्यांच्या आगाऊ रक्कम द्यावी लागते. मग ते इथे सहा-सात महिन्यांसाठी येतात,” तमिल तामके सांगतात. त्यांच्या तीन मासेमारीच्या बोटी आहेत.
आंब्याच्या बागांमधले नेपाळी
कोकणच्या नेपाळींची गोष्ट केवळ समुद्रकिनाऱ्यापुरती मर्यादित नाही. तर ती त्याच्याही अगोदर इथल्या आंब्याच्या बागांमध्ये सुरु झाली आहे. जेवढे नेपाळी मासेमारीत आहेत, त्यापेक्षा कित्येक अधिक आंब्याच्या बागेत आहेत.
बागांची राखण करण्यापासून ते आंब्याच्या कलमांची निगा राखणं, आंबे उतरवणे, त्यांचं पॅकिंग करणे, माल मार्केटला पोहोचवणे अशी आणि त्याच्याशी जोडलेली कित्येक कामं हे नेपाळी मजूर करतात.
आंब्याच्या बागांमधली नेपाळींची संख्या वाढत जाण्याचं कारणही हेच आहे की स्थानिक लोक या कामांमधून बाहेर पडत गेले.

फोटो स्रोत, BBC Marathi
“आणि हे नेपाळी फक्त आंब्याच्या बागांमध्येच काम करतात असं नाही. ते शेतीमध्येही आहेत. तिथलीही भात लावण्यापासून तो झोडपण्यापर्यंत सगळी कामं करतात. काही बांधकाम व्यवसायात शिरले आहेत. ड्रायव्हरही आहेत,” सावंत सांगतात.
पावसजवळच्या एका मोठ्या बागेत आम्ही जातो. दिवस कलायला आल्यामुळे बरीच कामं आटोपली आहेत. पण आता महत्त्वाचं आहे अंधारतली बागेची राखण. सगळ्यात जास्त माकडांपासून.

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC
या बागेत खुशीराम आम्हाला भेटतात. त्यांचं मुख्य काम माकडांपासून कलमांची राखण करणं. हातात एक गलोल घेऊन ते बागभर फिरत राहतात. त्यांच्याशी गप्पा सुरू होतात.
सोबत आणखी काही तिशीच्या आसपास असलेले तरुण नेपाळी कामगार आहेत. सगळे कैलालीतल्या एकाच गावचे आहेत. नेपाळमधली त्यांची शेतीची कामं झाली की पुढच्या सहा महिन्यांसाठी ते कोकणात येतात.
“पावसाळ्याच्या आसपास आमची शेतीची काम आटोपली, पेरणी झाली, की मग तिकडे काही काम उरत नाही. मग बसून काय करणार? शिवाय तिकडे कंपनी नाही, काही नाही. म्हणून बरेच जण भारताची वाट पकडतात,” खुशीराम आम्हाला सांगतात.
नेपाळी कामगार 10 ते 15 हजार रुपये महिन्याला कमावतात. नवरा बायको अशी जोडी असेल तर कमाई 18 ते 20 हजारांपर्यंत जाते. भारतातल्या कमाईनं नेपाळच्या आयुष्यात थोडी स्थिरता येते.
भारतीय रुपयांचं मूल्य नेपाळमध्ये वाढतं. त्यामुळे जेवढे पैसे वाचवून ते परत जातील, तेवढी नेपाळमध्ये जास्त रक्कम हाती येते. त्यानं तिथली काही महत्त्वाची कामं होतात. घर बांधता येतं, मुलांच्या शिक्षणाचा खर्च निघतो. खुशीराम त्यांचं गणितच आम्हाला सांगतात.

फोटो स्रोत, BBC Marathi
त्यामुळे या सगळ्यांचा कल जास्तीत जास्त पैसे वाचवून घराकडे नेण्याचा असतो. पगाराव्यतिरिक्त आठवड्याचे 500 रुपये त्यांना वरच्या खर्चासाठी मिळतात. तेही ते वाचवतात. अनेक जण पूर्ण पगार किंवा निम्मा आगाऊ घेऊनच मग कोकणात येतात.
वर्षातला काही काळ नेपाळमध्ये काम आणि उरलेला वेळ भारतात, अशी रचना तयार झाली आहे. त्यांना कोकणात आणणाऱ्या एजंट्सच्या व्यवस्था तयार झाल्या आहेत. दसऱ्यानंतर कोकणात नेपाळच्या सीमेवरुन भरभरुन बस येऊ लागतात.

फोटो स्रोत, BBC Marathi
“पूर्वी आम्ही रेल्वेनं यायचो. आत आमचा एजंट बसेस सोडतो. बॉर्डवरुन इथं रत्नागिरीपर्यंत येण्याचे तो 3500 रुपये घेतो,” संजीत चौधरी सांगतो.
नेपाळी मजूरांना भारतात आणणारं जाळं
वास्तविक भारतात नेपाळी नागरिक कामासाठी येणं हे नवीन नाही. देशभरात अनेक शहरं आणि गावांमध्ये राखणदारीसाठी सिक्युरिटी गार्ड म्हणून नेपाळी व्यक्ती असणं हे अनेकांना नवीन नव्हे.
भारतात कामासाठी येणा-या नेपाळी नागरिकांची निश्चित अधिकृत संख्या सरकार दरबारी उपलब्ध नाही, पण निश्चितपणे ती काही लाखांमध्ये आहे.
याचं कारण आहे भारत आणि नेपाळमध्ये 1950 ला झालेला करार. या कराराच्या विविध तरतुदींपैकी एक आहे की या देशाच्या नागरिकांना काम करण्यासाठी कोणत्याही परवान्याची गरज नाही.
इथल्या सीमा या ‘पोरस’ आहेत आणि त्यामुळे त्या ओलांडून कामासाठी ये-जा करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC
पण गेल्या काही वर्षांमध्ये केवळ राखणदारींच्या कामापुरतं मर्यादित न राहता कष्ट करण्याची तयारी आणि त्यासाठी हवी असलेली कौशल्य असल्यानं विविध क्षेत्रांमध्ये नेपाळी कामगारांची संख्या वाढली. त्यासाठी तयार झालेली ‘इन्फॉर्मल नेटवर्क्स’ ही महत्त्वाची भूमिका बजावतात.
कोकणातल्या आंबा व्यवसाय आणि मासेमारीमध्ये हेच झालं आहे. पूर्वी राखणदारीसाठी नेपाळी नागरिकच येतच होते. पण जशी कामाची गरज निर्माण झाली तशी आपल्या प्रांतातून, नातेवाईकांमधून, मित्रांमधून या प्रकारच्या नेटवर्कमधून येणाऱ्यांचा ओघ वाढत गेला.

“इतर क्षेत्रांमध्ये पाहिलं की ऊसतोड कामगारांना शेतामध्ये आणणारं किंवा वीटभट्टी कामगारांना भट्ट्यांपर्यंत आणणारं जे नेटवर्क आहे, ते अगदी असंच आहे. तसंच कोकणातल्या नेपाळी कामगारांचंही आहे. जिथं स्वस्त कामगार उपलब्ध आहेत तिथून ते आणले जातात. यामध्ये पैसे कमावणारेही तयार झाले आहेत. असे ‘लाँग डिस्टन्स मायग्रेशन’च्या अनेक व्यवस्था तयार झाल्या आहेत,” हातेकर पुढे सांगतात.
नेपाळमध्ये स्थलांतराचा प्रश्न गंभीर आहे. अत्यंत मर्यादित आर्थिक संधी आणि पर्यायानं कमी उत्पन्न, अनेकांना देश सोडायला भाग पाडतं.
नेपाळमधून युरोपात, आखाती देशांमध्ये, भारतात आणि पूर्वेकडच्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर होतं. या स्थलांतरित नागरिकांनी मायदेशात पाठवलेल्या उत्पन्नावरचा कर हे नेपाळाच्या उत्पन्नाचं मोठं साधन आहे.

फोटो स्रोत, BBC Marathi
भारतात येणारे बहुतांश स्थलांतरित नेपाळच्या सीमेलगतच्या तराई म्हणजे सपाटीच्या प्रदेशातले आहेत. कोकणात येणारे नेपाळी नागरिक हे मुख्यत्वे कैलाली या परिसरातले आहेत.
आम्हाला जे कोकणातल्या बंदरांवर आणि आंब्याच्या बागांमध्ये भेटलेले जवळपास सगळे कामगार हे कैलालीचे होते. एकेकाळी वेठबिगारीच्या विळख्यात अडकलेल्या या प्रदेशात आजही आर्थिक उत्पन्नाची साधनं कमी आहेत.
“कैलाली हा नेपाळच्या उत्तरेकरच्या प्रदेशातला एक जिल्हा आहे. तो बहुआयामी गरीबी निर्देशांकात, म्हणजे शिक्षण, आरोग्य, उत्पन्न, याबाबत नेपाळमधला क्रमांक दोनचा गरीब प्रदेश आहे. इथून जे लोक स्थलांतर करतात ते आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातले आहेत.”
“इथे थारोस ही मूलनिवासी जमात आहे. अगदी अलिकडे काही वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या वेठबिगारीमध्येही ते अडकले होते. हे स्थलांतरही मुख्यत्वे त्यांच्या आर्थिक स्थितीशी जोडलेलं आहे,” नेपाळी स्थलांतराचे अभ्यासक आणि काठमांडूस्थित ‘सोशल सायन्स बाहा’ या संस्थेचे उपसंचालक डॉ जीवन बनिया ‘बीबीसी मराठी’शी बोलतांना सांगतात.
पण नेमके किती नेपाळी नागरिक कोकणात आहेत? रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे मिळून हा आकडा 50 हजार ते 1 लाख असा बऱ्याचदा सांगितला जातो. पण आता पोलिसांनी स्थानिक पातळीवर नोंदणी सुरू केली आहे.

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC
त्याची कारणं अनेक आहे. काही अघटित घडलं तर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या सगळ्या कामगारांची माहिती प्रशासनाकडे असायला हवी म्हणून आता प्रत्येक पोलीस स्टेशनच्या पातळीवर ही नोंदणी आवश्यक केली आहे.
नेपाळी कामगारांना कामावर ठेवणारे बागामालक आणि मत्स्य व्यावसायिक यांनी ही नोंदणी पोलिसांकडे करणं आवश्यक आहे. पण अद्यापही सगळ्यांची नोंदणी होत नसल्यानं एकूण निश्चित आकडा तिथेही नाही.
“या नेपाळी नागरिकांची काहीही माहिती आपल्याकडे नसल्यानं आम्ही एक ‘मैत्री’ नावाचं अॅप तयार केलं आहे आणि त्यात नाव, मूळ गांव, तिथला संपर्क क्रमांक, पत्ता, कोणामार्फत इथे आले, कुठे काम करतात अशी वैयक्तिक माहिती भरणं अपेक्षित आहे.”
“गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये 5590 जणांची नोंद झाली आहे. परंतु हा आकडा निश्चित कमी आहे. आमचा असा अंदाज आहे की पंधरा हजारांहून अधिक नेपाळी नागरिक रत्नागिरी जिल्ह्यात काम करतात,” अशी माहिती रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी ‘बीबीसी मराठी’ला दिली.

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC
पण आकड्यांच्या या खेळात प्रश्न मानवी श्रमाच्या अधिकारांचाही आहे. यातले अनेक कामगार हलाखीच्या स्थितीत राहतात. गरजू असल्यानं स्वस्त मिळणारं लेबर म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि तो रस्ता शोषणाकडे जातो.
हीच भीती डॉ. जीवन बनियाही त्यांचा अनेक वर्षांच्या स्थलांतरित नेपाळी कामगारांच्या अभ्यासानंतर व्यक्त करतात.
“स्थलांतरित नेपाळी कामगारांना भारतासारख्या देशांमध्ये कामावर ठेवलं जातं कारण ते या देशांच्या कामगार कायद्यांच्या प्रभावात येत नाहीत. किमान वेतन, सुट्ट्या, विमा अशा गोष्टी त्यांना लागू होत नाहीत.”
“हे केवळ नेपाळी स्थलांतरितांनाच भोगावं लागतं असं नाही. सीमा ओलांडून नेपाळमध्ये काम करणाऱ्या भारतीय कामगारांनाही या सुविधा मिळत नाहीत. शिवाय ते बाहेरच्या देशांमध्ये युनियनही स्थापन करू शकत नाहीत. या स्थितीचा मालक फायदा घेतात आणि स्थलांतरितांचं शोषण सुरु होतं,” डॉ. बनिया सांगतात.
त्यांच्या अधिकारांची दोन्ही देशांनी काळजी घेतली पाहिजे असं अभ्यासकांना वाटतं.

फोटो स्रोत, BBC Marathi
घर सोडलेल्यांच्या कहाण्या
कोकणात येऊन काम करणा-या नेपाळी नागरिकांच्या सगळ्यांच्याच कहाण्या सारख्या नाहीत. प्रत्येकाच्या त्या वेगळ्या आहे. प्रत्येकाचे प्रश्नही वेगळे आहेत.
रत्नागिरीजवळ नेवरे इथे राहणारे 65 वर्षांचे प्रेमकुमार बोहरा हे सुद्धा कैलालीचेच आहेत. त्यांना तर इथे येऊन 25 वर्षं झाली आहेत. त्यांची दोन अपत्यही इथेच झाली.
जेव्हा वयाच्या 18 व्या वर्षी भारतात आले, तेव्हा अगोदर काही वर्षं पंजाबमध्ये काम केलं. मग ओळखीनं, कोणीतरी सांगितलं म्हणून 25 वर्षांपूर्वी रत्नागिरीत पोहोचले आणि इथेच राहिले. सध्या इथल्याच एका बागेत काम करतात. एका रिसोर्टची देखभाल करतात.

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC
आम्ही त्यांना भेटतो तेव्हा त्यांची पत्नी कामावर गेली आहे. धाकटी मुलगी दहावीच्या परीक्षेसाठी गेली आहे. सोबत मुलगा गणेश आहे. त्याचा जन्मही रत्नागिरीचाच आहे. आयुष्याचा एवढा काळ भारतात घालवूनही परत जावं लागणार आहे, हे प्रेमकुमार यांना माहिती आहे.
“आम्ही इथले नागरिक थोडेच आहोत. कितीही वर्षं राहिलो तरी परत जावं लागणारच आहे. कोणतीच कागदपत्रं नाहीत. त्यामुळे उप-यासारखंच रहावं लागतं,” प्रेमकुमार सांगतात.
हा प्रश्न बरीच वर्षं राहणाऱ्या सगळ्याच नेपाळी नागरिकांचा आहे. ते इथे कमावू शकतात, शिकू शकतात, पण नागरिक म्हणून असलेले कोणतेही अधिकार त्यांना नाहीत.
त्यांचा मुलगा गणेश तर इथल्या जिल्हा परिषद शाळेत शिकला. त्यानं नुकतीच बारावीची परीक्षा दिली आहे. नेपाळीपेक्षाही त्याला मराठी भाषा चांगली येते आणि तो आमच्याशीही मराठीतच बोलतो. पण नागरिकत्व नसल्यानं त्याला वाटतं की या शिक्षणाचा उपयोग नेपाळमध्ये जाऊनच त्याला करता येईल.
“रेशन कार्ड किंवा तसलं काही नसल्यानं मला शिष्यवृत्ती पण कधीही मिळाली नाही. मी सरकारी नोकरीतही जाऊ शकत नाही. त्यामुळे शिक्षण झाल्यावर नेपाळमध्येच परत जाऊन व्यवसाय करेन असं मला वाटतं,” गणेश म्हणतो.

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC
दिवसभर बंदरावर आणि नंतर आंब्याच्या बागांमध्ये फिरल्यावर आम्ही संध्याकाळी पावसच्या आठवडी बाजारात फिरतो. इथं नजरेत भरतात ते कोकणच्या रोजच्या आयुष्यात, जणू गावगाड्यात मिसळून गेलेले नेपाळी. स्थानिक आणि बाहेरचे, दोघही आता एकमेकांवर अवलंबून झाले आहेत. घर सोडून आलेल्यांच्या कहाण्या इथंही ऐकू येतात.
दीपा आणि प्रकाश बिश्वकर्मा त्यांच्या मुलांना गावी सोडून, दोघांचे मिळून 16 हजार रुपये महिना पगारावर इथे आलेत.
“टेन्शन तर खूप येतं. मुलं आमची तिकडे आहेत. त्यांच्यामध्ये जीव अडकला आहे. रोज फोनवर बोलतो, पण तरीही अस्वस्थता असतेच. पण काय करणार? हमारी तो मजबूरी है,” दीपा कळकळीनं बोलतात तेव्हा डोळ्यात पाणी असतं.
“गरज आहे म्हणून आम्ही भारतात येतो, पण आम्ही नेमके कोणाचे, कुठले हे प्रश्न सुटत नाहीत. मी तर आंब्याच्या सिझनमध्ये रत्नागिरीत असतो. मग दोनच महिने गावाकडे जातो आणि परत सफरचंदाच्या सिझनमध्ये हिमाचल प्रदेशमध्ये जातो. गेल्या वीस वर्षांपासून हेच चाललं आहे. काय करायचं?” कमल भारती अवघड प्रश्न विचारतात.

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC
नेपाळी नागरिकांची वाढत जाणारी संख्या हा कोकणातला चर्चेचा विषय आहे. त्याला बरेच कंगोरे आहेत. कोकणात स्थानिक असलेल्या या व्यवसायातून स्थानिक कामगार बाहेर पडत गेले, नव्यांची गरज निर्माण होत गेली आणि गरजू असणाऱ्या नेपाळी स्थलांतरितांनी ती पूर्ण केली.
पण या पार्श्वभूमीवर कधीकधी अशीही चर्चा होते की नव्या उद्योगांच्या शोधात असलेल्या कोकणात स्थानिक रोजगार इतरांकडे जात आहेत का?
“कोकणात नवे उद्योग नाहीत हे खरं आहे. इथं पर्यावरणपूरक उद्योग येऊन स्थानिक लोकांना रोजगार मिळणं आवश्यक आहे. ते व्हायलाच हवं. पण याचा अर्थ असा होत नाही की बाहेरचे लोक कोकणात येऊन इथल्या लोकांचा रोजगार हिरावून घेत आहेत.”
“कोकणातले लोक आज बोटीवर काम करायला तयार नाहीत. अंगमेहनतीची काम करायला तयार नाहीत. आणि ही स्थिती सगळीकडे आहे. कारण नव्या पिढीतली मुलं शिकली आहेत. शिकल्यामुळे त्यांच्या अपेक्षाही उंचावल्या आणि ते बरोबरच आहे,” डॉ. नीरज हातेकर म्हणतात.
स्थलांतराची आणि त्यानुसार बदलणाऱ्या अर्थकारणाची किचकट आणि लांब प्रक्रिया सतत सर्वत्र घडून येत असते. नेपाळी स्थलांतरितांमुळे कोकणात घडून येणाऱ्या या प्रक्रियेचे परिणाम कसे होतात याकडे लक्ष असायला हवं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC