Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, AFP via Getty Images
गेल्याच आठवड्यात ओरॅकल (Oracle) या आयटी कंपनीने भारतातील आपल्या 12 हजार कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवून कामावरून काढून टाकले.
भारतासारख्या देशात या एका कपातीमुळे सुमारे 50 ते 60 हजार लोकांच्या आयुष्यावर परिणाम झाला आहे.
सोशल मीडियावर अशा काही धक्कादायक गोष्टी शेअर होत आहेत की, 14 वर्षांचा अनुभव असलेल्यांपासून ते कॅन्सरशी झुंज देणाऱ्या 20 वर्षांच्या अनुभवी कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनाच सकाळी 6 वाजता ओरेकलच्या लीडरशिपकडून एक ईमेल आला जो अतिशय धक्कादायक होता.
खरं तर, यातल्या बऱ्याच लोकांना याची थोडीफार कल्पना आधीपासूनच होती, पण ज्या मोठ्या प्रमाणावर ही कपात झाली, ते पाहून सगळेच चक्रावून गेले.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे (AI) यावर्षी मेटा, आयबीएम आणि अमेझॉनसारख्या कंपन्यांमधून नोकरी गेलेल्यांची संख्या 85 हजारहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे.
ओरॅकलच्या एका माजी महिला कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसी न्यूज हिंदीशी बोलताना सांगितले, “जेव्हा जेव्हा एखादे नवीन तंत्रज्ञान येते तेव्हा अशा गोष्टी अनेकदा घडतातच. याबद्दल मी आणि माझी बहीण नेहमी चर्चा करायचो.”
नोकरी गेलेल्या या कर्मचाऱ्याने माहिती दिली की, ओरॅकलमधील त्यांच्या 4 वर्षांच्या कामाच्या काळात वार्षिक मूल्यमापनात त्यांना नेहमीच 5 पैकी 4 किंवा 5 असे उत्कृष्ट रेटिंग मिळाले होते.
इतकंच नाही तर त्यांना एआयचं प्रशिक्षणही देण्यात आलं होतं जे सध्या आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांसमोर एक मोठी समस्या बनली आहे.
या महिला कर्मचाऱ्याने सांगितले, “इतर सहकाऱ्यांसाठी तर हे खूपच मन सुन्न करणारं आहे. अनेकांचे रेटिंग खूप चांगले होते. त्यामुळे त्यांना धक्का बसला आहे. यातले बरेच जण असे आहेत, ज्यांचे कुटुंब पूर्णपणे त्यांच्या पगारावर अवलंबून आहे. त्यांना घराचे हप्ते (EMI) भरायचे आहेत आणि आजारी असलेल्या वृद्ध पालकांची जबाबदारीही सांभाळायची आहे.”
एआयमुळे झालेले विस्थापन
उत्तर कर्नाटकातील एका शेतकरी कुटुंबातून आलेली ही तरुण महिला ग्रामीण भागातील आहे. ती आणि तिचे पती त्यांच्या कुटुंबातील पहिलीच पिढी आहेत जे शेती सोडून बाहेर नोकरी करत आहेत.
ही महिला म्हणाली, “मी मानसिकदृष्ट्या खंबीर आहे. माझं मत असं आहे की, ज्या गोष्टीवर आपलं नियंत्रण नाही त्यावर वेळ का वाया घालवायचा?”
उद्योग क्षेत्रातील जाणकारही तिच्या या मताशी पूर्णपणे सहमत आहेत.
फोटो स्रोत, AFP via Getty Images
न्यूयॉर्कमधील टेक ॲडव्हायझरी आणि रिसर्च फर्म ‘थोलोंस’चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश वशिष्ठ यांनी बीबीसी न्यूज हिंदीशी बोलताना सांगितले, “तुम्हाला नवीन लोकांना कामावर घ्यावेच लागेल. संपूर्ण इंडस्ट्री आता एआयच्या मदतीने स्वतःला नव्याने तयार करत आहे.”
‘एआय नेटिव्ह’ कोण आहेत?
अविनाश वशिष्ठ यांनी सांगितले, “ज्या लोकांनी कधी लँडलाईन फोन पाहिलाच नाही आणि जे लहानपणापासूनच मोबाईल किंवा टॅबलेट वापरत आले आहेत त्यांना आम्ही ‘एआय नेटिव्ह’ म्हणतो. हे लोक आपल्या नोकरीच्या पहिल्याच दिवसापासून एआयवर काम करतात.”
“तर जे लोक गेल्या 3 वर्षांत या क्षेत्रात आले आहेत आणि गेल्या 2 वर्षांपासून एआय शिकण्यासाठी पुढाकार घेत आहेत ते एखाद्या देशाचे नागरिक होण्यासारखे आहेत. त्यांना आम्ही ‘एआय फर्स्ट’ म्हणतो.”
फोटो स्रोत, AFP via Getty Images
हा बदल एका रात्रीत घडून येईल असे नाही. त्याला काही कालावधी लागेल. परंतु आयटी उद्योग अत्यंत वेगाने बदलत आहे, हे वास्तव आहे. सध्या नोकऱ्यांवर याचा परिणाम नक्कीच होईल, पण मनुष्यबळ तज्ज्ञ आणि प्रसिद्ध एचआर कंपनी ‘टीमलईज सर्व्हिसेस’चे संस्थापक मनीष सभरवाल यांचं मत यापेक्षा थोडं वेगळं आहे.
सभरवाल म्हणाले, “भारतात सध्या सॉफ्टवेअर क्षेत्रातील नोकऱ्यांची संख्या सुमारे 50 लाख आहे, जी भविष्यात 1 कोटींपर्यंत पोहोचेल. एआयमुळे होत असलेला हा बदल तात्पुरत्या स्वरूपाचा आहे की ही एखादी मोठी क्रांती आहे, हे स्पष्ट व्हायला वेळ लागेल.”
“एआयची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांना खूप मदतीची गरज असते. तुम्ही हे तंत्रज्ञान केवळ विकत घेऊन लगेच लागू करता येत नाही.”
एआयचा नोकऱ्यांवर परिणाम?
आयटी क्षेत्रातील इतर कंपन्यांप्रमाणेच ओरॅकलने एआय तंत्रज्ञानावर मोठा खर्च केल्यानंतर कर्मचारी कपात करण्याचा मार्ग स्वीकारला आहे.
विशेष म्हणजे, गेल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 6.13 अब्ज डॉलर्सवर (51 हजार कोटी रुपये) पोहोचला आहे.
एका अहवालानुसार, जगभरातील 30 हजार कर्मचाऱ्यांची कपात केल्यास कंपनीला 8 ते 10 अब्ज डॉलर्सची बचत करणे शक्य होईल.
दुसरीकडे, कंपनीने आपल्या ‘एसईसी’ (SEC) फायलिंगमध्ये 2.1 अब्ज डॉलर्सच्या (17,430 कोटी रुपये) पुनर्रचना आराखड्याची अधिकृत घोषणा केली आहे.
उद्योगावर लक्ष ठेवणाऱ्या एका जाणकाराने नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटले, “एआयमधील (AI) गुंतवणुकीमुळे काही विश्लेषकांनी कर्मचारी कपातीची शक्यता आधीच वर्तवली होती. इतर कंपन्यांप्रमाणे मध्य स्तरावरील कर्मचाऱ्यांना याचा फटका बसेल असे संकेत होते. पण आता असे दिसतेय की, 2 ते 3 वर्षांचा अनुभव असलेले लोकही यात भरडले गेले आहेत.”
बीबीसी न्यूज हिंदीने या प्रकरणावर ओरेकलकडे त्यांची प्रतिक्रिया मागितली आहे. तसेच कंपनी दुसऱ्यांदा कर्मचारी कपात करणार का आणि एआयचे प्रशिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांना का काढले गेले, असे प्रश्नही विचारले आहेत.
फोटो स्रोत, AFP via Getty Images
कंपनीने यावर प्रतिक्रिया देताना म्हटले, “आम्ही या प्रकरणावर कोणतेही भाष्य करू इच्छित नाही.”
दरम्यान, ब्रिटनच्या एका विमा सॉफ्टवेअर कंपनीच्या गुरुग्राम कार्यालयातही असाच धक्कादायक प्रकार घडला.
तिथे कर्मचाऱ्यांना एका बैठकीत बोलावून अवघ्या अडीच तासांमध्ये कामावरून कमी केले गेले. 200 कर्मचारी असलेल्या या कंपनीत आता मोठी कपात झाली आहे.
नोकरी गेलेल्या एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसी न्यूज हिंदीला सांगितले, “प्रत्येक विभागातून टप्प्याटप्प्याने लोकांना काढले जात होते. असे करत सुमारे 20 जणांना कामावरून हटवले.”
“एआय आल्यामुळे बेंचवर म्हणजे राखीव कर्मचारी ठेवण्याची जुनी पद्धत आता संपली आहे. जे काम करायला 50 दिवस लागायचे, ते काम एआय आता फक्त 5 दिवसांत पूर्ण करत आहे.”
प्रोजेक्ट मॅनेजमेंटची जबाबदारी सांभाळणाऱ्या या कर्मचाऱ्याला आणि त्याच्या सहकाऱ्यांना सांगण्यात आलं की, ज्यांची नोकरी जाईल त्यांना नोटीस पिरियडच्या बदल्यात 2 महिन्यांचा पगार, ग्रॅच्युइटी आणि 15 दिवसांचा पगार दिला जाईल.
हे पॅकेज ओरॅकल कर्मचाऱ्यांना मिळालेल्या पॅकेजपेक्षा वेगळं होतं.
ओरॅकलमध्ये प्रत्येक वर्षाच्या सेवेसाठी 15 दिवसांचा मूळ पगार, नोटीस पिरियडसाठी 1 महिन्याचा पगार, राजीनामा दिल्यावर मिळणारे 2 महिन्यांचे पैसे आणि शिल्लक सुट्ट्यांचे पैसे यांचा समावेश होता.
हे सॉफ्टवेअर उद्योगासाठी संकट आहे का?
काही वर्षांपूर्वी ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (GCC) उभारण्याची जी स्पर्धा लागली होती, ती आता व्यवसायाला एका नव्या रूपात आणण्यासाठी धडपडत आहे.
ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (GCC) म्हणजे एखादी बहुराष्ट्रीय कंपनी आपल्या मुख्य देशाबाहेर सुरू केलेली एक विशेष शाखा असते. व्यवसायाची वेगवेगळी कामे एकाच ठिकाणाहून सांभाळणे हा यामागचा उद्देश असतो.
हे कंपनीचे एक ‘ऑफशोअर हब’ असते जिथून तंत्रज्ञान, ऑपरेशन्स, संशोधन, वित्त किंवा ग्राहक सेवा यांसारखी महत्त्वाची कामे हाताळली जातात.
वशिष्ठ यांच्या मते, “ग्राहकांच्या गरजा आणि जीसीसीचे (GCC) काम यात तफावत होती. आता कोडिंग आणि टेस्टिंग यांसारखी कामे तंत्रज्ञानामुळे स्वयंचलित झाल्याने सिस्टम देखभालीचा खर्च कमालीचा घटला आहे.
याच कारणामुळे सध्याचे करार आता अधिक चांगली उत्पादकता देऊ शकतात. ग्राहकांकडूनही GCC वर दबाव वाढतो आहे की, त्यांनी स्वतःला एआयनुसार बदलावे.
पूर्वीच्या आउटसोर्सिंग मॉडेलमध्ये 15 टक्के काम ऑनशोर (क्लायंटच्या देशात) आणि उरलेले ऑफशोर (भारतासारख्या देशात) असायचे. पण नवीन मॉडेलमध्ये हे प्रमाण 50-50 टक्के होण्याची शक्यता आहे.”
फोटो स्रोत, AFP via Getty Images
पण सभरवाल यांच्या मते, “एआय आल्यामुळे ‘सिस्टम इंटिग्रेशन’ची (यंत्रणांची सांगड घालणे) गरज अधिक वाढणार आहे. जुन्या पद्धतीची देखभाल प्रणाली कदाचित कमी होईल, पण सिस्टम इंटिग्रेशन महत्त्वाचं राहील. सॉफ्टवेअर सेवांमध्ये तरुणांसाठी सध्या तरी परिस्थिती ठीक आहे. पुढे हे सर्व एआयच्या कामगिरीवर अवलंबून असेल.”
सभरवाल पुढे असंही म्हणाले, “हो, पगारवाढ थोडी संथ होऊ शकते, पण रोजगाराची समस्या निर्माण होईल, असं मला वाटत नाही. सध्या प्रत्येक जण सॉफ्टवेअर क्षेत्र संपण्याबद्दल बोलत आहे, पण कोणत्याही परिस्थितीत तसं होताना दिसत नाही.”
वशिष्ठ यांनी सांगितले की, पूर्वी GCC मध्ये भरती प्रक्रिया एकाच मुख्य केंद्रातून व्हायची. पण आता 5 हजार ते 10 हजार कर्मचाऱ्यांपर्यंत विस्तार करण्यासाठी केवळ केंद्रीय मॉडेल चालणार नाही, तर तुम्हाला ‘फ्रेंचायझी मॉडेल’सारखे छोटे गट तयार करावे लागतील.
जीसीसीमधील भरतीचं काय होईल?
वशिष्ठ पुढे म्हणाले, “जीसीसीसाठी आताचा संदेश हाच आहे की, त्यांनी तातडीने महाविद्यालयांशी संपर्क साधावा आणि टियर-2 आणि टियर-3 शहरांमधील महाविद्यालयांमध्ये ‘जीसीसी अकादमी’ सुरू करावी. कारण सर्वोत्तम कौशल्ये तिथेच उपलब्ध आहेत.”
“इंटर्नशिपऐवजी आता ‘अप्रेंटिसशिप’वर म्हणजे प्रत्यक्ष कामातून मिळणाऱ्या प्रशिक्षणावर भर दिला पाहिजे. शेवटच्या सेमिस्टरमध्येच विद्यार्थ्यांना कामावर घेण्याचा अधिकार कंपन्यांना असायला हवा. कारण हेच तरुण खऱ्या अर्थाने ‘एआय नेटिव्ह’ आहेत.”
फोटो स्रोत, AFP via Getty Images
ओरॅकलच्या माजी महिला कर्मचाऱ्याच्या मते, पुढे जाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे “सतत नवीन कौशल्ये शिकणे आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहणे. आपण असे इतरही काम करू शकतो, ज्यामुळे आपल्या मुख्य नोकरीच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही.”
त्या महिला कर्मचाऱ्याने पुढे सांगितले की, सोशल मीडियावरील इतरांच्या अनुभवांपेक्षा वेगळा अनुभव मला आला. “मला ईमेल मिळाल्यावर लगेच माझ्या मॅनेजरचा फोन आला. त्यांनी मला खूप मदत केली आणि ते स्वतःही आमच्यासारखेच चकीत झाले होते. आम्हाला कंपनीतून काढण्याचा निर्णय नेमका कोणत्या स्तरावर घेतला गेला याची त्यांनाही कल्पना नव्हती.”
सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये अशा स्वयंचलित ईमेलवर टीका करताना म्हटले, “एका झटक्यात ईमेल पाठवून नोकरीवरून काढण्याच्या या पद्धतीत कर्मचाऱ्याच्या सन्मानाचा कोणताही विचार केला गेला नव्हता.”
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC



