Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
“हा आमचा शेवटचा आणि सर्वोत्तम प्रस्ताव आहे. इराण हा प्रस्ताव मान्य करतो की नाही, हे आता पाहायचं आहे. धन्यवाद,” असं म्हणत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हेन्स यांनी त्यांच्या समोरच्या टेबलावर दोनदा थाप दिली आणि पत्रकार परिषद संपवली.
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराणमध्ये 21 तास चर्चा झाली. मात्र, या चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नाही.
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हेन्स शांतता चर्चेसाठी पाकिस्तानात आले होते. त्यांनी ही चर्चा अयशस्वी ठरल्याची माहिती दिली.
रविवारी (12 एप्रिल) सकाळी 6 नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जे. डी. व्हेन्स म्हणाले की, “पाकिस्ताननं अमेरिका आणि इराणमधील दरी कमी करण्याचा आणि करार घडवून आणण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र, वाईट गोष्ट म्हणजे आम्ही कोणत्याही तोडग्यापर्यंत पोहोचू शकलो नाही.”
“ही अमेरिकेपेक्षा इराणसाठी वाईट गोष्ट आहे. चर्चेला यश आलेलं नाही आणि आम्ही अमेरिकेत परत जात आहोत,” असं अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणाले.
पाकिस्ताननं केलेल्या मध्यस्थीमुळे अमेरिका आणि इराण 2 आठवड्यांच्या शस्त्रसंधीसाठी तयार झाले होते. दोन्ही देशांची शिष्टमंडळं चर्चेसाठी इस्लामाबादला आली होती. इस्लामाबादमधील सेरेना हॉटेलमध्ये दोन्ही बाजूंमध्ये चर्चा झाली.
चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नाही, असं अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांनी सांगितलं.
मात्र, हा करार न झाल्यामुळे दोन आठवड्यांच्या तात्पुरत्या शस्त्रसंधीवर काय परिणाम होईल, हे त्यांनी स्पष्ट केलं नाही.
त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर जवळपास दोन तासांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इसहाक दार यांनीदेखील पत्रकार परिषद घेतली.
दार यांनी सांगितलं की, अमेरिका-इराणमधील चर्चेमध्ये पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका पार पाडत राहील, “दोन्ही बाजूंनी शस्त्रसंधीसाठीची त्यांची कटिबद्धता कायम राखणं आवश्यक आहे.”
इराण-अमेरिका शांतता चर्चा का फिस्कटली?
अमेरिका आणि इराण यांच्यातील शातंतेसाठीची चर्चा निष्फळ ठरण्यामागे वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत.
चर्चेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हेन्स म्हणाले, “आमच्या रेड लाईन्स काय आहेत, आम्ही कोणत्या गोष्टींबाबत तडजोड करू शकतो आणि कोणत्या गोष्टींबाबत करणार नाही, हे आम्ही अतिशय स्पष्ट केलं होतं.”
जे. डी. व्हेन्स यांच्या मते, “त्यांनी (इराण) आमच्या अटी मान्य करणार नाहीत, असं ठरवलं आहे.”
याप्रसंगी पत्रकारांनी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांना विचारलं, “कोणत्या अटी फेटाळण्यात आल्या हे कृपया स्पष्ट सांगा.”
त्यावर उत्तर देताना जे. डी. व्हेन्स म्हणाले की, बंद खोलीत 21 तास चाललेल्या चर्चेची संपूर्ण माहिती ते देणार नाहीत. मात्र “साधी गोष्ट अशी आहे की, ते अण्वस्त्रं तयार करणार नाहीत आणि अशी क्षमता मिळवण्यासाठी आवश्यक असलेली उपकरणंदेखील जमवणार नाहीत, याची खात्री आम्हाला त्यांच्याकडून (इराण) हवी आहे.”
“अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं हे मुख्य उद्दिष्ट आहे आणि आम्ही चर्चेच्या माध्यमातून ते साध्य करण्याचा प्रयत्न केला.”
फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणाले की, इराणची युरेनियम शुद्धीकरण करण्याची क्षमता आधीच नष्ट करण्यात आली आहे. “मात्र इराण कधीही अण्वस्त्रं तयार करणार नाही, अशी इच्छा आम्हाला त्यांच्यामध्ये दिसते आहे का? आतापर्यंत आम्हाला असं दिसून आलेलं नाही.”
एका प्रश्नाला उत्तर देताना जे. डी व्हेन्स म्हणाले की, चर्चेदरम्यान इराणच्या गोठवलेल्या मालमत्तेवर देखील चर्चा झाली. मात्र इराण आमच्या अटी मान्य करेल अशा टप्प्यापर्यंत आम्ही पोहोचलो नाही.
“आम्ही बरीच लवचिक भूमिका घेतली, असं मला वाटतं. राष्ट्राध्यक्षांनी आम्हाला सांगितलं की, तुम्ही चांगल्या हेतूनं चर्चा करायला जा आणि वाटाघाटी यशस्वी करण्याचे पूर्ण प्रयत्न करा. आम्ही तेच केलं. मात्र दुर्दैवानं चर्चेत कोणतीही प्रगती झाली नाही.”
चर्चा सुरू असताना त्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना किती वेळा संपर्क केला आणि राष्ट्राध्यक्ष काय म्हणाले, असं जे. डी. व्हेन्स यांना विचारण्यात आलं.
त्यावर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणाले, “आम्ही राष्ट्राध्यक्षांबरोबर सातत्यानं संपर्कात होतो. गेल्या 21 तासांमध्ये आम्ही किती वेळा बोललो, ते मला माहीत नाही. कदाचित डझनभर वेळा बोलणं झालं असेल.”
“आम्ही, ॲडमिरल कूपर (सेंटकॉम कमांडर), मार्को रुबिओ (परराष्ट्र मंत्री), पीट हेगसेथ (संरक्षण मंत्री) आणि संपूर्ण राष्ट्रीय सुरक्षा टीमच्या संपर्कात होतो. आम्ही सातत्यानं संपर्कात होतो, कारण आम्ही चांगल्या हेतूनं चर्चा करत होतो.”
पत्रकार परिषद संपताच अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हेन्स म्हणाले, “आम्ही तोडगा काढण्यासाठी एक सोपा प्रस्ताव दिला आहे. हा आमचा शेवटचा आणि सर्वोत्तम प्रस्ताव आहे. इराणला हा प्रस्ताव मान्य आहे की नाही, हे आता पाहायचं आहे.”
या पत्रकार परिषदेनंतर जे. डी. व्हेन्स रावळपिंडीच्या नूर खान हवाई तळावर गेले आणि तिथून अमेरिकेला निघून गेले.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर, परराष्ट्र मंत्री इसहाक डार आणि गृह मंत्री मोहसिन नकवी यांनी जे डी व्हेन्स यांना निरोप दिला.
अमेरिकेनं लवचिकता दाखवली नाही – इराणमधील प्रसारमाध्यमं
इराणमधील सरकारी प्रसारमाध्यमांनुसार, अमेरिकेच्या ‘अवाजवी मागण्यां’मुळे युद्ध संपवण्यासाठी होत असलेल्या चर्चेत अडथळा आला.
आयआरआयबी या इराणच्या सरकारी ब्रॉडकास्टरनं टेलीग्रामवरील पोस्टमध्ये म्हटलं, “इराणच्या शिष्टमंडळानं अनेक प्रयत्न करूनदेखील, अमेरिकेकडून अवाजवी मागण्या करण्यात आल्या. त्यामुळे चर्चेमध्ये अडथळा निर्माण झाला. अशाप्रकारे चर्चा संपली.”
इराणच्या संसदेचे सभापती मोहम्मद बगर गालिबाफ यांच्या नेतृत्वाखाली इराणचं शिष्टमंडळ शुक्रवार (10 एप्रिल) आणि शनिवारच्या (11 एप्रिल) मध्यरात्री इस्लामाबादमध्ये पोहोचलं.
तर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हेन्स, स्टीव्ह विटकॉफ, जेरेड कुशनर आणि अमेरिकेचे इतर अधिकारी शनिवारी (11 एप्रिल) सकाळी पाकिस्तानात पोहोचले.
दोन्ही शिष्टमंडळांनी स्वतंत्रपणे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, परराष्ट्र मंत्री इसहाक दार आणि फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची भेट घेतली.
या बैठकींनंतर पाकिस्तानच्या सरकारकडून देण्यात आलेल्या वक्तव्यांमध्ये म्हटलं होतं की, पाकिस्तान मध्यस्थी करणं सुरू ठेवेल.
तसंच, शनिवारी (11 एप्रिल) होणारी चर्चा संघर्षातून मार्ग काढण्याच्या दिशेनं टाकलेलं एक पाऊल असेल, अशी आशादेखील त्यात व्यक्त करण्यात आली.
फोटो स्रोत, AFP via Getty Images
पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी बीबीसीला सांगितलं की, इराणी आणि अमेरिकेच्या शिष्टमंडळांमध्ये आधी पाकिस्तानच्या माध्यमातून संदेशांची देवाण-घेवाण झाली. त्यानंतर दोन्ही बाजूंनी पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अडीच तास चर्चा केली.
त्यानंतर एक तासाची विश्रांती घेण्यात आली. सादर करण्यात आलेल्या मागण्यांच्या तांत्रिक पैलूंवर इराणच्या आणि अमेरिकेच्या तज्ज्ञांमध्ये चर्चा झाली.
पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनुसार, तांत्रिक मुद्द्यांच्या बाबतीत रात्री उशिरापर्यंत संदेशांची देवाण-घेवाण सुरू होती.
तस्नीम या इराणच्या वृत्तसंस्थेनं दावा केला की, अमेरिकेच्या भूमिकेत लवचिकपणा नसल्यामुळे चर्चा निष्फळ ठरली.
तस्नीमनुसार, इराणच्या संसदेचे सभापती गालिबाफ यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या शिष्टमंडळानं लष्कर प्रमुखांची किमान 2 वेळा आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांची एकदा भेट घेतली. “जेणेकरून आवश्यक गोष्टींची पूर्तता करता यावी आणि चर्चेच्या सुरुवातीलाच अमेरिकेनं वचनभंग केल्याबद्दल औपचारिक निषेध नोंदवता यावा.”
इराणच्या वृत्तसंस्थेनुसार, अमेरिकेच्या शिष्टमंडळाबरोबर 21 तासांहून अधिक वेळ चर्चा चालली. यादरम्यान इराणनं वारंवार त्यांचे प्रस्ताव मांडले आणि “अमेरिकेला वास्तवाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला.”
तस्नीम या वृत्तसंस्थेनं दावा केला, “प्रत्येक टप्प्यावर अमेरिकेकडून करण्यात आलेल्या जास्तीच्या मागण्यांमुळे संयुक्त आराखडा तयार होण्यात अडथळा निर्माण झाला. अमेरिकेच्या भूमिकेत लवचिकता नसल्यामुळे चर्चा निष्फळ ठरली.”
बातमीत पुढे म्हटलं की, चर्चेच्या पुढील फेरीसाठीची वेळ, स्थान आणि प्रक्रिया याबाबत अद्याप कोणताही कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नाही.
सेरेना हॉटेलपासून एक किमी अंतरावर काय परिस्थिती होती?
बिर्याणी, फ्राईड राईस, चिकन, कबाब आणि मिठायादेखील. शनिवारी (11 एप्रिल) इस्लामाबादमधील ज्या सेरेना हॉटेलमध्ये इराण आणि अमेरिकेच्या शिष्टमंडळांमध्ये थेट चर्चा झाल्या, तिथला हा मेन्यू नव्हता.
तर हे दृश्य तिथून एक किलोमीटर अंतरावरील जीना कन्व्हेंशन सेंटरमधील होतं. तिथे जगभरातून आलेल्या पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.
फोटो स्रोत, Reuters
जर दुसरा कोणताही प्रसंग असता, तर पाकिस्तान सरकारनं केलेल्या या व्यवस्थेचं कौतुक झालं असतं. मात्र तिथे देशातील आणि परदेशातील पत्रकार आलेले होते. ते ‘एक्सक्लूझिव्ह’ बातमीच्या शोधात तिथे आले होते.
पाकिस्तानच्या मध्यस्थतेखाली अमेरिका आणि इराणमध्ये होत असलेल्या चर्चेचं वार्तांकन करण्यासाठी ते तिथे आलेले होते.
हॉटेलच्या बाहेर रस्त्यावर बस उभ्या होत्या. त्या बस पत्रकारांना जीना कन्व्हेंशन सेंटरला घेऊन जात होत्या. तिथे सुरक्षेच्या कारणांमुळे गाड्या आणि अधिकृत नसलेल्या लोकांच्या वावरावर बंदी होती.
बसमधील परदेशी पत्रकारांचा उत्साह स्पष्टपणे दिसत होता.
मी, एका परदेशी मीडिया हाऊसशी संबंधित महिला पत्रकाराला फोनवर असं म्हणताना ऐकलं, “सर्वाचं लक्ष पाकिस्तानवर आहे.”
माहितीचा अभाव, मात्र खाण्याची चंगळ
थोड्या वेळातच आम्ही जीना कन्व्हेंशन सेंटरमध्ये पोहोचलो. तिथे देशातील आणि परदेशातील अनेक पत्रकार उपस्थित होते. ती जणूकाही एक जत्राच होती, जिथे सर्व भाषा कानावर पडत होत्या.
कोणी इंग्रजीत, कोणी उर्दूमध्ये, कोणी पश्तूमध्ये आणि कोणी युरोपातील इतर भाषांमध्ये कॅमेरा आणि फोनवरून रिपोर्टिंग करत होतं.
मी विचार करत होतो की, इथे काम कशाप्रकारे होईल. मी एका परदेशी महिला पत्रकाराला विचारलं, “इथून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या सेरेना हॉटेलमध्ये इराण आणि अमेरिकेच्या शिष्टमंडळांमधील बैठकांमध्ये काय होतं आहे, याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का?”
त्यावर त्या महिला पत्रकारानं उत्तर दिलं, “कदाचित कन्व्हेंशन सेंटरच्या बाहेर असणाऱ्या काही पत्रकारांकडे माहिती असेल. मात्र इथे कोणाकडेही काहीही माहिती नाही.”
फोटो स्रोत, Getty Images
मी हीच गोष्ट वेगवेगळ्या शब्दांमध्ये इतर पत्रकारांच्या तोडून ऐकली. संपूर्ण दिवसभर इथे राहूनदेखील, आत काय चाललं आहे, याची माहिती देऊ शकणारा कोणताही सरकारी अधिकारी मला दिसला नाही.
“कोणालाही चर्चेबद्दल काही माहिती आहे का?” हाच प्रश्न स्थानिक आणि परदेशी पत्रकार एकमेकांना वारंवार विचारत होते.
माहितीचा अभाव आणि धिम्या गतीनं चालणारं इंटरनेट यामुळे दिवसभर पत्रकारांना त्रास झाला.
यादरम्यान सेरेना हॉटेलमध्ये पाकिस्तानच्या मध्यस्थीनं अमेरिका आणि इराणमध्ये थेट चर्चा सुरू होती. त्याच्याशी संबंधित माहिती घेत असताना, धिम्या गतीनं चालणाऱ्या इंटरनेटमुळे माझा संपर्कदेखील अनेकदा तुटला.
इथून रिकाम्या हाती जायची वेळ येऊ नये, अशीच प्रार्थना जगभरातून इस्लामाबादमध्ये आलेले पत्रकार करताना दिसले. ही एक मोठी बातमी होती आणि संघर्ष संपणं, यापेक्षा मोठी बातमी असू शकत नाही.
त्यासाठी कन्व्हेंशन सेंटरमध्ये बसलेले पत्रकार, चर्चा सुरू असलेल्या सेरेना हॉटेलवर लक्ष ठेवून होते.
पत्रकार ज्या बातमीची वाट पाहत होते, ती बातमी रविवारी (12 एप्रिल) सकाळी 6 नंतर आली. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हेन्स यांनी चर्चा निष्फळ ठरल्याचं जाहीर केल्यानंतर चित्र स्पष्ट झालं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC



