Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
अपडेटेड 5 तासांपूर्वी
वाचन वेळ: 6 मिनिटे
सुनीता विल्यम्स आणि शुभांशु शुक्ला, ही दोन नावं समोर आली की डोळ्यांसमोर अथांग अंतराळ उभं राहतं आणि त्या अंतराळाचा वेध घेण्याचं स्वप्नही प्रत्यक्षात उतरलेलं दिसू लागतं.
सोबतच मनात हा विचारही येतो की, आपणही कधी अंतराळापर्यंत पोहोचू शकू का?
कोणत्याही मानवी अंतराळ मोहिमेचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे त्यातला ‘अंतराळवीर’ असतो.
शुभांशू शुक्ला यांनी भारतीय हवाई दलाच्या कॉकपिटपासून ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापर्यंतचा देदिप्यमान प्रवास करून दाखवला आहे.
तर सुनीता विल्यम्स यांचा प्रवास नौदलातील पायलट म्हणून सुरू झाला आणि तिथून त्या नासा आणि पुढे थेट इंटरनॅशनल स्पेस स्टेशनपर्यंत पोहोचल्या.
आता हे सर्व पाहिल्यानंतर अनेकांच्या मनात हा प्रश्न येऊ शकतो की, अंतराळात जाण्याचा मार्ग फक्त लष्करातूनच जातो का? एखादा सर्वसामान्य माणूसही अंतराळवीर होण्याचं स्वप्न पाहू शकतो का? आणि ते पूर्ण करणं शक्य आहे का?
करियर कनेक्टच्या आजच्या भागात आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत की, भारतात अंतराळवीर- ॲस्ट्रोनॉट कसं होता येतं? त्यासाठी नक्की काय शिकावं लागतं आणि तयारी कशी करावी लागते?
ॲस्ट्रोनॉट म्हणजे नक्की कोण आणि ते काय करतात?
ॲस्ट्रोनॉट कसं व्हायचं, हे जाणून घेण्याआधी ते नक्की कोण असतात हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.
तर अंतराळवीर म्हणजे अशा व्यक्ती ज्यांना अंतराळात जाण्यासाठी तिथे राहून काम करण्यासाठी आणि एखादी मोहीम फत्ते करण्यासाठी खास प्रशिक्षण दिलेलं असतं. हे लोक स्पेसक्राफ्ट म्हणजे अंतराळयानाच्या बाहेर पडून ‘स्पेसवॉक’ सुद्धा करतात. त्यासोबतच विज्ञान, तंत्रज्ञान आणि मानवाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे प्रयोग आणि कामं ते तिथे पूर्ण करतात
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थान इस्त्रोने अंतराळ विज्ञानाशी संबंधित शिक्षण आणि माहितीला प्रोत्साहन देण्यासाठी देशभरातून 237 ट्युटर्सची निवड केली आहे. यामध्ये अनेक एनजीओ आणि खासगी संस्थांचा समावेश आहे.
ज्या विद्यार्थ्यांना स्पेस सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये रस आहे, ते या ट्युटर्सकडे नाव नोंदवू शकतात. यातीलच एक संस्था म्हणजे ‘निम्बस एज्युकेशन’ ज्याचे संचालक मनीष पुरोहित यांनी स्वतः इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम केलं आहे.
फोटो स्रोत, Reuters
मनीष पुरोहित सांगतात की, “जसं डॉक्टर किंवा इंजिनिअर असतं, तसंच ‘ ॲस्ट्रोनॉट’ हे सुद्धा एक करिअर आहे. आपण ज्यांना अंतराळवीर म्हणतो, त्यांना अमेरिका, कॅनडा किंवा जपानमध्ये ‘ ॲस्ट्रोनॉट ‘ म्हणतात. रशियामध्ये त्यांना ‘कॉस्मोनॉट’ म्हटलं जातं, तर चीनमध्ये ‘तायकोनॉट’ म्हणतात. आणि भारताच्या अंतराळवीरांना आपण ‘गगनयात्री’ म्हणतो.”
आता प्रश्न हा पडतो की, हे ॲस्ट्रोनॉट, कॉस्मोनॉट, ताइकोनॉट किंवा गगनयात्री नक्की करतात काय?
याबद्दल ‘सायेस्ट्रा’ या एड्युटेक कंपनीच्या संशोधन शास्त्रज्ञ यशिका पंडिता सांगतात की, प्रत्येक अंतराळवीराची जबाबदारी वेगवेगळी असते.
काही जणांवर प्रयोगांची जबाबदारी असते, तर काही जण उपग्रह प्रक्षेपित करणे किंवा स्पेसक्राफ्टच्या यंत्रणांची देखभाल करण्याचे काम करतात. जे अंतराळ यान चालवतात, त्यांना ‘पायलट ॲस्ट्रोनॉट’ किंवा कमांडर म्हटलं जातं.
मनीष पुरोहित यांच्या मते, अंतराळवीर असणं ही एक ‘फुल टाइम’ नोकरी आहे. ते जेव्हा अंतराळात नसतात, तेव्हाही ते अंतराळवीरच असतात. ते सोप्या भाषेत समजवून सांगतात, “एखाद्या फायटर पायलटचं उदाहरण घ्या. रोज तर काही युद्ध होत नाही, मग उरलेल्या वेळी ते काय करतात? तर ते स्वतःला तयार ठेवतात, सतत ट्रेनिंग घेतात आणि नवीन तंत्रज्ञान शिकत राहतात. तसंच अंतराळवीरांचंही असतं ते सतत स्वतःला अपडेट ठेवत असतात आणि जमिनीवर राहून टीमला मदत करत असतात.”
ॲस्ट्रोनॉट कसं होता येतं?
भारत 2027 पर्यंत ‘गगनयान’ हे आपलं पहिलं मानवी मिशन अंतराळात पाठवण्याच्या तयारीत आहे. यासाठी चार पायलट्सची निवडही झाली आहे, ज्यात शुभांशू शुक्ला यांचं नाव आहे. त्यांच्यासोबत ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन आणि ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप हे हवाई दलाचे अधिकारी सुद्धा या मोहिमेवर जाणार आहेत.
या चौघांची निवड करणं सोपं नव्हतं. एअरफोर्सच्या अनेक पायलट्समधून, कठीण शारीरिक आणि मानसिक चाचण्या घेऊन त्यांना निवडलं गेलं. त्यानंतर त्यांनी रशियामध्ये 13 महिने खूप कठीण ट्रेनिंग घेतलं.
पण तुमच्या-आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला जर अंतराळवीर बनायचं असेल, तर काय करावं लागेल?
खरं तर, अंतराळवीर होण्यासाठी असा कोणताही एकच ठराविक कोर्स किंवा कॉलेज नाही. पण काही स्टेप्स आहेत ज्या फॉलो करून तुम्ही तुमचं हे स्वप्न पूर्ण करू शकता.
फोटो स्रोत, EPA
मनीष पुरोहित सांगतात की, “याची तयारी दहावीच्या निकालापासूनच सुरू होते. पहिली पायरी म्हणजे, 11 वी मध्ये सायन्स घेणं गरजेचं आहे ज्यात केमिस्ट्री, फिजिक्स आणि मॅथ्स हे मुख्य विषय असावेत. त्यानंतर 12 वी झाल्यावर पदवी शिक्षणही याच विषयांशी संबंधित क्षेत्रात पूर्ण करावं लागतं.”
पण फक्त पदवी असून चालत नाही. अंतराळवीर होण्यासाठी एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून मास्टर्स किंवा डॉक्टरेट म्हणजेच PhD करणं खूप महत्त्वाचं आहे. विशेषतः गणित, बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स किंवा एयरोस्पेस इंजिनीअरिंग यांसारख्या विषयांत तुमचं उच्च शिक्षण असायला हवं.
हे शिक्षण पूर्ण झाल्यावर, इस्रो किंवा इतर कोणत्याही स्पेस एजन्सीकडून जेव्हा नोकरीसाठी जाहिरात निघते, तेव्हा त्यासाठी परीक्षा द्याव्या लागतात. नासा सुद्धा असंच करतं ते अंतराळवीरांच्या बॅचसाठी अर्ज मागवतात. ज्यांच्याकडे आवश्यक शिक्षण आणि पात्रता आहे, ते तिथे अर्ज करून नासाचा भाग बनू शकतात.
मेडिकल फिटनेस
जर कोणाला अंतराळवीर बनायचं असेल, तर शारीरिक पात्रता सर्वात महत्त्वाची असते. मनीष पुरोहित सांगतात की, म्हणूनच अंतराळवीरांच्या निवड करताना लष्करी वैमानिकांना जास्त पसंती दिली जाते.
ते म्हणतात, “लष्करी वैमानिकांचे ट्रेनिंग खूप कठीण असते. मोठमोठी हेलिकॉप्टर्स आणि वेगवेगळी विमानं चालवणं सोपं नसतं, पण ते हे काम सराईतपणे करतात. कोणत्याही क्षणी बदलणारी परिस्थिती कशी हाताळायची आणि मोठ्या संकटातही डोकं कसं शांत ठेवायचं याचं त्यांना खास शिक्षण मिळालेलं असतं.”
पुरोहित सांगतात, “सध्या आपले सर्व गगनयात्री हे फायटर पायलट आहेत. कारण शारीरिक तंदुरुस्तीच्या बाबतीत ते जगातले सर्वोत्तम लोक आहेत. त्यांच्यामध्ये प्रचंड ताण आणि दडपण सहन करण्याची ताकद असते. मानसिकदृष्ट्या ते इतके खंबीर असतात की त्यांना कोणीही डगमगवू शकत नाही. फायटर पायलट असल्याने त्यांना आधीच ठाऊक असतं की ‘हाय रिस्क’ आणि ‘हाय स्ट्रेस’ जॉब काय असतो, जीवावर बेतणारे प्रसंग कोणते असतात आणि पापणी लवण्याच्या आत निर्णय कसा घ्यायचा असतो.
फोटो स्रोत, X/@AstroPeggy
या लोकांना अतिशय वेगाने विमानं उडवण्याची सवय असते. विमानाचा वेग अचानक वाढला किंवा कमी झाला, तरी त्यांना फरक पडत नाही. अगदी विमान झोका देऊन खाली कोसळू लागलं, तरी परिस्थिती कशी सावरली पाहिजे हे त्यांना चांगलंच ठाऊक असतं.
जेव्हा 8-9 लाख कोटी किलोचं रॉकेट खालून आग ओकत वर झेपावतं, तेव्हा स्पेसक्राफ्टचा वेग प्रचंड असतो.
अशा कठीण मोहीम यशस्वी करण्यासाठी आजवर फायटर पायलट्सनाच सर्वात योग्य मानलं गेलं आहे.
मनीष पुरोहित पुढे सांगतात की, “अशा वेळी कोणाचंही ब्लड प्रेशर अचानक वाढू शकतं किंवा इतर शारीरिक त्रास होऊ शकतात. म्हणूनच मेडिकल टेस्टमध्ये तुमची सहनशक्ती तपासली जाते. तुम्ही किती त्रास सहन करू शकता आणि त्या कठीण परिस्थितीतही तुमची वागणूक किती सामान्य राहते, हे तिथे पाहिलं जातं.”
इस्रोशी जोडले जाण्यासाठी काय आवश्यक आहे?
इस्रोमध्ये अंतराळवीर म्हणून निवड होण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत:
- नागरिकत्व: सर्वात आधी, तुम्ही भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.
- शिक्षण: एखाद्या चांगल्या कॉलेजमधून इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, कॉम्प्युटर सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा मॅथ्समध्ये पदवी घेतलेली असावी.
- उच्च शिक्षण: एयरोनॉटिकल किंवा एयरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स किंवा डॉक्टरेट (PhD) पदवी असणे अधिक फायदेशीर ठरते.
- अनुभव: भारतीय हवाई दलाच्या (IAF) पायलट्सना यात जास्त पसंती दिली जाते, कारण त्यांना विमानं उडवण्याचा दांडगा अनुभव असतो.
या सर्व अटी पूर्ण केल्यानंतरही इस्रोने तुमचा अर्ज मंजूर करणे आणि तुमची ट्रेनिंग पूर्ण होणे गरजेचे असते. हे ट्रेनिंग साधारण 2 वर्षे चालते.
फोटो स्रोत, AFP via Getty Images
तज्ज्ञांच्या मते, सध्या भारतात अशा प्रकारची थेट भरती झालेली नाही, पण ‘गगनयान’ मोहिमेच्या यशानंतर ती नक्कीच सुरू होईल. जागतिक नियमांनुसार, अंतराळवीर होण्यासाठी वय साधारण 35 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे लागते. तसेच, मनीष पुरोहित यांच्या मते, तुमची उंची एका ठराविक मर्यादेत असणे आणि दृष्टी उत्तम असणेही तितकेच गरजेचे आहे.
आणि तुमचं स्वप्न नासा मध्ये जायचं असेल तर…
अमेरिकेची स्पेस एजन्सी ‘नासा’मध्ये अंतराळवीर होण्यासाठी सगळ्यात पहिली अट म्हणजे तुम्ही अमेरिकेचे नागरिक असायला हवे. यशिका पंडिता यांच्या मते, तिथेही विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयातील पदवी असणं सक्तीचं आहे.
पण मग एखाद्या भारतीयाला नासामध्ये जायचं असेल तर काय?
यावर यशिका पंडिता सांगतात, “नासा असो किंवा रशियाची ‘रोसकॉस्मोस’ या संस्था देशाच्या सुरक्षेसाठी खूप महत्त्वाच्या असतात. तिथे अत्यंत गोपनीय तंत्रज्ञानावर काम चालतं. त्यामुळे कोणताही देश दुसऱ्या देशाच्या नागरिकाला सहजासहजी तिथे प्रवेश देत नाही. हो, पण जर एखादा भारतीय माणूस अमेरिकेचा नागरिक झाला असेल, तर मात्र त्याला नासामध्ये काम करणं सोपं जातं.”
या शिक्षणाशिवाय तुमच्याकडे लीडरशिप, टीममध्ये काम करण्याची वृत्ती आणि संवाद कौशल्य असणंही तितकंच गरजेचं आहे.
आता शेवटचा प्रश्न एका अंतराळवीराचा पगार किती असतो?
याचा नक्की आकडा सांगणं कठीण आहे, पण एका अंदाजानुसार भारतात एका अंतराळवीराला महिन्याला साधारण 90 हजार रुपयांच्या आसपास पगार मिळतो. याशिवाय त्यांना बोनस आणि इतर अनेक खास सोयी-सुविधाही दिल्या जातात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC



