Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Facebook/ashwini.gore.338
अश्विनी बिद्रे-गोरे या महिला पोलीस अधिकाऱ्याची हत्या झाल्यामुळे साधारण 9 वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता.
अश्विनी यांचा मृतदेह, हत्येसाठी वापरण्यात आलेलं हत्यार आणि इतरही पुरावा हाती येत नसल्यामुळे हे प्रकरण अतिशय गुंतागुंतीचं झालं होतं. महिला आणि त्यातही एक पोलीस अधिकारी बेपत्ता झाल्यामुळे अनेक प्रश्नचिन्हं निर्माण झाले होते.
पण, पती आणि कुटुंबानं केलेला संघर्ष, सरकारी वकिलांनी योग्यरीतीनं मांडलेली बाजू आणि एका महिला पोलीस अधिकाऱ्यानंच अतिशय उत्तमरीतीनं केलेला तपास यामुळे अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येचा आरोप असलेल्या अभय कुरुंदकर या बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला न्यायालयानं अखेर दोषी ठरवलं आहे.
एका महिला पोलीस अधिकाऱ्याची हत्या झाली, त्यात आरोपीही पोलीस अधिकारी आणि प्रकरणाचा चोख तपास करणाऱ्या दुसऱ्या महिला पोलीस अधिकारी, असं हे विलक्षण प्रकरण आहे.
हे संपूर्ण प्रकरण काय आहे, ही हत्या का झाली, अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या कुटुंबानं ही लढाई कशी लढली, पोलीस दलाची यातील भूमिका कशी होती याबद्दल जाणून घेऊया.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
अश्विनी बिद्रे-गोरे या नवी मुंबईतील कळंबोलीतून 15 एप्रिल 2016 पासून बेपत्ता झाल्या होत्या.
पण त्या बेपत्ता झाल्या नसून वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांनीच बिद्रेंना बेपत्ता केल्याचा आरोप अश्विनी बिद्रे यांच्या कुटुंबानं केला होता.
तपासात पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप सुरुवातीला अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी केला होता.
अश्विनी जयकुमार बिद्रे या मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आळते गावच्या होत्या. 2005 साली त्यांचा विवाह हातकणंगले गावातील राजू गोरे यांच्यासोबत झाला. लग्नाआधीपासूनच म्हणजे 2000 सालापासून त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या.
लग्न झाल्यानंतर एकाच वर्षातच अश्विनी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यांना पोलीस उप-निरीक्षक पद मिळालं.

फोटो स्रोत, Alpesh Karkare
पोलीस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे आणि त्यानंतर सांगली इथे झाली. यादरम्यान त्यांची ओळख त्याच पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्यासोबत झाली.
या दोघांमध्ये जवळीक वाढली. त्यानंतर 2013 साली अश्विनी बिद्रे यांना प्रमोशन मिळाल्यानं त्या रत्नागिरीला आल्या.
अभय कुरुंदकर तिथंही अश्विनीला भेटण्यासाठी वारंवार यायचे. हे सर्व प्रकरण अश्विनी यांचे पती आणि वडिलांना समजलं होतं.
पण त्यानंतर काही कालावधीनंतर अश्विनी बिद्रे-गोरे बेपत्ता झाल्या आणि त्यांचा खून झाल्याचं अखेर उघड झालं.
अभय कुरुंदकर यांचा बालपणीचा मित्र असलेल्या महेश फळशीकरनं अश्विनी यांच्या हत्येची कबुली दिली होती.
धक्कादायक म्हणजे अश्विनी यांची हत्या करुन, लाकूड कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मशीननं त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले होते. त्यानंतर हे तुकडे वसईच्या खाडीत फेकून देण्यात आले होते.
लॅपटॉपमधून मिळाली माहिती
दरम्यान अश्विनी बिद्रे यांच्याशी कोणताच संपर्क होत नसल्याने पती राजू गोरे आणि मुलगी सिद्धी चिंताग्रस्त होते. त्यांनी तक्रार देण्याच्या आधी अश्विनी बिद्रे यांची जिथे पोस्टिंग होती, त्या कळंबोली पोलीस ठाण्यात जाऊन चौकशी केली होती.
मात्र त्यांना तिथे काहीही माहिती न मिळाल्यानं त्यांनी अश्विनी बिद्रे बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. तसंच अश्विनी बिद्रे ज्या फ्लॅटमध्ये राहत होत्या. त्या फ्लॅटचं कुलूप तोडून मोबाईल व लॅपटॉपची तपासणी केली होती.
या तपासणीतूनच अश्विनी बिद्रे आणि या हत्याकांडातील बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्या संबंधाबाबत आणि या प्रकरणाबाबत अधिक माहिती समोर आली होती.
यानंतरच अश्विनी बिद्रे यांच्या जीवाचे काहीतरी बरे वाईट झाल्याच्या संशयावरून कळंबोली पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद नोंदवण्यात आली होती.

फोटो स्रोत, Alpesh Karkare
या फिर्यादीत पोलीस निरीक्षक कुरुंदकर यांच्यासह राजू पाटील, महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
मात्र, राजकीय संपर्कातून बिद्रे आणि गोरे कुटुंबीयांवर प्रचंड दबाव आणला गेला. तरीही हा दबाव झुगारून राजू गोरे यांनी दर आठवड्याला सुनावणीसाठी पनवेल आणि मुंबईत फेऱ्या मारल्या.
इतकंच नाही तर तत्कालीन मुख्यमंत्र्यांची आणि राज्यपाल यांची भेट घेऊन दादही मागितली होती.
या प्रकरणाच्या तपासाबाबत न्यायालयानंही नाराजी नोंदवली होती. अभय कुरुंदकरनं पदाचा गैरवापर करून गुन्हा दडविण्याचा प्रयत्न केला. अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर खऱ्या अर्थानं या प्रकरणाचा तपास सुरू झाला.
त्यानंतर 1 जानेवारी 2017 ला या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर वर्षभरानं आरोपीला अटक झाली होती.
या प्रकरणात गोरे कुटुंबीयांच्या संघर्षाला आता नऊ वर्षानंतर यश आलं असून पनवेल न्यायालयानं अभय कुरुंदकर आणि त्याच्या साथीदारांना दोषी ठरवलं आहे. नऊ वर्षांनंतर अश्विनी बिद्रे-गोरे यांना न्याय मिळाला. अर्थात अद्याप दोषींना शिक्षा सुनावलेली नाही.
तपासात समोर आलेले पुरावे
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे त्यांची हत्या होण्याच्या काही तास आधी या हत्याकांडातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला ठाणे शहरात भेटल्या होत्या.
संध्याकाळी दोघांनी ठाणे रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या एका हॉटेलमध्ये एकत्र चहा घेतला होता.
त्यानंतर एकाच कारनं दोघं मीरा रोडला कुरुंदकरच्या घरी गेले होते, असं बिद्रे आणि कुरुंदकर या दोघांकडे असलेल्या एमटीएनएलच्या मोबाईल लोकेशनवरुन पोलिसांनी केलेल्या चौकशीतून स्पष्ट झालं.
अश्विनी बिद्रे यांची हत्या 11 एप्रिल 2016 च्या रात्री झाली होती.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी कुंदन भंडारीनं अश्विनी यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कुरुंदकरला मदत केली होती, हे या सर्वांच्या एमटीएनएल मोबाईल सिम लोकेशनवरुन उघड झालं आहे.
तसेच इतर आरोपींचे लोकेशनदेखील याच परिसरामध्ये ट्रेस झालं होतं. महत्त्वाचं म्हणजे अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्यानंतरही त्या जिवंत असल्याचं भासवण्यासाठी कुरुंदकरनं एक शक्कल लढवली.
कुरुंदकरनं अश्विनी यांच्या मोबाईलवरुन चॅटिंग सुरू ठेवलं. याच चॅटिंगमधून अभय कुरुंदकरचा सहभाग समोर आला.

फोटो स्रोत, Alpesh Karkare
अश्विनी यांच्या मोबाईलवरुन ‘हाऊ आर यू’ असा प्रश्न विचारण्यासाठी ‘यू’ लिहिताना अभय कुरुंदकरने ‘वाय’ (Y) हे अक्षर वापरलं.
हाच धागा पोलिसांनी पकडला आणि त्याच्या मुसक्या आवळल्या. अश्विनी ‘यू’ संबोधण्यासाठी कायम ‘U’ हे अक्षर लिहित असत. मात्र अचानक चॅटिंगमध्ये आलेलं ‘Y’ हे अक्षर पोलिसांनी हेरलं.
अभय कुरुंदकर अशाप्रकारे ‘यू’ साठी ‘वाय’ (Y) हे अक्षर वापरत असे.
अभय कुरुंदकरचे नातेवाईक, मित्र अशा चार-पाच जणांकडून पोलिसांनी या गोष्टीची खात्री करुन घेतली.
‘यू’ म्हणण्यासाठी अभय कायम ‘Y’ वापरत असल्याचा दुजोरा पोलिसांना मिळाला, तर अश्विनी कधीच ‘यू’ म्हणण्यासाठी ‘Y’ वापरत नसल्याचंही तिच्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांकडून स्पष्ट झालं.
अश्विनी यांच्या मोबाईलवरुन मेहुणे अविनाश गंगापुरे यांना एक व्हॉट्सअॅप मेसेज आला.
मानसिक अस्वास्थ्यामुळे आपण (अश्विनी) उपचार घेण्यासाठी पाच ते सहा महिने उत्तरांचल किंवा हिमाचल प्रदेशला जाणार असल्याचा उल्लेख त्यामध्ये होता.
पोलिसांकडे तांत्रिक पुरावे होतेच, मात्र अश्विनी बेपत्ता झाल्या, तेव्हाही अभय त्यांच्यासोबत होता. त्या जिवंत असल्याचं भासवण्यासाठी त्यांच्याच मोबाईलवरुन अभय चॅटिंग करत राहिला हे देखील चौकशीतून निष्पन्न झालं.
तसंच याप्रकरणी पोलीस तपासा दरम्यान, अभय कुरुंदकरनं अश्विनीच्या डोक्यात बॅट मारुन हत्या केल्याची कबुली कुरुंदकरचा मित्र महेश पळणीकरनं पोलिसांना दिली होती.
सायबर एक्सपर्ट रोशन बंगेरा यांनी अश्विनी बिद्रे यांच्या मोबाइलवरून आणि मुख्य आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्या मोबाइलवरून आणि फेसबुक, व्हॉट्सॲप, लॅपटॉप, सर्व सोशल ॲपमधून महत्त्वाचा डेटा रिकव्हर केला होता.
रिकव्हर केलेला डेटा हा पुराव्याच्या दृष्टीकोनातून फार महत्त्वाचा ठरला. त्याचबरोबर या प्रकरणत मृतदेह आणि हत्येसाठी वापरण्यात आलेलं हत्यार सापडलेलं नसल्यामुळे तांत्रिक पुरावे महत्त्वाचे ठरले.
त्यासाठी गुगल, अंडर वॉटर स्कॅनिंग, ओशनोग्राफी विभागाची मदत, सॅटेलाईट इमेज यासारख्या तांत्रिक गोष्टींची मदत घेण्यात आली.
5 एप्रिलला न्यायालयात काय घडलं?
अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा अंतिम निकाल 5 एप्रिलला लागला. न्यायामूर्ती के जी पालदेवार यांनी पनवेल सत्र न्यायालयात हा निकाल दिला.
अश्विनी बिद्रे प्रकरणात आरोपी अभय कुरुंदकर हत्येसाठी दोषी असल्याचं सिद्ध झालं असून कलम 302 आणि 218 नुसार आरोप सिद्ध झाले आहेत.
यात इतर दोन सहभागी आरोपी कुंदन भंडारी आणि महेश पाटील यांच्यावरही गुन्हा सिद्ध झाला असून ते देखील शिक्षेस पात्र ठरले आहेत.
याबाबत स्थापन केलेल्या एसआयटीनं 80 जणांची साक्ष नोंदवत कुरुंदकर याच्यासह तिघांवर हत्येचा ठपका ठेवला होता.
तपास अधिकारी निलेश राऊत आणि संगीता अल्फान्सो यांनी केलेल्या तपासात कुरंदकर यांनी अश्विनी बिद्रे यांची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे निष्पन्न झाले होते.
त्यानुसार कुरुंदकर यांच्यासह राजू उर्फ ज्ञानेश्वर दत्तात्रय पाटील, कुंदन भंडारी आणि महेश पडळकर या चौघांची रवानगी तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती
या प्रकरणातील आणखी एक आरोपी राजेश पाटील उर्फ राजू पाटील याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
या प्रकरणाची अखेरची सुनावणी 11 एप्रिल रोजी दुपारच्या सत्रात होणार आहे. शिक्षा ठोठावण्यापूर्वी न्यायालय दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेणार आहे.
अश्विनी बिद्रे यांची मुलगी आणि पती यांना त्यादिवशी न्यायालयानं हजर राहण्यास सांगितलं आहे.
न्यायालयानं आरोपींना दोषी ठरवल्यानंतर अश्विनी बिद्रे-गोरे यांचे पती राजू गोरे यांनी समाधान व्यक्त केलं आहे. आता न्याय झाला आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
प्रसारमाध्यमांना ते म्हणाले, “हा जो निकाल लागला आहे, त्याबद्दल मी सर्वात आधी प्रसारमाध्यमांचे आभार मानतो. कारण प्रसारमाध्यमांनी हा विषय लावून धरल्यामुळेच या प्रकरणाचा तपास झाला आणि आरोपी दोषी ठरले. सुरुवातीच्या काळात जेव्हा आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करत होतो, तेव्हा आम्हाला न्यायालयाचा आधार होता.”
“त्यावेळी प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण उचलून धरल्यामुळेच त्याची विधानसभेत चर्चा झाली आणि नंतर योग्यप्रकारे पोलीस तपास झाला. या सर्व प्रकरणात अॅड. प्रदीप घरत यांनी अतिशय परिश्रम घेत आमची बाजू मांडली.
तसंच पोलीस अधिकारी संगीता अल्फान्सो यांनी या प्रकरणात उत्तमरित्या तपास केल्यामुळे खटला उभा राहणं शक्य झालं. मी प्रसारमाध्यमं, अॅड. प्रदीप घरत आणि पोलीस अधिकारी संगीता अल्फान्सो यांचे आभार मानतो.”

फोटो स्रोत, Alpesh Karkare
या प्रकरणात राजू गोरे यांच्या वतीनं न्यायालयात अॅड. प्रदीप घरत यांनी बाजू मांडली. न्यायालयाच्या निकालानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अॅड. प्रदीप घरत म्हणाले, “आज कोणा-कोणाविरोधात आरोप सिद्ध झाले, हे न्यायालयानं जाहीर केलं. अजून शिक्षा सुनावली जायची आहे. त्यापूर्वी न्यायालयाला दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घ्यायची आहे.
मुख्य आरोपी कुरुंदकर विरोधात हत्येचा गुन्हा सिद्ध झाला आहे. तर इतर आरोपींनी त्याला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात मदत केल्याचं सिद्ध झालं आहे.”
“11 एप्रिलला दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालय आरोपींना शिक्षा ठोठावणार आहे. या प्रकरणात तपास करण्याबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरदेखील निश्चितपणे कारवाई झाली पाहिजे.”
हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी संगीता अल्फान्सो न्यायालयाच्या निकालानंतर म्हणाल्या की, “या प्रकरणाचा छडा लावण्याचे आम्ही पूर्ण प्रयत्न केले. आमच्या सर्व टीमनं यात प्रयत्न केले. यात तांत्रिक पुरावे आणि परिस्थितीजन्य पुरावे गोळा करावे लागले. जवळपास सहा-सात वर्षे मी या प्रकरणावर काम करत होते. या प्रकरणात 85 साक्षीदार होते.”
“मृतदेह सापडला नसला तरी परिस्थितीजन्य पुराव्यांद्वारे गुन्हा सिद्ध करण्यात आम्हाला यश आलं.”
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC