Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, ANI
7 तासांपूर्वी
युपीएससीचा निकाल जाहीर झाला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने हा निकाल आज (22 एप्रिल) जाहीर केला आहे.
या परीक्षेला बसलेले विद्यार्थी यूपीएससीच्या वेबसाईटवर जाऊन निकाल पाहू शकतात.
महाराष्ट्रातील अर्चित डोंगरे देशभरातून तिसरा आला असून शक्ती दुबेने देशातून पहिला येण्याचा बहुमान पटकावला आहे.
भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS), भारतीय पोलिस सेवा (IPS) आणि विविध गट ‘अ’ आणि गट ‘ब’ या केंद्रीय सेवांमध्ये नियुक्त्यांसाठी एकूण 1,009 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
टॉपर शक्ती दुबे काय म्हणाल्या?
त्यावेळी शक्ती दुबे म्हणाल्या सांगितलं की, “काही वेळ मला या निकालावर विश्वासच बसत नव्हता.”
शक्ती दुबे म्हणाल्या की , “हे माझ्या अनेक वर्षांच्या मेहनतीचं फळ आहे. काही वेळ मला यावर विश्वासच बसला नाही. गेल्या वर्षी मुलाखतीनंतर मी 12 गुणांनी कट ऑफ चुकले होते.”
“तेव्हा माझ्या भावानं पुढच्या प्रयत्नात तुला पहिला क्रमांक मिळेल, असं सांगितलं होतं. मला कधीच वाटलं नव्हतं की, मला पहिला क्रमांक मिळेल. मात्र, माझ्या भावाला असं वाटत होतं. निकाल आल्यानंतर मी प्रथम माझ्या वडिलांना आणि नंतर माझ्या आईला फोन केला. हा माझा पाचवा प्रयत्न होता.”
शक्ती दुबे या प्रयागराज येथील रहिवासी आहेत.
त्यांनी म्हटलं आहे की, “प्रयागराज हे माझं जन्मस्थान आहे. ते माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे आणि या शहरानं मला घडवण्यात मोठी भूमिका बजावली आहे.”
“यूपीएससीचा अभ्यास करणारा प्रत्येक जण आपल्या बाजूने पूर्ण प्रयत्न करत असतो. थोड्या फार काही कमतरता आणि चुका असतात, त्यामुळे आपल्या हातून संधी जाते. त्यावेळी चुका शोधून त्यावर काम केलं पाहिजे. मात्र हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की यूपीएससी फक्त एक परीक्षा आहे. आयुष्यापेक्षा ती काही मोठी गोष्ट नाही,” असा संदेश त्यांनी यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या मुलांना दिला आहे.

फोटो स्रोत, ANI
यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2024 च्या निकालाची खास गोष्ट म्हणजे यावेळी पहिल्या पाच क्रमवारीत तीन महिला आहेत.
यावेळी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये एकूण1009 उमेदवार यशस्वी झाले आहेत, त्यापैकी 725 पुरुष आणि 284 महिला आहेत.
देशभरातील लाखो विद्यार्थी ही परीक्षा देत असतात. जगभरातल्या कठीण परीक्षांमध्ये युपीएससीची ओळख होते. या परीक्षेच्या निवड प्रक्रियेत तीन टप्पे असतात -प्रिलिम्स (पूर्वपरीक्षा), मेन्स (मुख्य) आणि मुलाखत.
तिन्ही टप्प्यांवर उमेदवाराचं मूल्यांकन करून अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाते.
2024 च्या परीक्षेत1132 रिक्त जागा भरल्या जातील.
हे आहेत ‘टॉप 10’
1. शक्ती दुबे
2. हर्षिता गोयल
3. अर्चित डोंगरे
4. मार्गी शहा
5. आकाश गर्ग
6. कोमल पुनिया
7. आयुषी बन्सल
8. राज कृष्ण झा
9. आदित्य विक्रम अग्रवाल
10. मयंक त्रिपाठी

फोटो स्रोत, Getty Images
यावर्षी किती जणांची निवड झाली?
भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) आणि भारतीय पोलिस सेवा (IPS) आणि केंद्रीय सेवा, गट ‘A’ आणि गट ‘B’ मध्ये नियुक्तीसाठी एकूण 1,009 उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे.
अंतिम निवड झालेल्या उमेदवारांमध्ये 335 उमेदवार हे सामान्य प्रवर्गातील आहेत.
109 उमेदवार हे आर्थिकदृष्ट्या कमकुवत गट (EWS )मधील आहेत.
318 उमेदवार ओबीसी प्रवर्गातील आहेत.
160 उमेदवार अनुसूचित जाती या प्रवर्गातले आहेत.
87 उमेदवार हे अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील आहेत.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC