Home LATEST NEWS ताजी बातमी LIVE : पाकिस्तानच्या गोळीबारात जम्मू-काश्मीरमधील अधिकाऱ्याचा मृत्यू – ओमर अब्दुल्लांची माहिती

LIVE : पाकिस्तानच्या गोळीबारात जम्मू-काश्मीरमधील अधिकाऱ्याचा मृत्यू – ओमर अब्दुल्लांची माहिती

3
0

Source :- BBC INDIA NEWS

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला

फोटो स्रोत, Getty Images

10 मे 2025, 06:58 IST

अपडेटेड 1 तासापूर्वी

भारत आणि पाकिस्तान या दोन अण्वस्त्रसज्ज देशांमधील संघर्ष गंभीर रूप घेताना दिसत आहे. दिवसागणिक दोन्ही देशांमधील तणाव वाढत आहे. भारत-पाकिस्तानमधील या संघर्षाशी संबंधित सर्व अपडेट्स तुम्हाला इथे एकाच ठिकाणी वाचता येतील :

लाल रेषा

पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात जम्मू-काश्मीरमधील एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली.

ओमर अब्दुल्ला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर म्हटलं, “राजौरीहून दुःखद बातमी. आपण जम्मू-काश्मीर प्रशासकीय सेवेतील एक समर्पित अधिकारी गमावला आहे. ते शुक्रवारी (9 मे) उपमुख्यमंत्र्यांसोबत राजौरीत होते आणि माझ्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाइन बैठकीला उपस्थित होते.”

राजौरी शहरात पाकिस्तानकडून गोळीबार होत असल्याची माहिती ओमर अब्दुल्ला यांनी दिली.

ते म्हणाले, “आज (10 मे) पाकिस्तानने राजौरी शहरावर गोळीबार केला. यादरम्यान, अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त राजकुमार थापा यांच्या घराला लक्ष्य करण्यात आलं. त्या हल्ल्यात राजकुमार थापा यांचा मृत्यू झाला”

जी-7 देशांनी भारत आणि पाकिस्तानला काय आवाहन केलं?

जी-7 देशांनी भारत आणि पाकिस्तानला शांतता राखण्यास आणि एकमेकांशी थेट चर्चा करण्याचं आवाहन केलं आहे.

दोन्ही देशांमधील तणाव वाढत असताना जी-7 देशांनी हे आवाहन केलं आहे.

कॅनडाने जारी केलेल्या निवेदनात, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, अमेरिका, ब्रिटन आणि युरोपियन युनियनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी 22 एप्रिलला जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.

जी-7 देश

फोटो स्रोत, Getty Images

यासोबतच, जी-7 देशांनी भारत आणि पाकिस्तान दोघांनाही संयम बाळगण्यास सांगितलं आहे.

जी-7 च्या निवेदनात म्हटलं आहे, “दोन्ही देशांनी एकमेकांशी बोलून तणाव वाढवण्याऐवजी शांततापूर्ण तोडग्याकडे वाटचाल करावी, अशी आमची इच्छा आहे.”

पाकिस्तानला IMF कडून 1.3 अब्ज डॉलर्सचं कर्ज मंजूर

भारत-पाकिस्तान तणाव सुरू असतानाच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) पाकिस्तानला 1.3 अब्ज अमेरिकन डॉलर्सचं कर्ज मंजूर केलं आहे. आयएमएफनं विस्तारित निधी सुविधेच्या (ईएफएफ) अंतर्गत पाकिस्तानला तात्काळ हा निधी दिला.

दुसरीकडे पाकिस्तानला कर्ज देण्यासाठी झालेल्या मतदानात भारताने सहभाग घेतला नाही. आतापर्यंतचा पाकिस्तानचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता पाकिस्तानकडून या निधीचा गैरवापर सीमेपलिकडे राज्यपुरस्कृत दहशतवादासाठी केला जाऊ शकतो, अशी भीती भारताने भीती व्यक्त केली.

आयएमएफनं शुक्रवारी (9 मे) 1 अब्ज डॉलरच्या ईएफएफ कर्ज कार्यक्रमाचा आढावा घेतला. तसेच पाकिस्तानसाठी 1.3 अब्ज डॉलर्सच्या नवीन लवचिकता आणि स्थिरता सुविधा (आरएसएफ) कर्ज कार्यक्रमावर निर्णय घेतला.

भारतानं एक निवेदन जारी करून म्हटलं, “पाकिस्तान बऱ्याच काळापासून आयएमएफकडून कर्ज घेत आहे. परंतु आयएमएफच्या अटींचे पालन करण्याचा पाकिस्तानचा ट्रॅक रेकॉर्ड खूपच खराब आहे.”

“गेल्या 35 वर्षांत पाकिस्तानने 28 वर्षे आयएमएफकडून कर्ज घेतले आहे. 2019 पासून गेल्या 5 वर्षांत आयएमएफचे 4 मदत कार्यक्रम झाले. ही मदत यशस्वी झाली असती, तर पाकिस्तानला पुन्हा या कार्यक्रमांतर्गत कर्ज घेण्याची वेळ आली नसती,” अशी भूमिका भारतानं घेतली आहे.

भारत-पाकिस्तान तणाव सुरू असतानाच आयएमएफकडून पाकिस्तानला 1.3 अब्ज डॉलर्सचं कर्ज मंजूर

फोटो स्रोत, Getty Images

भारतानं म्हटलं की, पाकिस्तानची ट्रॅक रेकॉर्ड पाहता असं दिसतं की, एकतर आयएमएफ कार्यक्रमाची योग्यरित्या आखणी झालेली नाही किंवा या कार्यक्रमाची योग्य देखरेख ठेवण्यात आली नाही किंवा पाकिस्ताननं या कार्यक्रमाची योग्य अंमलबजावणी केलेली नाही.

“पाकिस्तानी सैन्य आर्थिक बाबींमध्ये हस्तक्षेप करते. त्यामुळे धोरणात्मक चुक आणि सुधारणा उलटण्याचा धोका वाढला आहे. पाकिस्तानमध्ये लोकनियुक्त सरकार असले, तरी पाकिस्तानी लष्कर देशांतर्गत राजकारणात मोठी भूमिका बजावते. तसेच अर्थव्यवस्थेतही हस्तक्षेप करते”, असंही भारतानं म्हटलं.

सीमापार दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांना बक्षीस देणं चुकीचं असल्याचं मत भारतानं व्यक्त केलं आहे. तसेच यामुळे जगाला चुकीचा संदेश जाईल आणि निधी देणाऱ्या संस्था आणि देणगीदारांची प्रतिमा डागाळेल, असंही नमूद केलं.

भारतानं म्हटलं, “आयएमएफसारख्या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून येणारा पैसा दहशतवादासाठी वापरला जाऊ शकतो. अनेक देशांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. आयएमएफचे नियम आणि कार्यपद्धती अशा आहेत की ते काहीही करू शकत नाही. ही एक गंभीर समस्या आहे. जागतिक वित्तीय संस्थांनी त्यांच्या प्रक्रियांमध्ये नैतिक मूल्यांचा समावेश केला पाहिजे. आयएमएफने भारताच्या भूमिकेवर आणि मतदानात सहभागी न होण्याच्या निर्णयाकडे लक्ष दिलं आहे.”

पाकिस्तानचं ‘ऑपरेशन बुनयान मरसूस’

पाकिस्तान लष्कराच्या जनसंपर्क विभागानं म्हटलं आहे, “पाकिस्ताननं भारताविरुद्ध प्रतिहल्ला सुरू केला आहे.” मात्र भारतानं पाकिस्तानच्या या दाव्यांवर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

पाकिस्तानी लष्कराचा जनसंपर्क विभाग आयएसपीआरनुसार, पाकिस्ताननं भारताविरुद्ध सुरू केलेल्या कारवाईला ‘ऑपरेशन बुनयान मरसूस’ असं नाव दिलं आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढण्यास सुरुवात झाली. भारतानं बुधवारी (7 मे) पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान प्रशासित काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी हल्ले केले होते.

या हल्ल्यानंतर, पाकिस्तानने 33 लोकांचा मृत्यू होऊन मोठं नुकसान झाल्याची कबुली दिली.

भारतानं 3 लष्करी तळांवर हल्ला केल्याचा पाकिस्तानचा दावा

भारताने आमच्या तीन लष्करी हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत, असा दावा पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्यांनी केला. मात्र, भारताने पाकिस्तानच्या दाव्यांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

पाकिस्तानच्या लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी सरकारी टीव्हीवर बोलताना पाकिस्तानी लष्करानं भारताला ‘प्रत्युत्तर’ देण्याची कारवाई सुरू केल्याचं म्हटलं.

अहमद शरीफ चौधरी यांनी दावा केला की, “पाकिस्तानी लष्कराच्या हवाई संरक्षण यंत्रणेने भारताची बहुतेक क्षेपणास्त्रे पाडली आहेत. तसेच, पाकिस्तानचे सैन्य ‘पूर्णपणे तयार’ आहे.”

पाकिस्तानने ज्या लष्करी विमानतळांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे, त्यापैकी एक म्हणजे रावळपिंडीतील नूर खान, जे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपासून 10 किलोमीटर अंतरावर आहे.

असं असलं तरी, या दाव्यांवर भारताकडून अद्याप काहीही प्रतिक्रिया आलेली नाही.

पाकिस्तानच्या लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी

फोटो स्रोत, Getty Images

भारतातील ‘या’ 32 विमानतळांवरून 15 मेपर्यंत नागरी उड्डाणे बंद

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारताच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने (डीजीसीए) देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागातील 32 विमानतळांवरून नागरी उड्डाणं बंद केली आहेत.

भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) आणि संबंधित विमान वाहतूक अधिकाऱ्यांना अनेक ‘नोटिस टू एअरमन’ जारी करण्यात आल्या आहेत. यानुसार 15 मे रोजी सकाळी 5:29 वाजेपर्यंत नागरी उड्डाणं बंद राहतील.

विमानांचे प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

ज्या विमानतळांवरून नागरी उड्डाणं बंद करण्यात आली आहेत त्यामध्ये उधमपूर, अंबाला, अमृतसर, अवंतीपुरा, भटिंडा, भुज, बिकानेर, चंदीगड, हलवारा, हिंडन, जैसलमेर, जम्मू, जामनगर, जोधपूर, कांडला, कांगडा (गग्गल), केशोद, किशनगढ, कुल्लू मनाली (भुंतर), लेह, लुधियाना, मुंद्रा, नलिया, पठाणकोट, पटियाला, पोरबंदर, राजकोट (हिरासर), सरसावा, शिमला, श्रीनगर, थोईसे आणि उत्तरलाई या विमानतळांचा समावेश आहे.

एअर इंडियाने सोशल मीडियावर माहिती दिली आहे की, विमान वाहतूक अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर, जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, चंदीगड, भुज, जामनगर आणि राजकोट इत्यादी ठिकाणांवरील उड्डाणे 15 मेपर्यंत (सकाळी 5.29 वाजेपर्यंत) रद्द करण्यात येत आहेत.

बारामुल्लापासून भुजपर्यंत ड्रोन आढळले, फिरोझपूरमध्ये नागरी भागावर हल्ला

शुक्रवारी (9 मे) रात्री बारामुल्लापासून भुजपर्यंत 26 ठिकाणी सशस्त्र ड्रोन्स आढळून आले. पाकिस्तानला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेजवळची ही ठिकाणं आहेत.

यामध्ये काही सशस्त्र ड्रोन असल्याचा संशय असून ते नागरी तसेच लष्करी ठिकाणांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे, अशी माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे.

या ठिकाणांमध्ये बारामुल्ला, श्रीनगर, अवंतीपोरा, नगरोटा, जम्मू, फिरोझपूर, पठाणकोट, फाजिल्का, लालगढ जट्टा, जैसलमेर, बाडमेर, भुज, कुवारबेट आणि लखी नाला यांचा समावेश आहे.

एका सशस्त्र ड्रोनने फिरोझपूरमध्ये नागरी भागावर हल्ला केला. त्यात एका स्थानिक कुटुंबातील सदस्य गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी पाठवण्यात आलं असून सुरक्षादलांनी परिसराची पूर्णपणे तपासणी केली.

भारतीय संरक्षण दलं सतर्क असून हवेतून येणाऱ्या संभाव्य धोक्यांवर नजर ठेवून आहेत. तसंच गरज भासल्यास त्वरित कारवाईसाठी सज्ज असल्याचंही सांगण्यात आलं.

सीमा भागांतील नागरिकांना घरामध्येच राहण्याचा, अनावश्यक हालचाल टाळण्याचा आणि स्थानिक प्रशासनाने जारी केलेल्या सुरक्षिततेसंबंधी सूचना काटेकोरपणे पाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे. घाबरण्याचे काही कारण नाही, मात्र सतर्कता आणि काळजी आवश्यक आहे, असं लष्करानं स्पष्ट केलं आहे.

भारतीय सैन्य

फोटो स्रोत, Getty Images

बीबीसीचे सहयोगी पत्रकार रविंदर सिंग रॉबिन यांनी अमृतसरमध्येही मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू येत असल्याची माहिती दिली.

तसंच फिरोजपूरमधील स्थानिकांनी किमान तीन स्फोटांचे आवाज ऐकल्याचं पंजाबमधील बीबीसीच्या स्थानिक पत्रकारांनी म्हटलं आहे.

फिरोजपूर प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानंही तीन स्फोटांचे आवाज ऐकल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

बीबीसीच्या पत्रकार नवजोत कौर यांच्या मते, उपायुक्त निशांत यादव यांच्या आदेशानुसार, चंदीगडमधील बाजारपेठा संध्याकाळी 7 वाजता पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत

याशिवाय आज शुक्रवारी रात्री (9 मे) जम्मू आणि काश्मीरमधून पुन्हा एकदा गोळीबाराच्या बातम्या समोर आल्या आहेत.

सध्या श्रीनगरमध्ये असलेले बीबीसी प्रतिनिधी माजिद जहांगीर यांनी दिलेल्या माहितीनुसार कुपवाडा, उरी आणि पूंछमध्ये संध्याकाळी 7.20 वाजता गोळीबार सुरू झाला.

ANI वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, उरी सेक्टरमध्ये गोळीबार आणि स्फोटांचे आवाज ऐकू आले.

याशिवाय, पठाणकोटमधील बीबीसी टीमला स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत.

संग्रहित छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

त्याआधी शुक्रवारी दुपारी (9 मे) भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी यांनी गुरुवारी रात्री भारताच्या विविध भागात झालेल्या हल्ल्यांची माहिती दिली.

सोफिया कुरेशी म्हणाल्या, “गुरुवारी (8 मे) रात्री पाकिस्तानी सैन्याने भारतीय लष्करी तळांना लक्ष्य केले.”

पाकिस्तानकडून 300 ते 400 ड्रोन सोडण्यात आल्याचं त्या म्हणाल्या. पण पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी असे हल्ले केल्याचं नाकारलं.

X पोस्टवरून पुढे जा

परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

मजकूर उपलब्ध नाही

Xवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आणि सैन्य प्रमुखांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान कार्यालयाने X वर केलेल्या पोस्टमध्ये ही माहिती दिली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC