Home world news marathi India Pakistan Tensions : भारतासोबतचं वैर पाकिस्तानला भोवलं; संयुक्त राष्ट्र संघटनेच्या बैठकीत...

India Pakistan Tensions : भारतासोबतचं वैर पाकिस्तानला भोवलं; संयुक्त राष्ट्र संघटनेच्या बैठकीत दाखवून दिली जागा

5
0

Source :- ZEE NEWS

India Pakistan Tensions : (Jammu Kashmir) जम्मू काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये असणाऱ्या तणावात आणखी भर पडली. सातत्यानं होणारं शस्त्रसंधीचं उल्लंघन असो किंवा सीमाभागात दहशतवादी तळांमध्ये होणारा अन्नाचा किंवा पैशांचा पुरवठा असो. पाकिस्ताननं भारताला डिवचण्याचे सर्वतोपरि प्रयत्न केले. मात्र त्यांच्या याच कटकारस्थानांमुळं आता हेच वैर शेजारी राष्ट्राला भोवताना दिसत आहे. 

भारत आणि पाकिस्तान (India-Pakistan Tensions) या दोन्ही राष्ट्रांमध्ये तणावाची परिस्थिती वाढत असतानाच संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेनं एका बंद खोलीत उच्चस्तरिय बैठक घेतली. जिथं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी या संवेदनशील परिस्थितीत संयमानं कोणतंही पाऊल उचलावं आणि चर्चेतून यावर तोडगा काढावा असं आवाहन सदस्य राष्ट्रांनी केलं.

5 मे 2025 रोजी पार पडलेल्या या बैठकीसंदर्भातील कोणतंही अधिकृत विधान UN च्या वतीनं जारी करण्यात आलेलं नाही. मात्र संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी राजदूत असीम इफ्तिखार अहमद यांनी बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना काही महत्त्वाचे मुद्दे जाहीर केले. भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावावर तोडगा काढत या परिस्थितीवर चर्चात्मक मार्गानं कोणती वाट काढता येईल आणि माहितीच्या देवाणघेवाणीनं कशा प्रकारे ही चर्चा अधिक सक्षम करता येईल यावर भर देण्यात आल्याचं ते म्हणाले. तर, ग्रीसच्या राजदूतांनी या बैठकीतून सकारात्मक परिणाम दिसून आल्याची माहिती दिली. आम्हाला हा तणाव कमी होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती रशियाच्या राजदूतांनी दिली. 

भारतीय अधिकाऱ्यांनी काय माहिती दिली? 

सुरक्षा परिषदेच्या बैठकीपूर्वी भारताचे माजी स्थायी प्रतिनिधी सह्यद अकबरुद्दीन यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना या बैठकीतून किंवा चर्चेतून कोणताही तोडगा निघेल अशी आशा वाटत नसल्याचं वक्तव्य केलं होतं. तर, या बैठकीनंतर ते म्हणाले, ‘यापूर्वीप्रमाणेच आजही पाकिस्तानची अरेरावी इथं अपयशी ठरली. याआधी अपेक्षित असल्याप्रमाणेच परिषदेकडून कोणतीही समाधानकारक प्रतिक्रिया देण्यात आली नाही. भारतीय कूटनितीनं सुरक्षा परिषदेच्या हस्तक्षेपाची मागणी करणाऱ्या पाकिस्तानच्या सर्वच प्रयत्नांना हाणून पाडलं’. 

UN महासचिवांनीही केली पहलगाम हल्ल्याची निंदा 

बंद खोलीत झालेल्या या पैठकीपूर्वीच संयुक्त राष्ट्र संघटनेते महासचिव एंटोनियो गुटरेस यांनी भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या या तणावाला आतापर्यंतच्या गंभीर स्तराचा तणाव म्हणून संबोधत चिंता व्यक्त केली आणि या हल्ल्याची तीव्र शब्दांत निंदा केली. नागरिकांना निशाण्यावर घेणं स्वीकारार्ह नसल्याचं त्यांनी परखड स्वरांत म्हटलं. 

SOURCE : ZEE NEWS