Source :- ZEE NEWS
Gold Price To Fall: सोन्याच्या दरांमध्ये लवकरच मोठी पडझड होणार असल्याचं भाकित व्यक्त करण्यात आलं आहे. सोन्याच्या खाणी असलेल्या कझाकिस्तानमधील ‘सॉलिड कोअर रिसोर्सेस पीएलसी’च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हा अंदाज व्यक्त केला आहे. शुक्रवारी सोन्याच्या दरांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालं. आठवड्याभरातील सोन्याचा सर्वात कमी दर हा शुक्रवारी होता. अमेरिकी डॉलर अधिक मजबूत झाल्यानंतर अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्ध शांत होईल असा अंदाजही व्यक्त केला जात असल्याने सोन्याच्या दरांमध्ये घसरण होण्याची मोठी शक्यता आहे.
सोन्याचा दर कितीने पडणार?
पूर्वी पॉलीमेटल नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘सॉलिड कोअर रिसोर्सेस पीएलसी’चे सीईओ वेंटली निसीस यांनी ‘रॉयटर्स’ला एक विशेष मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी, “सोन्याचे दर पुढील 12 महिन्यांमध्ये 2500 अमेरिकी डॉलर्सने पडतील असा माझा अंदाज आहे,” असं विधान केला आहे. “सोन्याचे दर अगदी 1800 ते 1900 अमेरिकी डॉलर्सपर्यंत जाणार नाहीत. किमान किंमतीपेक्षा अधिक परतावा मिळेल. मात्र सध्या सोन्याच्या दरांमध्ये झालेली वाढ ही ओव्हर रिअॅक्शन आहे. जगभरात ज्या घटना घडत आहेत त्याला जो प्रतिसाद दिला जातोय त्यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये सध्या भरमसाठ वाढ झाली आहे,” असं वेंटली निसीस यांनी म्हटलं आहे. सोन्याच्या खाणींची मालकी असलेली ‘सॉलिड कोअर’ ही कझाकिस्तानमधील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. सध्या सोन्याचा दर 3,311.45 अमेरिकी डॉलर्स प्रती औंस इतका आहे. म्हणजेच प्रती ग्राम सोनं हे 106.70 अमेरिकी डॉलर्सला उपलब्ध आहे. भारतीय चलनामध्ये ही रक्कम 9110 रुपये प्रती ग्राम इतकी होते.
भारतीय चलनानुसार कितीने फरक पडणार?
वेंटली निसीस यांनी प्रती औंस सोनं 2500 अमेरिकी डॉलर्सला मिळेल असं म्हटलं आहे. याचाच अर्थ एक औंस सोनं म्हणजेच 28.3495 ग्राम सोनं आजच्या डॉलर्सच्या दरानुसार 2 लाख 13 हजार 475 रुपयांना मिळेल. याचाच अर्थ एक ग्राम सोनं 7530 रुपयांना मिळेल असं वेंटली निसीस यांना म्हणायचं आहे. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आजचा सोन्याचा दर 9110 इतका आहे असं ग्राह्य धरलं तर सोन्याचे दर प्रती ग्राम 1580 रुपयांनी कमी होतील. म्हणजेच एक तोळा सोनं 15 हजारांहून अधिक रुपयांनी स्वस्त होईल. याचाच अर्थ भारतीय बाजरापेठेत सोन्याचे दर पुन्हा 85 हजारांपर्यंत घसरतील असा अंदाज आहे.
सोन्याला एवढं महत्त्व का?
सामान्यपणे सोन्याकडे राजकीय आणि आर्थिक संकटाच्या परिस्थितीमध्ये संपत्ती साठवण्याचं उत्तम माध्यम म्हणून पाहिलं जातं. केवळ कौटुंबिक किंवा वैयक्तिक स्तरावर नाही तर जागतिक स्तरावरही अनेक देश याच हेतूने सोन्याचा साठा करुन ठेवतात. मागील काही काळामध्ये म्हणजेच 2025 च्या सुरुवातीपासून आतापर्यंत सोन्याच्या दरांमध्ये 26 टक्क्यांची वाढ झाली आहे. अमेरिकेने करांसंदर्भात घेतलेल्या नव्या भूमिकेमुळे जगभरामध्ये आर्थिक मंदी येईल अशी भीती व्यक्त केली जात होती.
ट्रम्प यांनी दिले महत्त्वाचे संकेत
अमेरिकेने चीनमध्ये निर्यात केल्या जाणाऱ्या गोष्टींवर 125 टक्के कर आकारण्यास सुरुवात केल्याने चीनने त्यांच्या देशातील कंपन्यांना इतर पर्यायी गोष्टी शोधण्याचा सल्ला दिला. याच आठवड्याच्या सुरुवातीला अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करांसंदर्भातील भूमिका अधिक सौम्य होईल अशी शक्यता व्यक्त केली आहे. यासंदर्भातील चर्चा सुरु असल्याचंही ट्रम्प यांनी सांगितलं.
सोनं खरेदीचा विचार असेल तर थांबा आणि…
सर्व गोष्टींचा विचार केल्यास भविष्यात सोन्याचे दर पूर्वव्रत होईल असं आतापासूनच सांगितलं जात आहे. त्यामुळेच सोन्याचे दर अधिक वाढतील असा विचार करुन आताच सोनं घेण्याचा विचार करणाऱ्यांनी थांबा आणि वाट पाहा भूमिका घेतलेलं बरं ठरेल असं सांगितलं जात आहे.
(Disclaimer – वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
SOURCE : ZEE NEWS