Home world news marathi Explainer: पहिल्यांदाच होणार स्पर्म रेस; पुरुष वंध्यत्वासंदर्भात विचार करायला भाग पाडणारी आकडेवारी...

Explainer: पहिल्यांदाच होणार स्पर्म रेस; पुरुष वंध्यत्वासंदर्भात विचार करायला भाग पाडणारी आकडेवारी समोर

2
0

Source :- ZEE NEWS

Health News : महिलांची प्रजनन क्षमता, त्यांच्या समस्या यावर कायमच प्रकर्षानं बोललं जातं. पुरुषांच्या बाबतीत मात्र या मुद्द्यांची चर्चा तुलनेनं कमी होते. आता मात्र संपूर्ण जगभरात पुरुष वंध्यत्वाचं वाढतं प्रमाण पाहता हा मुद्दा चर्चेचा विषय ठरत असून, त्याचबाबतची जनजागृती वाढवण्यासाठी पहिल्या स्पर्म रेसचं आयोजन केलं जात आहे. 

संपूर्ण जगाची लोकसंख्या 8 अब्जांवर पोहोचली असली तरीही या लोकसंख्येचं वितरण असमान असल्यामुळं एक मोठी समस्या संपूर्ण जगाच्या आरोग्य यंत्रणेपुढे उभी राहताना दिसत आहे. गरीब देशांमध्ये लोकसंख्यावाढ अतिशय झपाट्यानं होत असतानाच प्रगत राष्ट्रांमध्ये मात्र जन्मदर घटत चालला आहे. यामागे अनेक कारणं असून आरोग्यविषयक समस्या हे यातील मूळ कारण ठरत आहे ज्यामुळं फक्त महिला नव्हे तर पुरुषांची प्रजनन क्षमतासुद्धा प्रभावित होत आहे. याच मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी लॉस एंजेलिसमध्ये जगातील पहिली स्पर्म रेस अर्थात शुक्राणूंची शर्यत आयोजित करण्यात आली आहे. एकून ही बाब काहीशी विचित्र वाटेल मात्र त्यामागे एक मुख्य हेतूसुद्धा आहे. 

स्पर्म रेसमध्ये नेमकं काय होणार? 

स्पर्म रेसमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींच्या स्पर्मची गुणवत्ता आणि त्यांच्या गतीचं परीक्षण केलं जाणार असून, त्या माध्यमातून पुरुषांच्या प्रजनन क्षमतेसंदर्भात आणि त्याच्या आरोग्यासंदर्भात माहिती मिळू शकरणार आहे. अमेरिकेच्या एका नव्या स्टार्टअप कंपनीनं ही आगळीवेगळी रेस आयोजित केली असून, पुरुषांच्या प्रजनन क्षमते संदर्भातही संवेदनशील आणि गांभीर्यानं चर्चा होणं या यामागचा मुख्य हेतू आहे. या रेससाठी अतिशय अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. 

जन्मदरात होणारी घट मोठी समस्या… 

जगभरात पहिल्यांदाच अमेरिकेत या रेसचं आयोजन होत असल्यानं हा कुतूहलाचा विषय ठरत असतानाच जगातील अनेक भागांमध्ये जन्मदरात होणारी घट एक मोठी समस्या ठरताना दिसत आहे. जगातील जवळपास 50 टक्के लोकसंखख्या अशा देशांमध्ये राहतेय जिथं प्रजनन दर 2 हून कमी आहे. परिणामस्वरुप या देशांमध्ये जन्मदर घटत असून, हे भविष्याच्या दृष्टीनं एक मोठं संकट ठरत आहे. जन्मदरात झालेली घट ही अनेक कारणांमुळे असून, पुरुषांच्या प्रजनन क्षमतेतील अडचणी हेसुद्धा त्याच कारणांपैकी एक. यामध्ये स्पर्म काऊंटमध्ये घट, टेस्टोस्टेरोनचा स्तर कमी होणं, इरेक्टाइल डिसफंक्शन आणि टेस्टिक्युलर कॅन्सर अशा समस्यांचा समावेश आहे. 

तज्ज्ञ आणि अभ्यासकांच्या मते जगभरात जवळपास 7 टक्के पुरुष वंध्यत्वाचा सामना करत आहेत. मात्र तरीही या मुद्द्यावर मोकळेपणानं अद्यापही बोललं जात नाही. त्यामुळं हा मुद्दा दुर्लक्षित राहिल्यास एक मोठी आरोग्य समस्या भेडसावू शकते अशी भीतीसुद्धा व्यक्त केली जात आहे. 

एकट्या भारताविषयीची आकडेवारी पाहिल्यास भारतीय सहायक प्रजनन सोसायटीच्या माहितीनुसार देशात 2.75 कोटी लोकसंख्या वंध्यत्वाचा सामना करत असून, यामध्ये महिला आणि पुरुषांचा समावेश आहे. सदर आकडेवारीनुसार भारतात दर सहावी व्यक्ती या समस्येला सामोरी जात आहे. बदलती जीवनशैली, वातावरणात सातत्यानं होणारे बदल, कार्यपद्धती, हार्मोनल असंतुलन आणि ताणतणाव अशा एक ना अनेक कारणांमुळे हे संकट ओढावत असून, त्यावर वेळीच लक्ष दिलं जाणं आवश्यत असल्याचच तज्ज्ञ म्हणतात. 

SOURCE : ZEE NEWS