Source :- ZEE NEWS
Epstein Files : अमेरिकेतील लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन याच्या गुप्त कागदपत्रांमुळे जगभरात खळबळ माजली आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने 30 जानेवारी रोजी सुमारे 30 लाख पानांचे कागदपत्रे प्रसिद्ध केली. त्यानंतर, 10 देशांमधील 15 हून अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले आहे. जगभरातील 80 हून अधिक देशांमध्ये शक्तिशाली व्यक्तींची चौकशी सुरू आहे. या फायलींमध्ये राजकारणी, राजदूत, अब्जाधीश आणि राजघराण्यातील लोकांची नावे आहेत. ईमेल, फ्लाइट लॉग आणि संपर्क रेकॉर्डमध्ये 700 ते 1000 प्रभावशाली लोकांचा उल्लेख आहे.
अनेक प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराचे आरोप देखील आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, माजी अध्यक्ष बिल क्लिंटन आणि हिलरी क्लिंटन यांसारखी हाय-प्रोफाइल नावे कागदपत्रांमध्ये विविध संदर्भात दिसतात. या कागदपत्रांमध्ये आर्थिक व्यवहार, सामाजिक संबंध आणि वैयक्तिक भेटींबद्दल धक्कादायक माहिती आहे. हजारो ईमेल, फोटो आणि व्हिडिओ एपस्टीनचे प्रभावशाली लोकांसोबत असलेले नेटवर्कची गुपिते उघड करत आहेत.
वाढता दबाव आणि एकामागून एक राजीनामे
एपस्टीन फाईलच्या खुलाशानंतर, सार्वजनिक दबावामुळे जगभरातील अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. ब्रिटन आणि नॉर्वेमध्येही अनेक प्रमुख व्यक्तींनी राजीनामा दिला आहे. ब्रिटनमध्ये, पंतप्रधान केयर स्टारमर यांचे चीफ ऑफ स्टाफ मॉर्गन मॅकस्विनी यांना पद सोडावे लागले. अमेरिकेतील ब्रिटनचे राजदूत म्हणून पीटर मँडेलसन यांची शिफारस केल्यामुळे त्यांच्यावर दबाव आला. मॅकस्विनीने जाहीरपणे कबूल केले की हा सल्ला चूक होता आणि त्याची जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला.
नॉर्वेलाही धक्का बसला
एपस्टीन फाइल्सचा परिणाम नॉर्वेमध्येही दिसून आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, वरिष्ठ राजनयिक आणि माजी मंत्री मोना जुल लवकरच एपस्टाईनशी असलेल्या कथित संबंधांमुळे त्यांच्या पदावरून पायउतार होतील. 66 वर्षीय मोना जुल यांनी यापूर्वी नॉर्वेजियन सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केले आहे आणि त्यांनी इस्रायल, ब्रिटन आणि अमेरिकेत नॉर्वेच्या राजदूत म्हणूनही काम केले आहे.
अमेरिकेत सर्वात मोठा परिणाम
एपस्टीन फाइल्सचा अमेरिकेत सर्वाधिक परिणाम झाला. फेब्रुवारी 2026 मध्ये, एपस्टाईनशी त्यांचे ईमेल संपर्क उघड झाल्यानंतर ब्रॅड कार्प यांनी एका मोठ्या कायदा फर्मच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. नोव्हेंबर 2025 च्या सुरुवातीला, माजी अमेरिकन अधिकारी लॅरी समर्स यांनी बोर्ड पदाचा राजीनामा दिला आणि कबूल केले की एपस्टाईनशी असलेले त्यांचे संबंध ही एक गंभीर चूक होती. डिसेंबर 2025 मध्ये वादाच्या भोवऱ्यात एफबीआयचे उपसंचालक डॅन बोन्झिनो यांनीही राजीनामा दिला. जरी त्यांच्याविरुद्ध कोणतेही थेट आरोप सिद्ध झाले नसले तरी, एपस्टाईन फाइल्सच्या आसपासच्या वादामुळे त्यांच्यावर प्रचंड दबाव आला.
युरोपमध्येही परिणाम दिसून आला
या खुलाशांचे युरोपमध्येही गंभीर परिणाम झाले. माजी फ्रेंच मंत्री जॅक लँग यांनी एका प्रतिष्ठित सांस्कृतिक संस्थेच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला. स्लोवाकियामध्ये, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मिरोस्लाव लाजकॅक यांनी ईमेल वादानंतर राजीनामा दिला. स्वीडनमध्ये, एपस्टाईनच्या खाजगी बेटाशी संबंधित आरोप समोर आल्यानंतर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने राजीनामा दिला.
जगभरात सुरु असलेले हे राजीनमासत्र पाहिले असता बहुतेक प्रकरणांमध्ये शिक्षा झालेली नाही. तरीही, एपस्टीनसोबत संबंध उघड झाल्यामुळे व्यापक वाद आणि सार्वजनिक संताप निर्माण झाला. संस्थांची प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता जपण्यासाठी अनेक व्यक्तींनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
SOURCE : ZEE NEWS